Friday, August 8, 2014

जकार्ताच्या आठवणी : ८ : बांडुंगचा ज्वालामुखी

माझी इंडोनेशियाची ट्रीप जवळजवळ संपत आली होती. सोमवारी माझं परतीचं विमान होतं आणि भटकंती करायला शेवटचा विकेंड हातात होता. आम्ही बांडुंगचा ज्वालामुखी पाहायला जायचं ठरवलं. हि जागा जकार्तापासून साधारण दीडशे किमी लांब आहे. 

पहिल्यांदाच मला कोणी सोबत मिळवण्यासाठी काही अडचण नाही आली. आणि नेमकी इतकी चांगली गोष्ट माझ्या शेवटच्याच विकेंड ट्रीपमध्ये झाली. :D माझ्या तिकडच्या टीममध्ये दोन नवीन लोक भारतातून आले होते. आशिष आणि अंकिता. ते बांडुंगला यायला लगेच तयार झाले. आणि मागच्या आठवड्यात तमन सफारीला सोबत आलेली मीनाक्षीसुद्धा तयार होती. असे आम्ही ४ जण झालो. 

या ट्रीपमध्ये आम्ही पाहिलेल्या जागा आणि तिथवर प्रवास असं सगळंच आम्ही एन्जॉय केलं. आमचा यावेळीचा ड्रायव्हर गेबे हासुद्धा प्रसन्न स्वभावाचा होता. त्याने आधी टेपवर काही इंडोनेशियन गाणी लावली होती. मला अशी कुठलीही गाणी ऐकायलासुद्धा आवडतं पण लवकरच गाडीतले बाकीचे कंटाळले. मग आम्ही आपल्या मोबाईलवरच आवडती भारतीय गाणी वाजवायला लागलो. गेबेने आम्हाला त्याचं आवडतं भारतीय गाणं वाजवण्याची विनंती केली. इंडोनेशियामध्ये आणखी दुसरं कोणतं गाणं असणार? ते अर्थातच "कुछ कुछ होता है" चं शीर्षकगीत होतं. 

ते तसं बऱ्यापैकी जुनं गाणं आहे. पण तरी सुदैवाने आमच्यातल्या एकाच्या मोबाईलवर हे गाणं सापडलं आणि आम्ही त्याची फर्माईश पूर्ण करू शकलो. तो ते गाणं ऐकून खुश झाला आणि त्यासोबत गुणगुणूसुद्धा लागला. त्याने आणखी काही गाणे सांगायचा प्रयत्न केला, पण ती गाणी त्याच्या इंडोनेशियन लहेजामुळे आम्हाला समजलीच नाहीत. 

एकदा ती भारतीय गाणी वाजायला लागली कि आम्हालासुद्धा गाणे म्हणायला फार वेळ लागला नाही. आणि लगेच आम्ही भारतीयांचा आवडता गेम "अंताक्षरी" खेळायला लागलो. या सर्वामुळे आपण परदेशी इंडोनेशियात फिरत आहोत असं मुळी वाटतच नव्हतं. पहिल्यांदाच तिथे फिरताना इतकी मजा येत होती. 

आम्ही थोडावेळ गाणी म्हणत होतो, अंताक्षरी खेळत होतो, तर कधी पुन्हा काही गाणी मोबाईलवर वाजवत होतो. गेबेलासुद्धा हे सगळं ऐकून मजा येत होती. तो एखाद्या गाण्यातली वारंवार म्हटली जाणारी मुख्य ओळ ओळखून ती गुणगुणायला लागायचा. त्याचं गाणं ऐकणंसुद्धा मजेदार होतं. 

आम्ही जसे भारतीय संगीतात हरवून गेलो होतो, तसेच तिथल्या रस्त्यांवरसुद्धा हरवलो होतो. आम्हाला जायचं असलेली जागा आणि गेबेने समजलेली जागा वेगळ्या होत्या, आणि त्या गोंधळात आम्ही चुकीचे वळण घेऊन भलतीकडेच गेलो होतो. शेवटी कळलं कि त्या जागा एकच होत्या पण नावे दोन होती. एकमेकांची भाषा येत नसताना संभाषण साधताना अशा काही गडबडी होऊन जातात. 


या गोंधळात अर्धाएक तास खर्ची घालून शेवटी आम्ही पहिल्या ठिकाणी पोहोचलो. या ठिकाणी ज्वालामुखीची जागा, तिथले डोंगर, आणि तयार झालेले एक रासायनिक तळे असा नजारा उंचावरून पाहण्याची सोय केलेली होती. आणि ते दृश्य खूपच अनोखं होतं. विचित्र राखाडी रंगाचे खडकाळ डोंगर, तशाच रंगाचं विचित्र रसायन भरलेलं सरोवर, बऱ्याच ठिकाणाहून निघणारा धूर आणि सगळीकडे पसरलेला रासायनिक दुर्गंध. त्या दुर्गंधामुळे मला केमिकल लॅबचीच आठवण आली. 

हा आपण चित्रपटात पाहतो तसला ज्वालामुखी नव्हता. आणि अर्थात तशा ठिकाणी सुरक्षिततेची हमी नसल्यामुळे सामान्य माणसाला सोडणार पण नाहीत. इथला ज्वालामुखी तीसेक वर्षांपूर्वी फुटला होता असं मी ऐकलं. 

या डोंगरांवर चढाईला पण जाता येतं. काही लोक आम्हाला उंचावर जाताना दिसत होते. पण आमच्याकडे फार वेळ नसल्यामुळे आम्ही तितके दूर गेलो नाही. तिथून पुढच्या ठिकाणी निघालो. 


ह्या जागीमात्र बरंच आतवर जाउन तिथले डोंगर, गरम पाण्याचे डबके/झरे, असं बरंच काही बघता येतं. त्या जागी पोचण्यासाठी गाडी दूर बाहेरच लावून पायीच वीस-तीस मिनिट जंगलातून चालत जावं लागतं. तिथला एक स्थानिक गाईड नेमावा लागतो. आम्ही पण एका गाईडला सोबत घेतला, पण त्याला माहिती सांगण्यापेक्षा त्याच हिंदीचं ज्ञान दाखवण्याचीच जास्त हौस होती. आणि आमच्याकडून आणखी हिंदी शिकण्याचासुद्धा तो प्रयत्न करत होता. 



तिथे जंगलातून चालत जाताना खूप उंच वृक्ष पाहायला मिळाले. गाईडने आम्हाला एक ३०० वर्षे जुना भव्य वृक्ष दाखवला. त्या पायवाटेवरून चालत जाताना खूपच छान वाटत होतं. मला आपण पावसाळ्यात ट्रेक्स करायला जातो त्याचीच आठवण आली. आणि या मोसमात ट्रेकची छोटेखानी सुरुवात इंडोनेशियामध्ये झाली याचा आनंद झाला. 






इथे गरम पाण्याचे बरेच कुंड तर काही ठिकाणी डबकी होती. प्रत्येकाचे तापमान वेगळे होते. काही इतके गरम होते कि, तिथले लोक तिथे अंडे उकडून देतात. आणि ज्वालामुखीमध्ये उकडलेले अंडे अर्थातच साध्या अंड्यापेक्षा खूप महाग असतात. :D पण तरी आम्ही हौसेखातर तसे अंडे घेऊन खाल्ले. 





काही डबके थोडे कोमट होते, तिथे आम्ही पाय बुडवून थोडावेळ निवांत बसलो. तिथल्या गाईडनुसार इथल्या सल्फरयुक्त मातीमध्ये काही औषधी गुण आहेत. त्या मातीने काही लोक पर्यटकांना मसाज करून देत होते. आणि हि माती मुलतानी मातीसारखी त्वचेसाठी पण गुणकारी असल्याचे ते सांगत होते. तिथे एका मुलीने तशी लावून ठेवली होती. ते पाहून आमच्यासोबत असलेल्या मुलींना पण तसं करून पाहण्याचा मोह झाला होता. पण आम्ही चिडवू कि काय अशा भीतीने त्यांनी तो आवरला, आणि त्याऐवजी ती माती एका बाटलीत विकत घेतली. 


तिथल्या स्टॉलवर लाकडात कलाकुसर करून बनवलेल्या वस्तू होत्या. आम्ही तशा काही वस्तू आणि खेळणी विकत घेतली. खरेदी करून आम्ही परत निघालो. रस्त्यात मध्ये थांबून जेवण करून घेतले. येताना आम्हाला खूप ट्राफिक लागली. परत हॉटेलवर पोहचायला खूप उशीर झाला. दिवस खूप छान गेला होता. तो ज्वालामुखी जरी अपेक्षेपेक्षा वेगळा निघाला असला तरी एकदा पाहण्यासारखा नक्कीच होता. आणि यावेळी प्रवास तर खूपच मजेदार झाला होता. :)

No comments:

Post a Comment