Sunday, July 26, 2015

कोकण सफर : ९ : रत्नागिरी

रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. कोकणच्या बाहेर आंबेवाले हापूस आंब्याचे खोके घेऊन बसतात. आणि हा रत्नागिरी, हा देवगड, हा अमुक गावचा असली नावे घेत राहतात. फक्त त्यांच्याकडे पाहून आपल्याला तर काही कळत नाही. समोरचा आपल्याला बनवतोय असंच वाटत राहतं. जाणकारांना वास आणि आणखी पाहून गाव कळत असावं, पण आपल्याला तर नाय बुवा. असो.

रत्नागिरीची हापूसच्या पलीकडेहि ओळख आहे. इथे पाहण्यासारखे खूप काही आहे. आम्ही सर्वप्रथम गेलो रत्नदुर्गला. भारतात अनेक किल्ले असले तरी महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासात किल्ल्यांना विशेष महत्व आहे. तर त्या दृष्टीने हा किल्ला तितका प्रसिद्ध नाही. पण तरी किल्ले पहायला आम्हाला आवडतं.


रत्नागिरीला आम्ही मुक्काम करणार नव्हतो त्यामुळे सगळे सामान घेऊन फिरत होतो. किल्ला काहीसा गावाबाहेर आहे. तिकडे वर्दळसुद्धा अगदी तुरळक. हा किल्ला काही चढायला अवघड नाही. बराच वरपर्यंत रस्ताच दिसत होता. उन भयानक होतं. आम्ही रस्त्यात दोन तीन घरी सामान वर जाऊन येईपर्यंत ठेवता का म्हणुन विचारलं. एका काकूंनी तयारी दाखवली. आम्ही त्यांच्या घरात सामान काढून ठेवलं. आणि पुन्हा किल्ला चढायला लागलो.

वर पोहोचलो. आता जरा हवेची झुळूक सुरु झाली होती. वर फेरफटका मारला. खाली समुद्र, त्यात होड्या, जहाज वगैरे दिसत होते. किल्ल्यावर बघण्यासारखे विशेष काही नसले तरी हा समुद्राचा नजारा छान आहे.

वर एक मंदिर आहे तिथे दर्शन घेतले. काही वेळ अजून टाईमपास केला. मार्लेश्वरला कॅमेराची बॅटरी जी संपली होती ती चार्ज करायला अजून मिळाली नव्हती. त्यामुळे इथे मोबाईलनेच काही फोटो काढले. तेव्हाचे मोबाईल कॅमेरा अगदीच कामचलाऊ होते. ते या फोटोंवरून लक्षात येत असेलच.मग खाली निघालो. खाली जाताना त्या घरून सामान पुन्हा घेतलं. त्या काकुंचे आभार मानून पुन्हा गावात आलो.


मग आम्ही टिळकांचे घर पहिले. त्या घरात टिळकांचा पुतळा, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे राजकारणाव्यतिरिक्त इतर छंद, अभ्यासाचे विषय, त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांची नव्याने ओळख झाली. आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली. इतके वादळी आयुष्य, राजकीय कारकीर्द असूनही त्यांचा इतर विषयातला रस, अभ्यास आणि व्यासंग पाहून आदर शतपटीने वाढला.

मंडालेच्या तुरुंगात लिहिलेले गीता रहस्य तर इतिहासाच्या पुस्तकातल्या धड्यामुळे सर्वांना माहित असते. पण वेदांमधील उल्लेखानुसार आर्यांचे मुळ स्थान आर्क्टिक खंडात आहे असे प्रतिपादन करणारा "दि आर्क्टिक होम इन दि वेदाज" असा ग्रंथ त्यांनी लिहिला हे कळल्यावर मला त्यात रस आला. रामायण, महाभारत, आर्यकालीन इतिहास हे माझे आवडते विषय आहेत. त्यामुळे मी तो ग्रंथ वाचायचा ठरवला. हि सहल संपल्यावर मी लक्षात ठेवुन तो ग्रंथ नेटवरून मिळवला. पण काहीश्या जड भाषेमुळे तो पूर्ण वाचून झाला नाही.

 त्यानंतर आम्ही सावरकर यांनी कल्पिलेल्या सर्व जातीच्या लोकांसाठी खुल्या असलेल्या पतित पावन मंदिरात गेलो. सावरकर हे फक्त कट्टर हिंदू होते, एवढाच सर्वांनी समज करून घेतलेला आहे. पण त्यापलीकडे त्यांच्या कार्याची माहिती लोकांना नसते.

अंदमानात जाईपर्यंतचे त्यांचे आयुष्य प्रसिद्ध आणि सर्वांना माहित आहे. पण तिथे खडतर आयुष्य काढल्यानंतर त्यांची काही अटींवर सुटका करण्यात आली. नजरकैद, आणि सक्रिय राजकारणापासून दूर राहणे, अशा काही अटी होत्या. त्यामुळे त्यांनी धर्म आणि सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केले. काही कडवट अनुभवांमुळे ते कट्टर हिंदू होते खरे. पण आंधळे अनुयायी नाही.

हिंदू धर्माचा, संकल्पनेचा, शब्दाचा त्यांनी सखोल अभ्यास करून आपली मते मांडली. हिंदू धर्मातल्या कित्येक परंपरांवर टीका केली, विसंगती दाखवून दिल्या. तेव्हा दलित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसे म्हणून आंदोलने व्हायची. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून जिथे सर्वांना प्रवेश असेल असे मंदिर योजिले.

हि बाजू लोकप्रिय होण्यासारखी खचितच नाही, आणि तेव्हाच्या राजकारणातल्या अनेक पैलूंमुळे त्यांचे हे कार्य दुर्लक्षित राहिले.

आम्ही तिथे गेलो तेव्हा दुसरे कोणीही नव्हते. वर एका हॉलमध्ये एक छोटेखानी संग्रहालय आहे. आणि तिकीट काढल्यास एक सावरकरांविषयी एक मुद्रित कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळतो. तिथल्या काकांनी आम्ही फक्त तीनच जण असूनही तो कार्यक्रम दाखवला. लगे रहो मुन्नाभाई मध्ये, मुन्नाभाई गांधीजींबद्दल वाचायला वाचनालयात जातो, आणि तिथला ग्रंथपाल भावूक होतो, तत्सम प्रसंग होता तो. पुढे हा चित्रपट आला तेव्हा मला याचीच आठवण आली होती.

तर असे रत्नागिरीत येउन आम्ही या दोन महापुरुषांच्या कार्यामुळे भारावून गेलो. त्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याला निघालो.