Tuesday, July 7, 2015

कोकण सफर : ६ : कुणकेश्वर

कुणकेश्वरला आम्ही रात्री पोहोचलो. अगदी गुडुप अंधार झालेला होता. आम्ही राहायला जागा शोधत फिरू लागलो.

एका घरी काही खोल्या भाड्याने देण्याची व्यवस्था केली होती, तिथे आम्ही चाललो होतो. समुद्राचा आवाज येत होता आणि वारं सुद्धा खुप छान सुटलेलं होतं.

तिथे सुदैवाने आम्हाला जागा मिळाली. काही जणांनी तिथे आधी जागा आरक्षित केलेली होती, पण ऐन वेळेवर त्यांनी बेत रद्द केला, आणि तो आमच्या पथ्यावर पडला. त्यांनी एक मोठी आणि एक छोटी खोली घेतली होती. त्या मालकांच्या सुदैवाने त्यांना दोन्ही खोल्यांसाठी भाडेकरू मिळाले. आम्हाला त्यातली छोटी खोली मिळाली.

ती खोली काही खास नव्हती. पण आम्ही तिथे ज्या वातावरणात पोहोचलो होतो ते इतकं छान होतं कि आम्हाला खोलीबद्दल काहीच वाटलं नाही.

कधी कधी असंच होतं. एखादी गोष्ट वेगळ्याच कारणासाठी आवडते. काही खाण्याच्या प्रसिद्ध जागी बसायलाही जागा नसते. तरी तिथे लोक जातात. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अगदी सुमार असतो, पण ती जागा खूप निवांत असते, तिथे गप्पा छान होतात म्हणून लोक जातात.

हातपाय धुवून आम्ही बाहेर पडलो. कुणकेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे. समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून उंच असं मंदिर बांधलेलं आहे. तिथून किनाऱ्यावर उतरायला मोठ्ठा जिना आहे.

दंतकथा अशी आहे कि एका वादळात अडकलेल्या जहाजावरून एक व्यापारी बचावून या किनाऱ्यावर पोहोचला. आणि त्याने इथे हे मंदिर बांधलं.

आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार गर्दी नव्हती. प्रसन्न आणि मनासारखं दर्शन झालं.

मंदिरात गेलो कि अक्षय त्याला येतील तेवढे सगळे मंत्र आणि स्तोत्र म्हणतो आणि त्याला बाकीच्यांच्या तुलनेत नेहमी जास्त वेळ लागतो. इथे मात्र आम्ही सगळेच प्रसन्न वातावरणामुळे, मंदिराच्या सौंदर्यामुळे, तिथल्या शांततेमुळे भारावून गेलो होतो. अशा ठिकाणी जी देवाशी जवळीक जाणवते, भक्ती दाटते, ती रांगेत लागून, मंदिरात ओळख काढून किंवा पैसे मोजून पास काढून रांगेला बगल देत जे दर्शन उरकलं जातं त्यात कधीच होत नाही.

चराचरात ईश्वर आहे असे मानणाऱ्या आणि शिकवणाऱ्या आपल्या समाजात देवाचे वेगळे मंदिर बांधण्याचा उद्देश देवाजवळ जाता यावे, त्याचा सहवास जाणवावा म्हणूनच असावा. पण आताच्या कर्मकांडांच्या पद्धतीत सगळं काही उरक्ल्याची, फक्त पार पडल्याची भावना होते, देव भेटल्याची नाही.

इथे आम्हीसुद्धा जास्त वेळ बसलो होतो. पण अक्षय त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षासुद्धा खूप जास्त वेळ बसला होता. आम्हाला वाटलं मंत्र एकदा नाही तीनदा म्हणेल. पण अक्षय खूपच वेळ बसून होता. त्याची तंद्री लागली होती. आम्हाला आता आपला मित्र संन्यास घेतो कि काय अशी भीती वाटायला लागली. पण तसं काही झालं नाही, काही वेळाने अक्षय परत माणसात आला.

आम्ही बराच वेळ बाहेर कठड्यावर बसलो.

एक काका भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. पण त्या काकांना तरुण श्रोते मिळाल्यामुळे जास्त हुरूप चढला. माझा अध्यात्माचा सुद्धा अभ्यास आहे, आणि आपण इथे मंदिरात या वातावरणात बसलेलो आहोत तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो असं म्हणून चांगलंच प्रवचन दिलं. आता त्यातलं काहीही आठवत नाही. फक्त असं गाफील पकडून प्रवचन दिल्यामुळे त्या काकांची आठवण राहिली आहे.

आम्ही गावात फेरफटका मारून एका ठिकाणी जेवलो. तिथे अतिशय मोठा ग्रुप आलेला होता. त्यांचा धिंगाणा, मौजमजा चालू होती. थोडावेळ दुरून त्यांची मजा बघितली आणि आम्ही परत रूमवर जाऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर किनाऱ्यावर जायचा विचार होता पण आम्हाला जाग आली नाही. आम्ही उठलो तेव्हा मयुर गायब होता. तो काही वेळातच आला. त्याला जाग आली होती, आणि आम्ही उठलो नाही म्हणून तो एकटाच जाऊन फिरून आला होता. आणि असलं भारी वातावरण होतं यार, खूप मस्त वाटत होतं म्हणून आम्हाला जळवत होता.

या पूर्ण सहलीत कुणकेश्वरला आम्ही जे वातावरण आणि शांतता अनुभवली त्यामुळे या गावाची आणि मंदिराची एक वेगळ्याच प्रकारची रम्य आठवण आहे. काही दिवसांनी एकदा अक्षयला एका वक्तृत्व कलेच्या तासामध्ये आवडत्या जागेबद्दल बोलायला सांगितलं, तेव्हा तो याच जागेबद्दल बोलला.

आम्ही आवरून पुन्हा मंदिरात दर्शन घेतलं. आणि किनाऱ्यावर बराच वेळ घालवला. मग नाश्ता करून आम्ही त्या सुंदर गावातून निघालो.

No comments:

Post a Comment