Sunday, August 4, 2019

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : 
---

आदल्या दिवशी ३-४ किमीचा पिटुकला ट्रेक करून आमचा दिवस नंतर मजेत गेला. पण आज मात्र आमची परीक्षा होती. ३-४ किमीवरून ट्रेकच्या अंतराने थेट पाचपट उडी मारली होती. आज देओरीया ताल ते बनियाकुंड हे जवळपास २० किमी अंतर आम्हाला पार करायचे होते. 

सकाळी आम्ही लवकर तयार झालो. दुपारच्या जेवणासाठी आम्हाला आमचे डबे घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. आज्ञेबरहुकूम सगळ्यांनी छोटे मोठे स्टील किंवा टप्परवेअरचे डबे आणले होते. ते सगळे एकत्र करून त्यात साईझप्रमाणे पोळ्या किंवा भाजी असे कॅम्पवरच्या लोकांनी भरून आम्हाला दिले. ते घेऊन आमचा ट्रेक सुरु झाला. 



हा पूर्ण ट्रेक घनदाट जंगल, हिरवळ, उंच झाडे यांनी आच्छादलेल्या डोंगरांवरून आहे. आणि अंतर खूप असलं तरी दिलाशाची गोष्ट म्हणजे सलग चढ नाही. एखादा डोंगर चढून मग काही वेळ पठार, किंवा काही वेळ उतार असं असल्यामुळे अगदी असह्य होत नाही. 

त्यातही आम्ही मध्येमध्ये पाणी, चॉकलेट्स, बिस्कीट, फोटो अशा अनेक निमित्ताने थांबत थांबत ब्रेक्स घेत होतोच. 



आदल्या दिवशी भरपूर पाऊस झाल्यामुळे ती एक धास्ती मात्र आम्हाला होती. आज खूप मोठा ट्रेक होता आणि त्यात भिजून चालणं नकोसं वाटत होतं. 

पुण्याजवळ पावसाळ्यात खास भिजण्यासाठी आपण ट्रेकला जातो, तिथे भिजण्याची मजा असते. कारण तो ट्रेक करून एका दिवसात आपण घरी येतो, आराम करून पुन्हा रुटीन चालु. 

पण इथे आमच्या ट्रेकचा दुसराच दिवस होता. पुढच्या दिवशीसुद्धा ट्रेक करायचा होता. आणि इथल्या थंड वातावरणात आपल्याला सवय नसल्यामुळे पावसाचा काय परिणाम होईल सांगता येत नाही. ग्रुपमधल्या एक दोघांना हलका तापही येऊन गेलेला होता. 

सकाळी चांगलं ऊन असलं तरी ढगांचा ऊन सावल्यांचा खेळ चालु होता. आणि ट्रेक लीडर आम्हाला पावसाचीच भीती दाखवत पुढे पुढे दामटत होते. 

या रस्त्यात रोहिणी बुग्याल लागतं. बुग्याल म्हणजे मेडोज किंवा कुरण. ह्या भागात असे वेगवेगळे प्रसिद्ध बुग्याल आहेत. त्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकारने इथे कॅम्पिंग, मुक्काम ह्याला मज्जाव केलेला आहे. 



चोहीकडे पसरलेलं पठार, हिरवं गार मैदान, भरपूर गवत असल्यामुळे इथे आसपासचे पहाडी लोक आपली गुरे चरायला येतात. 

असेच काही गढवाली लोक इथे आम्हाला भेटले. पाण्याच्या एका झऱ्याजवळ आम्ही ब्रेक घेतला आणि पाणी भरायला थांबलो. एकदम थंडगार छान पाणी होतं. तिथेच या लोकांनी चूल मांडून दाल चावलचा बेत केला होता. आम्हाला पाहुन त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं, खूप प्रेमाने आग्रह केला. आम्ही सांगितलं कि आमच्याकडे डबे आहेत आणि थोडं पुढे आमचा लंच ब्रेक होणारच आहे. पण ते डब्यातलं थंड जेवण सोडा, आमच्या सोबत गरम खा म्हणून त्यांनी आग्रह केला. 

त्यामुळे आम्ही मान राखण्यासाठी अगदी चवीपुरता वरण भात एका पत्रावळीवर घेतला. आधी २-३ जण होते पण मग बाकी सगळे पण आले आणि सगळ्यांनी त्यात खायला सुरु केलं. तेव्हा त्यांनी अगदी आग्रहाने अजून अजून करत वाढलं. 



मग त्यांना हि मंडळी आपल्या सोबत खात आहेत हे बघुन अजून चांगली व्यवस्था करता आली नाही ह्याची खंत वाटायला लागली. भात कच्चाच राहिला, मीठ कमी पडलं अशा तक्रारी ते स्वतःच करून हळहळ करू लागले. कि आम्ही तर कसंहि बनवुन खातो, तुम्हाला थोडं अजून चांगलं मिळायला पाहिजे होतं. तुम्ही आमच्या घरी आले असते तर काय काय करून खाऊ घातलं असतं. त्यांचं हे प्रेमळ बोलणं बिलकुल तोंडदेखलं वाटत नव्हतं. 

आमचा गाईड स्वतः गढवाली होता. तो आम्हाला अभिमानाने सांगतच असायचा कि तिथली लोकं खूप चांगली असतात, मदत करतात, प्रवाशांची पाहुण्यांची सेवा करतात. त्याच्या भागातल्या अनोळखी लोकांनी आमचा असा पाहुणचार केलेला पाहून त्याचा चेहरा अभिमानाने आनंदाने फुललेला दिसत होता. 

तिथून थोडं पुढे एक डोंगर उतरल्यावर आकाश कामिनी नदीकाठी आमचा लंच ब्रेक झाला. छोटीशी डोंगराळ नदी, तिच्यावर पायी जाण्यापुरता छोटासा पूल, पाण्याचा आवाज, आणि आजूबाजूला डोंगर अशी छान जागा होती. आमचा ट्रेक बराचसा झाला होता. पण तिथे निवांत जेवण झाल्यावर पुढे जाण्याचं जीवावर आलं होतं. 



ट्रेकवर माझा अनुभव असा आहे कि छोटे छोटे ब्रेक्स (तेहि उभ्याउभ्या) घेत गेलो तर अंतर सहज पार होतं. सुका मेवा, चॉकलेट, बिस्किटे असं खात राहिलं तर भूकही लागत नाही. पण विश्रांतीसाठी जास्त वेळ थांबलो, जास्त वेळ बसलो, किंवा पद्धतशीर जेवलो तर त्यानंतर चालायला अवघड होतं. जितक्या वेळा बसू तितकं उठण्या-बसण्यात आपली ऊर्जा जाते, आपली ट्रेकची लय बिघडते. 

मला स्वतःला चढावर दम बराच लागतो आणि उन्हाचाही त्रास होतो. त्यामुळे मी सावकाश एक गती राखत चालत राहतो. दम लागला कि काही सेकंद थांबतो आणि पुन्हा चालायला लागतो. बाकीचे आरामाला थांबले तरी मी शक्यतो टेकण्यासारखं झाड किंवा दगड पाहून उभ्याउभ्याच आराम करायचा प्रयत्न करतो. 

जेवण झाल्यावर सगळ्यांना ट्रेक कधी एकदा संपतो असं झालं होतं. अजून एक दिड तासभर चालल्यावर अचानक एक डांबरी रस्ता लागतो आणि लक्षात येतं कि ट्रेक आता जवळपास संपला. हा रस्ता एका घाटात निघतो. तिथून एका बाजूला चोपता आणि दुसऱ्या बाजूला बनियाकुंड. त्याचा पुढचा ट्रेक चोपतालाच असला तरी आमचा मुक्काम बनियाकुंडला होता. 

तिथून मग उतारावर आरामात रमत गंमत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो. इथे बऱ्याच कॅम्प साईट्स आहेत. पण पाऊस झाल्यामुळे त्यांनी आमच्यातल्या काही जणांना रूम मध्ये राहण्याची सोय केली होती. 

आज २० किमी चालून जवळपास सर्वच जण थकले होते. १०-१५ मिनीट स्ट्रेचिंग करून फार बरं वाटलं. इथे अंधार खूप लवकर पडतो. आणि थंडी सुद्धा भरपूर आहे. सुदैवाने त्यांनी शेकोटीची व्यवस्था केली होती. जेवणाआधी आणि जेवणानंतर आम्ही बराच वेळ शेकोटी जवळच होतो. 

रात्री गरम कपडे, तिथले अतिशय जाड ब्लॅंकेट ह्यात घुसून आम्ही झोपून गेलो. आराम आवश्यक होता. 

पुढच्या दिवशी चंद्रशिला तुंगनाथ हा मुख्य ट्रेक करायचा होता. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात. 

क्रमशः