आजकाल प्रिंट मिडीयाला इलेक्ट्रोनिक मीडियाकडून स्पर्धा होत असली, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत पेपर आणि संध्याकाळच्या बातम्या हे बातम्यांचे एकमेव स्त्रोत होते. पेपरमध्ये काही छापून येण्याला अनन्यसाधारण महत्व होतं, आणि त्यामुळे आपल्यातल्या कोणाचं कुठल्याही संदर्भात पेपरमध्ये नाव छापून आलं तर ती एक सनसनी असायची.
तुमचं पेपरमध्ये नाव येण्यासाठी काही मोजकी प्रमुख कारणे असू शकतात
- तुम्ही राजकारणी/ नेते / कार्यकर्ते / आंदोलनकर्ते असाल तर
- तुम्ही अभिनेते / खेळाडू / कसलेही सेलिब्रिटी असाल तर
- महत्वाचे सरकारी अधिकारी असाल तर
- तुमच्या हस्ते उद्घाटन झाले तर, एखादे भाषण ठोकले तर
- गुन्हेगार असाल तर
- पिडीत असाल तर
- काही उल्लेखनीय यश मिळवले तर
आम्ही सामान्य मध्यमवर्गी असल्याने फक्त शेवटचे कारण लागू होते, त्यामुळेच पेपरमध्ये नाव येण्याइतके यश मिळवणे म्हणजे आमच्यासाठी अतिशय मोठी अभिमानास्पद गोष्ट असे.
माझं पहिल्यांदा पेपरमध्ये नाव आलं ते, तिसरीत एका चित्रकलेच्या स्पर्धेत दुसरा नंबर आला म्हणून. सकाळ वृत्तसमुहाकडूनच घेतलेली ती स्पर्धा असल्यामुळे, आपोआप त्याची बातमी आली होती. आणि मला शाळेत शिक्षकांनी बोलवून पेपर मध्ये नाव आल्याचं सांगितलं, आणि अभिनंदनसुद्धा केलं.
तेव्हा आमच्याकडे सकाळ घरी येत नव्हता, त्यामुळे तो खास विकत आणून ती बातमी वाचली, सगळ्यांना वाचून दाखवली. त्यात माझा तिसरा नंबर आल्याचं छापलं गेलं होतं म्हणून मी थोडा हिरमुसलो होतो.
नंतर असा प्रसंग आला तो चौथी मध्ये मी शाळेत पहिला आलो, आणि शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली तेव्हा. तेव्हा शाळेकडून रीतसर याची बातमी पेपरला दिली गेली. लोकमतच्या मराठी आणि हिंदी दोन्ही आवृत्त्यांमध्ये ती छापली गेली. पण दोन्ही मध्ये एक चूक झाली ती अशी, कि माझं पूर्ण नाव आकाश प्रदीप खोत, यातलं नेमकं माझं नाव वगळून प्रदीप खोत एवढंच छापलं. त्यामुळे "प्रदीप खोत यास शिष्यवृत्ती" अशी त्याची हेडलाईन होती. :-D बाबांच्या बऱ्याच ओळखीच्या लोकांचा ती हेडलाईन वाचून गोंधळ उडाला आणि त्यातल्या काहीजणांनी बाबांकडे त्याची चौकशी सुद्धा केली.
त्यानंतर पुढे मात्र माझं नाव नीट छापलं गेलं. पुढील वर्षांमध्ये असे प्रसंग अनेकदा आले. कधी चित्रकलेतल्या यशाबद्दल, तर कधी स्पर्धा परीक्षेतल्या बक्षिसाबद्दल, किंवा स्नेहसंमेलनातल्या सहभागाबद्दल. सुरुवातीला प्रत्येक वेळी आनंद व्हायचा. लोकांकडून अशावेळी तर नेहमीच अभिनंदनाचा वर्षाव व्हायचा. पण नंतर यातला आनंद कमी होत गेला.
तरीहि जेव्हा जेव्हा माझं नाव पेपर मध्ये आलं, जवळपास त्या प्रत्येक वेळच्या बातमीची कात्रणे मात्र मी जपून ठेवली आहेत. माझ्या एका मित्राने तर त्याचं नाव आलेले अख्खे पेपर जपले आहेत. हौसेला खरच काही सीमा नसते.
शाळेनंतर दोन-तीन वर्ष तरी मी असं पुन्हा काही उल्लेखनीय केलं नाही. नंतर कॉलेजमध्ये काही स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली तेव्हा सगळ्यांसोबत माझंही नाव आलं, त्याचं मला काही वाटलं नाही.
नंतर मात्र एका स्पर्धेत जिंकल्याबद्दल मला "मराठवाडा आय टी आयडॉल" असं प्रमाणपत्र मिळालं. ती स्पर्धा अत्यंत छोट्या प्रमाणावर झाली असल्यामुळे मला त्यात काहीच विशेष आनंद अथवा कौतुक नव्हतं, पण त्याची बातमी पेपर मध्ये आल्यावर, आणि त्या आकर्षक किताबामुळे सगळ्यांना एकदम काहीतरी मोठं वाटलं आणि मला सगळ्यांनी विश केलं. मीडियामुळे असा एकदा मीही उगाचच मोठा झालो होतो. :-D
नंतर मात्र एका स्पर्धेत जिंकल्याबद्दल मला "मराठवाडा आय टी आयडॉल" असं प्रमाणपत्र मिळालं. ती स्पर्धा अत्यंत छोट्या प्रमाणावर झाली असल्यामुळे मला त्यात काहीच विशेष आनंद अथवा कौतुक नव्हतं, पण त्याची बातमी पेपर मध्ये आल्यावर, आणि त्या आकर्षक किताबामुळे सगळ्यांना एकदम काहीतरी मोठं वाटलं आणि मला सगळ्यांनी विश केलं. मीडियामुळे असा एकदा मीही उगाचच मोठा झालो होतो. :-D
आता सोशल मीडिया असल्यामुळे, लोकांच्या कर्तृत्वाचा गवगवा व्हायला वेळ लागत नाही. तुमच्याबद्दल जे काही सांगण्यासारखे आहे, जी काही बातमी आहे, ती शेकडो लोकांपर्यंत पोचण्यासाठी फक्त एका स्टेटस अपडेटची गरज आहे. इथे सगळेच वैयक्तिक स्पेस असलेले सेलिब्रिटी असतात, आणि सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट होतात. एखाद्या ट्राफिक जामची, कोणाच्या आजारपणाची, एखाद्या शिंकेची सुद्धा बातमी होऊ शकते. असल्या छोट्या गोष्टीनादेखील भरपूर लाईक मिळतात.
पण आपलं कर्तृत्व लोकांपर्यंत पोचण्यासाठी मोजकी माध्यमे असतानासुद्धा, त्या माध्यमात उल्लेखला जाण्यासारखे काहीतरी माझ्या हातून घडले याचा मला सार्थ अभिमान आहे. :-)
No comments:
Post a Comment