Sunday, October 14, 2018

इतिहास नावाची ऐतिहासिक समस्या

लहानपणी इतिहास शिकायला सुरुवात झाली तेव्हा इतिहास असतो काय आणि का शिकावा हे हि सांगितलं गेलं होतं. हा तर परीक्षेतला प्रश्नसुद्धा होता. आणि त्यांचं रटलेलं उत्तर काहीसं असं होतं कि..

इतिहास म्हणजे आजवर घडलेल्या घटनांची नोंद. ज्यातुन आपल्याला मानवजातीने आजवर केलेल्या प्रगतीची आणि चुकांची माहिती मिळते. पूर्वजांच्या पराक्रमाने आणि यशाने प्रेरणा मिळते. आणि त्यांच्या चुकांतुन शिकण्याची संधी मिळते.

 उत्तरावर हल्ली घडत राहणाऱ्या घटनांमुळे पुन्हा विचार मनात येत होते. आणि जाणवत होतं कि हे उत्तर साफ चुकीचं आहे, किंवा अपूर्ण आहे. अर्थात लहानपणी असलेल्या आकलनापुरतं ठीक आहे. आणि मुलांना दिशा दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा. पण आजवर कोणी ती दिशा घेतलेली दिसत नाही. मनुष्यजात (हा जातीवाचक उल्लेख नाही. mankind ला समानार्थी मनुष्यजात अथवा मानवजात) आपल्या चुकांपासुन शिकलेली दिसत नाही.


इतिहासातुन आपल्याला प्रेरणा मिळते हे अगदी खरं आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या माझ्यासारख्या माणसाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव घेतलं कि जे चैतन्य अंगात सळसळतं त्याचं कारण बुद्धीच्या कणाकणात भिनलेला त्यांचा इतिहास. कोणासारखं बनायचं याचं आणि कोणासारखं बनायचं नाही याचं उत्तर आपल्याला इतिहासातच मिळतं. 

पण इतिहास हि तेवढीच तापदायक समस्यासुद्धा आहे. मानवाचा एकूण इतिहास पाहिला तर, जंगलात भटकंती, टोळ्या, मोठे समुह, वस्त्या, शहरे, संस्कृती, राज्ये, राज्य पद्धती असा आपला प्रवास झालेला आहे. पण त्यात सतत एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी महत्वकांक्षा, लोभ, मत्सर अशा वेगवेगळ्या कारणांनी लढाया, आक्रमण, हार जीत, हिंसा, कत्तली यांनीसुद्धा हा प्रवास भरलेला आहे.



शक्ती, सत्ता आणि त्यासाठीचा संघर्ष हि अगदी पुरातन काळापासुन अव्याहत चाललेली गोष्ट आहे. समूहात राहणाऱ्या काही प्राण्यांमध्ये सुद्धा हे दिसुन येतं. पण ते प्राणी काही इतिहास जपत नाहीत. माकडांची पेरूच्या झाडावरची टोळी आंब्याच्या झाडावरच्या टोळीशी कुठल्यातरी शेकडो वर्षांपूर्वीच्या गोष्टीवरून भांडत नाहीत. ते कायम वर्तमानात असतात. 

मानवजातीचा अज्ञात इतिहास तर हजारो लाखो वर्षांचा आहे. त्यावरून अभ्यासक सोडले तर कोणी भांडत नाही. कारण तो कोणालाच नीट माहित नाही. पण जेव्हा इतिहास लिहुन ठेवायला सुरुवात झाली तेव्हा पासून मात्र पुढे मानव पृथ्वीवर असेपर्यंत भांडत राहण्यासाठी आणखी एक कारण मिळालं. 

आज फक्त आपल्या देशाचा विचार केला तर चर्चेत असणारे किती तरी प्रश्न इतिहास आणि पुराणाशी निगडित आहेत. 

बाबरी मस्जिद, कोरेगाव भीमा, द्रविड विरुद्ध आर्य वाद, अमित शहा यांनी वामन जयंतीच्या शुभेच्छा देण्यावरून वाद, औरंगझेब रोडचे नामकरण करण्यावरून वाद, औरंगाबादच्या नामकरणावरून वाद, टिपू जयंतीवरून वाद, गणेशोत्सव नेमका कोणी सुरु केला यावरून वाद, इत्यादी इत्यादी. यादी न संपणारी आहे. 

यातल्या एका एका प्रश्नावर बघा. संबंधित घटनेला १००, २००, १०००, सांगता येत नाही इतका काळ लोटला आहे. 

१-२ शतके आधीपर्यंत असा काळ होता कि जगभरात अनेक राजवटी, राजवंश, साम्राज्ये उदयास येत होती, आणि लयाला जात होती. त्यांचा विस्तारवाद, एकमेकांवर आक्रमण सतत चालु असायचं. भारतात तर असंख्य राज्ये बनली आणि लोप पावली. स्वातंत्र्य मिळालं तेव्हासुद्धा शेकडो संस्थाने होती, जी नंतर भारतात विलीन झाली. 

पण तो काळ आता संपला आहे. राष्ट्रे उदयाला आली आहेत. विस्तारवाद आता इतका उघड उघड करता येत नाही. आडमार्गाने करावा लागतो. प्रत्यक्ष राज्याऐवजी आता आपले प्रभाव क्षेत्र आणि दरारा वाढवण्यासाठी महासत्तांमध्ये स्पर्धा चालू असते. 

प्रत्येक प्रदेशाने वेगवेगळ्या वंशाचे, धर्माचे, संस्कृतीचे राज्य पाहिले आहे. आणि आता प्रत्येकाचं प्रदेशात त्या वेगवेगळ्या वंश धर्म संस्कृतीचे लोक कमी अधिक प्रमाणात राहतात. आणि तो ऐतिहासिक द्वेष आणि राग कोणीही विसरायला तयार नाही. 

कोणीही वर्तमानात जगायला तयार नाही. हा द्वेष आपण कुठवर घेऊन जाणार आहोत? 

राजकारण हा ह्या आगीत तेल घालणारा खूप मोठा उद्योग आहे. आपण आपल्या उत्कर्षासाठी एकत्र येऊया म्हटलं, त्यासाठी थोडे कष्ट घेऊया म्हटलं तर कोणी येत नाही. पण तेच कोणी शत्रू समोर उभा केला, कोणाची भीती, कोणाचा द्वेष उत्पन्न केला कि सहज लोक जमा होऊन एकमेकांना मारायला तयार होतात. 

आणि इतिहास हा असे शत्रू शोधण्यासाठी आणि बनवण्यासाठी खूप सहज मार्ग आहे. 

आणि सर्वात सोयीची गोष्ट म्हणजे तो वाट्टेल तसा फिरवत येतो. आणि दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे हातात हत्यार अगदी सहज येतं, पुस्तक इतकं सहजी येत नाही. कोणी इतिहासातले दाखले देऊन भावनिक साद घालत असताना कोणीही शहानिशा करायला जात नाही. 

आता सोशल मीडियामुळे कुठलीही गोष्ट इतकी लगेच पसरते, आणि अर्ध्यावर लोकांनी पुढचा मागचा विचार न करता असल्या गोष्टी शेअर केलेल्या असतात. आधी निदान चुकीची माहिती पसरायला वेळ लागायचा, कष्ट घ्यावे लागायचे. आता ते खुप सोपं झालय.

आधी काही मोजके लोक अभ्यासक असायचे, त्यांच्यावर लोकांचा विश्वास असायचा आणि त्यांना सापडलेल्या गोष्टींवरून मत मतांतर होणे, वाद विवाद होणे, गट पडणे ह्यापुरतं मर्यादित होतं. पण आज काल तर जो उठतो तो फॉरवर्ड झालेले मेसेज वाचुन इतिहास तज्ञ बनतो. 

राजकारणी लोक आग लावुन सोडुन देतात. आणि होरपळतो सामान्य मनुष्य. 

इतिहासाला घेऊन आपण इतके भावुक होतो, जरा विचार करा, हेच मोठे लोक, देशाचा, पक्षाचा, स्वतःच्या फायद्याचा विचार करताना इतके भावुक होतात का?

देशाच्या पातळीवर विचार करा. 

अमेरिकेने जपान वर अणु बॉम्ब टाकुन शहर बेचिराख केले. देश उध्वस्त झाला. पण त्याच अमेरिकेने नंतर जपानच्या पुनर्वसनाला हातभार लावला, जपान आणि अमेरिकेचे आज उत्तम संबंध आहेत, आणि जपान पुन्हा प्रगत देश आहे. 

इंग्लंड ने भारतावर इतकी वर्ष राज्य केले, पारतंत्र्यात ठेवले. पण स्वातंत्र्या नंतर भारताने इंग्लंड शी शत्रुत्व पत्करले नाही. आपले त्यांच्याशी उत्तम संबंध आहेत आणि आपण राष्ट्रकुलात सहभागी आहोत. 

चीन ने भारतावर हल्ला केला. पण चीन आणि भारताचे व्यापारी संबंध आज तागायत आहेत. विवादास्पद मुद्द्यांवरून आजही संघर्ष चालू असतो. पण व्यापारी संबंध तोडण्याची भाषा दोन्ही सरकारे करू शकत नाहीत. 

देशांतर्गत पातळीवर

भारताच्या प्रत्येक भागावर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजवटीने राज्य केलंय. आणि त्यांच्या सीमा विस्तारल्या, कमी झाल्या. काही भाग एके काळी सोबत होते, नंतर वेगळे झाले. आणि असं अगणित वेळा झालं. भारताची फाळणी, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, त्यानंतरचं काही राज्याचं विभाजन हि अगदी अलीकडची उदाहरणं.

कितीतरी समुह भारतात आले आणि इथलेच झाले. ह्या अशा अखंड चालत राहणाऱ्या गोष्टींमुळेच आपली संस्कृती घडत गेली, बदलत गेली. त्यात सर्व राजवटी, लोकसमुह, भाषा यांचा प्रभाव होता, योगदान होतं. 

तो इतिहास, भाषा, जात, राज्य ह्या तपशिलात फरक असला तरी आपल्या संस्कृतीमध्ये एक समान धागा आहे.
आपली मूल्ये सारखी आहेत, परंपरांमध्ये साम्य आहे. विचारधारांमध्ये साम्य आहे. ह्या साम्याच्या बळावर आपल्या स्वातंत्र्ययोद्ध्यांनी बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं.

हे सगळं विसरून आता आज त्या इतिहासातली कुठली तरी गोष्ट पकडून, मुद्दे उकरून काढुन भांडण लावण्यात तात्पुरता राजकीय फायदा यापलीकडे काही दिसतंय का?

नसते वाद उकरून काढून आपण तो धागा कमजोर करतोय. नवीन पिढ्या ज्या सोशल नेटवर्क, तंत्रज्ञान ह्यामुळे जवळ जवळ येऊ शकतात त्यांच्यात उलट द्वेषाची पेरणी करतोय. भावी भारताची शक्ती कमी करतोय.

आज प्रत्येक जातीधर्माच्या लोकांनी फक्त आपल्याच जातीच्या लोकांचा इतिहास आणि वारसा जपण्याचं धोरण ठेवलेलं दिसतं. प्रत्येक जातीने आपापले संत शोधले आहेत, वीर आणि राजे शोधले आहेत. आणि त्यांना फक्त त्यांचंच महत्व वाटतं असं दिसतंय. पण आपण ह्यामुळे त्या महापुरुषांच्या कार्याची व्याप्ती आपल्या कर्मदळीद्री पण मुळे कमी करतोय.

त्या महापुरुषांवर ज्या जातीत ते जन्माला आले फक्त त्यांचाच कॉपीराईट आहे का? त्यांचं कार्य त्यांचा इतिहास हा काही जातीधर्मापुरता मर्यादित नाही. अशा लोकांचं कार्य पूर्ण देशातल्या जनमानसावर परिणाम करत असतं. देशातले सर्व लोक, सर्व पिढ्या त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊ शकतात.

पण असा मर्यादित इतिहास लक्षात ठेवुन भांडण्याच्या घातक सवयीमुळे आपल्याला ह्याचा विसर पडतोय.

आता अगदी घरातलं उदाहरण घ्या. दोन भावांचं किंवा सासू सुनांचं भांडण झालं तरी त्यात दोन बाजु असतात. दोन्ही जणांना आपलं बरोबर वाटत असतं. पण शेवटी एक कुटुंब म्हटलं तर कधी तरी ते बाजूला ठेवुन एकत्र यावं लागतं, राहावं लागतं.

भूतकाळ सोबत बाळगत राहिलं तर वर्तमान असह्य होतो.

जे दोन व्यक्तींमध्ये आहे, तसच दोन लोकसमूहात सुद्धा आहे. दोन किंवा किती तरी बाजू आहेत. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण त्या भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे आजचा विकास, प्रगती, यात काय फरक पडतो.

इतिहास, अस्मिता महत्वाची आहे. पण ते अभ्यासकांना पुराव्यानिशी करू द्या, त्यांच्यावर सोडा. हि गोष्ट आज लाठीकाठीने लादण्याची नाही.

जर आज सामान्य माणसाला लढायचं आहे तर ते आजचे प्रश्न, भविष्यावर परिणाम करणारे महत्वाचे विषय ह्यावर असायला हवं. ज्याने तुमच्या आमच्या आजच्या आयुष्यावर काहीही फरक पडत नाही अशा शेकडो वर्ष जुन्या वादावरून नाही.

आपल्या देशात अशा मुद्द्यांनी कायम मुख्य मुद्द्यांना बगल दिली आहे, भावनेने बुद्धीला बाजूला सारलं आहे आणि विकास दुय्यम झाला आहे. हा सर्वज्ञात इतिहास आहे. आपण ह्यापासुन तरी काही शिकणार का?