Sunday, July 12, 2015

कोकण सफर : ७ : विजयदुर्ग आणि राजापुर

विजयदुर्ग हा कोकणातला एक प्रसिद्ध किल्ला आहे. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव घेरिया होते. हा शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला आणि मग त्याचे विजयदुर्ग असे नामांतर केले. हा किल्ला शिवरायांच्याहि बऱ्याच आधीपासून अस्तित्वात आहे. शिलाहार राजांनी तो बाराव्या शतकात बांधला असे वाचायला मिळाले.

आधी चहुबाजूंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग होता. पण आता एका बाजुला भर टाकुन तो जमिनीशी जोडला गेला आहे. त्यामुळेच आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अगदी किल्ल्याच्या दारासमोरच उतरलो. आणि तो असा जमिनीवर पाहुन आम्हाला आश्चर्य वाटले. तो सिंधुदुर्गासारखाच बेटावर असेल आणि होडीने जावे लागेल अशी आमची कल्पना होती.

खूपच रणरणतं उन होतं त्या दिवशी. आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये पाणी शरबत वगैरे घेतलं. किल्ला पाहून आल्यावर तिथेच जेवू असं सांगितलं आणि आमचं जड सामान त्याच हॉटेलमध्ये ठेवुन आम्ही किल्ला पाहायला गेलो.

तो सुटीचा दिवस नव्हता, एवढं उन होतं आणि किल्ल्यावर सामसुम होती. इथे आम्हाला कोणी गाईडसुद्धा दिसला नाही. किल्ल्यावर फक्त आम्हीच फिरत होतो. आणि तसाही एक जलदुर्ग नुकताच पाहिला असल्यामुळे रचनेबद्दल थोडीफार कल्पना होतीच. गाईडकडून किल्ल्याचा इतिहास तेवढा नव्याने समजला असता.

छायाचित्राचा स्त्रोत
आम्ही किल्ल्यावर फेरफटका मारला. अगदी निवांत फिरलो. एका बुरुजावर उभे राहून समुद्र न्याहाळला. छान वारं सूटलं होतं म्हणुन एवढ्या उन्हात पण जर थंडावा मिळाला. समोर तळपत्या सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात चमचम करत होते. खूपच सुंदर आणि दिलखेचक दृश्य होतं ते.

किल्ला फिरून बाहेर गेलो. ठरलेल्या हॉटेलमध्ये जेवलो. कोकणात पर्यटन हा मोठा उद्योग आहे आणि तो दिवसेंदिवस फोफावतोय. आजकाल कोकणातल्या कुठल्याही (पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या) गावात जवळपास सगळ्या घरात खानावळी आणि कॉटेज असतात.

कोकणात मांसाहारी अथवा मत्स्याहारी लोकांची चंगळ असते. अशा लोकांना चिकन अथवा माश्याची एखादी छान डिश मिळाली कि ते खुश होतात. ती कोकणात मिळतेच. पण आम्ही तिघे मुख्यत्वे शाकाहारी लोक. मी कधी कधी चिकन किंवा फिश चवीला घेतो, पण आवड नाही. आणि इतक्या गरमीत तर नाहीच नाही. तर शाकाहारी लोकांची मात्र पंचाईत होते.

घरगुती जेवण या शीर्षकाखाली सगळी कडे तेच (तेच!!!) जेवण मिळतं. तुम्ही फक्त व्हेज कि चिकन कि फिश थाळी एवढंच सांगा. व्हेज म्हटलं कि बटाटा, पत्ताकोबी या पैकी एक भाजी, एक पातळ मटकी वगैरेची उसळ आणि सपक वरण भात हा ठरलेला मेनू. काहीच बदल नाही. त्यातली सोलकढी फक्त काय ती आम्हाला आवडायची.

जेवण करून आम्ही पुढे निघालो राजापूरला. राजापुर ला आम्हाला फक्त मुक्कामाला जायचे होते. आणि तिथुन सकाळी पुढच्या प्रवासाला.

आम्हाला बसच्या प्रवासात अगदी मागच्या बाजूला थोड्या पुढेमागे जागा मिळाल्या. त्या बसमध्ये बरेच लोक तो प्रवास रोज करणारे होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. ते एकाच गावात राहणारे, कामानिमित्त रोज सोबत प्रवास करणारे लोक होते. एकमेकांचे मित्रच होते. त्यांच्या आपसातसुद्धा गप्पा आणि हसणे खिदळणे चालू होते. आम्ही त्यांच्यात लगेच मिसळलो.

त्यांनी आमची सगळी हकीकत ऐकली, प्रवास कुठून कसा केला, आता कुठे जाणार ते ऐकलं. मग आमचं कसं चुकलं हे ऐकवलं. (हे अपेक्षितच होतं, पण ते टीकेच्या सुरात नाही तर सहज गप्पांच्या ओघात हे महत्वाचं :D ) तुम्ही इकडून तिकडे मग इकडे मग तिकडे असं करायला पाहिजे होतं असं सांगायला लागले. ह्यावरून त्यांचे आपसात मतभेद झाले. छ्याः, तिकडे काय आहे बघण्यासारखं, अरे तो रस्ता किती खराब आहे, असे त्यांचे दावे प्रतिदावे चालले होते. पण आमचा प्लान चुकला होता ह्यावर त्यांचं एकमत होतं. :)

एक दोघांनी आम्हाला त्यांच्या घरीच राहायला बोलावलं. पण सावंतवाडीमधल्या त्या क्रिकेट कोचच्या आपुलकीचा चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही तो धोका पत्करला नाही. आणि त्यांनी हि फार आग्रह केला नाही. आम्ही बसस्थानका जवळच एका हॉटेलात मुक्काम केला. मला वाटतं त्याच रात्री का दुसऱ्या दिवशी पहाते बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. हॉटेलचा चालक त्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पाहत बसला होता.

आमची मग हॉटेलच्या लॉबीमध्ये भारत पाकिस्तान राजकारणावर बरीच चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.