Tuesday, January 24, 2012

क्रौर्य

लहानपण म्हटलं कि एकदम गोड दिसणारी मुलं नजरेसमोर येतात, निष्पाप, निरागस, भोळी अशी विशेषणं डोक्यात येतात, बालकृष्णासारख्या लीला मनात येतात. हि अगदी सहज प्रतिक्रिया आहे, लहानपणाची अगदी पक्की डोक्यात बसलेली प्रतिमा आहे.

पण या प्रतिमेपलीकडेसुद्धा लहानपणाच्या काही काळ्या बाजू असतात, वाईट कोपरे असतात. लहानपणी केलेले जसे काही अभिमानास्पद, काही गमतीशीर पराक्रम आणि किस्से आठवतात, तसे मला काही लज्जास्पद प्रकारसुद्धा आठवतात. 

मन सर्वार्थाने संवेदनशील होण्याआधी लहानपणी मुक्या प्राण्यांवर केलेले क्रूर अत्याचार माझ्या मनातून जात नाहीत. तेव्हा काही कळत नव्हतं असा बहाणा करता आला तरी त्या बहाण्यावर स्वतःला स्वतःपासून सटकता येत नाही.

मी आणि माझे काही मित्र आम्ही लहानपणी खेळात, मजेत प्राण्यांना, किडामुंग्यांना अत्यंत भयानक छळलं आहे. आम्ही कुत्र्याच्या पिल्लांना त्यांच्या शेपटीला धरून उचलायचो. ती केकाटायला लागली कि हसायचो. त्यांना तसंच गोल गोल फिरवून भिरकावून द्यायचो. पेकाटात लाथा घालायचो. कुत्री, त्यांची आई जवळ नसताना आमची अशी मर्दमुकी चालायची. 

दोरीची गाठ करून बेडकांना त्यात अडकवायचो. त्यांचं अंग फाकताना, फाटताना पाहायचो. कोणी तरी सांगितलं, पैशाला (गांडूळासारखा अनेक प्रयांचा छोटासा प्राणी, त्याला हात लावला तर गोल वेटोळा
 घालून बसतो) पकडून काडीपेटीत बंद करून ठेवलं तर खरंच पैसा बनतो. प्रयोगाच्या हौसेने म्हणा अथवा पैशाच्या आकर्षणापोटी आम्ही काही पैसे पकडून बंद केले, आणि काही दिवसांनी त्यांचे पैसे नाही बनले म्हणून त्यांना मारून टाकलं.

गांडूळ तुकडे पाडलं तरी लगेच मारत नाही. त्याचा जीव, मज्जा रज्जू, बुद्धी सगळा विभागलेला असतं. म्हणून तुकडे पडले तरीहि प्रत्येक तुकड्यात जीव राहतो, आणि वळवळ सुरु राहते. ह्याची मी कित्येक प्रात्याक्षिके केली. 

एकदा आमच्या ओट्याच्या बाजूच्या सिंकमध्ये एक पाल येऊन पडली. पाल संकटात सापडली तर आधी शेपूट सोडून हलकी होते, आणि चपळ होऊन पळायचा प्रयत्न करते, हे पाहायला मी आधी तिच्या शेपटीवर प्रहार केला. नळाने पाण्याचा भडीमार केला, पण ती तगली. मग तिला कडची का आणखी काही घेऊन अक्षरशः ठेचून ठेचून मारलं. पुढे कुठेही पुस्तकात वर्णन वाचलं कि अमक्याला ठेचून मारलं पाहिजे, किंवा मारलं, तर माझ्या डोळ्यासमोर सगळा जिवंत देखावा उभा राहतो.

आपल्याला कुठलाही त्रास नसताना आपण त्यांना उगीचच छळतोय हे उमगलं तेव्हा खूप वाईट वाटलं. दुसऱ्यांची खोडी काढू नये, त्रास होईल असं वागू नये, हे सगळ्यांचे आई बाबा शिकवतात. त्यामध्ये प्राण्यांचाही समावेश करावा हे आधी जाणवलंच नाही. कॉलनीमधल्या मुलांसारखे ते प्राणी काही घरी येऊन नाव सांगू शकत नसत, त्यांच्या वतीने भांडायला त्यांचे पालकसुद्धा असमर्थ. आणि हे कोणाच्याही नजरेआड येत नसल्यामुळे आम्ही मोकाट.

पाल, कुत्रे, बेडूक हे काही चीन्कारासारखे दुर्मिळ जीव नाहीत, आणि आम्हीहि कोणी सेलिब्रिटी नाही, त्यामुळे अशा गुन्ह्यांखाली आमच्यावर पशुहक्क सारखे खटले हि भरले नाहीत कोणी.

त्यामुळेच या गोष्टी बंद व्हायला काही साक्षात्कार वगैरे झाला नाही, समज वाढत गेली तसा यातला आनंद आणि मजा आपोआप कमी होत गेले. स्वतःचे विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी विकसित होईपर्यंत वेळ लागला.

आम्ही काही अपवाद नव्हे, तेव्हाहि आणि आजही मी अनेक मुलांना, असंच करताना पाहतो. आम्ही तेव्हा करत होतो, तेव्हा मजा येत होती, आज दुसऱ्यांना तशी मजा घेताना पाहतो, तेव्हा आपल्यालाहि कधी असल्या प्रकारांनी आनंद व्हायचा याची शरम वाटते. लहानपणात भूतदयेचं शहाणपण लवकर आलं असतं तर हि टोचणी मनाला लागली नसती.

2 comments: