Wednesday, July 15, 2015

दाग अच्छे है

मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. 

त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. 

त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं. ज्या लोकांवर ज्या मोड्यूलची जबाबदारी होती, त्याचं काम संपलं कि ते घरी जात होते. असे करत आम्ही तिघे चौघेच पहाटेपर्यंत उरलो होतो. 

त्यात दोघेजण अगदी जवळच राहत होते. ते पायीपायी निघाले. मी आणि माझी एक मैत्रीण दोघे उरलो. पहाट झाली असली तरी सामसूम असल्यामुळे मी आधी तिला सोडून मग घरी जायचं ठरवलं. 

छायाचित्राचा स्त्रोत
तिथे एक दोनच टॅक्सी होत्या. आम्ही त्यातल्या एकात बसलो आणि निघालो. आम्ही बसुन निघाल्यावर आमचं टॅक्सीमध्ये आजुबाजुला लक्ष गेलं. त्या सीटवर खूपच विचित्र डाग पडलेले होते. मुळचे काळे नसले तरी थोडे काळपट. 
एवढ्या थकव्यानंतर अशी गचाळ टॅक्सी मिळाल्यामुळे आम्ही वैतागलो. 

"कसले कसले लोक बसतात टॅक्सीमध्ये कोण जाणे. किती घाण करून ठेवलंय हे सीट? आणि ह्यांना साफ करता येत नाही का?" इति मैत्रीण. 

"काय हो. सीट इतकं घाण झालंय, आणि तरी तुम्ही कसं काय बसवता लोकांना टॅक्सीमध्ये? ते साफ करा न आधी." मी त्या चालकावर डाफरलो. 

"सॉरी सर. करायचं आहे ते काम. पण राहुन जातंय. करेल सर लवकरच. सॉरी." चालक अपेक्षेपेक्षा विनम्र निघाला. 

छायाचित्राचा स्त्रोत
"आधीच करायचं ना मग. आणि आहेत कसले हे घाणेरडे डाग?" तो फक्त मला उद्देशुन सॉरी म्हणाला म्हणुन बहुतेक तिचा राग अजून कायम होता. 

"रक्ताचे". त्याने असं उत्तर दिल्यावर आम्ही दोघं दचकलो. 

"काय???" मैत्रीण. 

"कुणाच्या रक्ताचे?" मी. 

"मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे साहेब, तुम्ही बसले ना तिथेच हब मॉलसमोर एक अपघात झाला होता.
दोन पोरं गाडीवर चालली होती. त्यांना ट्रकने उडवलं. एक जवळच पडला, आणि एक जरा गाडीसोबत फरफटत गेला."

"एकदम गर्दी जमली होती. लोक नुसते पाहत होते सर. मी ह्या भागात आलो कि इथेच येउन थांबत असतो, तर मी आलो तर मोठा घोळका जमला होता. ट्रकवाला पळुन गेला होता. आणि लोक एकमेकांना कसा अपघात झाला ते सांगत होते. मी जाऊन पाहिलं तर पोरं तशीच पडलेली. कोणी तरी समोरून पाणी आणलं त्यांच्यासाठी, पण दवाखान्यात कोणी नेत नव्हतं."

"फार रक्त सांडलं होतं. पोरं कोवळी होती सर. माझा मुलगा पण त्याच वयाचा असेल. थोडा कमी जास्त."

"मी फार विचार नाय केला. त्यांना गाडीत टाकलं आणि अजुन एका माणसाला बसवलं सोबत अन घेऊन गेलो दवाखान्यात."

"त्यांना दाखल तर करून घेतलं पण नावगाव काही माहित नव्हतं. त्याचं सामान काही असेल तर आम्हाला माहित नव्हतं. तिथे माझं नाव नंबर वगैरे लिहून घेतलं आणि पोलिसांना पण कळवलं."

"खूप वेळ गेला. मी गेलो घरी शेवटी."

"त्यांचा मोबाईल कोणाला तरी सापडला होता. तो पोलिसात जमा झाला. कशीतरी ओळख पटली आणि त्यांचे घरचे दवाखान्यात पोचले. त्यांनी मला धन्यवाद द्यायला बोलवुन घेतलं. साधी पण चांगली माणसं होती सर. त्यांच्या वडिलांनी माझे हात पकडुन आभार मानले, आणि त्यांना एकदम रडु फुटलं."

"खोटं नाय बोलणार सर. पण असं कोणी नेउन सोडलं तर लोक देतात थोडी बक्षीस. मला पण होती थोडी अपेक्षा. आणि आपल्या गाडीचं सीट कव्हर एकदम साधंय न सर. ते रक्त वाळुन डाग पडले. लेदरचं असतं तर पुसता आलं असतं. इथे एकदम अवघड आहे. ते कव्हरच बदलावं लागणार. मला सध्या जरा जड जाइल ते. मी एरवी काही मागितलं नसतं, पण हे नुकसान झाल्यामुळे जरा मागावं वाटलं."

"पण तिथे गेल्यावर पाहूनच कळत होतं, त्या लोकांना उपचार जड चालले होते. एक मुलगा फारच जखमी झाला होता. मला मागावंच वाटलं नाय. बरं नसतं दिसलं ते. आणि त्या वडिलांनी जे माझे हात पकडून बोलले ना, कि तुमच्या मुळेच माझी पोरं जगली, त्याचंच फार समाधान वाटलं."

"माझी गाडी पाहून ते स्वतः म्हटले सर, कि तुमची नुकसान भरपाई देतो म्हणून. पण काही दिवस द्या, सध्या सगळे पैसे उपचारात चाललेत म्हणून. मी म्हटलं राहू द्या साहेब. तुमच्या पोरांचा जीव वाचला त्याच्यात समाधान आहे मला. मी बघेल माझ्या सीटचं."

"ते म्हणाले मला, पोरं बरी झाली कि भेटायला घेऊन येतो त्यांना. तुमचे त्यांना पण आभार मानायला सांगतो."

"तर असंय साहेब. ते साफ करायचं आहे मला, पण थोडा वेळ लागेल. म्हणून थोडे कस्टमर वैतागतात. पण इलाज नाय. काही दिवस हे असंच चालणार. त्या वडिलांना भेटल्यापासून मला त्या डागांचं पण काही वाटेना. म्हणजे मी कोणाचा तरी जीव वाचवल्याची खुण आहे ना सर ती. ती हटवावी लागणारच आहे, पण सध्या मला मेडलसारखी वाटतेय ती."

आम्ही निःशब्द झालो होतो. त्या डागांचं आता आम्हालाही काही वाटत नव्हतं. उलट अश्या चांगल्या माणसाची भेट झाल्याबद्दल छान वाटलं. 

रस्त्यांवर रोज कितीतरी अपघात होतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून खूप जणांचे जीव जातात. आपण अनेकदा असे अपघात जाता येत बघतो. कधी लोक जमलेलेच आहेत बघतील तेच काय ते असं म्हणुन निघून जातो. 

मला अशा वेळी थोडी अपराधी भावना येते. पण ती विसरली सुद्धा जाते. त्या गाडीत बसून मला ते सोडून दिलेले अपघात आठवले. आणि थोडं वाईट वाटलं. ती माणसं वाचली असतील का असा विचार आला. 

प्रत्येक ठिकाणी आपण मदत नाही करू शकत. काही नालायक लोक दुर्जन ठिकाणी अपघाताचे सोंग करून लोकांना लुटमार करतात. कधी पोलिस परेशान करतील अशी भीती असते. अशा कारणांमुळे गरजू लोकांना मदत करण्यास लोक घाबरतात. 

पण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपली गाडी खराब झाली तरी चालेल, आपला थोडा वेळ गेला तरी चालेल पण आपण हे जीव वाचवण्याचा प्रयत्न करूया अशा विचाराने मदत करायला हवी. 

असं करणारा एक माणुस आम्हाला भेटला आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटलं. 

शेवटी मी त्याला मीटर च्या वर १०० रुपये दिले. 

तो म्हणाला "नको साहेब, तुम्ही कशाला पैसे देताय. मी करेल ते काम माझं माझं."

मी म्हटलं त्याला "अहो तुम्ही उपकार किंवा मदत काहीच समजु नका याला. मी काही फार मोठी रक्कम देत नाहीये. तुम्ही जे चांगलं काम केलात त्याबद्दल आमची दाद समजा, कौतुकाने दिलेलं बक्षीस समजा."

त्यादिवशी पहिल्यांदा मला त्या साबणाच्या जाहिरातीतली ओळ सार्थ वाटली. "दाग अच्छे है". 

फेसबुकवरील या दुर्दैवी अपघाताच्या वृत्तांतापासून प्रेरित.