Wednesday, February 22, 2012

समाप्त

लहानपण देगा देवा... हि मी सुरु केलेली ब्लॉग्सची मालिका मी आज संपवत आहे. न सरले लहानपण हा त्यातला खऱ्या अर्थाने शेवटचा लेख होता. हा फक्त एक मालिकेवर एंडिंग नोट.


मनात घोळत असलेल्या काही आठवणी, लहानपनावारचे विचार, काही आधीपासून डोक्यात होते, काही हि मालिका सुरु केल्यामुळे सुचले, अशा सगळ्या सामुग्रीसाहित मी हे लेख लिहिले. माझ्या लहानपणाबद्दल असल्याने साहजिकच मला लिहिताना आनंद झालाच.

 आत्मचरित्र लिहायचं नाही हे माझ्या डोक्यात आधीच स्पष्ट होतं. फेसबुकवर ८०च्या दशकात जन्मलेल्या लोकांविषयी एक जनरल पोस्ट वाचून मला यावर लिहायची कल्पना सुचली. त्यामुळे जमेल तितकं जनरल लिहायचं मी प्रयत्न केला. अशा आठवणी लिहिल्या ज्यातले प्रसंग थोड्या फरकाने सगळ्यांनी अनुभवले असतील. थोडं जमलं थोडं राहिलं.

त्यामुळे एका मर्यादेपलीकडे आठवणी लिहायला हि मर्यादा होत्या. माझं सगळं लहानपण, आणि मी कसा घडलो हे सांगत बसायला मी काही महापुरुष नाही. त्यामुळे short & sweet  असंच या मालिकेचं स्वरूप राहावं याचा मी प्रयत्न केला.

माझे ब्लॉग्स सातत्य आल्यापासून चांगले वाचले गेले. ( माझ्या मेल करण्याचाही फायदा झाला. :-) ) संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. ज्यांनी वाचलं त्यातल्या बहुतेकांना त्यांचं लहानपण या न त्या मार्गे आठवलं. माझा एक उद्देश सफल झाला.

मी मराठी सोबत अमराठी मित्रांसाठी इंग्लिशमध्ये लिहायचं प्रयत्न केला, विषय सोपा असताना जमलं ते, पण थोडे हाय फाय विषय आणि मराठी आल्यानंतर तेच हाय फाय इंग्लिश मध्ये लिहायला मला जमलं नाही. शब्दासंपदेचा अभाव आणि आळस हि त्यामागची कारणे. असो.

वाचणाऱ्यांना आणि लिहिणाऱ्या मला लहानपणीच्या आठवणीतून आनंद मिळाला. तो आनंद मनात ठेवून मी या मालिकेतून निरोप घेतो.

समाप्त.

न सरले लहानपण


मागच्या पोस्टमध्ये मी म्हणालो होतो कि, कर्मयोगाचं तत्वज्ञान आपण उपजतच पाळत होतो, पण त्याचा आपल्याला विसर पडलेला असू शकतो. फक्त ती स्मृती जागवण्याची गरज आहे. लहानपणाचं तसंच आहे. मोठेपणाची पुटे चढलीएत फक्त मनावर, आपण अजूनही लहानच आहोत

वय झाल्यासारखं वाटत असेल तर घरातल्या, बाहेरच्या मोठ्या लोकांकडे पहा, आपण अजूनही लहान आहोत.

काही करून दाखवल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या क्षेत्रात सर्वोच्चपदी पोचलात का पहा, करण्यासारखं सगळं संपलं का पहा, उत्तर नकारार्थी आलं तर लहानच आहोत आपण.

क्षुल्लक गोष्टींचा राग येत असेल तर लहान आहोत आपण

बहुतेक गोष्टी, निर्णय कोणा न कोणावर अवलंबून असतील, तर लहान आहोत आपण

"तो झिंदा हो तुम"च्या स्टाइलमध्ये असं बरंच काही म्हणता येईल.. पण मग तसं असेलच तर लहानपण देगा देवा म्हणण्यात अर्थ काय? लहान व्हावं का वाटतं परत?

कारण मोठेपणाचे प्रॉब्लेम्स सुरु झालेत थोडे. इगो, अहंकार, शंकेखोरपणा ई.

आपल्याला वयाने लहान होणं या जन्मात तर शक्य नाही. पुढचा जन्म आहे कि नाही देव जाणे. मग शक्य आहे ते फक्त वृत्तीने लहान होणे.

घरातल्या एका छोट्या मुलाला सांगून पहा, हे काम तुला नाही जमणार. करून खरं पटल्याशिवाय नाही ऐकणार तो. आज आपल्याला कोणी सांगतो अरे हे काम नाही जमायचं तुला / सूट नाही होणार / वगैरे वगैरे.. आपण बहुतेक करून ते ऐकूच. त्यापेक्षा करके देखो!!

लहान मुलासोबत प्लान बनवून पहा एखादा.. त्याला जे काही प्रश्न पडतील ते त्याला माहिती नसल्यामुळे. आणि ते काम कसं करायचं याच स्वरूपाचे. ते काम न होऊ शकण्याची कारणे आणि शंका त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता फारच कमी. आपलं तसं होऊ शकतं मनात आणलं तर.

sense of achievement कमी असतो लहान असताना. बोलता येणं, चालणं याची पालक खबर ठेवत असले तरी मुलं आपल्या प्रगतीचा विचार नाही करत. ऐकतील तेवढे शब्द शिकतात, चालवेल तेवढं चालत जातात. आपणही सोडून देऊयात कि असे विचार कि आपण किती शिकलो आणि काय मिळवलं.. चिल्लर पार्टीला जसं प्रत्येक चॉकलेट प्यारं असतं तसं आपल्याला आपलं प्रत्येक झालेलं काम, मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतील. आपण शिकणं करणं सोडणार नाही.. त्यामार्गे आपण काही चांगलं मिळवूच हे सांगायला नको.

तर शेवटी सांगायचं हेच कि वयाने वाढ/घट आपल्या हातात नाही. अक्कल तर वाढलीच पाहिजे नाही तर इस जालीम दुनियामे जिया जाये कैसे? :-D आणि वृत्तीने लहान राहिलो तर मस्त मजेत जगता येईल, काही करून दाखवता येईल.

सोडोनिया आव मोठेपणाचा,
कधी लहान होऊन पहावे ।
बाळगत मनी सतत उत्साह,
अनुभव घ्यावे नित नवे ।।

बनोनिया कर्ता कार्यच करावे,
विसराव्या शंका किंतु नि पण ।
आकाश म्हणे मोठा तोची झाला,
सरून ज्याचे न सरले लहानपण ।।

Monday, February 6, 2012

छोट्यांचा कर्मयोग

हा लेख मी कर्मयोगावरची आध्यात्मिक चर्चा, प्रवचन, निरुपण अशा कुठल्याही उद्देशाने लिहिलेला नाही. तर जे ज्ञान आणि रहस्य शोधण्यात लोक वणवण भटकतात, पुस्तकांच्या राशी वाचून काढतात, प्रबंध लिहून पीएचडी करतात, ते खरं तर आपण उपजतच घेऊन येतो, पण नंतर त्याची पद्धतशीर वाट लागते हे दाखवण्याच्या उद्देशाने लिहिला आहे.

महाभारताच्या अंतिम निर्णायक युद्धासाठी सज्ज झाल्यावर समोर नातेवाईकांना, गुरुजनांना विरुद्ध उभे पाहून अर्जुनाची लढण्याची इच्छा डळमळीत झाली, तो संभ्रमित झाला आणि त्याला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने त्याला गीता सांगितली हे सर्वश्रुत आहे. त्याचा उपदेश फक्त युद्धावर थांबला नाही, अर्जुन विचार करून जे जे प्रश्न विचारात होता, त्यांच्या अनुषंगाने कृष्णाने अवघे आयुष्य पुरून उरेल असे तत्वज्ञान सांगितले. त्याची मुख्य शिकवण म्हणजे कर्मयोग.

फक्त काम करणे आपल्या हातात आहे, फळ काय मिळेल ते नाही. त्यामुळे मिळालेल्या फळाची चिंता न करता, मनासारखे मिळाल्यास जास्त आनंद किंवा न मिळाल्यास फार निराश न होता, क्रियाशील राहणे महत्वाचे. आपले कर्तव्य पार पाडताना आपले लोक जरी आड आले, त्यांच्या मोहात न पडता कर्तव्य पार पाडायला हवे. हा त्या शिकवणीचा सार.


आपण नीट पाहिलं, तर लहान मुलं आपोआप हि तत्वे जगत असतात. त्यांना कोणीही शिकवत नाही. उलट शिकून सावरून ती या तत्वांच्या विरुद्ध जगायला लागतात आणि मग नव्याने शिकायला अर्जुनासारखे प्रयास पडतात, स्वतः भगवंताला कष्ट घेऊन ते शिकवावे लागतात. मी काही उदाहरणे देऊन हे सांगायचा प्रयत्न करतो.

१. अविरत कार्यारतता
काम करताना सर्वात जास्त समाधान आणि आनंद मिळतो, काम पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. ह्याचा अनुभव मी स्वतः कित्येकदा घेतलाय. कॉलेज चालू असताना आनंद असायचा तसा पदवीधर झाल्यापासून घेतलेला नाही. प्रोजेक्टवर काम करताना मजा येते, कधी ताणही पडतो. प्रोजेक्ट संपल्यावर काही दिवस हायसं वाटतं, पण नंतर परत नवा प्रोजेक्ट पटकन सुरु व्हावा असं वाटतं, बेंचवर बसणं फारसं कोणालाही नको असतं.

बहुतांश लहान मुले कधीही शांत बसत नाहीत. त्यांना कायम काही न काही चाळा, खेळ लागतो. थकवा येईपर्यंत त्यांचे उद्योग चालूच असतात, आणि मग थकल्यावर ते काही विचार न करता शांत झोपी जातात. एखादी गोष्ट करायला घेतली, तर मनापासून करतात, आणि ती जमली न जमली तरी त्याचा आनंद आणि दुःख फार मनावर न घेता आणखी नवा उद्योग शोधतात.

त्यांना प्रत्येक काम करण्यात रस असतो. पांघरुणाची घडी घालणे, दरवाजा उघडणे, बटन दाबणे, टीवीचा रिमोट वापरणे, आईच्या स्वयंपाकात लुडबुड करणे, ईत्यादि. सगळंच करून पहायचं असतं. आता आपण जशी काही कामे करण्यात जास्त रस घेतो, आणि काही कामे करण्यात मुळीच नाही, तो प्रकार वयासोबतच वाढतो. आवडी निवडी, प्राधान्य बनल्यावर.

२. कामासाठीच काम
याला मी उदाहरण देईन ते अभ्यासाचं, शिकण्याचं. परीक्षेसाठी अभ्यास कि ज्ञानासाठी अभ्यास याचं

परीक्षा, स्पर्धा यांचं वाजवीपेक्षा जास्त महत्व पालकच त्यांच्या मुलांच्या मनावर बिम्बवतात. तोपर्यंत मुलं शिकवलेलं सगळं शिकतात. कुठला भाग परीक्षेत येईल, काय जास्त महत्वाचं हे त्यांच्या गावीदेखील नसतं. आपली प्रगतिपुस्तके तपासून पहा लहानपणापासून, तुमच्या लक्षात येईल. तुमचे सर्वात जास्त मार्क बालवाडी, पहिली दुसरीच्या दरम्यानचेच असतील. (संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमधे सारखे मार्क (कमी/जास्त) असतील तर तुम्ही अल्पसंख्य आहात :-P)

परीक्षेसाठी अभ्यास हि कल्पना आयुष्यात आली कि शिकण्याची वाट लागते म्हणजे लागतेच. झानासाठी अभ्यास हद्दपार. मग गणिताचे ए बी सी डी असे ग्रुप्स पडतात. मराठी साहित्याचे भाग म्हणून ठेवलेले धडे, आणि कविता, एक संदर्भासहित, दोन पाच सहा ओळीत, एक दहा बारा ओळीत, ३ एका वाक्यात, असे प्रश्नांचे स्त्रोत म्हणून आपल्या वाट्याला येतात. इतिहासाचं आकलन परीक्षेत ठरलेल्या घटनांच्या पार्श्वभूमी आणि परिणामांच्यापलीकडे जात नाही. काही विषयांमध्ये किती मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले आहेत, यापलीकडे काही न मोजणाऱ्या परीक्षांचा पालकांसोबत मुलंसुद्धा मग बाउ करतात. अपयशी झाले तर आत्महत्यासुद्धा करतात. 

३.अखंड प्रवाही राहणे
आयुष्य नदीसारखं मानलं तर समुद्राला मिळण्यात अखेर होईपर्यंत तिने वाहत राहायला हवं. कारण साचलं तरी पाणी हळूहळू गढूळ होत जातं. कोणी येऊन गाळ काढण्याचे प्रयत्न करेपर्यंत. म्हणून एखाद्या ठिकाणी पोचल्याचा आनंद मनात ठेवून तिथेच रेंगाळण्यापेक्षा पुढे निघणे चांगले. उदाहरण पुन्हा शिकण्याचेच देतो.

परीक्षा हा शिकण्यातला फक्त एक टप्पा आहे. महत्वाचं ते शिकणं, टप्पा नाही. लहान मुलांना बरेच दिवस आपण कुठली गोष्ट कितपत शिकलोय याचा काहीच अंदाज नसतो, म्हणून ते समोर येईल ते शिकत जातात. एखादा टप्पा गाठला म्हणून शिकण्याची इच्छा कमी होत नाही. गीता हेच शिकवते, कि कुठल्याही टप्प्यावर घोटाळू नका, आनंद आणि शोक उरका आणि चालायला लागा. हे आपण नाकारलं तरी बदलत नाही.

रूढ अर्थाने शिक्षण संपलं म्हणजे शिकणं संपलं असं समजणारे आयुष्यभर नाखूष राहतात. बदल झाला कि कुरकुर करतात. कम्प्युटर आले तेव्हा नाक मुरडणाऱ्या लोकांना शेवटी तो शिकावाच लागला. यावरून हेच दिसतं कि बदलाला सामोरे जाऊन जुळवून जे घेतात, त्यांच्यासाठीच आयुष्य आनंदी आणि सुकर असतं.

तात्पर्य हेच कि कर्मयोगाचं महान तत्वज्ञान आपल्या आतमधेच आहे. जगाचा आपल्यावर जितका प्रभाव पडला असेल तितका आपल्याला त्याचा विसर पडला असेल. गरज आहे ती लहान होऊन त्याला जागवण्याची, आणि त्यानुसार वागण्याची...