Monday, February 6, 2012

छोट्यांचा कर्मयोग

हा लेख मी कर्मयोगावरची आध्यात्मिक चर्चा, प्रवचन, निरुपण अशा कुठल्याही उद्देशाने लिहिलेला नाही. तर जे ज्ञान आणि रहस्य शोधण्यात लोक वणवण भटकतात, पुस्तकांच्या राशी वाचून काढतात, प्रबंध लिहून पीएचडी करतात, ते खरं तर आपण उपजतच घेऊन येतो, पण नंतर त्याची पद्धतशीर वाट लागते हे दाखवण्याच्या उद्देशाने लिहिला आहे.

महाभारताच्या अंतिम निर्णायक युद्धासाठी सज्ज झाल्यावर समोर नातेवाईकांना, गुरुजनांना विरुद्ध उभे पाहून अर्जुनाची लढण्याची इच्छा डळमळीत झाली, तो संभ्रमित झाला आणि त्याला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने त्याला गीता सांगितली हे सर्वश्रुत आहे. त्याचा उपदेश फक्त युद्धावर थांबला नाही, अर्जुन विचार करून जे जे प्रश्न विचारात होता, त्यांच्या अनुषंगाने कृष्णाने अवघे आयुष्य पुरून उरेल असे तत्वज्ञान सांगितले. त्याची मुख्य शिकवण म्हणजे कर्मयोग.

फक्त काम करणे आपल्या हातात आहे, फळ काय मिळेल ते नाही. त्यामुळे मिळालेल्या फळाची चिंता न करता, मनासारखे मिळाल्यास जास्त आनंद किंवा न मिळाल्यास फार निराश न होता, क्रियाशील राहणे महत्वाचे. आपले कर्तव्य पार पाडताना आपले लोक जरी आड आले, त्यांच्या मोहात न पडता कर्तव्य पार पाडायला हवे. हा त्या शिकवणीचा सार.


आपण नीट पाहिलं, तर लहान मुलं आपोआप हि तत्वे जगत असतात. त्यांना कोणीही शिकवत नाही. उलट शिकून सावरून ती या तत्वांच्या विरुद्ध जगायला लागतात आणि मग नव्याने शिकायला अर्जुनासारखे प्रयास पडतात, स्वतः भगवंताला कष्ट घेऊन ते शिकवावे लागतात. मी काही उदाहरणे देऊन हे सांगायचा प्रयत्न करतो.

१. अविरत कार्यारतता
काम करताना सर्वात जास्त समाधान आणि आनंद मिळतो, काम पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. ह्याचा अनुभव मी स्वतः कित्येकदा घेतलाय. कॉलेज चालू असताना आनंद असायचा तसा पदवीधर झाल्यापासून घेतलेला नाही. प्रोजेक्टवर काम करताना मजा येते, कधी ताणही पडतो. प्रोजेक्ट संपल्यावर काही दिवस हायसं वाटतं, पण नंतर परत नवा प्रोजेक्ट पटकन सुरु व्हावा असं वाटतं, बेंचवर बसणं फारसं कोणालाही नको असतं.

बहुतांश लहान मुले कधीही शांत बसत नाहीत. त्यांना कायम काही न काही चाळा, खेळ लागतो. थकवा येईपर्यंत त्यांचे उद्योग चालूच असतात, आणि मग थकल्यावर ते काही विचार न करता शांत झोपी जातात. एखादी गोष्ट करायला घेतली, तर मनापासून करतात, आणि ती जमली न जमली तरी त्याचा आनंद आणि दुःख फार मनावर न घेता आणखी नवा उद्योग शोधतात.

त्यांना प्रत्येक काम करण्यात रस असतो. पांघरुणाची घडी घालणे, दरवाजा उघडणे, बटन दाबणे, टीवीचा रिमोट वापरणे, आईच्या स्वयंपाकात लुडबुड करणे, ईत्यादि. सगळंच करून पहायचं असतं. आता आपण जशी काही कामे करण्यात जास्त रस घेतो, आणि काही कामे करण्यात मुळीच नाही, तो प्रकार वयासोबतच वाढतो. आवडी निवडी, प्राधान्य बनल्यावर.

२. कामासाठीच काम
याला मी उदाहरण देईन ते अभ्यासाचं, शिकण्याचं. परीक्षेसाठी अभ्यास कि ज्ञानासाठी अभ्यास याचं

परीक्षा, स्पर्धा यांचं वाजवीपेक्षा जास्त महत्व पालकच त्यांच्या मुलांच्या मनावर बिम्बवतात. तोपर्यंत मुलं शिकवलेलं सगळं शिकतात. कुठला भाग परीक्षेत येईल, काय जास्त महत्वाचं हे त्यांच्या गावीदेखील नसतं. आपली प्रगतिपुस्तके तपासून पहा लहानपणापासून, तुमच्या लक्षात येईल. तुमचे सर्वात जास्त मार्क बालवाडी, पहिली दुसरीच्या दरम्यानचेच असतील. (संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीमधे सारखे मार्क (कमी/जास्त) असतील तर तुम्ही अल्पसंख्य आहात :-P)

परीक्षेसाठी अभ्यास हि कल्पना आयुष्यात आली कि शिकण्याची वाट लागते म्हणजे लागतेच. झानासाठी अभ्यास हद्दपार. मग गणिताचे ए बी सी डी असे ग्रुप्स पडतात. मराठी साहित्याचे भाग म्हणून ठेवलेले धडे, आणि कविता, एक संदर्भासहित, दोन पाच सहा ओळीत, एक दहा बारा ओळीत, ३ एका वाक्यात, असे प्रश्नांचे स्त्रोत म्हणून आपल्या वाट्याला येतात. इतिहासाचं आकलन परीक्षेत ठरलेल्या घटनांच्या पार्श्वभूमी आणि परिणामांच्यापलीकडे जात नाही. काही विषयांमध्ये किती मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले आहेत, यापलीकडे काही न मोजणाऱ्या परीक्षांचा पालकांसोबत मुलंसुद्धा मग बाउ करतात. अपयशी झाले तर आत्महत्यासुद्धा करतात. 

३.अखंड प्रवाही राहणे
आयुष्य नदीसारखं मानलं तर समुद्राला मिळण्यात अखेर होईपर्यंत तिने वाहत राहायला हवं. कारण साचलं तरी पाणी हळूहळू गढूळ होत जातं. कोणी येऊन गाळ काढण्याचे प्रयत्न करेपर्यंत. म्हणून एखाद्या ठिकाणी पोचल्याचा आनंद मनात ठेवून तिथेच रेंगाळण्यापेक्षा पुढे निघणे चांगले. उदाहरण पुन्हा शिकण्याचेच देतो.

परीक्षा हा शिकण्यातला फक्त एक टप्पा आहे. महत्वाचं ते शिकणं, टप्पा नाही. लहान मुलांना बरेच दिवस आपण कुठली गोष्ट कितपत शिकलोय याचा काहीच अंदाज नसतो, म्हणून ते समोर येईल ते शिकत जातात. एखादा टप्पा गाठला म्हणून शिकण्याची इच्छा कमी होत नाही. गीता हेच शिकवते, कि कुठल्याही टप्प्यावर घोटाळू नका, आनंद आणि शोक उरका आणि चालायला लागा. हे आपण नाकारलं तरी बदलत नाही.

रूढ अर्थाने शिक्षण संपलं म्हणजे शिकणं संपलं असं समजणारे आयुष्यभर नाखूष राहतात. बदल झाला कि कुरकुर करतात. कम्प्युटर आले तेव्हा नाक मुरडणाऱ्या लोकांना शेवटी तो शिकावाच लागला. यावरून हेच दिसतं कि बदलाला सामोरे जाऊन जुळवून जे घेतात, त्यांच्यासाठीच आयुष्य आनंदी आणि सुकर असतं.

तात्पर्य हेच कि कर्मयोगाचं महान तत्वज्ञान आपल्या आतमधेच आहे. जगाचा आपल्यावर जितका प्रभाव पडला असेल तितका आपल्याला त्याचा विसर पडला असेल. गरज आहे ती लहान होऊन त्याला जागवण्याची, आणि त्यानुसार वागण्याची...