Friday, June 12, 2015

कोकण सफर : ५ : सिंधुदुर्ग आणि स्नोर्केलिंग

मालवण ला आम्हाला मुख्य आकर्षण होतं ते सिंधुदुर्गाचं. शिवरायांनी बांधलेल्या या प्रसिद्ध जलदुर्गाचं.

मालवण ला पोहोचलो कि लगेच आम्ही चौकशी करत सिंधुदुर्गा साठी जिथून होड्या सुटतात त्या धक्क्यावर आलो. तिकीट काढून होडीत बसलो. सिंधुदुर्ग मालवण जवळ समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. तिथे होडीनेच जावे लागते.

तिकडे जाताना दुरूनच तो दुर्ग दिसायला लागतो. तिथे पोहोचल्यावरच त्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे हे जाणवायला लागते. याआधी मी जंजिरा पाहिलेला असल्यामुळे किल्ल्याची काही वैशिष्ट्ये लक्षात येत होती. जसे कि, हे किल्ले बेटावर असल्यामुळे चहूबाजूंनी गलबते होड्या येऊ शकतात, त्यामुळे दरवाजा छुप्या पद्धतीने बांधलेला आहे. दुरून लवकर लक्षात येत नाही, माहितगार लोकच तिथे त्वरित जाऊ शकतील. तसेच शत्रू आलेच तर त्यांच्यावर दगड, गरम तेल यांनी हल्ले करण्यासाठी सोय करून ठेवलेली आहे.

इथे सुद्धा आम्ही माहिती दाखवण्यासाठी गाईड केला. जवळच एका दुकानात ५ रुपये देऊन आमच्या बॅग तिथे काढून ठेवल्या.

ह्या किल्ल्यावर काही एकमेव अशा गोष्टी आहेत. किल्ल्याच्या प्रवेशा जवळच शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत.

शिवरायांचे मंदिर आहे. शिवरायांना आणि जिजाऊ यांना अनेक जण देव मानत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष मंदिर इथेच आहे. शिवरायांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवांची मंदिरे आहेत.

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटावर गोड पाण्याचा स्त्रोत आहे, हेच पाहून महाराजांनी हा किल्ला बांधला होता.

मालवण हून या किल्ल्यावर येण्यासाठी एक पायी येण्याजोगा रस्ता सुद्धा होता. पाण्यातून च असला तरी तो उथळ भागात असल्यामुळे चालत येण्या जोगा होता. काही गावातले जाणते लोक तो वापरत होते. पण जपान मध्ये आणि दक्षिण भागात सुनामीच्या लाटा जेव्हा आल्या होत्या, तेव्हा त्याचा परिणाम इथपर्यंत झाला आणि ती वाट पाण्यात गेली. निसर्गाच्या रौद्र रूपाचा परिणाम किती दूरवर होतो.

किल्ल्यावर फिरून आम्ही परत होडीने मालवणला पोहोचलो. धक्क्यावर आम्हाला लोक स्नोर्केलिंग साठी विचारात होते. आम्हाला याबद्दल पूर्ण कल्पना नव्हती.

त्यांनी आम्हाला माहिती दिली कि स्कुबा डायव्हिंग मध्ये जसे संपुर्ण संच घेऊन प्रशिक्षित लोक समुद्रात खोलवर जाउन येतात, प्रवाळे, मासे बघतात. पण त्याला प्रशिक्षण लागते ते महागडे असते, संच लागतो तो हि महागडा असतो.

तसे स्नोर्केलिंग हे फार खोल न जाता वरच्या वर पोहत थोडी डुबकी मारत करायचे असते. आणि इथे तिथले गार्ड आपल्या सोबत येउन आपली मदत करतात. आणि संरक्षक जाकीट घालून जायचे असल्यामुळे पोहणे यायची हि गरज नाही.

आम्ही लगेच तयारी दाखवली. पण अक्षयला पाण्याची भीती असल्यामुळे तो तेव्हा यायला तयार झाला नाही. आम्ही त्याला तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो काही बधला नाही.

मी आणि मयुर दोघेच अक्षयकडे सामान ठेवून गेलो. एका होडीत बसून आम्ही पुन्हा सिंधुदुर्गाच्या दिशेने गेलो. सिंधुदुर्गा जवळच पाणी कमी खोल आहे आणि तिथे बऱ्यापैकी उथळ पाण्यात बघण्यासारखी सुंदर प्रवाळेसुद्धा आहेत. त्यामुळे तिथे स्नोर्केलिंगची चांगली सोय झाली आहे, अनेक स्थानिक मुलांना रोजगारसुद्धा मिळाला आहे.

मी तिथे पहिल्यांदाच स्नोर्केलिंग केलं आणि नंतर काही वर्षांनी जकार्ता ला. आणि दोन्ही वेळेसचा अनुभव अगदी सुंदर होता.

पाण्यात गेल्यावर वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. तिथला झिरपणारा प्रकाश, त्यात दिसणारे रंग. परमेश्वराने या दृष्टी आडच्या सृष्टीत रंग अजूनच मनसोक्त उधळले आहेत.

ते लोक आम्हाला माहिती सुद्धा सांगत होते. त्यांच्या अंदाजे ते प्रवाळ ३०० वर्ष आधीचे असावेत. म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळातले.

मी स्नोर्केलिंग करून खूपच खुश झालो होतो. ते करून आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं.

धक्क्यावर पोचल्यावर आम्हाला सार्वजनिक स्नानगृहात अंघोळ करणं भाग होतं आता नेमकं आठवत नाही, पण तिथे नंबर लागण्यात, पाणी आणि साबण मिळण्यात खूप वेळ लागला होता आणि तिथल्या चालकाशी भांडण झालं होतं असं आठवतंय.

अंघोळ झाल्यावर आम्ही गावात जाउन एक प्रसिद्ध खानावळ शोधत होतो, पण तिथे खूप गर्दी होती, आणि वाट बघावी लागणार होती. आम्हाला तेवढी वाट बघवणार नव्हती म्हणुन आम्ही एका अगदी छोट्या खानावळीत गेलो. तिथे फक्त आम्हीच होतो, आम्ही गेल्यावर तिथल्या आजोबांनी स्वयंपाक केला आणि वाढलं. इतकी भूक लागलेली असल्यामुळे आम्ही ते साधंच पण गरमागरम जेवण आनंदाने घेतलं.

मालवणहून आम्ही पुढे निघालो कुणकेश्वरला.

Friday, June 5, 2015

कोकण सफर : ४ : सावंतवाडी आणि आंबोली

कोल्हापुरहून आम्ही रात्रीच्या गाडीने सावंतवाडीला गेलो. सावंतवाडीला अगदी पहाटेच पोचलो. सावंतवाडीला हॉटेल शोधायला मात्र आम्हाला थोडी अडचण आली.

अक्षय सामान घेऊन बसस्थानकावर थांबला. मी आणि मयुर हॉटेल शोधायला बाहेर पडलो. पहाटेच पोहोचल्यामुळे सगळी दुकाने बंद होती. रस्त्यावरसुद्धा सामसुम होती. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर जवळ असल्यामुळे सगळी हॉटेल्स पूर्ण भरलेली होती. कुठेच जागा नव्हती.

मला एका म्हाताऱ्या काकांनी त्यांचा कोकणी हेल काढून टोमणा/सल्ला पण दिला.
"हा सीझन असा ते माहित नाय का तुला? सावंतवाडीस या टायमाला यायचे म्हणजे बुकिंग करायला नको?"

मी आणि मयुर एका चौकातून वेगवेगळे होऊन हॉटेल शोधत होतो. थोड्या वेळातच मला मयुरची हाक ऐकू आली. मयुरसोबत एक म्हातारा कृश माणूस दिसत होता. मी तिकडे गेलो. मयुर म्हणाला हे काका आता आपल्याला नेतील एका हॉटेलवर.

मयुरला अशी कुठल्याही ठिकाणी तिथल्या लोकांशी गप्पा मारत सलगी करायची सवय आहे. ह्या सवयीने त्याचे लोकांशी फार लवकर चांगले संबंध तयार होतात. तो अशा गप्पा मारून बरीच माहिती गोळा करतो. त्याचा आम्हाला आमच्या सहलींमध्ये फायदासुद्धा होतो. आणि आता ह्या सवयीचा त्याला त्याच्या कामातसुद्धा फायदाच होतोय. पण फायद्याबरोबर कधी कधी विचित्र लोक भेटले तर डोक्याला तापसुद्धा होतो, आणि कधी मजेदार किस्से होतात. तसा ह्या माणसाने सावंतवाडीत आमच्या डोक्याला चांगलाच ताप करून ठेवला होता.

पहाटे पहाटे बाकी सगळी सामसूम असताना रस्त्यावर भेटलेल्या माणसाकडून फार काय अपेक्षा करणार?

मला तो माणूस पिलेला वाटत होता. आम्ही त्याच्याबरोबर गेलो. तो त्याच्याबद्दल सांगायला लागला. म्हणे मी क्रिकेट कोच आहे. शाळेतल्या मुलांना शिकवतो. खासगी कोचिंगसुद्धा करतो. गरीब मुलांना मदत करतो.

त्याने आम्हाला एका हॉटेलवर नेलं. बाहेरून ते काही खास वाटतच नव्हतं. पण कोकणात बऱ्याच लोकांनी आपल्या घरात एक दोन खोल्या बांधून घरगुती निवारा सुरु केलेला आहे. आम्हाला वाटलं तसाच हा असेल. आणि काटकसर हे आमचं या ट्रीपचं धोरणच होतं त्यामुळे आमच्या काही अपेक्षा नव्हत्या.

त्याने "अप्पा…" अशी हाक मारून एका म्हाताऱ्याला उठवलं. त्याने आम्हाला सांगितलं होतं कि हे त्याच्या मित्राचं हॉटेल आहे. पण त्या आप्पांनी याला काही भाव दिला नाही. हा माणूस भाडेकरू घेऊन आल्याचं त्याला काही कौतुक नव्हतं. आम्ही भाडं भरलं आणि रूममध्ये गेलो.

इतक्या दळभद्री हॉटेलमध्ये आम्ही त्याआधी आणि त्यानंतरसुद्धा गेलो नाही. सगळ्या भिंतीना ओल लागली होती. पंख्याला काही वेग नव्हता. गाद्यासुद्धा कुबट वासाच्या. एका गाडीला बहुतेक बेडशिटसुद्धा दिलेलं नव्हतं. पण काही इलाज नव्हता. बाकी कुठे जागाच नव्हती. अडला हरी गाढवाचे पाय धरी.

तो माणुस आमच्या मागेमागे रूमवर आला होता. आम्हाला रूम आवडली नव्हती हे बघून लगेच म्हणाला चला मग माझ्या घरी चला. मीपण माझ्या घरी खोल्या बांधलेल्या आहेत . मी तुम्हाला आधीच म्हणणार होतो. पण तिथे माझ्या कोचिंगची मुलं राहतात. म्हटलं तुम्ही शहरातली माणसं तुम्हाला असं शेरिंग मध्ये चालणार नाही. म्हणून इथे घेऊन आलो.

आम्ही आता हा त्याच्या घरी घेऊन जाइल या भीतीने हॉटेलमधेच ठीक आहे म्हणून सांगितलं. तो माणूस मी संध्याकाळी चक्कर मारतो (कशाला???) म्हणून निघून गेला.

आम्ही आवरायला म्हणुन रूमच्या बाहेर असलेल्या संडास बाथरूमकडे गेलो. अतिशय गलिच्छ होतं. आम्ही शेवटी त्या सकाळी आणि दुसऱ्या सकाळी जवळच बसस्थानकावर असलेल्या सुलभमधेच पैसे देऊन प्रातःविधी उरकले.

सावंतवाडीला तिथली लाकडी खेळणी आणि जवळचा एक किल्ला बघायचा आमचा बेत होता. पण असं कळलं कि तो किल्ला चढायला फार अवघड होता आणि बघायला काही विशेष नव्हतं. आणि तिकडे जायचं तर सकाळी खूपच लवकर जायला हवं होतं.

कोणीतरी आम्हाला आंबोलीला जाण्याबद्दल सुचवलं. आणि आम्ही सावंतवाडीला येउन चुकलो, कोल्हापूरहून सावंतवाडीला येताना आधी आंबोली लागतं, तर आधी आंबोलीलाच जायला हवं होतं असंही सांगितलं. आंबोली आमच्या आधीच्या प्लानमध्ये नव्हतं. पण आंबोलीबद्दल माहिती ऐकून आम्ही तिकडे गेलो.

छायाचित्राचा स्त्रोत
आंबोली हे माळशेजसारखं मोठ्ठ्या घाटावर असलेलं गाव आहे. घनदाट झाडी, डोंगरदऱ्या असलेलं हे गाव महाबळेश्वर आणि माळशेज सारखंच प्रेक्षणीय आहे. आम्हाला हे गाव खूप आवडलं.

इथे बसमधून उतरताच पन्हाळ्यासारखे रिक्षावाले आमच्याजवळ आले. आम्ही एक रिक्षा आंबोलीमधली ठिकाणे पाहण्यासाठी ठरवली. त्यानेच आम्हाला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नेउन आणलं आणि माहितीसुद्धा दिली.

छायाचित्राचा स्त्रोत
आंबोलीत आम्ही तिथे एक कायम वाहणारा धबधबा पाहिला. हिरण्यकेशीच्या उगमस्थानी असलेलं महादेव मंदिर आणि आणखी काही मंदिरे पाहिली. एक इको पॉइन्ट पाहिला. तिथे एका स्थानिक शिल्पकाराने लाकडी खेळणी आणि शोभेच्या वस्तु विक्रीस ठेवल्या होत्या. अक्षयने तिथे थोडी खरेदी केली.

हि खरेदी सहलीच्या सुरुवातीच्या भागात केल्यामुळे आम्हाला पूर्ण सहलीत ती घेऊन फिरावं लागलं. त्यातल्या एक दोन वस्तू इतक्या विचित्र आकाराच्या होत्या कि त्यांच्या टोकदारपणामुळे पिशवी फाटत होती, मोठ्या आकारामुळे आमच्या बॅगमध्ये ठेवता येत नव्हती. आम्हाला ती तशीच हातात घेऊन फिरावं लागलं. एक दोनदा आम्ही हि पोस्टाने घरी पाठवून देता आली असती तर किती छान झालं असतं असासुद्धा विचार केला.

असो. तेव्हा आम्हाला सगळ्यांना नंतर कटकट वाटल्या त्या गोष्टींना शेवटी अक्षयच्या घरी शोकेसमध्ये जागा मिळाली आणि त्या तिथून सगळीकडे बाळगत घेऊन येण्याचं सार्थक झालं.

आंबोली पावसाळ्यात आणखी छान असणार याचा अंदाज येतच होता. आमचा प्लान नसतानासुद्धा आमचं इथे येणं झालं ते कोणा अज्ञात माणसाच्या सल्ल्यामुळे.

रिक्षावाल्याने आम्हाला सनसेट पॉइन्टसुद्धा दाखवला. पण तोपर्यंत आम्हाला थांबता येणार नव्हतं. आम्ही परत एसटी पकडून सावंतवाडीला गेलो. हि थोडी उलटीच पण छान चक्कर झाली होती. आंबोली तेव्हापेक्षा आता खूपच लोकप्रिय ठिकाण झालेलं आहे.

सावंतवाडीला संध्याकाळी आम्ही लाकडी खेळण्यांची दुकाने पहायला जाणार होतो. पण तेवढ्यात तो माणूस टपकला. आणि चला मी घेऊन जातो म्हणून आमच्यासोबत लटकला. मला त्याला टाळावं वाटत होतं कारण तो पैसे मागणार याची मला खात्री होती. पण तो ओळखीच्या दुकानात नेउन सवलत मिळवून देईल अशा आशेवर आम्ही गेलो. त्याने एका ओळखीच्या ठिकाणी नेलं खरं, पण ते अगदीच छोटं आणि घरगुती दुकान होतं. त्यामुळे तिथे खूपच कमी मोजकी खेळणी होती. त्यात वैविध्यसुद्धा नव्हतं.

आम्ही तिथे काही न घेता पुढे एका मोठ्या दुकानात गेलो. तो माणूस बाहेरच थांबला. आम्ही तो कटावा म्हणून भरपूर वेळ त्या दुकानात घालवला. पण तो काही कटला नाही. त्या दुकानात मात्र खूप प्रकारची छान खेळणी आणि वस्तू उपलब्ध होत्या. पण थोड्या महागसुद्धा होत्या. तिथून आम्ही काही वस्तु घेतल्या.

बाहेर तो माणुस आम्हाला जेवायलासुद्धा त्याच्या ओळखीच्या जागी न्यायच्या तयारीत होता. आम्ही शेवटी त्याला कटवायचं ठरवलं आणि त्याने पैसे मागितले. आम्ही काही ३०-४० रुपयेच दिले असावेत. तेवढ्यात त्याचा पिच्छा सुटला हे नशीब. ३०-४० रुपयांसाठी सकाळी आणि संध्याकाळी इतका वेळ गावात नव्या लोकांना चिटकणारा असा हा अजब क्रिकेट कोच होता. जाता-जातासुद्धा तो आम्हाला जेवण्यासाठी हॉटेल सांगून गेलाच.

त्याने आम्हाला राहण्यासाठी नेलेलं हॉटेल, लाकडी खेळण्यासाठी नेलेलं दुकान याचा इतका छान अनुभव असल्यामुळे आम्ही हटकुन त्याने सांगितलेलं हॉटेल सोडून दुसऱ्याच ठिकाणी जाउन जेवलो.

रूमवर परत येउन कशीबशी त्या भयानक हॉटेलमध्ये रात्र काढली आणि सकाळी (बसस्थानकावर) आवरून मालवणला निघालो.