Monday, March 9, 2015

संघर्ष

नुकतीच अमिताभ बच्चन यांची एक सुंदर मुलाखत पाहण्यात आली. चक्क अर्णब गोस्वामीने अमिताभना या मुलाखतीत बोलू दिलं. :D

या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचे वडील (महान साहित्यिक) हरिवंशराय बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. एकदा अमिताभ काही समस्यांमुळे त्रस्त होऊन वडिलांकडे गेले. आणि त्यांना तक्रारीच्या सुरात म्हणाले, "बाबूजी, जीवनमे बडा संघर्ष है"

त्यावर हरिवंशराय यांनी उत्तर दिले "जब तक जीवन है, तब तक संघर्ष है". 

अगदी सहज त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिलं. संघर्ष हा जीवनातला एक त्रासदायक टप्पा नसून आयुष्यभर असणार याची जाणीव करून दिली. 

आपल्याला नेहमी भरपूर अडचणी येत राहतात. कधी घरात, कधी बाहेर, मनाच्या, शरीराच्या, माणसांच्या, तंत्रज्ञानाच्या अशा कितीतरी प्रकारच्या अडचणी. अडचणी आल्या नाहीत असा माणूस मिळणे अशक्य आहे. 

आपल्याला काही श्रीमंत, प्रसिद्ध लोकांकडे पाहून वाटतं, यांचं आयुष्य किती सोपं आहे. कसलीहि अडचण नसेल. पण श्रीमंतीची आणि प्रसिद्धीचीसुद्धा एक किंमत असते. 

श्रीमंत माणूस अनेकांच्या डोळ्यात खुपतो. त्यांना खंडणीसाठी धमक्या येतात. व्यवसायात अडचणी असतात. आपलं वर्चस्व, धन टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांनासुद्धा झगडावंच लागतं. किंबहुना बराच संघर्ष करूनच ते त्या पदी पोचलेले असतात. हा संघर्ष आपल्या नजरेआड होतो.

स्वतः अमिताभ यांचच आयुष्य बघा. त्यांनी सुरुवातीला अभिनेता म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी तर संघर्ष केलाच. तो तर प्रत्येक अभिनेत्याने केलेला असेल. तरुण वयात असे संघर्ष करण्याची ताकद आणि धमक माणसात असतेच. पण शिखरावर असताना आपल्या काही व्यावसायिक चुकांमुळे ज्या माणसावर दिवाळे निघण्याची वेळ येते. त्यातुन जिद्दीने आणि मेहनतीने पुन्हा बाहेर येउन शिखराकडे जाण्याचा जो संघर्ष अमिताभ बच्चन यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात करून दाखवला त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्याला फिनिक्स पक्ष्याचीच उपमा द्यावी लागते.

आपण सामान्य माणसांच्या संघर्षाची यादी करायलाच नको. ती कोणीही देऊ शकतो.

संघर्ष हा शब्द ऐकला कि लगेच मनात एक त्रासदायक भावना येते. त्या शब्दाशी आपण त्रास, अडचणी अशा गोष्टी जोडल्या आहेत. आपण जोडल्या म्हणण्यापेक्षा त्या संघर्षाच्या व्याख्येतच आहेत.

पण जर आपण या संघर्षाशी जोडलेल्या काही छान गोष्टींचा विचार केला, तर संघर्षाची किंमत कळेल. उदा.. शिकवण, आठवण, मजा, आनंद. काही चुकलं का? या गोष्टींचा संघर्षाशी काय संबंध असं वाटतंय?

प्रत्येक संघर्ष आपल्याला काहीतरी शिकवूनच जातो. आपल्या अनुभवात आणि ज्ञानात भर घालतो. काही संघर्ष न करताच सगळं काही मिळायला लागलं तर कसली मजा? जी गोष्ट संघर्ष करून आपल्याला मिळते तिचाच आपल्याला जास्त आनंद होतो. तीच गोष्ट आपल्या जास्त लक्षात राहते.

तुम्ही आतापर्यंत चित्रपटगृहात जाउन कितीतरी चित्रपट पाहिले असतील. पण जो चित्रपट पाहताना सगळ्यांसाठी तिकिटे मिळवण्यापासून ते वेळेवर तिथे पोहचेपर्यंत तुमची धांदल उडाली असेल, तीच मजेदार आठवण जास्त लक्षात राहते.

बाकी कितीतरी वेळेस अगदी सहज तिकीट मिळून जातं. जाताना येताना काही घडत नाही. चित्रपटात काही विशेष असेल तरच त्या गोष्टी डोक्यात रेंगाळतात, पण बाकी खास आठवण म्हणून काही राहत नाही.

आपल्या कामातसुद्धा काही अडथळे न येता काम चालु राहिलं तर ते आपल्याला हवंच असतं. पण खूप दिवस तसं झालं तर त्या कामातसुद्धा काही आव्हान राहत नाही. तोचतोचपणा येतो. काही लोक तर पैशापेक्षाही आव्हानासाठी नोकऱ्या बदलतात.

जेवणाच्या ताटात गोड पदार्थ बहुतेक सर्वांनाच आवडतो. पण म्हणून आपण फक्त गोडाचं जेवण करायला गेलो तर त्रास होतो. आपल्याला काहीतरी चमचमीत, तिखट हवंच असतं. संघर्ष हा आपल्या आयुष्यातला मसाला आहे. तो नसला तर अगदी सपक अळणी असं आपलं आयुष्य राहील.

संघर्ष हि आपल्याला खूप काही मिळवण्याची संधी आहे. एखादी गोष्ट सहजगत्या मिळेल त्यापेक्षा संघर्ष करून मिळवताना आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. एखादी समस्या सोडवण्याचे नवे मार्ग समजू शकतात. आपला कणखरपणा वाढू शकतो. काही नवी कौशल्ये आपल्या अंगी येऊ शकतात. आपण एखादी गोष्ट करू शकू असं वाटत नसतानाही त्या संघर्षापायी आपल्या हातून आपल्यालाच अशक्य वाटणारी गोष्ट घडू शकते.

आपण जाणूनबुजून संघर्ष करावाच असं नाही. पण कधी संघर्ष वाट्याला आला तर त्याचा ह्या दृष्टीने विचार करावा. त्याने आपल्याला काय काय मिळतंय हे डोळसपणे पाहावं. त्याची चव चाखावी आणि लक्षात ठेवावी.

कारण… जब तक जीवन है, तब तक संघर्ष है…

1 comment:

  1. सुंदर लेख , जीवन एक संघर्ष 👍

    ReplyDelete