Wednesday, August 13, 2014

रघु देसाई

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती.

"वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता. सबको गधेजैसे काम करनेकि आदत है यहा, टाईमपे घर निकलो, तो ऐसे देखते है कि सामनेसे आठवा अजूबा जा रहा है." अशी त्याची कुरकुर चालायची.

एकदम गप्पिष्ट माणूस होता तो. त्याच्या बे-मध्ये बऱ्याचदा गप्पांचे अड्डे जमलेले असायचे. आजूबाजूच्या दिल्लीकडच्या, पंजाबी वगैरे पोरांसोबत गप्पा मारताना तो तिकडे असतानाच्या आठवणी काढायचा. तिकडचे किस्से सांगायचा. तिकडे वातावरण किती मस्त असतं, तिकडचे लोक किती बिनधास्त असतात. तिथे त्याच्या ऑफिसजवळच तो राहायचा, आणि तिथे आजूबाजूला खाण्यापिण्याच्या गोष्टींची कशी रेलचेल असायची वगैरे गोष्टी सांगत रमायचा.  मुंबईला शिव्या द्यायचा. जाण्यायेण्यात इतका वेळ जातो म्हणून वैतागायचा. त्याच्या  आधीचंच शहर जास्त चांगलं होतं. 

त्याने तिकडे बॅंचलर लाइफ़ एन्जॉय केली होती. आता लग्न झाल्यावर कशी वाट लागते हे सांगायचा, अजून अविवाहित असलेल्या मुलांना "ऐश करा लेको, हेच दिवस आहेत" अशा आशयाचे डोस पाजत राहायचा. त्याचे तसले दिवस सरल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत असे. आणि ती त्याच्या बोलण्यामधूनही लपत नसे. त्याच्या मते आधीचंच आयुष्य छान होतं.

त्याचं एकदा कुठल्यातरी मित्राशी फोनवर बोलणं चालू होतं. लवकरच कुठला तरी लाँग विकेंड येणार होता. तो मित्र सुटीवर मूळ गावी चालला होता. तो यालापण चलायला सांगत असावा. हा त्याला हताश सुरात म्हणत होता "तुमचं काय साहेब.. असेल तर ट्रेनमध्ये बुकिंगच्या बर्थवर नाहीतर बिनधास्त खाली पेपर टाकून जाताल गावाला. आम्ही आता फॅमिलीवाले. बुकिंग मस्ट झालंय. असं जाऊ शकत नाही. आणि एकट्याने जायचा विषय जरी काढला तरी बायको जीव घेईल."

तो एकटा असताना सुटीच्या दिवशी दुसरं काही नसेल तर ऑफिसला येऊन नेटवर टाईमपास करत असे, पण आता कामासाठी विकेंडला ऑफिसला यावं लागलं तरी त्याची बायको कुरकुर करायची, आणि मग तो चिडून यायचा. कधी उशिरा थांबावं लागलं आणि बायकोचा फोन आला कि वेडावाकडा चेहरा करून फोन वर बोलायचा, आणि आम्हाला हसवायचा. त्याची आधीची एकट्याची लाइफ सही होती, असं त्याला मनापसून वाटतं.


एव्हाना आमच्या प्रोजेक्टची डेवलपमेंट संपून टेस्टिंग सुरु झालं होतं. टेस्टर लोक सगळे एपीआय (सॉफ्टवेअरचा एक भाग) टेस्ट करून त्यातले बग्स, इश्युज रेज करायचे. ते आम्हा डेवलपर लोकांना सोडवण्यासाठी असाईन व्हायचे. रघुने बरेच मोठे एपीआय डेवलप केले असल्यामुळे त्याला बरेच इश्युज यायचे, आणि तो वैतागायचा. दिवसभर टेस्टर लोकांना लाखोली वाहत इश्यू सोडवत बसायचा.त्या एपीआयमध्ये मला कळायला लागल्यावर मलाही इश्यू मिळायला लागले. मग तो गमतीने म्हणायचा "यार तूहि लेले न सारे इश्युज, इतना अच्छा जावाका (जावा : प्रोग्राम लिहिण्याची भाषा) चँप है.. मै  टेस्ट लीड को बोल देता हु, अभी इसके आगे मेरे एपीआयमे कुछ इश्यू आता है, तो सिधा तेरेकोही देनेको.. मेरेको झंझटहि नही चाहिये" हे याला त्याला चँप म्हणून काम करून घेण्याची त्याची खास स्टाइल होती.

कोणालाही काम सांगताना त्या व्यक्तीला कितपत ज्ञान आणि अनुभव आहे याचा विचार न करता अगदी बारीकसारीक सूचना द्यायचा. "काम सुरु करताना कोड लेटेस्ट घे" "किवर्डस कैपिटलमध्ये टाक" इ. समोरच्याच्या अकलेचा असं सन्मान करण्याचं त्याचं कारण "बाद मे लफडा नही चाहिये" असं असायचं. 

रघुला शिकवण्याची आवड उपजतच. त्यामुळे संधी मिळेल तिथे प्रत्येकाला निःशुल्क शिकवण्याचं अखंड व्रत त्याने घेतले आहे. टीममधले सहकारी, टेस्टर लोक, बॉस कोणालाही त्यांचे काम आणखी चांगले कसे करता येईल, त्यांना प्रगतीस कुठे वाव आहे, हे तो अगदी उत्साहाने शिकवत असतो. यामुळे तो कंपनीसाठी एक अमूल्य असेट आहे. :D 

त्याचं स्वतःचं काम किती व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा त्याला छंदच आहे. कुठल्याही चर्चेत, "मेरे सिस्टमपे तो मैने ऐसा सब कर के रखा है.." "मै ना इसको ऐसे ऐसे करता हु, तो क्या है ना टाईम बच जाता है" अशी वाक्य तो येता जाता कोणावरही फेकतो.

ब्लेम गेम मध्ये तर तो एक कसलेला पटू आहे. सरकारी खात्यात, जिथे फक्त इकडून तिकडे काम टोलवणे हे मुख्य कौशल्य लागतं, तिथे त्याने टोलवाटोलवीची महान कामगिरी करून दाखवली असती. आयटी कंपनीमधेही काही कमी होत नाही हे सर्व. पण टोलवण्याआधी थोडे तरी काम करावं लागतंच.

रघुकडे काही असं काम आलं कि रघु ताबडतोब त्याचा फडशा पाडून, चेंडू दुसरीकडे टोलवून देई. आणि दुसरीकडून काही विलंब झाला कि याचा ठणाणा सुरु. बॉसशी काही बोलायला जावं आणि तो जागेवर नसेल, किंवा त्याने मेलला लवकर उत्तर दिले नाही तर त्यालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही. मग बाकीच्या पामरांची काय कथा.

रघूच्या लेखी काम देणारा म्हणजे शत्रू.. त्यामुळे त्याला काम देणाऱ्याला रिकामं न राहू देणं हे त्याचं कर्तव्य असल्यागत तो वागे. प्रत्येक छोट्या बाबतीत वरून मंजुरी आल्याशिवाय स्वतः पुढे जात नसे. म्हणजे कामाला उशीर झाला तर तो बॉसने शंकेचं लवकर समाधान केलं नाही म्हणून, आणि कामात चूक झाली तर विचारूनच केलं होतं अशी बोंब ठोकायला तो मोकळा.

काही दिवसांनी काही एफएस, डीएस ( थोडक्यात क्लायेंटच्या गरजा, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी डेवलपरला सूचना असलेले कागदपत्र  ) मध्ये चुका ध्यानात आल्या, त्या बदलण्याचं काम होतंच, त्यात परत क्लायेंटने बऱ्याच गरजा बदलून आमचं आणखी काम वाढवलं.

तेव्हा रघु आयुष्यालाच वैतागला होता. "क्या कामा करते रे ये लोग, दस बार डीएस चेंज करेंगे, और दस बार हमे उसकेलीये बैठना होगा दस घंटे, साला एक बार बैठो ना जी भरके क्लायेंटके साथ, ठीक से एकही ढंग का डीएस बनाओ, हम भी एकही बार कुछ घंटे मे बना देंगे उसको.. ये क्या रोज कि मगजमारी, रोज कुछ चेंज करो, रोज उसको टेस्ट करो, इश्युज निकालो तबतक नया चेंज आ जाता है..."

असाच रडतपडत तो प्रोजेक्ट संपला. नंतरच्या प्रोजेक्टमध्ये रघु दुसऱ्या टीममध्ये गेला होता. त्याच्या अनुभवामुळे त्याला आता काही डीएस बनवायचं काम दिलं होतं. मी सहज त्याला भेटायला गेलो तेव्हासुद्धा  तो वैतागलेलाच होता.

" साला क्या टीम है यार, पकाते है बहोत. डीएस बनानेको दिया है मुझे.. हर रिव्यू मे कुछ न कुछ मिल जाता है इनको.. पक गया मै. कोई और बनाये तो अच्छा है यार. बस पढनेका और प्रोग्राम बनानेका. ये फालतू काम है एकदम. अपना पेहलेका काम अच्छा था यार, मजा आता था करनेमे, टीम भी अच्छा था.. ये क्या......"

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष आहे.