Friday, August 22, 2014

डागाळलेला चंद्र

आत्ता अशातच पोर्णिमा होऊन गेली. त्याधीपासून आणि त्यानंतरही काही दिवस चंद्र खूपच सुंदर दिसत होता. आणि सुदैवाने मला जवळपास रोज त्याचं दर्शन झालं. आणि विशेष म्हणजे त्याच्या सर्व डागांसह तो खूप सुंदर वाटत होता.

लहानपणापासून चंद्र म्हणजे सुंदर, सौंदर्याची एक उच्च उपमा म्हणजे चंद्रासम सौंदर्य, असं आपल्या डोक्यात कायमचं कोरलं गेलंय. अनेक कवितांमधून, फिल्मी गाण्यांमधून, ललित लेखांमधून, आणि आणखी कशा कशातून. दर कोजागिरीला आपण त्याची पूजासुद्धा करतो.  

लहानपणी चंद्रावरचे डाग सश्यासारखे दिसतात म्हणून चंद्रदेवाच्या मांडीवर ससा बसलेला असतो अशी कथासुद्धा मी ऐकली होती. पुराणात चंद्राच्या डागांची सुद्धा एक कथा आहे. चंद्राने उंदरावरून जाणाऱ्या गणपतीची खिल्ली उडवली म्हणून गणपतीने त्याला पूर्ण निस्तेज होण्याचा शाप दिला. पश्चातापदग्ध चंद्राने क्षमा मागितल्यानंतर मग गणपतीने त्याला शापातून मुक्त केलं, पण काही डाग तसेच राहिले, ह्या धड्याची आठवण राहावी म्हणून. 

कळायला लागल्यावर डाग असलेल्या चंद्राला इतकं सुंदर म्हणून का चढवून ठेवलंय असा प्रश्न पडतो. नितळ चेहऱ्याच्या एखाद्या लावण्यावातीची तुलना अशा डागाळलेल्या चंद्राशी केली तर काहीसं आश्चर्यच वाटतं. पण डाग असुनही एखादी गोष्ट सुंदर वाटू शकते हे कळायला अजून बरीच समज यावी लागते. 

चंद्राला निरखून पाहताना मनात चंद्र आणि आयुष्य याचा एकत्रित विचार सुरु झाला. आणि जाणवलं कि आपण चंद्रासारखेच आहोत. लहान असतो तेव्हा सुरक्षित वातावरणात, घराच्या आवारात आपला वावर असतो. बरचसं आयुष्य आपल्या आई-बाबांच्या सावली मध्ये जातं. पण त्यातून बाहेर पडून स्वतः प्रकाशमान व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या प्रकाशाइतकेच आपले डाग सुद्धा जगासमोर येतात. 

अगदी निरभ्र असं आयुष्य कोणाला जगता आलंय? गुण अवगुण, आणि सुख दुःख अशा दोन्ही आलेखांवर आपला आयुष्य आणि व्यक्तिमत्व दोन्हीकडे झुकलेलं असतंच. अगदी सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांनी गुणांमुळे, कर्तृत्वामुळे यश आणि लोकांचं प्रेम मिळवलं, तितकंच अवगुणांमुळे, नशिबामुळे दुःख आणि रोषसुद्धा पत्करला. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" हा प्रश्न समर्थांना सुद्धा पडला. आणि सुर्यावरही डाग आहेतच, पण तो दूर असल्यामुळे आणि अत्यंत तेजस्वी असल्यामुळे ते दिसत नाहीत एवढंच. 

पण डाग असले तरीही प्रकाश देता येतो, हे चंद्रच आपल्याला शिकवतो. चंद्राचा प्रकाश स्वतःचा नसतो, परावर्तीत असतो, तसंच आपलंसुद्धा नाही का? आपणसुद्धा अनेक गोष्टींसाठी अनेक लोकांवर अवलंबून असतो. ती लोक आपली कामे पार पाडतात म्हणूनच आपण आपला कार्यभाग साधू शकतो. 

आपल्याकडे काही महत्वाचे सण जसे कि राखी पोर्णिमा, गुरु पोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा असे पौर्णिमेलाच ठेवले आहेत. या प्रत्येक दिवशी चंद्र वेगवेगळ्या तर्हेने अतिशय सुंदर दिसतो. त्या सणांच्या मूळ उद्देशा इतकाच चंद्राचे सौंदर्य साजरे करणे हा सुद्धा एक सुप्त हेतू नसेल कशावरून?

चंद्रासारखे आपण कलेकलेने वाढत जातो, मोठ्यांच्या सावलीमधून बाहेर पडता पडता आयुष्याची पोर्णिमा गाठतो. आणि पुन्हा कलेकलेने कमी होत आकाशातून गायब होऊन जातो. पण चंद्र पहायची सवय असलेल्यांना त्या जागी अमावास्येलासुद्धा गोल पोकळी दिसत राहते. 

सौंदर्य-दृष्टी आली तर चंद्र त्याच्या सर्व डागांसह सुंदर वाटतो. नजरेतच सर्व काही आहे. ती नजर असलेले लोकच डागाळलेल्या चंद्राला आणि कुठे न कुठे उण्या पडणाऱ्या आयुष्यालासुद्धा सुंदर म्हणू शकतात.