Tuesday, July 28, 2015

आमच्या आयुष्यातले कलाम

अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी काल व्हॉटस्‌ऍपवर समजली. आणि सगळ्या ग्रुप्सवर हीच चर्चा सुरु झाली. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झाले.

महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन, प्रकल्प व्यवस्थापक, नेते, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, अशा त्यांच्या अनेक ओळखी आहेत. अनेकांनी त्यांचा आजच्या वृत्तपत्रांमध्ये भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती असा उल्लेख केला आहे, आणि तो अगदी सार्थच आहे.



त्यांच्या या सर्वव्यापी लोकप्रियतेचे एक कारण हे असु शकेल कि त्यांची कुठल्या हि राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. त्यांची राष्ट्रपती बनण्याआधीची पार्श्वभूमी हि वैज्ञानिक होती. त्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी महान होती. आणि मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाने, वक्तृत्वाने, लिखाणाने आणि प्रचंड उत्साहाने अवघ्या देशाला भारून टाकले होते.

ते राष्ट्रपती बनले तेव्हा आम्ही शाळेत होतो. मी अगदी प्रामाणिकपणे कबुल करतो कि कलाम मला ते राष्ट्रपती होण्याआधी माहित नव्हते.सुरुवातीला ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, एवढीच त्रोटक माहिती कळाली. पण त्यांनी कसला शोध लावला हे समजलं नाही.

त्यामुळे हे कोणाला बनवलं राष्ट्रपती असं हि वाटलं होतं. तसेही नागरिक शास्त्रात राष्ट्रपती पद हे मुख्यतः नामधारी आहे, आणि त्याला मर्यादित अधिकार असतात. त्यामुळे हे पद विशेष महत्वाचे नाही म्हणुन काय फरक पडतो असेही वाटले.

पण ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची सविस्तर माहिती छापून यायला लागली, त्यांच्या पुस्तकांची नावे कळायला लागली.

कलाम यांनी राष्ट्रपती पदावर राहून काय काय करता येते हे दाखवायला सुरुवात केली. त्यांनी  भारताला उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न दाखवले. आणि फक्त राजकारण्यांसारखे स्वप्न रंगवत बसले नाहीत. तर हे स्वप्न साकारण्यासाठी भारताच्या तरुणाईला साद दिली. त्यांना प्रेरित केले. मार्गदर्शन दिले.

त्यांचे देशव्यापी दौरे व्हायला लागले. त्यांनी कित्येक शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या. मला आठवतंय त्याप्रमाणे त्यांचे काही लाख शाळा/विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष होते. एक राष्ट्रपती स्वतः इतक्या उत्साहाने लहान थोर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, हे अगदी विलक्षण होते.

देशातले नकारात्मक वातावरण बदलून सकारात्मक करण्यात त्यांनी प्रचंड हातभार लावला . तेव्हा बातम्या, चर्चा, मोठ्यांच्या गप्पा, शिक्षक जी विषयेतर मते मांडत ती, या सर्वातुन भारत हा अत्यंत मागास देश आहे, सरकार अत्यंत फालतू आहे, इथे चांगले काम करता येणार नाही, अशी भावना अगदी आमच्यासारख्या शाळेतल्या मुलांचीसुद्धा होती.

अशाच विचारांमधून, आणि अनुभवांमधून अनेक हुशार भारतीय परदेशी जातात, तिकडे उत्कृष्ट काम करतात. ब्रेन ड्रेन हि मोठी समस्या होती.

कलाम आणि तसेच यांच्या भाषणांमुळे हि मानसिकता थोडी बदलली.

स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने बघावी लागतात. काहीजण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात. बाकीजागच्या जागच्या जागी या पायावरून त्या पायावर भार देत राहतात. कारण त्यांना आपल्याला काय हवे तेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळवावे हे हि ठाऊक नसते. 
- डॉ. ए पी जे अब्दुल कलाम

त्यांचे अग्निपंख हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या एका पुस्तकाने माझ्यावर आणि अनेकांवर खूप प्रभाव पाडला. मी ते वाचनालयातून, मित्राकडून आणि नंतर स्वतः घेऊन असे कित्येकदा वाचले. झपाट्याने वाचले.

त्यातुन त्याचं कार्य किती मोठे आहे हे समजलं. एक माणूस प्रतिकूल परिस्थितून शिकून किती मोठा होतो, केवढी मोठी कामगिरी करून दाखवतो, ह्याचं जिवंत उदाहरण पाहता आलं.

भारतात सुद्धा  DRDO, इस्रो अशा संस्थांमध्ये किती अभिमानास्पद प्रकल्प केले गेले आहेत हे समजले. परदेशी मदतीशिवाय आपण काही करू शकत नाही हा गैरसमज दूर झाला.

आधी शास्त्रज्ञ म्हणजे त्यांनी काही तरी नवीन आणि महत्वाचा शोध लावायला हवा, हा समज बदलला. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आहे तेच तंत्रज्ञान प्रभावीपणे राबवणे, कमी खर्चात आणि कमी सुविधा वापरून बनवणे ह्यालासुद्धा कल्पकता लागते.

कलाम ह्यांची फक्त वैज्ञानिक म्हणूनच नव्हे, तर अशा प्रकल्पात एक व्यवस्थापक, समन्वयक आणि नेता म्हणून देखील कामगिरी खुप मोठी आहे.

अनेक बुद्धिमान लोकांचे नेतृत्व करणे, वरिष्ठ मंडळी, आणि विद्यमान सरकार यांच्यापर्यंत आपल्या कल्पना पोहोचवून मंजुऱ्या मिळवणे, सरकारी अडचणींचा सामना करणे, त्यातून स्वतः नाउमेद न होता आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणे यासाठी कलाम यांच्यासारखाच असामान्य नेता लागतो.

आपल्या समोर असलेल्या प्रतिकुलतेला घाबरून पळ काढण्यापेक्षा तिचा सामना करून चांगली कामगिरी करण्याची त्यांनी जिद्द्द एकदा नव्हे तर अनेकदा दाखवली . त्यामुळेच बाकीच्या देशांनी मदत नाकारून सुद्धा, भारतीय लोकांनी त्यांच्या तोडीस तोड प्रकल्प केले आणि तेही कमी खर्च आणि वेळेत . हीच प्रेरणा दायी परंपरा आताच्या मंगळ यानापर्यंत चालू आहे.

त्यांच्या गाथेमुळे भारतीय असण्याबद्दलचा गंड दूर होऊन त्या जागी उदंड आशावाद आला. अभिमान आणि आत्मविश्वास आला .

त्यांनी दाखवलेले स्वप्न (व्हिजन २०२०) सर्वांनी  पाहिले आणि मी यात सहभागी होऊ शकतो, आणि भारत बदलू शकतो, पुढे जाऊ शकतो हा विश्वास सगळ्यांना आला.

मला आकडेवारी माहित नाही, पण कलाम सर राष्ट्रपती झाल्यानंतर ब्रेन ड्रेन नक्की कमी झाला असेल असं  मनापासुन वाटतं.

भारताच्या इतिहासात अनेक महान लोक होऊन गेले. पण आताच्या काळात ज्यांना समोर बघुन आयुष्य घडवावं, ज्यांच्यामुळे भारतीय असण्याचा अभिमान वाटावा असे खूप मोजके लोक आहेत. त्यांच्यापैकी एक कलाम सर होते.

त्यांना भेटण्याची इच्छा इतकी प्रबळ होती कि फक्त त्यांना भेटण्याची संधी आहे असे समजल्यामुळे आम्ही शाळा बुडवून एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. पण दुर्दैवाने त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

ह्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली, त्यांच्या जाण्यामुळे पोकळी निर्माण झाली, अशी वाक्ये वापरत पोकळी ह्या शब्दाची अतिपरीचायाद अवज्ञा झाली आहे. असे नव्हे कि ती लोक, तेवढी मोठी नसतात, निश्चित असतात. पण त्यांची कामगिरी करून झालेली असते, ते बरीच वर्षे सक्रिय नसतात.

कलाम सरांचे तसे नव्हते. ते शेवटच्या दिवसापर्यंत सक्रिय होते. कार्यरत होते. २०२० अजून यायचे आहे, आणि त्यांचे स्वप्न पूर्णतः प्रत्यक्षात यायला अजून वेळ आहे. ते पूर्ण झालेले आपल्याला त्यांच्या  सोबत पाहण्याचे सौभाग्य लाभायला हवे होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत हि "पोकळी" शब्दशः जाणवते आहे.

आपण त्यांच्या पासून प्रेरणा घेऊयात. आपापल्या क्षेत्रात झोकुन देऊयात. भारतीयाने केलेले प्रत्येक चांगले काम भारताला पुढे नेईल. आपण स्वतःला सक्षम केले कि देश सक्षम होईल. आपण जबाबदारी उचलली कि देश जबाबदार होईल.

आपण झटून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

Sunday, July 26, 2015

कोकण सफर : ९ : रत्नागिरी

रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. कोकणच्या बाहेर आंबेवाले हापूस आंब्याचे खोके घेऊन बसतात. आणि हा रत्नागिरी, हा देवगड, हा अमुक गावचा असली नावे घेत राहतात. फक्त त्यांच्याकडे पाहून आपल्याला तर काही कळत नाही. समोरचा आपल्याला बनवतोय असंच वाटत राहतं. जाणकारांना वास आणि आणखी पाहून गाव कळत असावं, पण आपल्याला तर नाय बुवा. असो.

रत्नागिरीची हापूसच्या पलीकडेहि ओळख आहे. इथे पाहण्यासारखे खूप काही आहे. आम्ही सर्वप्रथम गेलो रत्नदुर्गला. भारतात अनेक किल्ले असले तरी महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासात किल्ल्यांना विशेष महत्व आहे. तर त्या दृष्टीने हा किल्ला तितका प्रसिद्ध नाही. पण तरी किल्ले पहायला आम्हाला आवडतं.


रत्नागिरीला आम्ही मुक्काम करणार नव्हतो त्यामुळे सगळे सामान घेऊन फिरत होतो. किल्ला काहीसा गावाबाहेर आहे. तिकडे वर्दळसुद्धा अगदी तुरळक. हा किल्ला काही चढायला अवघड नाही. बराच वरपर्यंत रस्ताच दिसत होता. उन भयानक होतं. आम्ही रस्त्यात दोन तीन घरी सामान वर जाऊन येईपर्यंत ठेवता का म्हणुन विचारलं. एका काकूंनी तयारी दाखवली. आम्ही त्यांच्या घरात सामान काढून ठेवलं. आणि पुन्हा किल्ला चढायला लागलो.

वर पोहोचलो. आता जरा हवेची झुळूक सुरु झाली होती. वर फेरफटका मारला. खाली समुद्र, त्यात होड्या, जहाज वगैरे दिसत होते. किल्ल्यावर बघण्यासारखे विशेष काही नसले तरी हा समुद्राचा नजारा छान आहे.

वर एक मंदिर आहे तिथे दर्शन घेतले. काही वेळ अजून टाईमपास केला. मार्लेश्वरला कॅमेराची बॅटरी जी संपली होती ती चार्ज करायला अजून मिळाली नव्हती. त्यामुळे इथे मोबाईलनेच काही फोटो काढले. तेव्हाचे मोबाईल कॅमेरा अगदीच कामचलाऊ होते. ते या फोटोंवरून लक्षात येत असेलच.



मग खाली निघालो. खाली जाताना त्या घरून सामान पुन्हा घेतलं. त्या काकुंचे आभार मानून पुन्हा गावात आलो.


मग आम्ही टिळकांचे घर पहिले. त्या घरात टिळकांचा पुतळा, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे राजकारणाव्यतिरिक्त इतर छंद, अभ्यासाचे विषय, त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांची नव्याने ओळख झाली. आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली. इतके वादळी आयुष्य, राजकीय कारकीर्द असूनही त्यांचा इतर विषयातला रस, अभ्यास आणि व्यासंग पाहून आदर शतपटीने वाढला.

मंडालेच्या तुरुंगात लिहिलेले गीता रहस्य तर इतिहासाच्या पुस्तकातल्या धड्यामुळे सर्वांना माहित असते. पण वेदांमधील उल्लेखानुसार आर्यांचे मुळ स्थान आर्क्टिक खंडात आहे असे प्रतिपादन करणारा "दि आर्क्टिक होम इन दि वेदाज" असा ग्रंथ त्यांनी लिहिला हे कळल्यावर मला त्यात रस आला. रामायण, महाभारत, आर्यकालीन इतिहास हे माझे आवडते विषय आहेत. त्यामुळे मी तो ग्रंथ वाचायचा ठरवला. हि सहल संपल्यावर मी लक्षात ठेवुन तो ग्रंथ नेटवरून मिळवला. पण काहीश्या जड भाषेमुळे तो पूर्ण वाचून झाला नाही.

 त्यानंतर आम्ही सावरकर यांनी कल्पिलेल्या सर्व जातीच्या लोकांसाठी खुल्या असलेल्या पतित पावन मंदिरात गेलो. सावरकर हे फक्त कट्टर हिंदू होते, एवढाच सर्वांनी समज करून घेतलेला आहे. पण त्यापलीकडे त्यांच्या कार्याची माहिती लोकांना नसते.

अंदमानात जाईपर्यंतचे त्यांचे आयुष्य प्रसिद्ध आणि सर्वांना माहित आहे. पण तिथे खडतर आयुष्य काढल्यानंतर त्यांची काही अटींवर सुटका करण्यात आली. नजरकैद, आणि सक्रिय राजकारणापासून दूर राहणे, अशा काही अटी होत्या. त्यामुळे त्यांनी धर्म आणि सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केले. काही कडवट अनुभवांमुळे ते कट्टर हिंदू होते खरे. पण आंधळे अनुयायी नाही.

हिंदू धर्माचा, संकल्पनेचा, शब्दाचा त्यांनी सखोल अभ्यास करून आपली मते मांडली. हिंदू धर्मातल्या कित्येक परंपरांवर टीका केली, विसंगती दाखवून दिल्या. तेव्हा दलित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसे म्हणून आंदोलने व्हायची. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून जिथे सर्वांना प्रवेश असेल असे मंदिर योजिले.

हि बाजू लोकप्रिय होण्यासारखी खचितच नाही, आणि तेव्हाच्या राजकारणातल्या अनेक पैलूंमुळे त्यांचे हे कार्य दुर्लक्षित राहिले.

आम्ही तिथे गेलो तेव्हा दुसरे कोणीही नव्हते. वर एका हॉलमध्ये एक छोटेखानी संग्रहालय आहे. आणि तिकीट काढल्यास एक सावरकरांविषयी एक मुद्रित कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळतो. तिथल्या काकांनी आम्ही फक्त तीनच जण असूनही तो कार्यक्रम दाखवला. लगे रहो मुन्नाभाई मध्ये, मुन्नाभाई गांधीजींबद्दल वाचायला वाचनालयात जातो, आणि तिथला ग्रंथपाल भावूक होतो, तत्सम प्रसंग होता तो. पुढे हा चित्रपट आला तेव्हा मला याचीच आठवण आली होती.

तर असे रत्नागिरीत येउन आम्ही या दोन महापुरुषांच्या कार्यामुळे भारावून गेलो. त्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याला निघालो.

Sunday, July 19, 2015

कोकण सफर : ८ : काही मंदिरे

ह्या एका दिवसात आम्ही तीन गावांना भेटी दिल्या.

सर्व प्रथम आम्ही गेलो आडिवरे या गावी. इथे या भागातले प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. कोकण आणि गोव्यातली बरीच मंदिरे कौलारू असतात. एरवी मंदिराचे साधारण प्रवेश, गाभारा, कोरीव भिंती, कळस असे जे स्वरूप असते त्यापेक्षा इथे बरीच वेगळी मंदिरे पाहायला मिळतात.

छायाचित्राचा स्त्रोत
कोकणात जशी कौलारू घरे असतात, तशीच. शाळेत भूगोलात कौलारू घरांचा उपयोग शिकवला जातो. पावसाचे पाणी सहज वाहून जाऊन त्याचा निचरा व्हावा यासाठी कौलारू घरे बांधली जातात. असे पाठांतर आपण केलेले असते, घटक चाचणी, सहामाही असा पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारलेला मला आठवतो. त्यात त्याची बांधणी पण असावी. मला कौलारू घर अथवा मंदिर काहीही पाहिले तरी तो भूगोलाचा धडा आणि ते पाठांतर याची पुन्हा उजळणी होते.

एसटी मंदिराच्या अगदी समोर थांबली. विचारत जावे लागले नाही. अगदी पटकन आणि सहज दर्शन झाले. मंदिर सुंदर होते. मंदिरात एक वेगळ्याच प्रकारची विहीर होती. विहीर वेगळ्या प्रकारची म्हणण्यापेक्षा तिथला पाणी काढण्याचा रहाट खूपच वेगळा होता. आता नीटसा आठवत नाही. पण खूप वेगळा होता. त्याने पाणी काढणे अगदी सोपे होते. तिथे काही बायका पाणी काढत होत्या, तर आम्हीपण थोडं पाणी काढुन पाहिलं होतं.

छायाचित्राचा स्त्रोत
दर्शन करून आम्ही लगेच पुढची बस पकडून कशेळीला गेलो. इथे एक सूर्य मंदिर आहे. सूर्य आपल्याकडे महत्वाचा देव असला तरी त्याची मंदिरे भारतात खूप कमी आहेत. कोणार्कचे सूर्य मंदिर तिथल्या रथामुळे जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर इतके भव्य नाही. थोडेबहुत आडिवरे सारखेच होते. पण आम्ही दुपारी पोहोचलो होतो, आणि त्यामुळे काही गर्दी नव्हती. मंदिरात फक्त आम्हीच होतो. अगदी शांत आणि निवांतपणे देव भेटल्यासारखा वाटला.

तिथून आम्ही गेलो पावसला. पावसला स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. गीता हा ग्रंथ असा आहे, कि त्यात बहुमोल आणि चिरकालीन टिकणारी तत्वे सांगितली आहेत. ज्यांच्या बळावर आपण आयुष्य जगू शकतो, ज्यांचा आधार घेऊ शकतो अशी हि तत्वे आहेत. त्यामुळे अनेक महान लोकांचा (भारतीय आणि परकीय दोन्ही ) गीतेचा अभ्यास असलेला दिसतो.

काही प्रतिभावंत लोकांचा अभ्यास फक्त स्वतःपुरता राहत नाही. त्यांना गीतेवर भाष्य करणे अथवा आपल्या भाषेत ती पुन्हा लिहून काढणे याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वर यांनी सामान्यांना कळण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. विनोबांनी गीताई लिहिली. टिळकांनी गीतारहस्य लिहिले. तसेच या स्वामींनी आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचे आणखीही लेखन आहे. आम्ही या आधी लहानपणी तिथे गेलो होतो तेव्हा हि ज्ञानेश्वरी आम्ही आणली होती.

या मठाबाहेर अगदी स्वस्त दरात (तेव्हा ३ रुपये फक्त, आता अशात ६ रुपयांना आहे असं ऐकलं) कोकम शरबत मिळत होतं. हे मी पिलेलं आतापर्यंतचं सर्वोत्तम कोकम शरबत. अशी सर्वोत्तम चव मिळते तेव्हा मी सहसा एकावर थांबत नाहीच. आणखी एक दोन शरबत रिचवून आम्ही पावसहून निघालो.

पुढे आम्ही एका ठिकाणी (बहुतेक तरी देवरुख) मुक्काम करून नंतर मार्लेश्वरला गेलो. हि जरा वाकडी वाट असली तरी गेलो. एक तर आम्ही पास काढलेला होता त्यामुळे वाकडी तिकडी, उलट सुलट कशीही असली तरी आम्हाला फरक पडत नव्हता. आणि दुसरे म्हणजे आम्ही सहलीचा प्लान करत होतो तेव्हा अक्षयने मार्लेश्वरची खूप स्तुती केली होती. तो तिथे आधी जाऊन आला होता, आणि तिथे जायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्याची पुन्हा जायची प्रबळ इच्छा होती, आणि आम्हाला पण पहिल्यांदा जायची इच्छा होती.

मग चांगलं ठिकाण असेल तर तिथे जायला जी वाट असेल तिकडून तुम्हाला जावंच लागतं. मार्लेश्वर हे शिवाचे मंदिर आहे. हे एवढे वर्णन पुरेसे नाही. मार्लेश्वर हे उंच डोंगरात गुहेतले शिवाचे मंदिर आहे. तिथून जवळच पुढे मोठे धबधबे आहेत. खाली वाहती नदी आहे. अत्यंत सुंदर निसर्गात वसलेलं मंदिर. अक्षय मागे आला होता तेव्हा त्याने इथे जिवंत सापसुद्धा पाहिले होते. पण आम्हाला यावेळी ते दिसले नाहीत.

मंदिरातून बाहेर आल्यावर आम्ही पुढे जाऊन धबधबा पाहायला गेलो. तो तेव्हा पूर्ण जोरात वाहत नसला तरी तो पावसाळ्यात किती भव्य असेल याची कल्पना येत होती. इथे मंदिर धबधबा आणि परत असे यायला जायला खूप चालावे आणि चढावे उतरावे लागते. आम्ही उन्हात फिरून त्रस्त झालो होतो.

पावसाळ्यात पुन्हा यायला हवे असे आम्हाला वाटले. पण ती जागा खरोखर सुंदर आहे, आणि तिथे जाणे वर्थ होते, व्यर्थ नाही.





परत जातांना आम्ही फोटोग्राफी सुरु केली. काही ग्रुप काही सोलो असे फोटो काढले. मी एक फोटोग्राफीचा कोर्स केला असल्यामुळे मी फोटोग्राफर असल्यासारखं मिरवायचो. मित्र माझी उडवायचे, पण फोटो चांगले आले कि कौतुक पण करायचे. मयुरलासुद्धा फोटो काढण्याची हौस होती. जास्त करून मीच फोटो काढायचो पण, मधेच तो कॅमेरा घेऊन तिरप्या तार्प्या पोजमध्ये बसून फोटो काढायचा, आणि पहा कसला भारी फोटो काढलाय अशा अविर्भावात कॅमेरा परत द्यायचा.

पण त्याला फोटो काढून घेण्याची जास्त हौस होती. अक्षयची ती हौस तेव्हा इतकी प्रबळ नव्हती, पण आताशा खूपच वाढली आहे. त्या सहलीत मात्र मयुर फोटो काढून घेण्यामध्ये सर्वात पुढे होता. तो साध्या, फिल्मी अशा पोज तर द्यायचाच. पण त्याला सरकार चित्रपट प्रचंड आवडला होता, आणि त्यामुळे नेते, भाई लोक यांच्यासारखे, बुवा महाराज यांच्या सारखे सुद्धा फोटो काढून घ्यायचा.

कधी कधी मजा म्हणुन उगाच और एक, और एक करून फोटो काढायला लावायचा. मला फोटो काढायला काही अडचण नसली तरी दिवसभर फिरायचे तर बॅटरी जपून पुरवावी अशा विचाराने चिडचिड व्हायची. तशी मस्ती नेहमीच चालू असली तरी या ठिकाणी बॅटरी कमी झाली असल्यामुळे आमचं भांडण झालं होतं. शेवटी कॅमेरा बंद पडला, आणि तो आणि पुढचा दिवस चार्ज करता आला नाही. :D

वाकड्या वाटेने पुन्हा मागे येउन आम्ही रत्नागिरीला गेलो. 

Wednesday, July 15, 2015

दाग अच्छे है

मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. 

त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. 

त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं. ज्या लोकांवर ज्या मोड्यूलची जबाबदारी होती, त्याचं काम संपलं कि ते घरी जात होते. असे करत आम्ही तिघे चौघेच पहाटेपर्यंत उरलो होतो. 

त्यात दोघेजण अगदी जवळच राहत होते. ते पायीपायी निघाले. मी आणि माझी एक मैत्रीण दोघे उरलो. पहाट झाली असली तरी सामसूम असल्यामुळे मी आधी तिला सोडून मग घरी जायचं ठरवलं. 

छायाचित्राचा स्त्रोत
तिथे एक दोनच टॅक्सी होत्या. आम्ही त्यातल्या एकात बसलो आणि निघालो. आम्ही बसुन निघाल्यावर आमचं टॅक्सीमध्ये आजुबाजुला लक्ष गेलं. त्या सीटवर खूपच विचित्र डाग पडलेले होते. मुळचे काळे नसले तरी थोडे काळपट. 




एवढ्या थकव्यानंतर अशी गचाळ टॅक्सी मिळाल्यामुळे आम्ही वैतागलो. 

"कसले कसले लोक बसतात टॅक्सीमध्ये कोण जाणे. किती घाण करून ठेवलंय हे सीट? आणि ह्यांना साफ करता येत नाही का?" इति मैत्रीण. 

"काय हो. सीट इतकं घाण झालंय, आणि तरी तुम्ही कसं काय बसवता लोकांना टॅक्सीमध्ये? ते साफ करा न आधी." मी त्या चालकावर डाफरलो. 

"सॉरी सर. करायचं आहे ते काम. पण राहुन जातंय. करेल सर लवकरच. सॉरी." चालक अपेक्षेपेक्षा विनम्र निघाला. 

छायाचित्राचा स्त्रोत
"आधीच करायचं ना मग. आणि आहेत कसले हे घाणेरडे डाग?" तो फक्त मला उद्देशुन सॉरी म्हणाला म्हणुन बहुतेक तिचा राग अजून कायम होता. 

"रक्ताचे". त्याने असं उत्तर दिल्यावर आम्ही दोघं दचकलो. 

"काय???" मैत्रीण. 

"कुणाच्या रक्ताचे?" मी. 

"मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे साहेब, तुम्ही बसले ना तिथेच हब मॉलसमोर एक अपघात झाला होता.
दोन पोरं गाडीवर चालली होती. त्यांना ट्रकने उडवलं. एक जवळच पडला, आणि एक जरा गाडीसोबत फरफटत गेला."

"एकदम गर्दी जमली होती. लोक नुसते पाहत होते सर. मी ह्या भागात आलो कि इथेच येउन थांबत असतो, तर मी आलो तर मोठा घोळका जमला होता. ट्रकवाला पळुन गेला होता. आणि लोक एकमेकांना कसा अपघात झाला ते सांगत होते. मी जाऊन पाहिलं तर पोरं तशीच पडलेली. कोणी तरी समोरून पाणी आणलं त्यांच्यासाठी, पण दवाखान्यात कोणी नेत नव्हतं."

"फार रक्त सांडलं होतं. पोरं कोवळी होती सर. माझा मुलगा पण त्याच वयाचा असेल. थोडा कमी जास्त."

"मी फार विचार नाय केला. त्यांना गाडीत टाकलं आणि अजुन एका माणसाला बसवलं सोबत अन घेऊन गेलो दवाखान्यात."

"त्यांना दाखल तर करून घेतलं पण नावगाव काही माहित नव्हतं. त्याचं सामान काही असेल तर आम्हाला माहित नव्हतं. तिथे माझं नाव नंबर वगैरे लिहून घेतलं आणि पोलिसांना पण कळवलं."

"खूप वेळ गेला. मी गेलो घरी शेवटी."

"त्यांचा मोबाईल कोणाला तरी सापडला होता. तो पोलिसात जमा झाला. कशीतरी ओळख पटली आणि त्यांचे घरचे दवाखान्यात पोचले. त्यांनी मला धन्यवाद द्यायला बोलवुन घेतलं. साधी पण चांगली माणसं होती सर. त्यांच्या वडिलांनी माझे हात पकडुन आभार मानले, आणि त्यांना एकदम रडु फुटलं."

"खोटं नाय बोलणार सर. पण असं कोणी नेउन सोडलं तर लोक देतात थोडी बक्षीस. मला पण होती थोडी अपेक्षा. आणि आपल्या गाडीचं सीट कव्हर एकदम साधंय न सर. ते रक्त वाळुन डाग पडले. लेदरचं असतं तर पुसता आलं असतं. इथे एकदम अवघड आहे. ते कव्हरच बदलावं लागणार. मला सध्या जरा जड जाइल ते. मी एरवी काही मागितलं नसतं, पण हे नुकसान झाल्यामुळे जरा मागावं वाटलं."

"पण तिथे गेल्यावर पाहूनच कळत होतं, त्या लोकांना उपचार जड चालले होते. एक मुलगा फारच जखमी झाला होता. मला मागावंच वाटलं नाय. बरं नसतं दिसलं ते. आणि त्या वडिलांनी जे माझे हात पकडून बोलले ना, कि तुमच्या मुळेच माझी पोरं जगली, त्याचंच फार समाधान वाटलं."

"माझी गाडी पाहून ते स्वतः म्हटले सर, कि तुमची नुकसान भरपाई देतो म्हणून. पण काही दिवस द्या, सध्या सगळे पैसे उपचारात चाललेत म्हणून. मी म्हटलं राहू द्या साहेब. तुमच्या पोरांचा जीव वाचला त्याच्यात समाधान आहे मला. मी बघेल माझ्या सीटचं."

"ते म्हणाले मला, पोरं बरी झाली कि भेटायला घेऊन येतो त्यांना. तुमचे त्यांना पण आभार मानायला सांगतो."

"तर असंय साहेब. ते साफ करायचं आहे मला, पण थोडा वेळ लागेल. म्हणून थोडे कस्टमर वैतागतात. पण इलाज नाय. काही दिवस हे असंच चालणार. त्या वडिलांना भेटल्यापासून मला त्या डागांचं पण काही वाटेना. म्हणजे मी कोणाचा तरी जीव वाचवल्याची खुण आहे ना सर ती. ती हटवावी लागणारच आहे, पण सध्या मला मेडलसारखी वाटतेय ती."

आम्ही निःशब्द झालो होतो. त्या डागांचं आता आम्हालाही काही वाटत नव्हतं. उलट अश्या चांगल्या माणसाची भेट झाल्याबद्दल छान वाटलं. 

रस्त्यांवर रोज कितीतरी अपघात होतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून खूप जणांचे जीव जातात. आपण अनेकदा असे अपघात जाता येत बघतो. कधी लोक जमलेलेच आहेत बघतील तेच काय ते असं म्हणुन निघून जातो. 

मला अशा वेळी थोडी अपराधी भावना येते. पण ती विसरली सुद्धा जाते. त्या गाडीत बसून मला ते सोडून दिलेले अपघात आठवले. आणि थोडं वाईट वाटलं. ती माणसं वाचली असतील का असा विचार आला. 

प्रत्येक ठिकाणी आपण मदत नाही करू शकत. काही नालायक लोक दुर्जन ठिकाणी अपघाताचे सोंग करून लोकांना लुटमार करतात. कधी पोलिस परेशान करतील अशी भीती असते. अशा कारणांमुळे गरजू लोकांना मदत करण्यास लोक घाबरतात. 

पण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपली गाडी खराब झाली तरी चालेल, आपला थोडा वेळ गेला तरी चालेल पण आपण हे जीव वाचवण्याचा प्रयत्न करूया अशा विचाराने मदत करायला हवी. 

असं करणारा एक माणुस आम्हाला भेटला आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटलं. 

शेवटी मी त्याला मीटर च्या वर १०० रुपये दिले. 

तो म्हणाला "नको साहेब, तुम्ही कशाला पैसे देताय. मी करेल ते काम माझं माझं."

मी म्हटलं त्याला "अहो तुम्ही उपकार किंवा मदत काहीच समजु नका याला. मी काही फार मोठी रक्कम देत नाहीये. तुम्ही जे चांगलं काम केलात त्याबद्दल आमची दाद समजा, कौतुकाने दिलेलं बक्षीस समजा."

त्यादिवशी पहिल्यांदा मला त्या साबणाच्या जाहिरातीतली ओळ सार्थ वाटली. "दाग अच्छे है". 

फेसबुकवरील या दुर्दैवी अपघाताच्या वृत्तांतापासून प्रेरित.

Sunday, July 12, 2015

कोकण सफर : ७ : विजयदुर्ग आणि राजापुर

विजयदुर्ग हा कोकणातला एक प्रसिद्ध किल्ला आहे. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव घेरिया होते. हा शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला आणि मग त्याचे विजयदुर्ग असे नामांतर केले. हा किल्ला शिवरायांच्याहि बऱ्याच आधीपासून अस्तित्वात आहे. शिलाहार राजांनी तो बाराव्या शतकात बांधला असे वाचायला मिळाले.

आधी चहुबाजूंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग होता. पण आता एका बाजुला भर टाकुन तो जमिनीशी जोडला गेला आहे. त्यामुळेच आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अगदी किल्ल्याच्या दारासमोरच उतरलो. आणि तो असा जमिनीवर पाहुन आम्हाला आश्चर्य वाटले. तो सिंधुदुर्गासारखाच बेटावर असेल आणि होडीने जावे लागेल अशी आमची कल्पना होती.

खूपच रणरणतं उन होतं त्या दिवशी. आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये पाणी शरबत वगैरे घेतलं. किल्ला पाहून आल्यावर तिथेच जेवू असं सांगितलं आणि आमचं जड सामान त्याच हॉटेलमध्ये ठेवुन आम्ही किल्ला पाहायला गेलो.

तो सुटीचा दिवस नव्हता, एवढं उन होतं आणि किल्ल्यावर सामसुम होती. इथे आम्हाला कोणी गाईडसुद्धा दिसला नाही. किल्ल्यावर फक्त आम्हीच फिरत होतो. आणि तसाही एक जलदुर्ग नुकताच पाहिला असल्यामुळे रचनेबद्दल थोडीफार कल्पना होतीच. गाईडकडून किल्ल्याचा इतिहास तेवढा नव्याने समजला असता.

छायाचित्राचा स्त्रोत
आम्ही किल्ल्यावर फेरफटका मारला. अगदी निवांत फिरलो. एका बुरुजावर उभे राहून समुद्र न्याहाळला. छान वारं सूटलं होतं म्हणुन एवढ्या उन्हात पण जर थंडावा मिळाला. समोर तळपत्या सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात चमचम करत होते. खूपच सुंदर आणि दिलखेचक दृश्य होतं ते.

किल्ला फिरून बाहेर गेलो. ठरलेल्या हॉटेलमध्ये जेवलो. कोकणात पर्यटन हा मोठा उद्योग आहे आणि तो दिवसेंदिवस फोफावतोय. आजकाल कोकणातल्या कुठल्याही (पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या) गावात जवळपास सगळ्या घरात खानावळी आणि कॉटेज असतात.

कोकणात मांसाहारी अथवा मत्स्याहारी लोकांची चंगळ असते. अशा लोकांना चिकन अथवा माश्याची एखादी छान डिश मिळाली कि ते खुश होतात. ती कोकणात मिळतेच. पण आम्ही तिघे मुख्यत्वे शाकाहारी लोक. मी कधी कधी चिकन किंवा फिश चवीला घेतो, पण आवड नाही. आणि इतक्या गरमीत तर नाहीच नाही. तर शाकाहारी लोकांची मात्र पंचाईत होते.

घरगुती जेवण या शीर्षकाखाली सगळी कडे तेच (तेच!!!) जेवण मिळतं. तुम्ही फक्त व्हेज कि चिकन कि फिश थाळी एवढंच सांगा. व्हेज म्हटलं कि बटाटा, पत्ताकोबी या पैकी एक भाजी, एक पातळ मटकी वगैरेची उसळ आणि सपक वरण भात हा ठरलेला मेनू. काहीच बदल नाही. त्यातली सोलकढी फक्त काय ती आम्हाला आवडायची.

जेवण करून आम्ही पुढे निघालो राजापूरला. राजापुर ला आम्हाला फक्त मुक्कामाला जायचे होते. आणि तिथुन सकाळी पुढच्या प्रवासाला.

आम्हाला बसच्या प्रवासात अगदी मागच्या बाजूला थोड्या पुढेमागे जागा मिळाल्या. त्या बसमध्ये बरेच लोक तो प्रवास रोज करणारे होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. ते एकाच गावात राहणारे, कामानिमित्त रोज सोबत प्रवास करणारे लोक होते. एकमेकांचे मित्रच होते. त्यांच्या आपसातसुद्धा गप्पा आणि हसणे खिदळणे चालू होते. आम्ही त्यांच्यात लगेच मिसळलो.

त्यांनी आमची सगळी हकीकत ऐकली, प्रवास कुठून कसा केला, आता कुठे जाणार ते ऐकलं. मग आमचं कसं चुकलं हे ऐकवलं. (हे अपेक्षितच होतं, पण ते टीकेच्या सुरात नाही तर सहज गप्पांच्या ओघात हे महत्वाचं :D ) तुम्ही इकडून तिकडे मग इकडे मग तिकडे असं करायला पाहिजे होतं असं सांगायला लागले. ह्यावरून त्यांचे आपसात मतभेद झाले. छ्याः, तिकडे काय आहे बघण्यासारखं, अरे तो रस्ता किती खराब आहे, असे त्यांचे दावे प्रतिदावे चालले होते. पण आमचा प्लान चुकला होता ह्यावर त्यांचं एकमत होतं. :)

एक दोघांनी आम्हाला त्यांच्या घरीच राहायला बोलावलं. पण सावंतवाडीमधल्या त्या क्रिकेट कोचच्या आपुलकीचा चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही तो धोका पत्करला नाही. आणि त्यांनी हि फार आग्रह केला नाही. आम्ही बसस्थानका जवळच एका हॉटेलात मुक्काम केला. मला वाटतं त्याच रात्री का दुसऱ्या दिवशी पहाते बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. हॉटेलचा चालक त्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पाहत बसला होता.

आमची मग हॉटेलच्या लॉबीमध्ये भारत पाकिस्तान राजकारणावर बरीच चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. 

Tuesday, July 7, 2015

कोकण सफर : ६ : कुणकेश्वर

कुणकेश्वरला आम्ही रात्री पोहोचलो. अगदी गुडुप अंधार झालेला होता. आम्ही राहायला जागा शोधत फिरू लागलो.

एका घरी काही खोल्या भाड्याने देण्याची व्यवस्था केली होती, तिथे आम्ही चाललो होतो. समुद्राचा आवाज येत होता आणि वारं सुद्धा खुप छान सुटलेलं होतं.

तिथे सुदैवाने आम्हाला जागा मिळाली. काही जणांनी तिथे आधी जागा आरक्षित केलेली होती, पण ऐन वेळेवर त्यांनी बेत रद्द केला, आणि तो आमच्या पथ्यावर पडला. त्यांनी एक मोठी आणि एक छोटी खोली घेतली होती. त्या मालकांच्या सुदैवाने त्यांना दोन्ही खोल्यांसाठी भाडेकरू मिळाले. आम्हाला त्यातली छोटी खोली मिळाली.

ती खोली काही खास नव्हती. पण आम्ही तिथे ज्या वातावरणात पोहोचलो होतो ते इतकं छान होतं कि आम्हाला खोलीबद्दल काहीच वाटलं नाही.

कधी कधी असंच होतं. एखादी गोष्ट वेगळ्याच कारणासाठी आवडते. काही खाण्याच्या प्रसिद्ध जागी बसायलाही जागा नसते. तरी तिथे लोक जातात. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अगदी सुमार असतो, पण ती जागा खूप निवांत असते, तिथे गप्पा छान होतात म्हणून लोक जातात.

हातपाय धुवून आम्ही बाहेर पडलो. कुणकेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे. समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून उंच असं मंदिर बांधलेलं आहे. तिथून किनाऱ्यावर उतरायला मोठ्ठा जिना आहे.

दंतकथा अशी आहे कि एका वादळात अडकलेल्या जहाजावरून एक व्यापारी बचावून या किनाऱ्यावर पोहोचला. आणि त्याने इथे हे मंदिर बांधलं.

आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार गर्दी नव्हती. प्रसन्न आणि मनासारखं दर्शन झालं.

मंदिरात गेलो कि अक्षय त्याला येतील तेवढे सगळे मंत्र आणि स्तोत्र म्हणतो आणि त्याला बाकीच्यांच्या तुलनेत नेहमी जास्त वेळ लागतो. इथे मात्र आम्ही सगळेच प्रसन्न वातावरणामुळे, मंदिराच्या सौंदर्यामुळे, तिथल्या शांततेमुळे भारावून गेलो होतो. अशा ठिकाणी जी देवाशी जवळीक जाणवते, भक्ती दाटते, ती रांगेत लागून, मंदिरात ओळख काढून किंवा पैसे मोजून पास काढून रांगेला बगल देत जे दर्शन उरकलं जातं त्यात कधीच होत नाही.

चराचरात ईश्वर आहे असे मानणाऱ्या आणि शिकवणाऱ्या आपल्या समाजात देवाचे वेगळे मंदिर बांधण्याचा उद्देश देवाजवळ जाता यावे, त्याचा सहवास जाणवावा म्हणूनच असावा. पण आताच्या कर्मकांडांच्या पद्धतीत सगळं काही उरक्ल्याची, फक्त पार पडल्याची भावना होते, देव भेटल्याची नाही.

इथे आम्हीसुद्धा जास्त वेळ बसलो होतो. पण अक्षय त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षासुद्धा खूप जास्त वेळ बसला होता. आम्हाला वाटलं मंत्र एकदा नाही तीनदा म्हणेल. पण अक्षय खूपच वेळ बसून होता. त्याची तंद्री लागली होती. आम्हाला आता आपला मित्र संन्यास घेतो कि काय अशी भीती वाटायला लागली. पण तसं काही झालं नाही, काही वेळाने अक्षय परत माणसात आला.

आम्ही बराच वेळ बाहेर कठड्यावर बसलो.

एक काका भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. पण त्या काकांना तरुण श्रोते मिळाल्यामुळे जास्त हुरूप चढला. माझा अध्यात्माचा सुद्धा अभ्यास आहे, आणि आपण इथे मंदिरात या वातावरणात बसलेलो आहोत तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो असं म्हणून चांगलंच प्रवचन दिलं. आता त्यातलं काहीही आठवत नाही. फक्त असं गाफील पकडून प्रवचन दिल्यामुळे त्या काकांची आठवण राहिली आहे.

आम्ही गावात फेरफटका मारून एका ठिकाणी जेवलो. तिथे अतिशय मोठा ग्रुप आलेला होता. त्यांचा धिंगाणा, मौजमजा चालू होती. थोडावेळ दुरून त्यांची मजा बघितली आणि आम्ही परत रूमवर जाऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर किनाऱ्यावर जायचा विचार होता पण आम्हाला जाग आली नाही. आम्ही उठलो तेव्हा मयुर गायब होता. तो काही वेळातच आला. त्याला जाग आली होती, आणि आम्ही उठलो नाही म्हणून तो एकटाच जाऊन फिरून आला होता. आणि असलं भारी वातावरण होतं यार, खूप मस्त वाटत होतं म्हणून आम्हाला जळवत होता.

या पूर्ण सहलीत कुणकेश्वरला आम्ही जे वातावरण आणि शांतता अनुभवली त्यामुळे या गावाची आणि मंदिराची एक वेगळ्याच प्रकारची रम्य आठवण आहे. काही दिवसांनी एकदा अक्षयला एका वक्तृत्व कलेच्या तासामध्ये आवडत्या जागेबद्दल बोलायला सांगितलं, तेव्हा तो याच जागेबद्दल बोलला.

आम्ही आवरून पुन्हा मंदिरात दर्शन घेतलं. आणि किनाऱ्यावर बराच वेळ घालवला. मग नाश्ता करून आम्ही त्या सुंदर गावातून निघालो.