Sunday, January 15, 2012

चंपक आणि रमेश मुधोळकर

औरंगाबादला जुन्या शहरात गुलमंडी, कुंभारवाडा, टिळकपथ असे भरपूर दुकानांनी गजबजलेले भाग आहेत. तिथे शहरवासीयांची खरेदीसाठी नेहमी झुंबड उडते. मोठ्या ब्रान्डची दुकाने, मॉल्स येईपर्यंत आणि अजूनही काही वेळा आमची कपडाखरेदी तिकडेच ठरलेली असते.

लहानपणी मी आणि बाबा काही कामासाठी तिकडे गेलो होतो. खरेदी उरकून आम्ही पार्किंगजवळ आलो. तिथे समोरच एक पेपर स्टाल आहे. तिथे बाबा मासिके, पुस्तक वगैरे चाळत होते. तिथे चंपक नावाचं मुलांचं मासिक पण होतं. बाबांनी ते माझ्यासाठी विकत घेतलं.

खास माझ्यासाठी असं घेतलेलं (शाळेची सोडून) ते पहिलंच पुस्तक. मासिक म्हणजे काय हे समजेपर्यंत माझ्यालेखी ते एक पुस्तकच होतं. घरी जाताना मी खूप उत्सुक होतो, घरी गेल्यावर ते वाचायला. पुढे ते वाचून संपवायला मला एक आठवडा लागला जवळपास. तेव्हा वाचनाचा वेग खूपच कमी होता.

त्या मासिकात काही गोष्टी, काही कॉमिक्स, हसू नका बरे नावाचं विनोदांच सदर असं बरंच काही होतं. त्यात एक गोष्ट होती, ती (पुढील गोष्ट पान नं अमुक वर) असं बारीक अक्षरात लिहून अर्धवट सोडली होती. मी ती सूचना वाचलीच नाही आणि सलग वाचत गेलो. ती गोष्ट अर्धवट कशी हे मला समजलं नाही, मी पान गहाळ झालाय का हे नंबरवरून तपासायचा प्रयत्न केला, पण ते तर बरोबर होतं. ते तसंच सोडून मी वाचत गेलो. पुढे जेव्हा त्या पानावर पोचलो, तेव्हा मधेच ती गोष्ट सुरु झाली.. आणि मग मला संदर्भ लागला. आणि असंच पेपरमध्येपण करतात हे हि समजलं.


ते पुस्तक संपलं तेव्हा खूप आनंद झाला. आम्ही पुढे बरेच महिने ते आणतच गेलो. कधी कधी त्यातून क्रमशः एखादी मालिका प्रसिद्ध व्हायची, तेव्हा तर पुढचं मासिक येईपर्यंत उत्कंठा लागलेली असायची. कॉमिक्सची आणि माझी ओळख चंपकमुळेच झाली. त्यातला चिकु नावाच्या सशाची कॉमिक्स मला अत्यंत आवडत. नंतर डायमंड कॉमिक्सची चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी अशी सध्या माणसा-मुलांची कॉमिक्स, आणि राज कॉमिक्सची नागराज, सुपर कमांडो ध्रुव, शक्ती अशी सुपरहिरोजची कॉमिक्ससुद्धा आणून वाचायला लागलो.
कधी कधी 'चांदोबा' नावाची पौराणिक कथा, ग्रीक कथा असलेली मासिके सुद्धा वाचली जायची.

आणि मला त्यातूनच वाचनाची आवड लागली. मला वाचायला आवडतं म्हणून मग आई बाबांनी आणखी मिळतील तशी मुलांसाठीची पुस्तके आणायला सुरु केलं. आणि माझी वाचनाची आवड आणि सवय वाढत गेली.

या पुस्तकांमध्ये सुरुवातीला जास्त करून रमेश मुधोळकर यांनी लिहिलेली मोठ्या माणसांची चरित्रे, अकबर बिरबल यांच्या गोष्टी अशी होती. अकबर आणि बिरबलच्या गोष्टी तर माझ्या काकांना सुद्धा आवडायच्या, ते पुस्तक वाचायला आम्हाला त्यांच्याशीसुद्धा स्पर्धा करावी लागायची. :-D

रमेश मुधोळकरांची अशी बरीच अक्षरशः शेकडो पुस्तके आहेत. मी आत्ता हा लेख लिहितांना त्यांच्याबद्दल माहिती मिळवायला गूगल केलं तेव्हा त्यांची यासाठी लिम्का बुकमध्ये नोंद आहे असं कळलं. ते लेखक अपघातानेच झाले. कुठल्याशा पुस्तकाच्या अनुवादात त्यांनी भाग घेतला, आणि मग लिहित गेले. लहान मुलांसाठी साहित्य निर्मिती करत गेले.

या साहित्याला कोणी फार महान समजत नाही, आणि समजणारही नाही. ते तसं नाहीच. त्या वयात शाळेत कुठल्या तरी प्रश्नावलीत मी आवडते लेखक 'रमेश मुधोळकर' असं लिहिलं तेव्हा बाबा, काका हसले होते. पण लहान मुलांना वाचनाची आवड लागावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश असतो, त्यात ती सफल होतात, हे माझ्या उदाहरणावरून मी सांगू शकतो. अगदी लहान वयात कोणी शेक्सपिअर, कालिदास आणून दिला तर तो समजणारही नाही, आणि त्याची किंमतही कळणार नाही. पायाला, पहिल्या पायरीला सुद्धा महत्व आहेच.

आपल्याकडे दुर्दैवाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. लहान मुलांची पुस्तक काय, कोणीही लिहील असं अविर्भाव असतो. पु लंना देखील याची खंत होती. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंय कि "आयुष्यात काही करायचं राहून गेलं असं विचार केला तर लहान मुलांना आवडेल, रुचेल असं काही माझ्या हातून घडलं नाही, याची मला खंत राहील"

पुढे मी अनेक क्लासिक्स वाचली, चांगल्या कथा, कादंबऱ्या वाचल्या. त्यांनी माझं आयुष्य नक्कीच समृद्ध झालं. पण माझं लहानपण समृद्ध करण्याचं श्रेय जातं ते या मासिकांना, आणि लेखकांना.

मी हा लेख केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने लिहिला. मला वाचनाची आवड आणि सवय लावल्याबद्दल धन्यवाद आई-बाबा, चंपक आणि रमेश मुधोळकर. :-)