Tuesday, October 21, 2014

मन आकाशाचे व्हावे

डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. आमटे कुटुंबियांचे महान कार्य या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. अनेक लोक या चित्रपटामुळे प्रेरित झाले असतील.

अशावेळी मी एका तुलनेने छोट्या चित्रपटाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येउन गेला. नाव "बोक्या सातबंडे". 

हा दिलीप प्रभावळकरांच्या "बोक्या सातबंडे" या पुस्तकांवर आधारित होता. आपल्याकडे बालसाहित्य हा तसा दुर्लक्षित प्रकार आहे. किंवा फारसा गांभीर्याने न घेतला जाणारा प्रकार आहे. जे साहित्य मराठीत उपलब्ध आहे, त्यात "बोक्या सातबंडे"  हि मालिका खूप चांगल्या साहित्यापैकी एक आहे. 

चिन्मयानंद उर्फ "बोक्या सातबंडे" हे दिलीप प्रभावळकर यांनी निर्माण केलेले काल्पनिक पात्र. मुंबईमधला एक खोडकर, प्रेमळ आणि संवेदनशील असा मुलगा. तो आणि त्याची मित्रांची टोळी, त्यांचे प्रताप… त्याचे खोड्यांना काहीसे वैतागलेले पण चांगल्या कामात पाठीशी उभे राहणारे आई बाबा, आजी, दादा. या सगळ्यांच्या गोष्टी या मालिकेत त्यांनी लिहिल्या होत्या. 

जितकी हि पुस्तकांची मालिका गाजली, तशीच बऱ्याच वर्षापूर्वी यावर एक टीव्ही मालिकासुद्धा बनली होती.

यातला बहुतेक कथाभाग हा मुळ पुस्तकातलाच आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा हा एक सुंदर चित्रपट आहे. 

आपल्याकडे लहान मुलांना अतिशय आचरट किंवा अतिगोड अशा भूमिका देण्याचा प्रघात आहे. त्याविरुद्ध इथे बहुतेक मुलं वास्तविक, आणि निरागस दाखवली आहेत. बाल्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे. 

क्रिकेट खेळताना बोक्या आणि त्याच्या मित्रांचा बॉल एका आजीआजोबांच्या घरी जाऊन पडतो. ते आजोबा अतिशय खडूस म्हणून प्रसिद्ध असतात. सगळ्याच मुलांनी त्यांच्याकडून बोलणी खाल्लेली असतात. त्यांच्याकडून बॉल परत आणण्याची जबाबदारी बोक्यावर येउन पडते. बोक्या त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याबद्दल त्याचं कुतूहल जागृत होतं. आणि बोक्याचा प्रामाणिकपणा त्या आजी आजोबांना भावतो. 

त्यांचा मुलगा कित्येक वर्षांपासुन अमेरिकेत जाऊन राहतोय. इथे हे दोघेच त्याची वाट बघत बसलेत असं त्याला समजतं आणि त्याला त्यांच्याबद्दल ममत्व वाटायला लागतं. तो त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांना जाऊन भेटायला लागतो. घरी काही खास केलं कि त्यांना नेउन देतो. बोक्यामुळे त्यांना खुप समाधान मिळतं. 

असंच एकदा त्याला आपल्या घरातली कामवाली बाई, तिच्या घरची परिस्थिती त्याला समजते. तिच्या मुलांना वाढदिवस साजरा करणे, बाहेर फिरायला जाणे, या गोष्टी आपल्याला जितक्या सहज मिळतात तितक्या त्यांना मिळत नाहीत ह्याची त्याला जाणीव होते. आणि मग त्याच्या सुट्ट्यात तो त्याच्या मित्रांना घेऊन अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. 

त्यांना समजावून सांगताना  "मोठ्यांना स्वतःहून काही सुचत नाही. आणि आपल्याला सुचलेलं काही आवडत नाही" हे बोक्याचं वाक्य पुरेसं बोलकं आहे. 

यात काही खूप महान असं दाखवलेलं नाही. अगदी छोट्याछोट्याच पण आपल्याला सहज जमतील अशा गोष्टी आहेत. आपण संवेदनशील बनून राहिलो तर आपल्याला आणि लोकांना आनंद मिळेल अशा गोष्टी आपण किती सहजपणे करू शकतो हे यात छान दाखवलेलं आहे.

या चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत खूप सुंदर आणि मनाचा ठाव घेणारं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं "मन आकाशाचे व्हावे" हे गीत अगदी सहजरित्या या चित्रपटाचा संदेश देतं.

हल्ली बरीचशी मुलं कम्प्युटर, स्मार्टफोन यामध्येच गुंग असतात. घरातल्या लोकांशी संवाद, आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी चांगल्या गप्पा, त्यांच्यामध्ये रस घेणे या गोष्टी अभावानेच दिसतात. मुलांमध्ये संवेदनशीलता, आणि अशा जाणीवा निर्माण व्हाव्यात म्हणून थोडे प्रयत्न सुद्धा करायला हवेत. 

हा चित्रपट आपल्या कुटुंबातल्या मुलांना नक्की दाखवा. आणि तुम्ही सुद्धा पहा.

Monday, October 20, 2014

आमटेमय

काल रात्री "डॉ. प्रकाश बाबा आमटे" पाहिला. तुमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार, किंवा पाहण्याचा बेत तरी असेल. नसेल पाहिला तर जरूर पहा.

हा चित्रपट पाहुन आलेल्यांपैकी अनेक लोकांसारखाच माझाही अनुभव होता. मनस्थितीसुद्धा तशीच. स्तिमित. निशब्द. अंतर्मुख.

बाबा आमटे या महापुरुषाच्या या सुपुत्राने त्यांच्या लौकिकाला शोभेल अशी कामगिरी केली, आणि अवघ्या जगाला काहीतरी शिकवून जाइल असे आयुष्य जगले.

आपल्या हुशारीच्या बळावर, डॉक्टरकिची पदवी हातात असताना, शहरात, उच्चभ्रु दवाखान्यात काम करत आरामात आयुष्य काढण्याची संधी असताना, प्रकाश नावाचा तरुण आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन हेमलकसासारख्या दुर्गम भागात आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतो. किती विलक्षण आहे हे.

असे निर्णय सहज घेत येत नाहीत. किती मोह असतात माणसाला, आपल्याला… त्या सर्वावर पाणी सोडुन अशा ठिकाणी आयुष्य काढणे सोपी गोष्ट नाही.

आणि त्यांना तितकीच मोलाची साथ दिली त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी. प्रकाश आमटे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी, आणि पुढचं आयुष्य कसं असणार याची पर्वा न करता त्याही या सर्वात सहभागी झाल्या आणि उत्तम कार्य केलं.


हे निर्णय घ्यायला एकवेळ सोपे म्हणता येतील इतके ते निभवायला अवघड असतात. प्रकाश आमटेंना कदाचित आई बाबांच्या संस्कारांमुळे मोह माहित नसतील. आणि बाबांसारखी मोठी समाजसेवा करण्याचं आकर्षण असेल. मंदा आमटे यांनी कदाचित प्रकाशवरच्या प्रेमामुळे, स्वतःच्या तत्वांमुळे, इच्छेमुळे हा निर्णय घेतला असेल. निर्णयापर्यंत आपण कसेही पोचलो तरी, निर्णयानंतरच प्रवास सुरु होतो.

आणि त्यांच्या इतक्या खडतर प्रवासात कधी तरी कंटाळा येणं, उबग येणं, भ्रमनिरास होणं, आणि यातून परत फिरणं शक्य होतं. ते त्या दोघांनीही केलं नाही.

हेमलकसात गेल्यावरसुद्धा आदिवासींनी त्यांना उपचार करू देण्यात २-३ वर्ष गेली. ते तितके दिवस थांबले. स्वतःला कशात तरी गुंतवून घेऊन तिथेच तळ ठोकून राहिले.

आणि एकदा कामाला सुरुवात झाली कि, त्याला फक्त वैद्यकीय सेवेच्या मर्यादा राहिल्या नाहीत. आधी आदिवासी लोकांवर उपचार. मग त्याचं अंधश्रद्धा निर्मुलन. त्यांच्यासाठी स्वच्छता, आरोग्य इत्यादींचं प्रशिक्षण. त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण.

आणि हे सर्व करताना संस्कृती, भाषा यामुळे आदिवासींशी संवाद साधण्यात, त्यांचा विश्वास संपादन करण्यात ज्या अडचणी आल्या त्या सर्वांचा यशस्वी सामना केला.

आदिवासी लोकांचं सरकारी अधिकारी, तस्कर, ठेकेदार अशा अनेक लोकांकडून विविध पातळीवर आणि विविध प्रकारे शोषण होतं. ह्यातूनच त्यांच्यातले अनेक लोक नक्षलवादी गटात ओढले जातात. आमटेंनी त्यांच्यासाठीसुद्धा भेदभाव न करता काम केले. प्रयत्न केले.

संधी दिली तर माणूस किती बदलू शकतो, याचं उदाहरण म्हणून डॉ. पुरू पुंगाटी यांची कथा चित्रपटात दाखवली आहे. पोलिसांच्या छळामुळे नक्षलवादी गटात जाउन पोचलेला एक अल्पवयीन मुलगा आमटेंना भेटतो. आमटे त्याला मार्ग दाखवतात आणि तो पुढे एक डॉक्टर बनतो. हा कथाभाग सर्वांनाच थक्क करून सोडतो.

अशा मदती खेरीज आदिवासींना त्याचं शोषण होऊ नये म्हणून, सरकारकडून लुटले जाऊ नये म्हणूनसुद्धा त्यांचे प्रयत्न दिसतात. आणि हे सर्व अगदी त्यांच्या स्वभावानुसार शांतपणे, हसत हसत. कुठेही लढ्याची भाषा नाही , आणि क्रांतीचा आव नाही.

त्यांची सेवा माणसांपुरती सुद्धा राहिली नाही. प्राण्यांचेसुद्धा उपचार केले. स्वतः माणसांचे डॉक्टर असून, प्राण्यांचे उपचार शिकून घेतले. या प्रयत्नातुन प्राण्यांचे अनाथालय उभे राहिले. एरवी हे प्राणी स्वतः मेले, शिकाऱ्याने मारले तरी दखल न घेणाऱ्या सरकारला ह्या प्राण्यांच्या अनाथालायाचा मात्र जाच होतो.

इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथे इतर डॉक्टर जायला तयारच होत नाहीत, तिथे हे डॉक्टर दाम्पत्य सर्व प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करत असताना, गरज पडल्यास आहे त्या साधन आणि औषधांचा वापर करून शस्त्रक्रिया करत असताना सरकारला त्यांच्या परवान्यांची आठवण होते.

परवाने आहेत ते डॉक्टर जाण्यास तयार नाहीत. आपल्याकडे सर्व प्रकारचे अधिकार असतानासुद्धा आपण प्राण्यांचे अनाथालय, उपचार केंद्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. हे लक्षात न घेता केवळ स्वतःच्या अहंकारापायी सरकारी अधिकारी आमटेंना परेशान करतात तेव्हा खरंच संताप येतो.

अशा कृतघ्नपणाचा सामना करूनसुद्धा आपलं कार्य करण्याचं बळ आमटे कुटुंबिय कसे गोळा करत असतील याचं खुपच आश्चर्य आणि कौतुक वाटतं.

आपल्याला अनेक गोष्टीचं आकर्षण असतं. सुंदर घर. घरातल्या सुबक वस्तु. शानदार गाडी. पैसा. गुंतवणूक. या सगळ्याच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावतो. आणि आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न करतो.

पण या सगळ्याकडे पाठ फिरवुन सुद्धा हे लोक इतकं सुंदर आयुष्य जगताना दिसतात, ते पाहून जाणीव होते कि आयुष्याला सुंदर बनवण्याची ताकद कुठल्या वस्तुत नाही तर आपल्या माणसांत आहे. आपल्या कामात आहे. आपण निवडलेल्या मार्गात आहे.

चित्रपट संपतो तेव्हा सर्व जण शांत असतात. काही लोक टाळ्या वाजवुन दाद देण्याचा प्रयत्न करतात. पण हा शांतपणा, हे भारावलेपण आपण इथेच थांबवायला नको. घरी येउन आपण पुन्हा नेहमी सारखंच जगायला लागलो तर काय फायदा?

प्रकाश आमटे एकटे नाहीत, त्यांचे आई बाबा, भाऊ सर्व कुटुंबीय आणि साथीदार ग्रेट आहेत. असे अनेक लोक आहेत. अशा अनेक संस्था आहेत. आपण सर्वच त्यांच्याइतका त्याग करून सेवा करू शकत नाही. पण आपण अशा लोकांच्या कामात हातभार लावू शकतो. आपला वेळ देऊ शकतो. पैशाच्या स्वरुपात योगदान देऊ शकतो. अशा कुठल्या तरी चांगल्या कामात सहभागी होऊ शकतो.

हा चित्रपट कसा आहे, अभिनय कसा आहे, दिग्दर्शन कसं आहे… याचा वस्तुनिष्ठ विचार मला करता येत नाही. एवढंच सांगतो, या सर्व लोकांचा हि कथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे. आमटे कुटुंबियांच्या विशाल कार्याला हि एक सलामी आहे. त्यांनी खूप मोठा विचार यातून मांडलेला आहे. आणि तुम्हाला विचार करण्यास भाग पडतो. आमटेमय करून सोडतो.

Tuesday, October 7, 2014

अजि म्या पंतप्रधानास पाहिले

दसऱ्याच्या निमित्ताने चार दिवसाच्या सुटीवर आम्ही औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला पोचल्यावर पहिल्याच सकाळी पेपरमधून कळलं कि देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा घेत आहेत. हि बातमी वाचताच मला आनंद झाला. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदींची अनेक भाषणे आणि मुलाखती टीव्हीवर तुकड्यातुकड्यात पाहिली होती. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व आणि हजरजवाबीपणाची प्रचितीसुद्धा आली होती. आता त्यांना प्रत्यक्ष बघण्याची आणि ऐकण्याची संधी चालून आली होती. मी ताबडतोब माझ्या मित्रांना हे कळवलं आणि जायचा बेत ठरवला. 

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हि सभा होती. आणि त्याच दिवशी मोदी बीड, औरंगाबाद, मुंबई अशा तीन सभा घेणार होते. औरंगाबादची सभा नेमकी कधी होणार याबद्दल मात्र संभ्रम होता. पेपर मधली बातमी, त्याच पेपरमध्ये भाजपाची जाहिरात, आणि त्या सभेच्या प्रचारार्थ आलेले एस.एम.एस या सगळ्यामध्ये वेगवेगळी वेळ दिली होती. लोकांना जमा होण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून लवकरची वेळ दिली असावी असा आम्ही अंदाज बांधला. पण या प्रकारामुळे आपण घरून कधी निघावे ते कळत नव्हते. 

योगायोगाने त्याच दिवशी दुपारी आमच्या मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवाराची बायको काही महिला कार्यकर्त्यांसोबत आमच्या घरी प्रचारासाठी येउन गेली. त्यांच्याकडून कळले कि मोदींच्या भाषणाची वेळ ४ वाजताची असली तरी सभा दुपारपासूनच सुरु होणार आहे, आणि जागा मिळण्यासाठी त्यांनी लवकरच जा म्हणून सांगितले. 

त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. म्हणून जावे कि नाही असेही वाटत होते. पण पंतप्रधान आपल्या घरापासून इतक्या जवळच्या ठिकाणी येउन भाषण करणार आहेत,  आपल्याला सुद्धा सुटीच आहे. असा योग पुन्हा सहज कधी यावा असा विचार करून शेवटी जायचाच निश्चय केला. 

माझे मित्र अक्षय, जयदीप, गिरीश यांच्यासोबत मी निघालो. सभेच्या ठिकाणी, गरवारे मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर भरपूर गर्दी, आणि कडक बंदोबस्त होता. तिकडे सामान्य नागरिकांच्या गाड्या नेण्यालासुद्धा बंदी होती. आम्ही दूर रस्त्यावरच गाडी लावली आणि चालत मैदानाकडे निघालो. हजारो लोक त्याच दिशेने चालले होते. मला अगदी वारीची आठवण आली. 

काही कार्यकर्ते प्रचाराची पत्रके वाटत होते. लोक ती घेऊन रस्त्यावरच टाकत होते. मला भारतीय लोकांच्या वागण्यातला विरोधाभास पुन्हा जाणवला. ज्या नेत्याच्या सभेसाठी हे लोक इतक्या दुरून उत्साहाने चालले होते, त्याच नेत्याने आदल्याच दिवशी दिलेला स्वच्छ भारताचा संदेश त्यांनी पायदळी तुडवला होता. 

सभा आधीच सुरु झाली होती. मैदान बरचसं भरलं होतं. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले उमेदवार मंचावर होते. एक एक करून त्यांचा परिचय दिला जात होता. त्यांना बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ दिला जात होता. झाडून सगळे उमेदवार आज मोदीसाहेबांसोबत मंचावर उभे राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत होते. 

सर्व उपस्थित जनता तेथे फक्त मोदींसाठीच जमली होती हे स्पष्ट होते. उमेदवारांच्या बोलण्याकडे कोणाचे हि लक्ष  नव्हते. लोक आतापेक्षा चांगली जागा मिळतेय का याच प्रयत्नात होते (आम्ही सुद्धा :D) आणि मोदींच्या नावाचा घोष करत होते. कॅमेरा आपल्या दिशेने फिरला कि नाचून किंवा हात हलवून प्रतिसाद देत होते. मधून मधून निवेदक मोदी साहेबांचे हेलिकॉप्टर बीडहून निघाले, औरंगाबादला पोचले, अशी माहिती देत होते. 

अखेर मोदी सभास्थळी पोचले आणि पूर्ण वातावरण बदलले. गोंधळ घालणारे प्रेक्षक थोडे शांत झाले. सत्कार वगैरे पार पडल्यावर मोदींनी मराठीतून भाषण सुरु केले, आणि दोन तीन वाक्ये मराठीत बोलून सगळ्यांना जिंकून घेतले. आणि मग त्यांच्या शैलीत हिंदीत भाषा केले. भाषण बरेचसे त्यांच्या अमेरिकेतल्या भाषणासारखेच होते. पण तरी त्यात जिवंतपणा होता. 



आतापर्यंत झालेल्या सगळ्या बाकी लोकांच्या भाषणात आणि त्यांच्या भाषणातला दर्जात्मक फरक लगेच दिसून येत होता. लोकांना काही प्रश्न विचारून त्यांना सभेत गुंतवून ठेवण्याची, आपल्या बाजूने वळवण्याची, आपले मुद्दे लोकांकडूनच वदवून घेण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अशी सभा अनुभवता येणार नाही याचं मला थोडंसं वाईट वाटलं. 


भाषणाच्या शेवटी मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा पुन्हा एकदा संदेश दिला. उपस्थित सर्वांना त्या ठिकाणी कचरा न करण्याची, आणि असलेला कचरा उचलून नेण्याची विनंती केली. तरी बहुतांश लोक खुर्च्या अस्ताव्यस्त करून, कचरा तसाच टाकून निघाले. काही भाजपचे कार्यकर्ते येऊन लोकांना प्रोत्साहन द्यायला कचरा गोळा करू लागले. मग काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने कचरा उचलण्यास आणि खुर्च्या नीट लावण्यास सुरुवात केली. मी आणि माझ्या मित्रांनी भरपूर वाकड्यातिकड्या पडलेल्या खुर्च्या उचलून नीट लावून ठेवल्या. गिरीश म्हणाला, कि सगळ्यांनाच लगेच समज येणं अवघडच आहे, पण इथल्या दोन टक्के लोकांना जरी समज आली तरी बस. पडेल हळू हळू फरक. 

महाराष्ट्रात कोणाचे सरकार येईल? मोदी सरकार वचनाला कितपत जागेल, किती विकास करेल? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल. पण लोकांचा विश्वास संपादित करून, त्यांच्यात उत्साह जागवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. मनमोहन सिग यांच्यानंतर अशा प्रकारचा नेता पंतप्रधानपदी येणे हा देशासाठी एक सुखद बदल आहे. 

तर अशा प्रकारे मी प्रथमच भारताच्या पंतप्रधानाला प्रत्यक्ष  पाहिले आणि ऐकले, आणि हा प्रसंग दीर्घ काळ माझ्या स्मरणात राहील.