Saturday, August 9, 2014

जकार्ताच्या आठवणी : ९ : परत मातृभूमीला

शनिवारी आम्ही बांडुंगला जाउन आलो आणि रविवार मी खरेदी आणि सामान बांधणीसाठी राखून ठेवला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी माझं परतीचं विमान होतं. मी घरातली मंडळी आणि मित्रांसाठी काही भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे घेतली. कारण हि माझी पहिलीच विदेश यात्रा होती. 

भारतात आता चित्र झपाट्याने बदलत असलं तरीसुद्धा विदेश यात्रा हि अजूनही विशेष गोष्ट समजली जाते. माझे बाबा मागे एकदा कामानिमित्त जपानला गेले होते, आणि त्याची खूप हवा झाली होती. सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला फोन केले. ज्या लोकांना हे जाऊन आल्यावर समजलं ते आधी का नाही सांगितलं  म्हणून नाराज झाले होते. 

मी आयटीमध्ये काम करतो त्यामुळे मी कधी न कधी ऑनसाईट जाणार हे तर आम्हाला माहीतच होतं. पण म्हणतात त्याप्रमाणे पहिली ट्रीप हि सगळ्यांसाठीच खास असते. आणि माझ्यासाठी सुद्धा खास आहे. हा खूपच छान अनुभव होता. माझ्या ऑफिसमधले असे लोक ज्यांना आता याचं काही अप्रूप राहिलेलं नाही, त्यांनासुद्धा माझा उत्साह पाहून लक्षात येत होतं कि हि माझी पहिलीच वेळ आहे. 

मी कामाच्या बाबतीत बरंच काही शिकलो. नव्या जागा पाहिल्या. तिथे भरपूर मजा केली. मी एक महिना एकटाच राहत होतो म्हणून स्वतःलाच स्वयंपाक करून घ्यावा लागायचा. त्यामुळे माझा स्वयंपाक सुधरला. 

तंत्रज्ञानामुळे आता गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. गुगलने एकहाती कित्येक उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहेत. गुगलचे नकाशे जगात कुठेही जायला मदत करतात. गुगलची भाषांतर सेवा बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या भाषेचा पॅक लोड करून घेतला तर इंटरनेट नसताना पण हि सुविधा वापरता येते. त्यात व्याकरणातल्या चुका होत असतीलहि, पण कामचलाऊ वाक्ये तर नक्कीच बनवता येतात. हि सुविधा मला तिथल्या टॅक्सीवाल्यांशी बोलताना खूप उपयोगी पडली. 

आणि गुगलच्या प्राथमिक सर्चच्या सुविधेबद्दल नव्याने काय बोलावं? या कशाहीबद्दलची माहिती मिळवण्याच्या शक्तीने सर्व जगात एक क्रांतीच झाली आहे. मला खरच आधीच्या काळातल्या लोकांनी ज्यांनी या कुठल्याही सुविधा न वापरता जगात प्रवास केला असेल, त्याचं आश्चर्यच वाटतं. ज्या लोकांनी हि तंत्रे बनवली, आणि ज्या लोकांनी या तंत्रांशिवाय यश मिळवलं अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना माझा सलाम. 

खूप सिनेमे पाहण्याचा पण एक वेगळाच फायदा आहे. विमानतळ, तिथले सुरक्षेसाठीचे चेक्स, बाहेरच्या देशातल्या गोष्टी या पुन्हापुन्हा पाहून आपल्याला नकळत त्याबद्दल ओळख होत जाते. एरवी सगळं काही प्रथमच पाहताना जो गोंधळ उडतो तो कमी होतो. 

मी पुन्हा क्वालालम्पुरमार्गेच परत आलो. माझी क्वालालाम्पुरहून मुंबईला जाणारे विमान एक तास उशिरा निघाले. तिथे वाट पाहताना खूप कंटाळा आला. विमान हवेत गेल्यावरसुद्धा हवामानामुळे खूप त्रास झाला. सगळ्यांनाच हरवलेल्या MH ३७० विमानाची घटना आठवत होती. आम्हाला निघायलाच आणि रस्त्यात हवामानामुळे बराच उशीर झाल्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळ चुकली होती. बाकीच्या विमानांना पुढे जाण्याची संधी मिळाली होती. मग त्यामुळे आम्ही थोडावेळ मुंबईमधेच आकाशात घिरट्या घालत होतो. मी मुंबईमधल्या जागा ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. 

मुंबई अशा प्रकारे पाहण्याचा अनुभव छान होता. भरपूर वेळ हवेत घालवून शेवटी आमचं विमान मुंबईमध्ये उतरलं आणि मी माझ्या मातृभूमीत परतलो. :)