Saturday, April 18, 2020

पुन्हा एकदा रामायण

रामायणाचं पुनर्प्रक्षेपण आज संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन.

२०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत.

नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा. पण त्याच टीव्हीवर बाकी इतक्या मालिका असताना, आणि आज तर इतक्या वाहिन्या, नेटफ्लिक्स, प्राईमवरच्या सिरीज सारखे हजारो पर्याय असताना, डेटा इतका स्वस्त असताना हे बाकीच्या मालिकांना का जमलं नाही?

आणि रामायण दाखवण्यातसुद्धा धार्मिक अजेंडा शोधणाऱ्यांना तर शत शत प्रणाम. एक एक करत रामायण, महाभारत सोबतच चाणक्य, व्योमकेश बक्षी, सर्कस, शक्तिमान हे सर्वच सुरु झालं. तरीही रामायणाने पुन्हा जी लोकप्रियता गाठली ती दुसऱ्या कोणाला जमली नाही. महाभारतला दुसरी वाहिनी (डीडी भारती) आणि थोडी विचित्र वेळ याचा फटका बसला असावा, नाही तर त्या मालिकेतही तेवढी शक्ती आहे.



या कथांचा आपल्या संस्कृतीवर, आपल्या समाजमनावर जो पगडा आहे तोच यातुन ठळक दिसुन येतो. आणि हे लोक सामान्य लोकांपासुन पार तुटलेले आहेत हेही दिसुन येतं. ह्यांच्या रडगाण्याकडे साफ दुर्लक्ष करत लोकांनी पुन्हा रामायणाचा आस्वाद घेतला. तुम्ही सामान्य लोकांपासुन दूर ज्या कुठल्या पातळीवर पोचला आहात, तिथेच खुश असा.

कोरोना संकटाच्या ह्या काळात रामायण दाखवल्याबद्दल दूरदर्शनचे खुप आभार.

एका अलौकिक युगपुरुषाची हि कथा किती प्रेरणा देते, शिकवण देते. कुटुंबातल्या प्रत्येक नात्याची महती, प्रत्येक नातं निभावण्याची आदर्श सांगुन जाते.

मला रामायण, महाभारत या कथांचं लहानपणापासुन खुप आकर्षण आहे. त्या कथा मी वेगवेगळ्या रूपात वाचल्या. रामायण फार आदर्शवादी आहे, त्यात साधी साधी माणसं देवासारखी वाटतात. महाभारत जास्त सामान्य माणसाच्या जवळ आहे. त्यामुळे साहजिक अलीकडच्या काळातले लेखक आणि कादंबरीकार यांचं त्यावर जास्त प्रेम आहे. म्हणुन ते जास्त वाचनात आलं.

रामायण लहान मुलांची पुस्तकं, आणि काही थोडी विस्तीर्ण पुस्तक यापलीकडे वाचनात नाही आलं. रामायण मालिका मी लहान असताना संपलेली होती. पण जय हनुमान, जय वीर हनुमान अशा मालिकांमधून ती कथा पाहण्यात आलं होतीच.

आपल्या पुराणकथा वाचताना एक लक्षात येतं कि त्यात खुप वेगवेगळी रूपं आहेत. विष्णु पुराणात विष्णूची महती जास्त, शिव पुराणात शंकराची महती जास्त असा प्रकार आहे. आणि प्रत्येक लेखकाने आपल्या भक्तिभावाने, आपल्या समजुतीनुसार, कल्पनेनुसार त्यात भर घातली आहे. बदल केले आहेत.

एक साधा खेळ असतो, कि एकाच्या कानात काही तरी सांगायचं, त्याने दुसऱ्याच्या कानात काही तरी सांगायचं आणि मग असं दहा बारा लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्यात मूळ गोष्टीतलं किती उरेल आणि बाकी मीठ मसाला किती असेल सांगता येत नाही.

या कथा हजारो वर्षांनी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्यात किती चमत्कृती, अतिशयोक्ती यांची भर पडली असेल सांगता येत नाही. पण मला वाटतं हे सगळे थर बाजूला करून हजारो वर्षांपूर्वी खरंच हे महान लोक जन्माला येऊन गेलेच असावेत. त्याशिवाय त्यांच्या चरित्राचा इतका पगडा आशियातल्या इतक्या देशांमध्ये उमटला कसा.

त्यांच्या वास्तव्याच्या भारतात ज्या काही खुणा सांगितल्या जातात त्या सगळ्या खऱ्या असतील असं नाही. पण त्यांच्या नंतरही पराक्रमी राजे महाराजे सम्राट, संत महात्मे होऊन गेलेच कि. त्यांच्यापैकी कोणीही इतका प्रचंड प्रभाव टाकून गेले नाहीत.

या कथेमधल्या चमत्कृती, अति नाट्यमय प्रसंग यापैकी काही गोष्टी नक्कीच नंतर आल्या असतील. पण आगीशिवाय धूर उमटत नाही तसा मुळात त्या व्यक्तींचं आयुष्य श्रेष्ठ असल्याशिवाय हे वरचे दागदागिने त्यांना शोभूनही दिसले नसते.

रामानंद सागर यांनी मालिकेच्या शेवटी अत्यंत विनम्रपणे इतक्या संतांच्या विविध रामायणातून आमच्या छोट्याशा झोळीत जे मावेल तेवढं आम्ही प्रामाणिक पणे सादर केलं, चुकलो असु तर माफ करा असं सुंदर निवेदन केलं.

अगदी त्या कथेतल्या पात्रांना शोभेल अशाच भाषेत आणि भावातलं ते निवेदन ऐकून मला काही तरी सापडल्या सारखं वाटलं.

३३ वर्षांपूर्वी तंत्रज्ञान, त्याहूनही भारतीय चित्र सृष्टीतलं तंत्रज्ञान आज इतकं प्रगत नसताना त्यांनी ज्या ताकदीने रामायण सादर केलं, त्याला खरंच तोड नाही. त्या मालिकेतून भक्तिभाव ओसंडून वाहतो.

नंतर कित्येक रामायण, हनुमान, विष्णु यांवर मालिका बनल्या, पण कशालाही त्याची सर आली नाही.

आणि तरीही त्यांचा तो विनम्रपणा पाहुन मला रामायणातलं एक गुज सापडलं. विनम्रपणा, भक्तिभाव, समर्पण वृत्ती.

रामायणातील प्रत्येक पात्र बाकीच्यांना प्रचंड आदर, प्रेम आणि समर्पण वृत्तीने वागवतं. राम पित्यासाठी, त्याच्या वचनासाठी राज्य सोडतो. सीता नवऱ्यासाठी, लक्ष्मण मोठ्या भावासाठी राजमहाल सोडतो. भरत मोठ्या भावासाठी, आणि न्याय्य वारसदारासाठी राज्य परत करतो. शत्रुघ्न एकटा महालात राहुन कुटुंबाला सांभाळतो. हनुमान सुग्रीवामागे किष्किंधे बाहेर राहतो, आणि मग रामासाठी पराक्रम गाजवतो. सुग्रीव मित्रासाठी आपली सेना आणि राज्य पणाला लावतो. इंद्रजित आणि कुंभकर्ण आपल्या पित्यासाठी, भावासाठी राम लक्ष्मणाच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊन सुद्धा प्राण पणाला लावतात.

अतिशय पराक्रम गाजवुन, यश मिळवुन पुन्हा पुन्हा सर्व जण याचं श्रेय एकमेकांना, एकमेकांच्या मदतीला, प्रेमाला, आशीर्वादाला देत राहतात. कोणीही आपल्या त्यागाचं भांडवल करू पाहत नाही. उलट दुसऱ्याची महती गात राहतात.

कोणीही मला कुटुंबाकडून, देवाकडून, देशाकडून काय मिळालं याचा कधीच विचार करत नाहीत. उलट आपलं कर्तव्य काय, आपला धर्म काय याचाच विचार करत राहतात.

माणसाला मोठं व्हायचं असेल तर कर्तव्य ओळखणं, ते निभावणं हाच मार्ग आहे. आपल्या कुटुंबाचा, पूर्वजांचा मान राखणं, आणि आपल्या पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असं आयुष्य जगणं हि आपली जबाबदारी आहे. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या घरच्यांच्या शब्दाची किंमत आपण राखु तेवढीच.

आणि कितीही मोठे झालो तरी आपल्या कुटुंबासमोर, मित्रांसमोर, गुरूंसमोर, उपकर्त्यांसमोर, आपल्या सेवक आणि कनिष्ठांसमोर सदैव विनम्र राहिलं पाहिजे. हाच त्यांचा संदेश आहे.

अर्थात रामकथेत ज्या काही त्रासदायक गोष्टी (वालीचा वध, सीतेची अग्नी परीक्षा, सीतेला सोडणं) आहेत, त्याबद्दल नेहमी मन साशंक असतं. उत्तर रामायण तर मूळ रामायण नाही नंतर जोडण्यात आलेला भाग आहे असंही वाचनात येतं.

पण त्याबद्दल विचार करताना एक जाणवतं कि तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या लोकांना आजचे मापदंड लावुन चालणार नाही.

प्रत्येक पिढीत इतका बदल होत जातो, कि ५०-६० वर्षांपूर्वीच्या लोकांना आपल्या सारखं धरून तोलू शकत नाहीत. हजारो वर्ष आधीच्या नायकांना कसं जोखणार?

आजकाल जे इंग्रजीमध्ये अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन या कथा आपल्या संकुचित विचारांनी मोडतोड करत सादर करण्याचं पेव फुटलेलं आहे, तेवढंच वाचुन आणि खरं मानुन लोक वादविवाद करतात तेव्हा त्यांची कीव करावी वाटते.

आजचं तंत्रज्ञान, चित्रपट मालिकांमध्ये झालेल्या सुधारणा, उत्कृष्ट नटांची वाढलेली संख्या या सगळ्यांचा पूर्वग्रह मनात ठेवुन हे रामायण पाहिलं तर अवघड आहे.

पण ३३ वर्षांपूर्वीचा आजच्या तुलनेतला भाबडेपणा, जुनं तंत्रज्ञान, आणि रामानंद सागर यांचा प्रामाणिक प्रयत्न याकडे पाहिलं तर त्याचं महत्व कळतं.

त्यामुळे या कठीण काळात रामानंद सागर कृत रामायण पाहण्याचा योग आला हि देवाचीच कृपा. नाहीतर याची सीडी, डीव्हीडी उपलब्ध असूनही पाहण्याचा कधी योग येणं अवघड होतं. आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात आजच्या पिढीतल्या लोकांनी पाहणं तर फार अवघड.

त्यानिमित्ताने आता पुन्हा यावर चर्चा सुरु झाली, नेट फोरम्स वर याबद्दलचे प्रश्न दिसु लागले. मी सध्या बऱ्याचदा तशाच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय.

माझ्या सारख्या अनेकांना तर पुन्हा रामायण वाचुन काढण्याची इच्छा हि झाली असेल.

हि मालिका बघुन खुप सकारात्मकता मिळाली, अनेक भावुक क्षण मिळाले, लोकांचं आणि नात्यांचं महत्व पुन्हा कळलं.

सतत वाईट आणि चिंताजनक बातम्यांचा भडीमार होत असताना मनाला उभारी देणारं असं काही तरी समोर यावं हि रामाचीच इच्छा असावी.

।। जय श्रीराम ।।