Wednesday, February 22, 2012

न सरले लहानपण


मागच्या पोस्टमध्ये मी म्हणालो होतो कि, कर्मयोगाचं तत्वज्ञान आपण उपजतच पाळत होतो, पण त्याचा आपल्याला विसर पडलेला असू शकतो. फक्त ती स्मृती जागवण्याची गरज आहे. लहानपणाचं तसंच आहे. मोठेपणाची पुटे चढलीएत फक्त मनावर, आपण अजूनही लहानच आहोत

वय झाल्यासारखं वाटत असेल तर घरातल्या, बाहेरच्या मोठ्या लोकांकडे पहा, आपण अजूनही लहान आहोत.

काही करून दाखवल्यासारखं वाटत असेल तर तुमच्या क्षेत्रात सर्वोच्चपदी पोचलात का पहा, करण्यासारखं सगळं संपलं का पहा, उत्तर नकारार्थी आलं तर लहानच आहोत आपण.

क्षुल्लक गोष्टींचा राग येत असेल तर लहान आहोत आपण

बहुतेक गोष्टी, निर्णय कोणा न कोणावर अवलंबून असतील, तर लहान आहोत आपण

"तो झिंदा हो तुम"च्या स्टाइलमध्ये असं बरंच काही म्हणता येईल.. पण मग तसं असेलच तर लहानपण देगा देवा म्हणण्यात अर्थ काय? लहान व्हावं का वाटतं परत?

कारण मोठेपणाचे प्रॉब्लेम्स सुरु झालेत थोडे. इगो, अहंकार, शंकेखोरपणा ई.

आपल्याला वयाने लहान होणं या जन्मात तर शक्य नाही. पुढचा जन्म आहे कि नाही देव जाणे. मग शक्य आहे ते फक्त वृत्तीने लहान होणे.

घरातल्या एका छोट्या मुलाला सांगून पहा, हे काम तुला नाही जमणार. करून खरं पटल्याशिवाय नाही ऐकणार तो. आज आपल्याला कोणी सांगतो अरे हे काम नाही जमायचं तुला / सूट नाही होणार / वगैरे वगैरे.. आपण बहुतेक करून ते ऐकूच. त्यापेक्षा करके देखो!!

लहान मुलासोबत प्लान बनवून पहा एखादा.. त्याला जे काही प्रश्न पडतील ते त्याला माहिती नसल्यामुळे. आणि ते काम कसं करायचं याच स्वरूपाचे. ते काम न होऊ शकण्याची कारणे आणि शंका त्याच्या डोक्यात येण्याची शक्यता फारच कमी. आपलं तसं होऊ शकतं मनात आणलं तर.

sense of achievement कमी असतो लहान असताना. बोलता येणं, चालणं याची पालक खबर ठेवत असले तरी मुलं आपल्या प्रगतीचा विचार नाही करत. ऐकतील तेवढे शब्द शिकतात, चालवेल तेवढं चालत जातात. आपणही सोडून देऊयात कि असे विचार कि आपण किती शिकलो आणि काय मिळवलं.. चिल्लर पार्टीला जसं प्रत्येक चॉकलेट प्यारं असतं तसं आपल्याला आपलं प्रत्येक झालेलं काम, मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतील. आपण शिकणं करणं सोडणार नाही.. त्यामार्गे आपण काही चांगलं मिळवूच हे सांगायला नको.

तर शेवटी सांगायचं हेच कि वयाने वाढ/घट आपल्या हातात नाही. अक्कल तर वाढलीच पाहिजे नाही तर इस जालीम दुनियामे जिया जाये कैसे? :-D आणि वृत्तीने लहान राहिलो तर मस्त मजेत जगता येईल, काही करून दाखवता येईल.

सोडोनिया आव मोठेपणाचा,
कधी लहान होऊन पहावे ।
बाळगत मनी सतत उत्साह,
अनुभव घ्यावे नित नवे ।।

बनोनिया कर्ता कार्यच करावे,
विसराव्या शंका किंतु नि पण ।
आकाश म्हणे मोठा तोची झाला,
सरून ज्याचे न सरले लहानपण ।।

2 comments: