Thursday, January 12, 2012

चोरून पाहिलेला पिक्चर

घरी न सांगता पाहिलेल्या सिनेमाला किंवा केलेल्या कुटाण्यांना 'इल्लिगल' म्हणायची पद्धत मी आणि माझा मित्र चेतनने मिळून १२ वीच्या सुमारास सुरु केली. नुकतंच कॉलेज सुरु झालेलं असल्यामुळे आम्हाला ती हवा लागली होती, आणि ११वि १२ वीच्या दोन वर्षात आम्ही बऱ्याच illegal activities केल्या. पण काही वर्षांपूर्वी या शब्दाचा गंध नसताना आम्ही एक पिक्चर अनधिकृतपणे पाहिला, आणि नंतर घरी कळल्यावर, सरकारदरबारी अनधिकृत बांधकाम नियमित करताना होत असेल तसा त्रास आम्हाला झेलावा लागला.

आम्ही ६वि मध्ये होतो. याआधी आम्ही फक्त घरच्यांसोबतच पिक्चर  पाहायचो. फक्त मुलं जाण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. आमच्या या पराक्रमानंतरमात्र आम्हाला चांगलाच आत्मविश्वास आला आणि आम्ही दर मोठी परीक्षा झाली कि पिक्चरचा बेत आखायला लागलो.

झालं असं, कि आमचा एक लहानपणीचा वर्गमित्र सुमित पगारिया, जो चौथीनंतर शाळा सोडून गेला होता. तो वर्ष-दीड वर्षाच्या अंतराने औरंगाबादला आला होता, आणि आम्हाला भेटायला शाळेत आला होता. पूर्ण मधली सुटी आम्ही त्याच्यासोबतच घालवली. बाहेर खाल्लं, गप्पा मारत बसलो. वर्गातही उशिरा आलो, पण एवढ्यावर त्याचं आणि आमचं समाधान झालं नाही. कल्पना कोणाची ते आठवत नाही, पण आमचा त्याच दिवशी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा 'बादशाह' पहायचं ठरलं. 


सुमित सुटीवरच होता, आणि शाळा संपेपर्यंत तो घरी जाऊन येणार असल्यामुळे घरी सांगूनपण येणार होता. अडचण होती ती आमची, मी, सुशांत (चुलत भाऊ), आणि अमित बरडे यांची. आमच्या घरी सांगायचं कसं हाच मोठा प्रश्न होता. आतापर्यंत आमचं आम्ही असं पिक्चरला गेलेलो नसल्यामुळे ते हो म्हणतील कि नाही याचा आम्हाला अंदाजच नव्हता. आणि ते एकवेळ बाजूला ठेवलं तरी आमचे आई-बाबा ऑफिसला गेलेले असल्यामुळे त्यांना विचारायचीही सोय नव्हती.

मुळात जायचं कि नाही यावर आम्ही खूप वेळ घोटाळत बसलो. मग जायचं ठरल्यावर अमितचं घर अगदी जवळ असल्यामुळे, त्याच्या घरी सांगणं तर भागच होतं, त्याच्या आईला विनंत्या करून आम्ही परवानगी मिळवली. पण मी आणि सुशांत घरी सांगणार कि नाही याची चौकशी करून त्यांनी आम्हीसुद्धा घरी सांगूनच जायला हवं अशी अट घातली. त्यांच्यासमोर हो ला हो लावून आम्ही परवानगी पदरात पाडली. आमच्याकडे तेव्हा पैसे तर नव्हते त्यामुळे, अमितच्या घरी सांगितल्यामुळे आमची तिकीटाची सोय झाली.

मग पुन्हा आमच्या घरी कसं सांगायचं यावर चर्चासत्र. माझी तर चांगलीच फाटली होती. आम्ही ऑफिसमध्ये फोन केला असता तर परवानगी नाकारायची शक्यताच जास्त, आणि ऑफिसमध्ये फोनवर जास्त वेळ विनवण्या करणं वगैरे तर शक्य नव्हतं, आणि ते नाही म्हणाले असते आणि आम्ही तरीही गेलो असतो, मग तर आमची पद्धतशीर खरडपट्टी काढली गेली असती. म्हणून आम्ही त्यांना न विचारताच जायचं पक्कं करून टाकलं.

पण घरी काही तरी निरोप पोचणं गरजेचं असल्यामुळे, आम्ही रिक्षा करून घरी गेलो. रिक्षाच भाडं सराफकाकूंना(आमच्या भाडेकरू) द्यायला लावलं. घरी दप्तर टाकून दिलं आणि सराफ काकूंकडून घाई-घाईमध्ये आणखी पैसे घेऊन, बाहेर जातोय असं सांगून निघालो.

एवढं सगळं करून आम्ही थियेटरला पोचलो, तेव्हा तिकिटे संपली होती, आणि ब्लैकमध्ये विक्री सुरु झाली होती. ब्लैकबद्दल पेपरमध्ये मी बरंच वाचलेलं होतं. त्यांच्या टोळ्या, पोलिसांच्या कारवाया, असं बरंच काही मी ऐकून होतो. त्यामुळे आता काय करायचं यावर पुन्हा आमचा खल सुरु झाला. मी घरी परत जायचं म्हणत होतो, घरी न सांगता, ते पण ब्लैकमध्ये पिक्चर पहायचा मला अतीच वाटत होतं. तर आता आलोच आहोत तर पाहून घेऊ पिक्चर असं बाकीच्यांचं म्हणणं होतं, असंही घरी जाऊन बोलणी खायचीच होती, तर मी नंतर तयार झालो.

ब्लैकवाला एक अगदी टिपिकल गुंड छाप माणूस होता, त्याने सांगितलेल्या दामदुप्पट भावात आम्ही थर्डक्लासची तिकिटे घेतली. भाव करायची तर आमची टाप नव्हतीच. आमचे तिकीट आणि इंटर्वल मध्ये खाण्याचे असे मोजूनमापून आणलेले पैसे त्यातच संपले होते. आत गेलो तेव्हा पिक्चर सुरु होऊन गेलेला होतं. रसभंग म्हणून तरी किती व्हावा.

तो पिक्चर मी अत्यंत उत्तेजित आणि अस्वस्थपणे पाहिला. ब्लैक्मध्ये तिकीट काढली होती तर कोणी उठवत तर नाही ना असं मला वाटत राहिलं. आणि घरी न सांगता परस्पर येण्यामधल रोमांच किंवा भीती काय म्हणता येईल ते तर होतंच. पहिला दिवस असल्यामुळे भरगच्च गर्दी होती. आणि आम्हाला पिक्चरसुद्धा आवडला. (जेम्स बॉन्ड तोपर्यंत पहिला नसावा म्हणून :-D) तो पडलेला फ्लॉप पिक्चर होता हे बरंच नंतर कळलं.

नंतर घरी पोचलो तेव्हा, सराफ काकूंकडून पैसे घेऊन आम्ही कुठेतरी गेलो, हे तर आई आणि काकूला कळलंच होतं. तर त्यामुळे आम्ही न सांगता बाहेर गेलो म्हणून, पिक्चर पाहिला म्हणून, सराफकाकू आणि अमितकडून पैसे घेतले म्हणून, बेजबाबदारपणा दाखवला म्हणून अशा प्रत्येक मुद्द्यावरून आम्हाला झापलं. आणि एवढं पुरेसं नव्हतं म्हणून कि काय, उत्तरपूजा बांधायला आम्हाला आजीकडे जायला सांगितलं.

आता तिकडे काय होणार यावर विचार करत आम्ही दोघं तिच्या घरी गेलो. तेव्हा तिथे अपेक्षेएवढं काही झालं नाही. आजी फार काही बोलली नाही. थोडंसं झापून नंतर आम्हाला शिकरण-पोळी खायला देऊन शांत बसली. आणि आम्ही यावर आश्चर्य व्यक्त करत, पोपोयचं कार्टून बघत निवांत खायला बसलो.

माझ्या चित्रपट कारकीर्दीमध्ये तो दिवस सोन्याच्या अक्षराने लिहिला जाईल. माझ्या आणि मित्रांच्या पिक्चर पाहणे, अनधिकृतपणे पाहणे, पडेल पिक्चरसुद्धा पहिल्या दिवशी पाहणे, अशा प्राणपणे जोपासलेल्या अनेक परंपरांची मुहूर्तमेढ त्यादिवशी रोवली गेली.

No comments:

Post a Comment