Monday, October 20, 2014

आमटेमय

काल रात्री "डॉ. प्रकाश बाबा आमटे" पाहिला. तुमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार, किंवा पाहण्याचा बेत तरी असेल. नसेल पाहिला तर जरूर पहा.

हा चित्रपट पाहुन आलेल्यांपैकी अनेक लोकांसारखाच माझाही अनुभव होता. मनस्थितीसुद्धा तशीच. स्तिमित. निशब्द. अंतर्मुख.

बाबा आमटे या महापुरुषाच्या या सुपुत्राने त्यांच्या लौकिकाला शोभेल अशी कामगिरी केली, आणि अवघ्या जगाला काहीतरी शिकवून जाइल असे आयुष्य जगले.

आपल्या हुशारीच्या बळावर, डॉक्टरकिची पदवी हातात असताना, शहरात, उच्चभ्रु दवाखान्यात काम करत आरामात आयुष्य काढण्याची संधी असताना, प्रकाश नावाचा तरुण आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन हेमलकसासारख्या दुर्गम भागात आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतो. किती विलक्षण आहे हे.

असे निर्णय सहज घेत येत नाहीत. किती मोह असतात माणसाला, आपल्याला… त्या सर्वावर पाणी सोडुन अशा ठिकाणी आयुष्य काढणे सोपी गोष्ट नाही.

आणि त्यांना तितकीच मोलाची साथ दिली त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी. प्रकाश आमटे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी, आणि पुढचं आयुष्य कसं असणार याची पर्वा न करता त्याही या सर्वात सहभागी झाल्या आणि उत्तम कार्य केलं.


हे निर्णय घ्यायला एकवेळ सोपे म्हणता येतील इतके ते निभवायला अवघड असतात. प्रकाश आमटेंना कदाचित आई बाबांच्या संस्कारांमुळे मोह माहित नसतील. आणि बाबांसारखी मोठी समाजसेवा करण्याचं आकर्षण असेल. मंदा आमटे यांनी कदाचित प्रकाशवरच्या प्रेमामुळे, स्वतःच्या तत्वांमुळे, इच्छेमुळे हा निर्णय घेतला असेल. निर्णयापर्यंत आपण कसेही पोचलो तरी, निर्णयानंतरच प्रवास सुरु होतो.

आणि त्यांच्या इतक्या खडतर प्रवासात कधी तरी कंटाळा येणं, उबग येणं, भ्रमनिरास होणं, आणि यातून परत फिरणं शक्य होतं. ते त्या दोघांनीही केलं नाही.

हेमलकसात गेल्यावरसुद्धा आदिवासींनी त्यांना उपचार करू देण्यात २-३ वर्ष गेली. ते तितके दिवस थांबले. स्वतःला कशात तरी गुंतवून घेऊन तिथेच तळ ठोकून राहिले.

आणि एकदा कामाला सुरुवात झाली कि, त्याला फक्त वैद्यकीय सेवेच्या मर्यादा राहिल्या नाहीत. आधी आदिवासी लोकांवर उपचार. मग त्याचं अंधश्रद्धा निर्मुलन. त्यांच्यासाठी स्वच्छता, आरोग्य इत्यादींचं प्रशिक्षण. त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण.

आणि हे सर्व करताना संस्कृती, भाषा यामुळे आदिवासींशी संवाद साधण्यात, त्यांचा विश्वास संपादन करण्यात ज्या अडचणी आल्या त्या सर्वांचा यशस्वी सामना केला.

आदिवासी लोकांचं सरकारी अधिकारी, तस्कर, ठेकेदार अशा अनेक लोकांकडून विविध पातळीवर आणि विविध प्रकारे शोषण होतं. ह्यातूनच त्यांच्यातले अनेक लोक नक्षलवादी गटात ओढले जातात. आमटेंनी त्यांच्यासाठीसुद्धा भेदभाव न करता काम केले. प्रयत्न केले.

संधी दिली तर माणूस किती बदलू शकतो, याचं उदाहरण म्हणून डॉ. पुरू पुंगाटी यांची कथा चित्रपटात दाखवली आहे. पोलिसांच्या छळामुळे नक्षलवादी गटात जाउन पोचलेला एक अल्पवयीन मुलगा आमटेंना भेटतो. आमटे त्याला मार्ग दाखवतात आणि तो पुढे एक डॉक्टर बनतो. हा कथाभाग सर्वांनाच थक्क करून सोडतो.

अशा मदती खेरीज आदिवासींना त्याचं शोषण होऊ नये म्हणून, सरकारकडून लुटले जाऊ नये म्हणूनसुद्धा त्यांचे प्रयत्न दिसतात. आणि हे सर्व अगदी त्यांच्या स्वभावानुसार शांतपणे, हसत हसत. कुठेही लढ्याची भाषा नाही , आणि क्रांतीचा आव नाही.

त्यांची सेवा माणसांपुरती सुद्धा राहिली नाही. प्राण्यांचेसुद्धा उपचार केले. स्वतः माणसांचे डॉक्टर असून, प्राण्यांचे उपचार शिकून घेतले. या प्रयत्नातुन प्राण्यांचे अनाथालय उभे राहिले. एरवी हे प्राणी स्वतः मेले, शिकाऱ्याने मारले तरी दखल न घेणाऱ्या सरकारला ह्या प्राण्यांच्या अनाथालायाचा मात्र जाच होतो.

इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथे इतर डॉक्टर जायला तयारच होत नाहीत, तिथे हे डॉक्टर दाम्पत्य सर्व प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करत असताना, गरज पडल्यास आहे त्या साधन आणि औषधांचा वापर करून शस्त्रक्रिया करत असताना सरकारला त्यांच्या परवान्यांची आठवण होते.

परवाने आहेत ते डॉक्टर जाण्यास तयार नाहीत. आपल्याकडे सर्व प्रकारचे अधिकार असतानासुद्धा आपण प्राण्यांचे अनाथालय, उपचार केंद्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. हे लक्षात न घेता केवळ स्वतःच्या अहंकारापायी सरकारी अधिकारी आमटेंना परेशान करतात तेव्हा खरंच संताप येतो.

अशा कृतघ्नपणाचा सामना करूनसुद्धा आपलं कार्य करण्याचं बळ आमटे कुटुंबिय कसे गोळा करत असतील याचं खुपच आश्चर्य आणि कौतुक वाटतं.

आपल्याला अनेक गोष्टीचं आकर्षण असतं. सुंदर घर. घरातल्या सुबक वस्तु. शानदार गाडी. पैसा. गुंतवणूक. या सगळ्याच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावतो. आणि आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न करतो.

पण या सगळ्याकडे पाठ फिरवुन सुद्धा हे लोक इतकं सुंदर आयुष्य जगताना दिसतात, ते पाहून जाणीव होते कि आयुष्याला सुंदर बनवण्याची ताकद कुठल्या वस्तुत नाही तर आपल्या माणसांत आहे. आपल्या कामात आहे. आपण निवडलेल्या मार्गात आहे.

चित्रपट संपतो तेव्हा सर्व जण शांत असतात. काही लोक टाळ्या वाजवुन दाद देण्याचा प्रयत्न करतात. पण हा शांतपणा, हे भारावलेपण आपण इथेच थांबवायला नको. घरी येउन आपण पुन्हा नेहमी सारखंच जगायला लागलो तर काय फायदा?

प्रकाश आमटे एकटे नाहीत, त्यांचे आई बाबा, भाऊ सर्व कुटुंबीय आणि साथीदार ग्रेट आहेत. असे अनेक लोक आहेत. अशा अनेक संस्था आहेत. आपण सर्वच त्यांच्याइतका त्याग करून सेवा करू शकत नाही. पण आपण अशा लोकांच्या कामात हातभार लावू शकतो. आपला वेळ देऊ शकतो. पैशाच्या स्वरुपात योगदान देऊ शकतो. अशा कुठल्या तरी चांगल्या कामात सहभागी होऊ शकतो.

हा चित्रपट कसा आहे, अभिनय कसा आहे, दिग्दर्शन कसं आहे… याचा वस्तुनिष्ठ विचार मला करता येत नाही. एवढंच सांगतो, या सर्व लोकांचा हि कथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे. आमटे कुटुंबियांच्या विशाल कार्याला हि एक सलामी आहे. त्यांनी खूप मोठा विचार यातून मांडलेला आहे. आणि तुम्हाला विचार करण्यास भाग पडतो. आमटेमय करून सोडतो.