Saturday, September 27, 2025

ये दिल मांगे मोर!

प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. 

त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणाचा व्यत्यय न येता आपल्याला सोयीस्कर होईल असा त्याचा विचार असावा. 

पण ते विमान घेण्याची तयारी करत असताना, त्याला त्याच्या आईने सांगितलेल्या तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. त्याची आई पोर्तुगालच्या ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली. तिथे शाळेत जाण्यासाठी तिला रोज अनेक मैल पायी ये जा करावी लागत असे. 

ऐकून थोडं आश्चर्य वाटतं की नाही? ही तर आपल्या इथलीच गोष्ट वाटते. पोर्तुगाल सारख्या युरोपातल्या, एके काळी जगात विविध ठिकाणी वसाहती करून राज्य करणाऱ्या देशामध्ये अशीच परिस्थिती कशी असेल? पण असंच आहे खरं. पळसाला पाने तीनच. गरिबांची परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. 

रोनाल्डोला वाटले आपण एक विमान घेऊन फारतर आपली थोडी अधिक सोय करून घेऊ शकतो, पण आपण आपल्या आईसारख्या आजही पायपीट कराव्या लागणाऱ्या मुलांसाठी काही करू शकलो तर? हा विचार येताच त्याने विमान खरेदी रद्द करून त्याऐवजी तब्बल १०० स्कूल बसेस विकत घेतल्या. 

पोर्तुगालच्या ग्रामीण भागात शाळेपासून दूर राहत असणाऱ्या मुलांसाठी या बसेसची सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी त्याला बसमध्ये चढून बसलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आता रोज बसमध्ये प्रवास करण्याचा आनंद, त्याच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून रोनाल्डोला फार समाधान वाटलं. 

त्याने त्याच्या आईला जेव्हा हे सांगितलं, आणि विशेषतः तिने लहानपणी सोसलेल्या कष्टाची जाणीव ठेवून ही कल्पना सुचल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा साहजिकच त्या फार भावुक झाल्या. रोनाल्डो म्हणतो या प्रसंगातून मला आयुष्यात काय खरं महत्वाचं आहे हे समजलं. 

हा व्हिडिओ पाहून मला नाना पाटेकरची आठवण झाली. त्यानेही महागडी परदेशी कार घेण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवले होते. पण दुष्काळाच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून त्याची इच्छा गेली. 



त्याने मराठवाड्यातून आलेल्या अभिनेता आणि मित्र मकरंद अनासपुरे ला सांगितलं की हे पैसे घे आणि दुष्काळी भागात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना हे पैसे वाट. त्यांना थोडा हातभार लागेल. मकरंदने हे पैसे द्यायला नानाने स्वतः यावे असा आग्रह केला. शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांना एकत्र आणून ते पैसे दिले. 

त्यांना भेटल्यावर ही मदत फार तुटपुंजी आहे आणि यातून प्रश्न सुटणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरांना आवाहन केले, अल्पावधीत कोट्यवधी रुपये जमले. त्यातून नाम फाऊंडेशन आकारास आली. तिचा नुकताच दशकपूर्ती सोहळा झाला. गेल्या दहा वर्षात या संस्थेने अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांना मदत केली, जलसंवर्धन, आपत्कालीन मदतकार्य, वीरगतीस प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची मदत, असहाय्य महिलांची मदत असे भरीव कार्य केले. 

दोन्ही गोष्टींमध्ये साम्य हेच की आपण नेहमी आपले आयुष्य अजून आरामदायक करायच्या मागे असतो. आणखी मोठे घर, आणखी मोठा टीव्ही, महागडा स्पीकर, अत्याधुनिक मोबाईल.. अशा अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात आणि आपण त्या गाजरांमागे गाढवासारखे फिरत राहतो. 

त्याच वेळी आपल्याच आजूबाजूला मूलभूत गोष्टींसाठी झगडा करावे लागणारे लोक असतात. अर्थात त्यात आपला काही दोष नसतो. पण भांडवलशाही, चंगळवाद या सगळ्या गोष्टींचे हेही पैलू आहेत. 

आपण आपला उत्कर्ष साधायला हवा पण आपल्याला दुसऱ्याचं दुःख सुद्धा समजायला हवं. ते नजरेआड करण्याइतके आपण निर्ढावलो तर आपण कितीही उत्कर्ष साधला तरी माणुस म्हणुन आपण छोटेच राहु. 

आधी पोटोबा मग विठोबा असं आपल्याकडे म्हणतात. आपल्या ताटातला घास कमी करून दुसऱ्याला देणारे विरळाच. पण तो विठोबा किमान भरल्या पोटी तरी लक्षात यावा. 

कोणाची गरज किती हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. प्रत्येकाची सुरुवात वेगळ्या बिंदूवरून होते. कोणासाठी स्वतःच घर एवढंच स्वप्न असेल, कोणासाठी थोडा मोठा फ्लॅट हे स्वप्न असेल. कोणी लहानपणापासून मर्सिडीज गाडी घ्यायची इच्छा बाळगून असेल. 

अशी स्वप्न असायलाच हवीत. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, दिशा मिळते.. स्वप्नपूर्तीचा आनंद घेता येतो. पण कुठली स्वप्नं, कुठलं लक्ष्य आपल्यासाठी महत्वाचं आहे हे ही लक्षात यायला हवं. नाही तर थांबायचं कुठे हे आपल्या कधीच लक्षात येणार नाही. आपण समोर ठेवतोय ती लक्ष्य आपल्यासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत की निव्वळ आकर्षण म्हणून, समाजात मित्रमैत्रिणींच्या बघितलेल्या गोष्टींमुळे, प्रभावामुळे आहेत, का लोकांना काहीतरी दाखवायला म्हणून आहेत हे समजलं की आपण त्यातून स्वतंत्र होऊ शकतो. नाही तर आपण या अनावश्यक लक्ष्यांचे गुलाम होऊन बसु. 

पैशाने किती सुख विकत घेता येतं त्याला मर्यादा आहेत. अजून चांगलं, अजून भारी याला काही अंत नाही. रोनाल्डोला जेट विमानापेक्षा १०० स्कूल बसमध्ये आणि नाना पाटेकरला इंपोर्टेड कारपेक्षा नाम फाऊंडेशनमध्ये कितीतरी पटीने अधिक समाधान मिळालं असेल. 

त्यामुळेच जगातल्या अति‌‌‍‌श्रीमंत व्यक्तींपैकी असलेल्या बिल गेट्स, वॉरन बफे, अझीम प्रेमजी सारख्या व्यक्तींनी आपली अर्धी संपत्ती टप्प्या टप्प्याने समाजोपयोगी कामांसाठी दान करण्याचा संकल्प केलेला आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट इतकीच त्यांच्या गेट्स फाउंडेशन मधली कारकिर्द आणि त्याचा आवाका तेवढाच मोठा आहे. 

ह्यासाठी ह्या मोठ्यां लोकांच्या गोष्टी झाल्या.. दहा वर्षांनी अमुक एवढे कमावल्यावर मगच बघु असा दृष्टिकोन ठेवण्याची गरज नाही. आपण जशा म्युच्युअल फंडाच्या SIP लावतो, RD करतो.. तसं सुद्धा करू शकतो. महिन्यातली शंभरात अर्धा पैसा, एक रुपया जे आपल्याला पटेल ते अशा कामात देऊ शकतो. 

प्रत्येक गोष्ट पैशाने होत नसते. पैसा देण्याइतकंच वेळ देणं, श्रमदान करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रकमेला किंवा प्रमाणाला महत्व नाही. रामाच्या सत्कार्यात आपण उभे राहिलो तर तो हनुमानाची दखल घेतो, सुग्रीवाची घेतो, अंगद, नल, नील यांची घेतो, तितकीच दखल तो सेतुसाठी चिमूटभर वाळू आणणाऱ्या खारीची सुद्धा घेतो. प्रश्न दान काय आणि किती हा नाही, दानत आहे की नाही हा आहे. 

तोच राम जेव्हा समुद्राने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, लंकेत जाण्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही तेव्हा खवळला होता. त्याने उग्र रूप धारण करत समुद्रच कोरडा करण्याची तयारी केली होती तेव्हा कुठे समुद्राला उपरती होऊन त्याने सेतु बांधण्याचा मार्ग सुचवला होता. ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. असा समृद्ध तरीही स्वमग्न समुद्र होण्यापेक्षा छोटासा वाटा उचलणारी खार झालेले केव्हाही चांगले.. नाही का?

⁠जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणजे जो आपुले, 

⁠तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

Monday, July 21, 2025

क्विक कॉमर्स आणि आपण

फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. 

पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स". किराणा भुसार दुकानात मिळतात अशा सर्व पॅक वाल्या गोष्टी, परफ्युम, साबण आणि तत्सम कॉस्मेटिक गोष्टी असं बरंच काही यांच्या ऍपवरून काहीही मागवलं कि सहसा १० मिनिटाच्या आत घरात एवढी भारी हि सोय आहे. झेपटो, ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट आणि तत्सम "क्विक कॉमर्स" या श्रेणीत मोडल्या जाणाऱ्या सेवा आता पुणे मुंबई आणि भारतातल्या बऱ्याच मोठ्या शहरात नित्याच्या झाल्या आहेत.

आता घराबाहेर पडलं कि सोसायटीच्या गेटवर जाईपर्यंत बऱ्याचदा या सगळ्या सेवांपैकी कोणत्या तरी एकाचा शर्ट घातलेला डिलिव्हरी बॉय गेटमधुन काहीतरी घेऊन येत असतो किंवा काही तरी देऊन परत निघालेला असतो. इतकं हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे. 


मी स्वतः कित्येकदा अशा ऑर्डर्स केलेल्या आहेत. कधी घाईच्या वेळेत म्हणुन, कधी काही कुपन कोड किंवा सवलत आहे म्हणुन, सुरुवातीला तर खरंच हे ५-७ मिनिटात येतात कि काय हे बघायला गंमत म्हणुन. बऱ्याचदा त्यांची अमुक एक रकमेच्या वर बिल झालं तर डिलिव्हरी फ्री अशा कारणामुळे एखाद दुसरी वस्तु आत्ता गरज नसली तरी काही दिवसात वापरात येईलच अशा गोष्टी शोधुन त्या कार्ट मध्ये टाकणं असे सुद्धा प्रकार केलेले आहेत. त्यामुळे मी आता या पोस्ट मध्ये जे काही म्हणतोय ते "सौ चुहे खाके बिल्ली चली हज" अशातला प्रकार आहे. 

या सगळ्या प्रकारांबद्दल इकडून तिकडून आणि स्वतःच्या विचारातून काही नकारात्मक मुद्दे लक्षात आले, ते इथे मांडतोय. 

या कंपन्यांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला अशी चर्चा होत असते. पण त्याबरोबरच त्या डिलिव्हरी बॉईजची परिस्थिती बिकट असते, फार वेगात त्यांना सतत डिलिव्हरीचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून पळत राहावं लागतं. ऊन पावसात ते काम करतातच, पण त्या नादात ट्रॅफिकचे सुरक्षेचे नियमही दुर्लक्षित होतात असंही समजतं. आणि दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे. ह्यात काय चांगलं काय वाईट ठरवणं अवघड आहे, हा थोडा मोठा व्यापक विषय आहे. 

दुसरा मुद्दा आला तो म्हणजे व्यायाम, जीवनशैली आणि आपल्या सवयीचा. आपण एक एक करत आपलं बाहेर पडण्याचं कारण कमी करत चाललेलो आहोत. प्रत्येक गोष्ट घर बसल्या आली तर आपण फक्त मॉर्निंग वॉक, ट्रेडमिलचा वॉक असे मुद्दाम ठरवून केलेले वॉक सोडले तर इतर कुठल्याही कारणामुळे जे नैसर्गिक रित्या आपसूक चालणं फिरणं होतं ते कमी कमी होत चाललंय. यामुळे आज उद्या पाच पाच मिनिटात गोष्टी मिळुन वेळ वाचत असला तरी दीर्घकालीन नुकसान आपलंच आहे. 

आपण मुळात hunter gatherer होतो म्हणतात. म्हणजे एक तर शिकार करायला किंवा फळं कंदमूळं गोळा करायला भटकणं हीच आपली मुळ जीवनशैली होती. आपली जी काही संस्कृती, प्रगती आहे ती हळु हळु प्रकृतीच्या विपरीत दिशेने जात जातच आपण इथवर आलोय, पण आपल्याच प्रकृतीवर त्याचा परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे. आजवर इतके शोध लागले, अवजारं आणि यंत्र बनवली तरी आपण फिरणं पूर्ण बंद केलेलं नव्हतं. आणि आता फिरण्याची जी काही मोजकी कारणं शिल्लक राहत आहेत ती आपण टिकवली पाहिजेत. चालण्यासाठी फिरण्यासाठी ठरवावं लागतं, निमित्त शोधावं लागतं हि आजची वस्तुस्थिती आहे. 

पुढचा मुद्दा येतो पर्यावरणाचा. क्विक कॉमर्सवाले डिलिव्हरी बॉईज त्यांच्या ठराविक नेमून दिलेल्या विभागात सतत १०-१० मिनिटांच्या डिलिव्हरीज करत फिरत असतात. ते ज्या गोष्टी पुरवतात त्यातल्या बहुतांश गोष्टी त्याच गल्ल्यांमध्ये सहज उपलब्ध असतात. तरीही त्या गोष्टी घरी पोचवण्यासाठी हा दिवसभर गाड्यांचा, म्हणजेच पेट्रोलचा वापर कितपत योग्य आहे? पेट्रोल डिझेल चा साठा भरपूर असला तरी मर्यादित आहे हे आपण शाळेपासून शिकतो, पण ते वापरताना विसरतो. प्रदुषण आणि ट्रॅफिक होतं तेही आहेच. 

आपण दूरदूरच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या वापरतो, जवळपास न मिळणाऱ्या गोष्टी ऑर्डर करतो इतपर्यंत ठीक आहे. ज्या गोष्टी आणायला आपण एरवीही गाडी काढूच त्या गोष्टी मागवणंही ठीक आहे, पण अगदी आपल्याच गल्लीत मिळणाऱ्या गोष्टी पेट्रोल जाळून घरी मागवणं म्हणजे आपला ऐदीपणा वाढायला लागलाय असं वाटतंय. अक्षरशः काही रुपये आणि काही मिनिटं वाचवायला आपण बिनदिक्कत एवढं पेट्रोल जाळलं तर कदाचित उद्या आपलीच पोरं ग्रेटा थनबर्ग सारखी आपल्या पिढीला जाब विचारतील तुम्ही आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही ठेवलं म्हणुन! 

एखादी गोष्ट दुकानात १०० रुपयांना मिळत असेल आणि ती घरबसल्याही तेवढ्याच किमतीत (किंवा प्रसंगी त्याहूनही कमी) मिळत असेल तर घरबसल्याच आकर्षक पर्याय वाटणार हे साहजिक आहे. पण हि गोष्ट एवढी सोपी नाही. किंमत पैशात जरी भारी वाटत असली तरी आपण इतर नुकसान विचारात घेत नाही. प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्याचा हा तोटा आहे. 

तुमच्या अजुन लक्षात आलं नसेल तर पुढच्यावेळी काही ऑर्डर करताना लक्षपूर्वक बिल बघा. सगळ्याच कंपन्या आता मार्केटप्लेस फी, प्लॅटफॉर्म फी, हँडलिंग फी अशा वेगेगळ्या नावाने ५ रुपये, १० रुपये असं शुल्क गुपचुप आकारायला लागलेल्या आहेत. आपल्याला त्या सेवेची सवय लागेपर्यंतचे लाड होते सगळे. त्यांना सुरुवातीला इन्व्हेस्टरकडून मिळालेला पैसा संपला कि हि किंमत आपल्याला कधी न कधी मोजावी लागणार तर होतीच. शेवटी त्यांना सुद्धा रोहित शर्माला सपत्नीक घेऊन जाहिरात करायची तर त्याचा पैसा कुठून येणार? आपल्याकडूनच. 

काहीही ऑनलाईन मागवणं सरसकट बंद करावं असं माझं म्हणणं नक्कीच नाही. मला स्वतःला ते जमणार नाही. पण थोडं विचारपूर्वक करायला हवं हे नक्की. जी गोष्ट जवळपास मिळत नाही, किमतीत फार फरक आहे, फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे अशा गोष्टींना पर्याय नाही. पण ह्या क्विक कॉमर्स पेक्षा क्विक वॉक केव्हाही बरा. चलते रहोगे तो लंबा चलोगे ;-)

Sunday, June 29, 2025

हिंदी सक्तीबद्दल

सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. 

माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. 

अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही. 

त्यामुळे आता पद्धतशीर रित्या शाळेत तीन वर्ष शिकलेल्या भाषांचा विचार केला तर हिंदी मला आजही उत्तम समजते, बोलता येते, त्या भाषेत लिहिता येते आणि व्यक्त होता येते. याउलट संस्कृतचे तेव्हा पाठ केलेले आणि आजवर लक्षात असलेले काही श्लोक सुभाषित सोडले तर एखादा नवा संस्कृत श्लोक समोर आला तर त्यातल्या अर्ध्याअधिक शब्दांचे अर्थ लावता येतील पण श्लोकांचा अर्थ लावायला तीनतीनदा वाचल्याशिवाय किंवा भाषांतर वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. त्यात बोलणे, स्वतःहून काही लिहिणे तर लांबच राहिले. 

अशी अवस्था का झाली? कारण बिरबलाच्या गोष्टीतल्या सारखे आहे. भाकरी का करपली, घोडा का अडला इ. "न फिरवल्यामुळे". संस्कृतचा वाचन, लिखाण, संभाषण, नाटक, सिनेमा इ. कुठल्याही माध्यमातुन अजिबात सराव नाही. हिंदीचा मात्र सतत सराव आहे. आपल्याकडे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमे, हिंदी चित्रपटगीते बघितली ऐकली जातात. अनेक उत्तर भारतीय आपल्या आजूबाजूला राहतात, कार्यालयात भेटतात, त्यामुळे संभाषणाचा सराव राहतो. 

मराठी, हिंदी भाषेत बरेच साम्य आहे, ज्यांना या दोन्ही भाषा येतात त्यांना हे सहज जाणवु शकते. त्यामुळेच इतर दाक्षिणात्य राज्यातून येणाऱ्या लोकांना हिंदी जशी अवघड जाते तेवढी आपल्याला जात नाही. बोलताना आपला मराठी हेल राहत असेल तेवढाच, पण त्याबद्दल कमीपणा घ्यायची गरज नाही. गुजराती, बंगाली, पंजाबी, हरयाणवी, बिहारी असे सर्व लोक हिंदी बोलतात तेव्हा त्यांचा त्यांचा हेल आणि लहेजा असतोच. आपण काही वेगळे नाही. 

सांगायचं तात्पर्य त्रैभाषिक सूत्र हे अशा पद्धतीने आपल्याकडे आधीपासून आहेच. हिंदीचा याहुन अधिक प्रचार प्रसार महाराष्ट्रात अजिबात आवश्यक नाही. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसे शो मिळत नाहीत अशी नेहमीच रड असते. घराबाहेर अनेक लोक रिक्षावाले, कॅबवाले, वेटर यांच्याशी सवयीने हिंदीतच संभाषण सुरु करतात. हिंदीचं मराठीवर सांस्कृतिक अतिक्रमण आतासुद्धा आहेच, ते वाढवायची गरज नाही. 

आता पहिलीपासुन शिकवण्याचा विचार केला तर एक साधी गोष्ट बघा. आपल्याकडे आता बहुतांश चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. आसपासची बहुतांश मुलेही त्यामुळेच इंग्रजी माध्यमात शिकतात. अ आ इ आधी ए बी सी डी, एक दोन तीन आधी वन टू थ्री, आंब्या आधी मँगो, लाल पिवळ्या आधी रेड येलो शिकतात. त्यांना मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी पर्यायी शब्द वापरून सांगितले जातात. 

ज्यांचं शालेय पुस्तकांच्या पलीकडे मराठी वाचन नाही त्यांना जास्त मराठी शब्द वापरून बोललं तर समजत नाही. हे फक्त मुलांच्याच बाबतीत नाही तर आजूबाजूला आपल्याच पिढीच्या मोठ्या लोकांशी बोलतानाही होतं. "हाय फाय मराठी" किंवा "प्रो लेव्हल मराठी" समजत नाही म्हणतात. 

हि अशी अवस्था असतांना आणखी एक भाषा पहिलीपासून त्यांच्या माथी मारून काय होणार. मराठी आणि हिंदीत इतकं साम्य आहे कि एक ना धड भाराभर चिंध्या होण्याची शक्यता जास्त वाटते. अनेक शैक्षणिक क्षेत्रातील लोकही याचा विरोध करत आहेत. 

आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही. हिंदीचा आणखी प्रसार करण्याऐवजी आपल्या मुलांची मराठी आणखी कशी उत्तम होईल, त्यांना शालेय अभ्यासक्रमात मराठी पुस्तकांची  यादी देणे, मराठी कविता म्हणायला लावणे, मराठी नाटक बसवणे असे उपक्रम करून याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. 

याचे राजकारण कुठवर जाईल, शासकीय निर्णय काय होतील ते माहित नाही. पण ते काहीही झाले तरी सर्व मराठी पालकांनी आपल्या मुलांची मराठी चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आजसुद्धा आहे. वर्षातुन दोन तीनदा मराठीचे स्टेटस आणि स्टोरी ठेवणे पुरणार नाही. त्यामुळे सजग व्हा, माय मराठीसाठी सक्रिय व्हा.

Friday, June 27, 2025

कॉर्बेटचं मृगजळ

गेल्या मे आम्ही उत्तराखंडला जाऊन आलो तिथे आम्ही नैनीताल आणि जवळपासच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. शेवटचा दिवस आम्ही जिम कॉर्बेट अभयारण्यसाठी राखून ठेवला होता.

पूर्वतयारी

जिम कॉर्बेटची सफारी त्यांच्या वेबसाईट वर आधीच बुक करावी लागते. शेकडो एकर परिसर असल्यामुळे तिथे वेगवेगळे झोन आहेत. बिजरानी, झिरना, ढिकाला, ढेला अशी त्या झोन्सची नावे आहेत. अजूनही आहेत. तिथे जाण्यासाठी विमानमार्गे पंतनगर / हल्द्वानी हे विमानतळ आहे. रामनगर हे रेल्वे स्टेशन आहे. ह्याच गावाजवळ बरेच झोन आहेत त्यामुळे इथे बरीच वर्दळ असते. बहुतांश लोक याच गावात मुक्कामाला राहून कॉर्बेटला जाऊन येतात. नैनिताल या लोकप्रिय ठिकाणाहून इथे बाय रोड यायला दोनेक तास लागतात.


ह्या झोन्समध्ये सफारीसाठी भारतीय नागरिकांसाठी आणि परदेशी नागरिकांसाठी वेगवेगळ्या वेळी स्लॉट उपलब्ध होतात. परदेशी नागरिकांना आपली ट्रिप सोयीस्कररित्या आखता यावी म्हणून त्यांच्यासाठी काही दिवस आधी उपलब्ध होतात. प्रत्येक झोनचे वर्षभरात ऋतूनुसार वेगवेगळ्या महिन्यात बदलणारे वेळापत्रक असतात. साधारणपणे रोज सकाळी आणि दुपारी असे दोन स्लॉट असतात. त्यापैकी आपल्या इच्छेनुसार आपण एक किंवा अधिक स्लॉट बुक करू शकतो.


माझी हि पहिलीच वेळ असल्यामुळे मी यावर फार सविस्तर लिहत नाही, फक्त जुजबी माहिती देऊन हा काय प्रकार असतो ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय. कोणी इच्छुक असल्यास आपल्या तारखांनुसार नेमकी माहिती काढावी.


तर आता तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. तर उन्हाळ्यात आम्ही चाललो होतो त्या मे महिन्यात कुठले झोन चालु असतील, कुठल्या झोनमध्ये सहसा वाघ दिसतात, अशी मी इंटरनेटवर सर्च करून, ब्लॉग्स वाचुन माहिती काढत होतो. थोडी चॅट जीपीटी आणि इतर एआयची पण मदत घेतली. तिथे जाऊन आलेल्या मित्राशीपण बोललो.


ढिकाला हा एक झोन असा आहे जो जंगलाच्या बराच आत आहे. तिथे जाऊन मुक्कामच करावा लागतो, आणि ज्यांना तिथे आत असलेल्या रेस्ट हाऊसचे बुकिंग मिळते त्यांनाच फक्त इथे सफारीला जाण्याची परवानगी असते. इतर झोन मध्ये जंगलात काही मोजके रेस्ट हाऊस आहेत पण तिथे राहणं बंधनकारक नाही. हा झोन सर्वात भारी आहे असं सर्वसाधारण मत दिसलं. पण त्याची बुकिंग तात्काळ तिकिटांसारखी फार लवकर फुल होते. मीही प्रयत्न केला पण मिळाली नाही. मग उरलेल्या झोनपैकी बिजरानी, झिरना हे झोन चांगले आहेत असं समजलं.


आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही दोन तीन दिवस जिम कॉर्बेटला देण्याचा विचार नव्हताच. सफारीही महागडी होती. आम्ही बिजरानी झोनचा दुपारचा एक स्लॉट (३-६) बुक केला. सर्व लोकांचे आधार कार्ड नंबर आम्हाला ऑनलाईन फॉर्म मध्ये भरावे लागले. त्या यादीप्रमाणे सर्व आधारकार्ड प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळेस सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पडताळून पाहिले. त्यामुळे ते सर्वांनी कागदावर किंवा मोबाईलवर सर्वांना तयार ठेवावे लागतात नाही तर सगळ्यांचा वेळ जातो.


सकाळचा स्लॉट पहाटे ६ वाजता आहे म्हणजे त्यावेळेस सर्वांना कॉर्बेटच्या गेटवर हजर राहावं लागतं. लहान मुलांमुळे आम्ही तो स्लॉट टाळला. आधीच्या राणीखेतच्या मुक्कामाहून आम्ही दुपारपर्यंत रामनगरला पोहोचु आणि मग तीन वाजता सफारीला जाऊ असा बेत आखला. 


खर्च


या सफारीसाठी आम्हाला 

  • ऑनलाईन बुकिंगला (प्लॅटफॉर्म, व्यवस्थापन इ.): ३४००
  • सफारी जिप्सी गाडीसाठी रोख - २७००
  • सफारी गाईडसाठी रोख - ९००
असे एकुण ७००० रुपये लागले. 

एका सफारी जिप्सीमध्ये ६ जण बसु शकतात. मांडीवर घेण्यासारखी लहान मुले असली तर तशी आणखी २ जण त्याच गाडीत बसु शकतात. जिप्सीच्या सर्वात पुढच्या भागात ड्रायवर आणि गाईड बसतात. मध्ये ३+१ लहान मुलं, मागे ३+१ लहान मुलं एवढे जण बसु शकतात.

आधीचा अपूर्ण अनुभव

माझी अभयारण्यात सफारीला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी मी इंडोनेशिया मध्ये "तमन सफारी"ला गेलो होतो. 


तिथे सिंह झेब्रा असे विविध प्राणी जवळुन बघण्याचा अनुभव घेतला होता. परंतु तो थोडा कृत्रिम प्रकार आहे. तिथे अशा प्राण्यांना थोडं ट्रेनिंग देऊन, आणि ऐकीव माहिती नुसार इंजेक्शन किंवा औषधाद्वारे थोडी भुल देऊन सोडलेलं असतं. प्रत्येक प्राणी त्याच्या विशिष्ट झोन मध्ये दिसेलच अशी व्यवस्था असते. बऱ्याच प्राण्यांना सफारीला येणाऱ्या प्रवाशांकडून काही तरी खायला मिळण्याची सवय असते. त्यामुळे ते अपेक्षेने गाडीजवळ येतात. आम्ही तरी फक्त माकड, झेब्रा अशा प्राण्यांसाठी गाजराचे जुडगे वगैरे घेतले होते. दुसऱ्या गाडीत मी सिंहासाठी मारून ठेवलेले छोटे प्राणी किंवा कच्चं मांस सुद्धा खिडकीतून सिंहाकडे भिरकावताना पाहिलं होतं.




ह्याला सफारीचं सिम्युलेशन म्हणता येईल. प्राण्यांना न बांधलेल्या पिंजऱ्याबाहेर मोकळ्या अवस्थेत तर बघता येतं. पण त्या प्राण्यांना शिकार करण्याची, अन्न शोधण्याची नैसर्गिक धडपड करण्याची गरज नसते. त्यामुळे ते प्राणी थोडे सुस्तावलेले असतात. त्यामुळे तो अनुभवही थोडा अपूर्णच वाटतो.


खऱ्या अभयारण्यात जाण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मी या दिवसाची वाट बघत होतो. सफारीमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायची म्हणून खास मोठी झूम लेन्ससुद्धा जुगाड करून घेऊन गेलो होतो. ती अवजड लेन्स पूर्ण ट्रिपमध्ये बॅगमध्ये सांभाळत फिरत होतो. 


प्रत्यक्ष अनुभव


शेवटी तो दिवस उगवला. राणीखेतहुन आमचा प्रवास अपेक्षेपेक्षा लांबला, तरी आम्ही जेवणाच्या वेळेपर्यंत कॉर्बेटला पोहोचलो. लवकर गेलो असतो तर हॉटेलवर सामान उतरवून, फ्रेश होऊन मग आलो असतो. पण त्याऐवजी कॉर्बेटच्या गेटबाहेर अनेक हॉटेल्स आहेत, तिथेच जेवलो. इथे सहजरित्या सफारीच्या दोन तासांपुरत्या मिलिटरीवाले किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सर्रास घालताना दिसतात तसल्या हॅट्स भाड्याने मिळतात. ५० रुपये भाडे, आणि विकत घ्यायची असल्यास २५० रुपये. घासाघीस होऊ शकते. चांगल्या दर्जाच्या दुर्बिणीसुद्धा २०० रुपये भाड्याने सफारी पुरत्या मिळतात.


आपण बुकिंग करतो त्या पोर्टलवरून आपल्याला आपल्या सफारी गाडीच्या ड्रायव्हरचा नंबर आधीच मिळतो. त्याच्याशी एक दिवस आधीपासुन संपर्क साधलेलं बरं. त्याला फोन करून आम्ही ३ च्या सुमारास गेटवर हजर झालो. ओळखपत्राची पडताळणी वगैरे सोपस्कार झाल्यावर आमचा गाईड येऊन बसला. टायगर कि तरफ से मै आपका स्वागत करता हु म्हणुन जरा वातावरण निर्मिती केली. तो युट्युब चॅनल सुद्धा चालवतो त्याची माहिती दिली. त्याला हलकेफुलके विनोद करण्याची, पांचट चारोळ्या करण्याची आवड होती त्यामुळे त्याच्या गप्पा ऐकत आम्ही आत गेलो.



आत गेल्या गेल्या डावीकडे एक मोट्ठा सांबार स्तब्ध उभा होता. प्रवेशद्वारापाशी पुतळा लावलाय कि खरा आहे हे आम्हाला समजायला दोन सेकंद लागले. कॉर्बेटच्या परिसर सुरु झाला कि बाहेर सुद्धा हरणं फार सहज दिसतात हे ऐकलं होतं. तसंच झालं. हरणांचे कळप चरताना दिसायला लागले. झाडांवर माकडं दिसायला लागली.



त्यांचे थोडेफार फोटो काढले, पण फार रमत गमत फोटो काढत बसलो नाही. तीन तासात सफारी बाहेर पोहचायला हवी असते. त्यामुळे अगदी निवांत ठिकठिकाणी थांबता येत नाही, तरी ड्रायवर मागे बसलेले प्रवासी कशात रस घेत आहेत, कशाचा फोटो काढत आहेत, त्यांचे फोटो उरकले का याचा अंदाज घेऊन थांबत किंवा निघत असतात.



आत जिम कॉर्बेट राहिलेला बंगला आहे. तिथे छोटा ब्रेक झाला. इथे वॉशरुम्स ची सोय आहे. इतरही काही चेकपॉईंटवर सर्व गाड्या थांबुन ड्रायवर गाईड काही तरी रिपोर्ट करून येत होते. तिथे ५-१० मिनिट थांबुन ड्रायवर गाईड एकमेकांशी बोलून कुठे काय दिसलं याचा अंदाज घेत होते.


आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा मार्ग एक असला तरी आतमध्ये प्रचंड मोठा परिसर आणि कच्चे रस्ते असल्यामुळे सर्व सफारी गाड्या सारख्या रूट वर जात नाहीत. त्या त्या गाडीत बसलेले ड्रायवर गाईड मिळुन वेगवेगळ्या रस्त्यांवर गोल गोल फिरवतात, त्यामुळे इतर गाड्या आपल्याला पुन्हा पुन्हा क्रॉस होतात. त्यात बसलेले प्रवासी एक दोनदा क्रॉस झाले कि लक्षात यायला लागतात. तिथे मराठी बोलणारे लोक केसरी आणि वीणा वर्ल्डतर्फे बरेच आलेले दिसले.


एका ठिकाणी कृत्रिम हौद बांधले होते, तिथे पाण्यासाठी माकड हरीण, एक पक्ष्याचं कुटुंब होतं. तिथे जरा काही इंटरेस्टिंग पाहायला मिळालं. पक्ष्याचं जोडपं आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी फार जागरूक होतं. त्यांना माकडापासून धोका वाटत होता, हरणांना मात्र ते निवांत पाणी पिऊ देत होते. माकडाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याला वारंवार जवळ जाऊन चोचीने टोचून टोचून त्यांनी पळवुन लावलं.




माकडं आपल्याला शहरात पण दिसतात, त्यांची इतर माकडांशी, कुत्र्यांशी किंवा माणसांशी हातापायी दिसते. पक्ष्यांशी भांडण हा पहिल्यांदाच दिसलेला प्रकार.


आम्हाला हरणं दिसली, माकडं दिसली, काही पक्षी दिसले, कॅमेऱ्याचा थोडा वापर झाला. एक दीड तास होई पर्यंत जरा आम्ही उत्साहात होतो. गाईडच्या डायलॉग्सला प्रतिसाद देत होतो. डियर मंकी फुल गॅरंटी टायगर कि नो वॉरंटी.. हा डायलॉग त्याने फार मारला. नंतर नंतर आम्ही फक्त माकडं पाहून कंटाळलो.


एकदा वाघ दिसेल कि काय अशी शक्यता खरोखर निर्माण झाली होती. गाईडच्या माहितीनुसार जंगलात वाघ कुठे आहे, कुठून फिरतोय याची कल्पना त्यांना बऱ्याचदा माकडांमुळे आणि इतर प्राण्यांच्या आवाजामुळे येते. याला "कॉल्स" म्हणतात. तर एका ठिकाणी आम्ही एक वळण घेतलं आणि मागच्या बाजुने आवाज ऐकु आले. ड्रायव्हरने पटकन गाडी थांबवुन सर्रकन गाडी रिव्हर्समध्येच मागे घेतली. तिथे यु-टर्नला जागा नव्हती. वळणावर गाडी पुन्हा सरळ करून आम्ही वाट बघत बसलो. एक दोन इतर गाड्या का थांबले म्हणून चौकशी करत काही वेळ थांबून गेल्या. पण वाघोबा काही आला नाही.


मग आणखी एक प्रयत्न म्हणुन गाईड म्हणाला जरा डीप फॉरेस्ट मधुन नेऊन आणतो. त्याने मग आणखी दाट झाडी असलेल्या, आणखी छोटे, कच्चे रस्ते असलेल्या भागात घेऊन गेला. तिकडेही वाघोबाची गाठ पडली नाही. एक दोन गाड्या तिकडूनही येताना जाताना भेटल्या. आता दीड दोन तास होऊन गेले होते. सफारीची वेळ अर्धी अधिक होऊन गेली होती. त्यामुळे इतर गाडीतले प्रवासीसुद्धा थोडे निराश दिसत होते. त्या स्लॉट मध्ये कोणालाच वाघ दिसला नव्हता. गाड्या समोरासमोर थांबल्या कि गाईड ड्रायव्हर त्यांची रूट बद्दल चर्चा करत होते आणि आम्ही प्रवासी एकमेकांना "कुछ दिखा?" असं विचारत होतो.


फिरता फिरता आम्हाला काही छान पक्षी मात्र दिसले. किंगफिशर दिसला. गाईडने विजय मल्ल्याची आठवण काढली. एका ठिकाणी एक मोर अतिशय सुंदर डौलदार पद्धतीने पोज देऊन उभा होता. प्राण्यांपेक्षा पक्ष्यांमधेच थोडी जास्त व्हरायटी पाहायला मिळाली.





तो रस्ता फार छोटा असल्यामुळे तिथे एक अगदी छोटासा रोमांचक किस्सा घडला. मी गाडीच्या उजव्या बाजुला बसलो होतो. त्याच बाजूला आम्हाला एक वानरांचं कुटुंब दिसलं. आम्ही काही सेकंड थांबुन त्यांचं निरीक्षण केलं आणि निघालो. तेवढ्यात त्यांची झाडांवर हालचाल सुरु झाली. गाईडला काय वाटलं कोणास ठाऊक त्याने त्या वानराला हटकलं.. तो थोडासा चिडला आणि दात दाखवुन गुरकावयला लागला. रस्ता छोटासा असल्यामुळे आमच्यात काहीच अंतर नव्हतं. एका छोट्याश्या उडीत तो गाडीत घुसू शकला असता. गाईडने त्याला आणखी घाबरवायचा प्रयत्न केला आणि ड्रायव्हर ने थोडी थोडी गाडी सरकवत पुढे काढली आणि आणखी काही घटना टाळली.


थोड्याच वेळात आम्ही पुन्हा मोकळ्या पटांगणात मोठ्या रस्त्यांवर लागलो आणि सफारी संपुन पुन्हा बाहेरच्या दिशेने निघालो. गाईड रोहित शर्मा सारखा इट्स नॉट ओव्हर अनटिल इट्स ओव्हर ची फिलॉसॉफी सांगत होता. होप रखिये सर, कभी कभी यहांसे जाते जाते गेट के पास भी दिख जाता है.







पण त्या दिवशी आमचा कोणाचा व्याघ्रयोग नव्हताच. गाईडने याचं आणखी एक कारण सांगितलं. दोन दिवसापूर्वी इथे जोरदार पाऊस होऊन गेला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची बरीच डबकी तयार झाली होती. उन्हाळ्यात प्राणी पाण्यासाठी भटकंती करतात आणि त्यामुळे जास्त शक्यता वाढते. पण आता पाण्याची ठिकाणं वाढल्यामुळे वाघाला वणवण फिरण्याची गरज नव्हती. या वर्षी पाऊस भारतात इतरत्र झाला तसाच उत्तराखंडातही मे मध्येच सुरु झाला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या पावसामुळे आमचे आधीच्या ठिकाणचे बेतही थोडे फसले होते. त्याचा प्रभाव इथेही पडला होता.


वाघाचं दर्शन आणखी चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी माझ्या भावाला एक चांगली कल्पना सुचली. तो आधी कुठल्या तरी सफारीला असताना तिथले गाईड वॉकी टॉकी वर एकमेकांशी संपर्कात होते म्हणे, तिथे त्यामुळे त्यांना बिबटे फार चांगल्या प्रकारे पाहता आले. इथे गाड्या एकमेकांसमोर आल्या तरच गाईड एकमेकांशी बोलत होते. बिनतारी यंत्रणा नव्हती. आत मोबाईललाही रेंज नसल्यात जमा होती. आणि दुसरं म्हणजे आता ड्रोन उपलब्ध असल्यामुळे वाघांवर अंतर राखुन नजर ठेवता येईल आणि गाईड्स ला नेमकी माहिती मिळाली तर अचुक ठिकाणी नेता येईल. सफारी गाईड वगैरेचा खर्च तसा बराच आहे. रोज दोनदा मोठ्या संख्येने बऱ्याच गाड्या भरून पर्यटक वेगवेगळ्या झोन मध्ये जात असतात. त्यांना हि गुंतवणूक आवाक्याबाहेर नाही. अर्थात रोजच्या रोज मोठ्या संख्येने पर्यटक यायला लागलेलं वाघाला आवडेल का कोणास ठाऊक?


गेट जवळ पोहोचल्यावर गाईडने माफ करना सर, आपको टायगर नही दिखा सके, म्हणुन निरोप घेऊन गेला.


निघताना मला वाटलं, वाघ बघायचा वाघ बघायचा म्हणुन आपण हरीण आणि माकडांकडेही फार निवांत बघितलं नाही. दोन तीन फोटो काढले कि चालले पुढे. एवढा जड कॅमेरा धरून हलत्या गाडीत फोटो चांगले आले कि नाही हे बघणं सुद्धा अवघड. आणि ते बघण्यात बॅटरी जाते ती वेगळीच. त्यामुळे एरवी पण मी पुन्हा पुन्हा कॅमेरा मध्ये फोटो बघत बसत नाही. फक्त एरवी फरक एवढा असतो कि एवढे चटकन हलणारे प्राणी नसतात. लँडस्केप असो किंवा माणसांचे फोटो, फार तर स्माईल आणि डोळे नीट यावेत म्हणुन दोन तीन क्लिक केले कि बास. लँड्स्केपला तीही गरज नाही. तेवढा आत्मविश्वास असतो. इथे दूरच्या प्राण्यांचे फोटो काढताना फोकस करूनही त्यांची हालचाल झाली कि फोकस बिघडू शकतो. त्यासाठी अधिकच्या बॅटरी सोबत ठेवायला हव्यात म्हणजे तिथल्या तिथे फोटो बघत बसलं तरी बॅकअप राहतो.


आम्ही मुलांना फक्त वाघ वाघ असं सांगितलेलं नसलं तरी तिथे बाहेर वाघाची चित्र, वाघाचे टीशर्ट, गाईड भेटल्यापासुन बोलण्यात वाघ वाघ येत असल्यामुळे चक्क ते सुद्धा माकडं आणि हरणं यात नंतर फारसा रस दाखवत नव्हते. कधी दिसेल वाघ, कधी दिसेल वाघ हेच विचारत होते. तिथे प्रवेशद्वारापाशी आठ वाघ जेवायला डायनिंग टेबलवर बसलेत असं चित्र होतं. आम्हाला वाघ दिसले ते एवढेच.



तीन तासाचा मर्यादित वेळ असल्यामुळे वाघाचा मागोवा घेत पुढे पुढे जात राहणं काही चुकीचं वाटत नव्हतं, पण फक्त एकच गोष्ट डोक्यात ठेवुन आपणच आपला इतर गोष्टी बघण्याचा अनुभव थोडा नीरस करतोय कि काय असंही मला वाटत होतं.
कॉर्बेटचा वाघ म्हणजे आमच्यासाठी मृगजळच ठरलं.


Monday, April 28, 2025

यात्रा आणि सक्रिय सोहळे

अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं. 

कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही. "घे पाऊल पुढं जरा आणि कंबर लचक जरा" या गाण्याचा आणि शिवजयंतीचा काय संबंध? 

कुठेतरी वाचलं होतं असा आपल्याच सणांचा तमाशा आपणच करतो. रमजान मध्ये इफ्तार पार्ट्या होतील, ईदला लोक भेटीगाठी करतील, शीरखुर्मा खातील पण असले चाळे करताना दिसणार नाहीत. तसं पाहायला गेलं तर त्यांच्यात संगीतच वर्ज्य आहे पण तरी लग्नात पार्ट्यात फिल्मी गाणी वाजत असतील पण सहसा सणांच्या दिवशी नाही. 

डिस्को, क्लब्स, गाणी लावून सर्वांनी नाचायचे वगैरे प्रकार आपल्याकडे पश्चिमेकडून आले. हरकत नाही, पण तिकडचे लोक सुद्धा दारू पिऊन क्लब मध्ये नाचायची गाणी आणि ख्रिसमसच्या दिवशी वाजवायची गाणी यात फरक ठेवतात. चर्च समोर एड शिरन चं "शेप ऑफ यु" वाजलेलं नाही दिसणार, खास ख्रिसमसची जिंगल बेल आणि इतर कॅरल्स ऐकायला मिळतील. त्यांच्यात संगीत वर्ज्य नाही त्यामुळे खास चर्चमध्ये म्हणायची सुंदर सुंदर गाणी आहेत. अगदी मराठीतही आहेत. लहानपणी माझ्या घराशेजारीच एक चर्च असल्यामुळे मी दर रविवारी "धन्यवाद येशुला", "हालेलूया म्हणूया" अशी गाणी ऐकलेली आहेत. तिथून मला "मुंगळा", "काला कव्वा", "झिंगाट" कधीही ऐकू आलं नाही. 

असो, संगीत आणि नाचाचा विषय नाही. सण उत्सव साजरे करण्याची ही पद्धत योग्य आहे का असा विचार करत असताना मला आठवली माझी रायरेश्वरची राईड. 

माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर शिवजयंती:

२०२३ मध्ये शनिवारी महाशिवरात्र आणि रविवारी शिवजयंती असा खास विकेंड जुळून आला होता. मी त्या आधीच्या एक दोन वर्ष आधीपासून भरपुर सायकलिंग करायला लागलो होतो. पुणे आणि जवळपास भरपूर मोठ्या मोठ्या राइड्स होत होत्या. तर या वीकेंडला काही प्लॅन करावा असं मनात आलं. 

मला आठवलं रायरेश्वर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत ह्या किल्ल्यावरच्या रायरेश्वर महादेवाच्या मंदिरात येऊन स्वराज्याची शपथ घेतली होती. म्हणजे शिव आणि शिवराय या दोघांशी निगडित हि जागा होती. "शिव वंदन राईड" अशी कल्पना घेऊन मी तिथे पुण्याहुन सायकलने जायचं, मुक्काम करायचा, दोन्ही शिवांना वंदन करून दुसऱ्या दिवशी परत यायचं असा प्लॅन केला. मी आणि तीन मित्रांनी तो अंमलात आणला. माझ्या आयुष्यातली ती सर्वात सुंदर शिवजयंती होती. 

फक्त चौघंच होतो, चढ भरपूर होता आणि त्यामुळे साहजिकच वेग अतिशय कमी, आम्ही पुढे मागेही होत होतो. बराच वेळ एकट्याने सायकल चालवायला, विचार करायला मिळत होता. तसंही सायकलवर फिरण्याची हि खासियत आहेच, एरवी गाडीवर फटकन सरून जातील अशा जागा निवांत पाहणे, स्वतःशीच विचार करत फिरणे यात फार आनंद आहे. तर त्या दोन्ही दिवशी किल्ल्यावर जाऊन येत असल्यामुळे, तिथली शिवजयंती पाहिल्यामुळे, मी बराच वेळ फक्त महाराजांबद्दल विचार करत होतो. इतक्या कमी वयात त्यांनी केलेला संकल्प, पन्नाशी पर्यंतच्या अल्पही नाही आणि दीर्घही नाही अशा आयुष्यात गाजवलेलं प्रचंड कर्तृत्व... 

एक अनोखा स्वातंत्र्यदिन:

असाच अनुभव मला त्याआधी पंधरा ऑगस्टच्या आधी आला होता. सायकलिंग ग्रुपमधल्या सारंगदादाने पुण्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांशी निगडित असलेल्या काही वास्तु आणि जागांची माहिती स्वातंत्र्यदिन जवळ आल्यावर पाठवली होती. मी आणि एक मित्र त्या सर्व आणि आणखी एक दोन तशाच ठिकाणी सायकलवर फिरून आलो. तर तो विचार घेऊन पुण्यात फिरताना मस्त वाटत होतं. लोकमान्य टिळक, आगरकर, वासुदेव फडके, महात्मा गांधी असे अनेक जण त्या काळात याच रस्त्यांवरून फिरले असतील, वावरले असतील. तेव्हाचं वातवरण कसं असेल. 

माझा वारीचा अनुभव:

मी कॉलेजात असताना आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली होती. विठ्ठलाची अपार भक्ती, श्रद्धा असं काही कारण नव्हतं खरं सांगायचं तर. कुतूहल होतं, शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा नेमकी काय आहे, कशासाठी आहे, कसे चालतात लोक एवढं, काही गवसतं का त्यातुन असे अनेक प्रश्न होते. फार कमी वय होतं त्यामुळे तेव्हा नाही मिळाली सगळी उत्तरं, आणि फार काही समजलंही नाही. अनुभव छान होता. खुप लोकांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या, भेटता आलं, गप्पा मारता आल्या. डोंगर, शेत, माळरान अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाचा योग आला. 

आषाढी एकादशीचं निमित्त असतं पण बहुसंख्य वारकरी तर पंढरपुरात पोहोचल्यावर त्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेऊही शकत नाहीत. चंद्रभागेत स्नान करून, कळस दर्शन करून मग मंदिराला प्रदक्षिणा घालुन परत फिरतात. ज्यांना शक्य आहे ते आणखी मुक्काम करून मग जमेल तसं दर्शन करून निघतात. महाराष्ट्र भरातुन अनेक दिंड्या आळंदी देहू गावी जमा होतात. ट्रक टेम्पो मध्ये सामान भरून अनेक वारकरी आपापल्या गावातुन असा प्रवास करतात. तर काही जण तर आपल्या गावाहून आधी पंढरपूरला जाऊन दर्शन करून मग आळंदी देहू ला जातात. कारण एकादशीला दर्शन होत नाही. थोडक्यात ज्या दिवसाचं निमित्त असतं त्या दिवशी अनेकांचं विठ्ठल दर्शन होत नाही तरी सर्व समाधानी असतात, आपल्या वारीत त्यांना विठ्ठल भेटलेला असतो. 

तीन वर्षांपूर्वी मी सायकलवर वारी केली तेव्हा मात्र वेगळा अनुभव होता. पुणे ते पंढरपूर अशी एका दिवसात ~२२५ किलोमीटर सायकल चालवुन आम्ही संध्याकाळी उशिरा पोहोचलो. त्या दिवशी मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशीच्या दर्शनाचे ऑनलाईन पास काढून ठेवलेले होते. सकाळी दर्शन झाल्यावर सायकल टेम्पोमध्ये आणि आम्ही बस मध्ये असा पार्टीच्या प्रवासाचा बेत होता. तरी तिथे गेल्यावर सांगण्यात आलं कि उद्या आपण लवकर निघायचा प्रयत्न करूया आजच मुखदर्शन करून घ्या. प्रचंड थकवा आला होता पण तरी जेवण झाल्यावर स्वतःला ढकलत ढकलत गेलो. आत गेलो, मुखदर्शन झालं आणि सांगता येणार नाही इतकं छान वाटलं. थकवा किंवा अंगदुखी काही चमत्कार होऊन गेली नाही पण तरतरी आली. इतकी तंगडतोड केल्यावर दर्शन झाल्याचं समाधान वाटलं. 

आपल्या सण, उत्सवाच्या दिवशी काय होतं. घरचा सण असतो तेव्हा आपला भर खायला काय आहे, कुठले कपडे घालायचे, आपल्या घरी कोण येणार आणि आपण कुठे जाणार यावरच असतो. सार्वजनिक उत्सवात सुद्धा तेच.. त्याचा दिखावा, तिथली खाण्यापिण्याची व्यवस्था, ढोल ताशे, डीजे, प्रमुख पाहुणे अशा गोष्टींवर जास्त भर असतो. ज्या देवाचं, माणसाचं निमित्त असतं त्याचा विचार त्या दिवशी आपण स्वतः कितीदा करतो? 

वारकरी वर्षातून कधीही पंढरपूरला गाडीने जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतात. त्यासाठी तर तो वर्षभर उपलब्ध असतो. पण वारीचं महत्व हे प्रवासात आहे. त्यातल्या कष्टात आहे. ते पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या आनंदात आहे. मग विठ्ठल एकादशीला नाही दिसला तरी चालतो. पंधरा दिवस मैल न मैल चालताना, रिंगण घालताना, इतर वारकऱ्यांसोबत भजनं म्हणताना, कीर्तन ऐकताना असंख्य वेळा त्याचा नामोच्चार झालेला असतो, विठ्ठलाची प्रतिमा डोळ्यासमोर येत नाही असा एकही दिवस वारीत जात नाही. 

आपण काही कष्ट करून शरीराला, मनाला भुक लागायला भाग पाडतो त्यानंतर ती वारी ती यात्रा पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळतं त्याला तोड नाही. भगवा झेंडा आपण नेहमी बघतो इकडे तिकडे. पण तोच ट्रेक करताना वर किल्ल्यावर दिसतो तेव्हाची भावना, किल्ल्यावर पोहोचल्यावर झेंडा समोर येतो तेव्हाची भावना वेगळीच असते. अशी पायपीट केल्यावर जी कडक भुक लागते तेव्हा पिठलं भाकरी, मॅगी, ठेपले, चिवडा काहीही खायला मिळालं तरी भारी लागतं. 

आणि असं करताना आपण जर सतत विठ्ठलाचं किंवा कुठल्याही देवाचं नाव घेत असु, शिवरायांचा विचार करत असु, महापुरुषांच्या आठवणी जागवत असु, तर त्यातून मिळालेली प्रेरणा आणि आनंद कुठे.. आणि शरीराला काहीच कष्ट न पडता कोंबलेल्या पंचपक्वान्नाच्या जेवणाची सुस्ती, औचित्य विसरून भान विसरून कुठल्याही गाण्याच्या ठेक्यावर नाचण्याची बेहोशी कुठे...

हे कधीच करू नये असं नाही, पण नेहमी फक्त तेच करण्यापेक्षा वेगवेगळे मार्ग आजमावून पाहायला हवं. सुग्रास अन्नाने आपली जीभ सुखावते, नाच गाण्यामुळे मुड छान होतो.. पण आपल्या जिभेला आणि आपल्या मूडला आपण नेहमीच ट्रीट देत असतो. पण ते क्षणिक असतं. त्यात फार काळ टिकण्याची क्षमता नसते. 

आपल्या शरीराला आणि मनाला बुद्धीला सुद्धा ट्रीट द्यायला हवी. चांगला व्यायाम, चांगले विचार, चांगला कन्टेन्ट हे त्यासाठीच आहे. आणि खरंच सांगतो, वर जे जे अनुभव सांगितलेत त्या सगळ्याचा सकारात्मक प्रभाव माझ्या मनावर, मुडवर दीर्घकाळ टिकला. 

त्यामुळेच इतक्या गाड्या, रेल्वे, हेलिकॉप्टर सगळी सोय असुनही आजही वारीला महत्व आहे. यात्रेला महत्व आहे. मोठमोठ्या यात्रा, ट्रेक्स, परिक्रमा, सायकल प्रवास पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक आहे. 

आपली बरीच प्रख्यात मंदिरे, तीर्थ स्थळे इतक्या दुर्गम ठिकाणी का आहेत? सहज मिळणाऱ्या गोष्टीचं काही कौतुक नसतं. लोकांना तिथे येताना कष्ट पडले पाहिजेत, त्यांनी देवाचा धावा केला पाहिजे, देवासमोर पोहोचल्यावर तुच पार पाडलंस रे बाबा, असे भाव मनात आले पाहिजेत असाच विचार असेल आपल्या पूर्वजांचा कदाचित. वय झालं कि, आरोग्य बिघडलं कि, वेळापत्रक फारच व्यस्त असेल तेव्हा आपल्या घरात, मनात देव आहेच, पण शक्य असेल तेव्हा असा बाहेर पडून देवाकडे जाण्याचा आनंद घेऊन बघायलाच हवा. 

वैयक्तिकरित्या मला तर सायकलिंग, ट्रेक्स याची आवड आहे त्यामुळे ते करताना मला आनंद मिळतोच, पण त्याशिवाय माझ्या विचारांना चालना मिळते. माझ्या मेंदूची क्रिएटिव्ह बाजु सक्रिय होते. खालील ब्लॉग्समधले विचार मला राईड, ट्रेक करताना सुचले आहेत. कधी कधी काही ओळी सुचतात. फोटोग्राफी तर होतेच. 

गुढीपाडव्याला राम मंदिरात सायकलवर जाऊन येताना: रामाचा प्रभाव

सिंहगड ट्रेक करताना कोणीतरी शिवरायांच्या पुतळ्यासमोर ग्लुकोजच्या गोळ्या वाहिलेल्या पाहुन: नैवेद्य 

सणाच्या दिवशी त्या त्या देवळात राईड, गणपतीत मानाचे गणपती, नवरात्रीत देवीची नऊ मंदिरे, महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मारक किंवा पुतळ्याजवळ राईड अशा गोष्टी आमच्या सुरूच असतात. मी जमेल तेव्हा असेच प्रयत्न इतर निमित्ताने सुद्धा करतो. माझ्या एक दोन वाढदिवशी मी माझ्या वयाइतके किलोमीटर राईड केली. गेल्या दोन लग्नाच्या वाढदिवसाला मी आणि बायको मिळुन लग्नाला जेवढी वर्ष झाली तेवढे किलोमीटर रनिंग किंवा लॉन्ग वॉक करून आलो. त्याआधीच्या वेळी दोघं एक छोटी हाईक करून आलो. 

आता कोणाला वाटेल ह्यांना सायकलिंगला निमित्तच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सायकल घातलीच पाहिजे का? तसं आहेच ते खरं. :-P पण सगळ्यांनीच सायकल घेतली पाहिजे असं नाही. जी आवड असेल ते करा. चाला, फिरा, पळा... घराबाहेर पडा. यात्रा करा, प्रवास करा. जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतं पण त्याची जागा समुद्रातच. 

जेव्हा बाहेर पडायला वेळ नाही तेव्हा इतर काही कला आवडत असेल तर ती जोपासा. गाणं म्हणत असाल, काही वाजवत असाल तर त्या दिवशी एखादं साजेसं गाणं रेकॉर्ड करा, फिरायची आवड असेल तर साजेश्या ठिकाणाला भेट द्या, चित्रकला आवडत असेल तर साजेसं चित्र काढा. 

या वर्षीच्या शिवजयंतीला माझ्या मुलीने स्वतःहून महाराजांचं एक चित्र काढलं. तिचं पाहुन मलाही काढावं वाटलं आणि मी एक स्केच काढलं. चित्र कसं आलेय ते जाऊ द्या, ती तर अजुन शिकतच आहे आणि मला आता पुन्हा नव्याने शिकण्याची गरज आहे. पण हे काढताना दोघांनी एन्जॉय केलं. 

आता तुम्हाला या ब्लॉगचं थोडं विचित्र शीर्षक उलगडलं असेल. होईल तेवढं मराठीच वापरायचं म्हणुन हे सुचलं. कदाचित ऍक्टिव्ह सेलिब्रेशन म्हटलं असतं तर लगेच लक्षात आलं असतं. सक्रिय सोहळा म्हणजे माझ्या लेखी कुठल्याही निमित्ताने सक्रियपणे साजरे केलेले क्षण. निष्क्रिय राहुन अर्थात आपण काही साजरं करू शकत नाही.

पण कुठलाही आनंद उत्सव फक्त काही खाऊन साजरा केला तर तो जिभेसाठी छान, आरोग्यासाठी घातक. फक्त ढिंचॅक ढिंचॅक वाजवुन साजरा केला तर नाचायला छान पण कानासाठी घातक, पर्यावरणासाठी घातक. त्यामुळे सक्रिय म्हणजे साजरा करण्यासाठी असा प्रकार शोधा जो त्या प्रसंगासाठी सुद्धा चांगला, आपल्या शरीरासाठी मनासाठी सुद्धा चांगला. 

त्यावरून आठवलं हल्ली सगळीकडे एक प्रकारच्या सक्रिय सोहळ्यांचं प्रमाण वाढत चाललंय. मॅरेथॉन, सायक्लोथॉन, वॉकॅथॉन अशा गोष्टींना वाढता प्रतिसाद आहे हे फार चांगलंय. हे आरोग्याचे, शारीरिक क्षमतेचे सोहळेच असतात. आरोग्याप्रती सजग असलेले, व्यायामाची आवड असलेल्या लोकांची भेट होण्यासाठी उत्तम ठिकाण. तिथे गेल्यावर सगळ्या सभासदांची सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहत असते. तुम्ही आजवर केलं नसेल तर एकदा नक्की करून पहा. आपल्या क्षमतेनुसार ५ किमी, १० किमी असा प्रकार निवडा. 

पटलं तर अशा सक्रियतेने एखादं निमित्त साजरं करून पहा. आवडलं तर इतरांना सांगा. सक्रियतेच्या वारीत सहभागी व्हा. जय हरी।।

Thursday, March 6, 2025

शिवसृष्टी पुणे

महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.



छान अनुभव होता. 
समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया शिवसृष्टी
अशी काहीशी त्यांची टॅग लाइन आहे आणि ती त्यांनी सार्थ केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून उभी राहिलेली ही शिवसृष्टी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली आहे. त्याचा आत्ताशी कुठे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, उर्वरित भागाचं काम अजुन काही वर्ष चालेल.


आत्ता अशात लल्लनटॉप या युट्युब चॅनलवर एका भारतीय इतिहासावर भरपूर संशोधन केलेल्या एका ब्रिटिश अभ्यासकाची मुलाखत पाहिली. ( लिंक )

इतिहासात रुची असणाऱ्या कोणीही आवर्जुन बघावी अशी हि मुलाखत होती. त्यात शेवटी त्यांनी भारतात इतिहासाकडे किती दुर्लक्ष केलं जातं, इतका प्राचीन आणि समृद्ध वारसा आपल्याकडे असुन त्याची किती वाईट अवस्था आहे, आपली संग्रहालये कशी देखरेखीविणा धुळ खात पडलेली असतात अशा गोष्टींवर खंत व्यक्त केली आहे.

त्याला अपवाद ठरावी अशी ही शिवसृष्टी झालेली आहे. तिच्या नावात त्यांनी सृष्टी हा शब्द जो वापरलाय तो फार समर्पक आहे. कारण इथे म्युझियम किंवा संग्रहालय म्हटलं की जो निर्जीव इतिहास समोर येतो तसं नाही तर शिवरायांचा इतिहास जिवंत करून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.


बहुतांश ठिकाणी संग्रहालयामध्ये केवळ ऐतिहासिक काळातल्या अनेक वस्तु जसेकी शस्त्रास्त्रे, अवजारे, भांडी, झेंडे, दागिने, काही महत्वाच्या व्यक्तींच्या वैयक्तिक वापरातील वस्तु असतात, चित्रे किंवा छायाचित्रे असतात आणि माहितीचे फलक लावलेले असतात. सहसा आपण सुरुवातीला उत्सुकतेने काही फलक वाचतो आणि हळुहळु उत्साह ओसरत जातो आणि उर्वरित भागात पटापट नजर फिरवुन लोक निघतात. कारण फक्त माहितीचा भडीमार केला कि तोचतोचपणा यायला लागतो.

हे लक्षात घेऊन विकसित देशांमध्ये जी संग्रहालये आहेत तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऐतिहासिक गोष्टींच्या सोबतीला आकर्षक देखावे, दृक्श्राव्य माध्यमातले खेळ, ऑडिओ गाईड असे प्रयोग केलेले असतात. भेट देण्यास आलेल्या लोकांमध्ये कुतूहल कसं जागृत ठेवता येईल, बाहेर पडेपर्यंत त्यांना कसं उत्साही ठेवता येईल यासाठी प्रयत्न केलेले असतात. संग्रहालयामध्ये काही विभाग कायमचे आणि काही जागेत वेगवेगळ्या विषयांवर (उदा. व्हिक्टोरिया कालखंड, नेपोलियन कालखंड ई.) विशेष मेहनत घेऊन मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शन ठेवतात जेणेकरून आधी येऊन गेलेल्या लोकांनाही परत यावंसं वाटावं.

आपल्याकडची बहुतांश संग्रहालये सरकारच्या अखत्यारीत असल्याने लोक आले काय गेले काय फरक पडत नसल्यासारखं व्यवस्थापन असतं. त्यामुळेच खाजगी प्रयत्नातून शिवसृष्टीसारखे प्रकल्प उभे राहायला हवेत आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळायला हवा.

तुम्ही आजवर इथे भेट दिली नसेल तर तुम्हाला कल्पना यावी म्हणुन तिथे काय काय आहे याची सविस्तर माहिती देतोय:

संग्रहालय: 

शस्त्रास्त्रे: पारंपरिक संग्रहालयाप्रमाणे इथेही एक विभाग शिवकालीन शस्त्रास्त्रांचा आहे. 

रणांगण: शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी सामना केलेल्या बहुतांश शत्रूंची चित्रे उपलब्ध आहेत. त्यांचा एक विभाग आहे.



या दोन्ही विभागात शिवसृष्टीचे मार्गदर्शक सविस्तर माहिती देतात. आपणच आपल्या चार वस्तु बघुन पुढे सरका असा प्रकार नाही. सर्व शस्त्रांची माहिती, ते कसे बनवतात, कुठल्या प्रकारचे योद्धे / सैनिक कुठल्या प्रसंगात वापरत असत याची माहिती सांगतात. सर्व शत्रूंच्या चित्रासमोर त्यांची माहिती थोडक्यात सांगतात. 

दृक्श्राव्य खेळ:

जाणता राजा
"जाणता राजा" हे समर्थ रामदासांनी केलेल्या शिवरायांच्या वर्णनाचा एक भाग आहे. याच नावाचं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं एक नाटक माझ्या लहानपणी महाराष्ट्रभर गाजलं होतं. खरेखुरे हत्ती घोडे, अस्सल वाटणारे किल्ले आणि दरबाराचे मोठाले सेट्स, मोठ्या संख्येत दाखवलेल्या सैनिकांमुळे खऱ्या वाटणाऱ्या लढाया अशा भव्य नेपथ्य आणि आयोजनामुळे नेहमीपेक्षा अतिशय वेगळा अनुभव देणारं हे नाटक होतं. त्यामुळे याला महानाट्य म्हणायचे. मला आठवतंय याचा एक दौरा छत्रपती संभाजीनगर ला तेव्हा आला होता आणि काही दिवस सलग तिथे खेळ होते, आणि प्रचंड प्रतिसाद होता. मी रोज बाबांच्या मागे लागायचो पण त्याची तिकिटे आम्हाला मिळाली नाहीत.

तर या नाटकाच्या काही संपादित केलेल्या महत्वाच्या प्रसंगांची एक क्लिप सध्या इथे दाखवली जाते. शिवसृष्टीच्या पुढच्या टप्प्यात या नाटकासाठी कायमस्वरूपी नाट्यगृहाची व्यवस्था असणार आहे, आणि तिथे त्याचे नियमितपणे प्रयोग केले जातील. हे सुरु होईल तेव्हा लहानपणी हुकलेली हि संधी साधण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.


सिंहासनाधिश्वर
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता हे सर्वांना माहित आहे. तो शिवरायांना भरलेल्या दरबारात मुजरा असलेलं चित्र सुप्रसिद्ध आहे. तर या अधिकाऱ्याने त्या सोहळ्यात पाहिलेल्या गोष्टी आणि शिवरायांच्या आजूबाजूला असलेली राजचिन्हे याचं सविस्तर वर्णन लिहुन ठेवलं होतं. (आपल्याकडे अशा सविस्तर नोंदी करण्याची सवय फार आधी लागायला पाहिजे होती. अनेक ऐतिहासिक वादविवादांना कारण राहिलं नसतं.) 

या वर्णनात आलेल्या वस्तु, छत्र चामरे, राजदंड, राजमुद्रा, शिवकालीन नाणी अशा गोष्टी इथे ठेवल्या आहेत आणि समोर या डायरीचे अभिवाचन एका स्क्रीनवर दाखवले जाते. राज्याभिषेकाच्या वेळेसचे रायगडावरचे वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.


श्रीमंत योगी
इथे शिवरायांच्या एका आज्ञापत्राच्या आधारे शिवरायांची स्वराज्य स्थापन करण्यामागे काय दृष्टी होती, काय स्वप्न होतं, त्यांनी कोणती मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न केला हे स्वतः शिवरायांच्या मुखातुन ऐकायला मिळतं. शिवरायांचा एक पुतळा, रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या आधारे हालचाली करतो, बोलतो आणि आपल्याशी संवाद साधतो. त्यांच्या वेळेसची परिस्थिती आणि त्यांनी केलेल्या संकल्पाची माहिती देतो. शिवराय आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो. 


आग्र्याहुन सुटका
शिवरायांची आग्र्याहुन सुटका हा त्यांच्या आयुष्यातला प्रचंड महत्वाचा आणि परिचित असलेला प्रसंग. मिर्झा राजा जयसिंग याने त्यांना आग्र्यात जायला भाग पाडलं होतं आणि त्यांच्या सुरक्षेची आणि पाहुणचाराची जबाबदारी त्याचा मुलगा रामसिंग याकडे होती. तर या पितापुत्रांच्या चाकरीत असलेल्या एक कारकुनाने शिवराय आग्र्यात असताना परिस्थिती कशी बदलत गेली, कसं राजकारण घडत गेलं हे लिहुन ठेवलेलं आहे. तर त्याचा एक पुतळा समोर मध्यभागी आहे, एका बाजूला आग्र्याच्या दरबाराचा देखावा आहे, तिथे औरंगजेबाच्या लोकांचं राजकारण दिसतं आणि दुसरीकडे शिवरायांच्या आग्र्यातील निवासस्थानाचा देखावा आहे आणि तिथे घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचं वर्णन त्या कारकुनाकडून ऐकायला मिळतं. 

या रोचक प्रकरणाचे तपशील आपल्याला रंजक पद्धतीने समजतात. 


रायगड सफारी (5D)
स्वराज्याची राजधानी रायगड हा भव्य असा किल्ला आहे. यावरचे मुळ महाल, कार्यालय, बाजारपेठ आता अस्तित्वात नसले तरी यांचे अवशेष इतर किल्ल्यांच्या तुलनेत बऱ्याच चांगल्या परिस्थितीत आहेत आणि त्यावरून किल्ल्यावरच्या त्याकाळच्या परिस्थितीची कल्पना येते. मी नुकताच रायगडावर जाऊन आलो आणि याआधीही २-३ वेळा गेलोय त्यामुळे तिथली दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतीच. 

ज्यांनी रायगड आजवर पाहिलेला नाही त्यांनाही तो जवळुन पाहिल्याचा अनुभव हा 5D शो देतो. तुम्ही इतर ठिकाणी असे 5D/6D/10D प्रकार पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज असेलच. रायगडचं ड्रोन ने घेतलेलं चित्रीकरण, त्यावर ऍनिमेशनच्या साहाय्याने आता जिथे फक्त अवशेष आहेत तिथे प्रत्यक्षात कशा वास्तु असतील याची कल्पना केलेलं चित्रण (आता आलेल्या छावा चित्रपटातही या प्रकारचं चित्रण आहे) दिसतं. तिथली सर्व व्यवस्था समजते. 

अशा दोन्ही प्रकारे चित्रण असल्यामुळे मला हा शो आवडला. फक्त माझ्या मते हा फक्त ३D चालला असता. युद्धप्रसंग नसल्यामुळे उगाच खुर्च्या पुढे मागे हलवुन बळजबरी ५D केला असं वाटलं. शिवसृष्टीमधे खटकलेली केवळ हीच एक गोष्ट. 

दुर्गवैभव

मला प्रचंड आवडलेला हा विभाग. काही प्रमुख किल्ल्यांच्या मोठ्या आकारातल्या प्रतिकृती इथे बघायला मिळतात. पण इथेही त्याला सुंदर कल्पनांची जोड दिली आहे. प्रत्येक किल्ल्याच्या मागे पडद्यावर काही दृश्य दिसतात, तिथले गाईड किल्ल्याची माहिती सांगतात, आणि माहिती आणि दृश्याच्या अनुषंगाने किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या त्या त्या भागात विशेष प्रकाशझोत टाकुन तो अधोरेखित केला जातो. किल्ल्याची माहिती फार नव्या आणि उद्बोधक पद्धतीने आपल्याला समजते. 




पन्हाळगड - विशाळगड हे जवळ असलेले किल्ले, तिथला सिद्दी जौहरचा वेढा आणि एका पावनखिंडीतली ती शौर्यगाथा इतक्या चांगल्या प्रकारे कधीच समजली नव्हती. पावनखिंड या सिनेमात सुद्धा नाही. इथे उभ्या केलेल्या प्रतिकृती, विशिष्ट प्रकारे सांगितलेली माहिती, त्याला पूरक अशी प्रकाश योजना, हलत्या सावल्यांमुळे महाराजांचं पथक नेमकं कुठून कुठे गेलं, त्यांची आणि सिद्दीच्या सैन्याची गाठ कुठे कुठे पडली, बाजीप्रभू आणि बांदल सेनेने त्यांना कुठे थोपवून धरलं हा सगळा घटनाक्रम फार फार स्पष्टपणे समजतो. 


स्वराज्याच्या इतिहासात भूगोलाला, सह्याद्रीला, गनिमी काव्याला इतकं महत्व का आहे, हे इथे येऊन समजतं. माझ्या मते तरी या बाकी सर्व सुंदर विभाग तर आहेतच, पण या एका विभागासाठी सर्वांनी आवर्जून यावं.

दुसऱ्या टप्प्यातले काही सुरु झालेले विभाग
आतापर्यंत सांगितलेले सर्व विभाग शिवसृष्टीच्या एकाच इमारतीत होते. तिचं नाव "सरकार वाडा" असं ठेवलं आहे. दुसरीकडे अद्याप बांधकाम चालु आहे. परंतु त्यातील काही विभाग नुकतेच सुरु झाले होते आणि भवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठा तर अगदी आम्ही जायच्या दोन दिवस आधी झाली होती. त्यामुळे सुदैवाने हे भाग आम्हाला पाहता आले. 

शिवरायांची अस्सल चित्रे
एका भव्य दालनात शिवरायांच्या समकालीन कलावंतांनी काढलेली त्यांची चित्रे मोठ्या आकारात लावलेली आहेत. शिवरायांनी इतर राजांप्रमाणे स्वतः कधी चित्रकाराला बोलवून स्वतः त्याच्यासमोर बसुन चित्र काढलं नाही. तेवढा निवांत वेळ त्यांच्या दगदगीच्या आयुष्यात मिळाला नसेल आणि त्यांच्या लेखी याला प्राधान्यही नसेल. आपल्या नशिबाने इतर लोकांनी वर्णनाप्रमाणे काढलेल्या चित्रांमुळे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन होतं. 



चित्रांसोबत इथे त्यांनी स्वतः लढलेल्या लढायांची माहिती आहे. 

या दालनाच्या मध्यभागी शिवसृष्टीची संपूर्ण संकल्पना दाखवणारं एक मॉडेल आहे. शिवसृष्टीचे लोक इथे पूर्ण संकल्पना आणि पुढे येऊ घातलेले विभाग यांची माहिती देतात. 


गंगासागर तलाव
रायगडावर असलेल्या गंगासागर तलावाची प्रतिकृती. इथे वेगवेगळ्या नद्या आणि किल्ल्यांवरचं पाणी आणुन टाकलेलं आहे. 


प्रतापगड सारखं भवानी मंदिर 
आपण जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देतो त्याचं कारण भोसले कुळाची आणि पर्यायाने स्वराज्याची कुलदेवता होती तुळजापूरची भवानी माता. शिवरायांच्या कालखंडात तुळजापुर आदिलशाही भागात असल्याने त्यांना तिथे जाण्यावर मर्यादा येत असाव्यात. त्यामुळे शिवरायांनी प्रतापगडावर भवानी मंदिर बांधलं होतं. 


त्या मंदिराची हि प्रतिकृती आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे फक्त देखाव्याचं मंदिर नाही. इथे पद्धतशीर प्राणप्रतिष्ठा पूजा करून मूर्ती बसवलेली आहे, त्यामुळे आपल्याला भवानीच्या मंदिरात जाऊन दर्शनाचा आनंद मिळतो. 


स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा
शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंच, पण स्वधर्म म्हणजे हिंदू/ सनातन धर्माला पुन्हा सन्मान मिळवून दिला. काही शतकांच्या अंतराने एक अभिषिक्त हिंदु राजा आपल्याला मिळाला. नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेऊन एक क्रांतिकारी पाऊल उचललं. 

आणखी एक दुर्लक्षित योगदान म्हणजे त्यांची स्वभाषा मराठी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. शिवजयंतीला फेसबुकवर मी एक पोस्ट पाहिली होती त्यात दोन पत्रांची तुलना होती. एक शिवरायांच्या कारकिर्दी आधीचं जे मराठीत असुनही आपल्याला अजिबात कळत नाही कारण त्यात अर्धेअधिक शब्द आणि वाक्यरचना फारसी आहे. दुसरं शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरचं. यातलं मराठी जुनं असलं तरी थोडा अर्थ लागू शकतो. 

"न होता शिवाजी तो सुन्नत होती सबकी" हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याजोडीला "नसते छत्रपती शिवाजी तर नसती भाषा मराठी" असंही म्हणायला हरकत नाही. कदाचित मी फारसी ब्लॉगर झालो असतो. 


तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठीचं शिवरायांचं योगदान एका अनोख्या प्रयोगात आपल्याला बघायला मिळतं. एरवी नाटकात वेगळे सेट जरी असले तरी प्रेक्षक एकाच जागी स्थिर असतात आणि सेट फिरवतात. इथे आपण मध्यभागी प्रेक्षागृहात बसतो आणि संपूर्ण प्रेक्षागृह गोल फिरतं आणि वेगवेगळ्या स्क्रीन्स वर अगदी अस्सल वाटणारे देखावे आपल्याला बघायला मिळतात. इथल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आशिया खंडातील हा असा एकमेव प्रयोग आहे. 


तिकीट - मोठ्यांसाठी (१६ वर्षे आणि वर) ६०० रु. 
वय ५ ते १६: ३०० रु. 
त्याखालील मुलांना तिकीट नाही. 
संकेतस्थळ - तिकिटे बुक माय शोवरही उपलब्ध आहेत, पण ते अतिरिक्त शुल्कही आकारतात, त्यामुळे इथे येऊन काढलेलं बरं.

वेळ: सकाळी ९.३० ते ६
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे. 

खाण्यापिण्याची सोय: 
तिथे २-४ ठिकाणी वॉटर कुलर आहेत, त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. 
एक छोटे उपहारगृह आहे तिथे काही मोजके पदार्थ मिळु शकतील.  


सर्व परिसर आणि वॉशरूम मधली स्वच्छता चांगली आहे. 

आवाहन

इतका छान प्रकल्प आपल्याकडे सुरु होऊनही त्याला प्रतिसाद मोठ्या संख्येने दिसत नाही. आम्ही गेलो तो शाळेच्या सुटीचा दिवस असुनही काहीच गर्दी नव्हती. आम्ही सोडुन इतर १०-१५ लोक होते. 

ह्याची खंत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातूनही व्यक्त झाली. बोलता बोलता त्या म्हणाल्या आमच्या इथे दुसऱ्या गावातुन, दुसऱ्या राज्यातून आलेले लोकसुद्धा येऊन गेले पण पुणेकर मात्र काही येत नाहीत. 

तेव्हा पुणेकरांनो, सर्वांना विनम्र आवाहन. शिवरायांची कारकीर्द सुरु झालेलं ठिकाण म्हणजे पुणे. त्यांची जडणघडण इथल्या लालमहालात झाली. आपल्या इतक्या जवळ असा भव्य प्रकल्प असताना आपला प्रतिसाद उदंड असला पाहिजे, तर असे काम करणाऱ्यांना बळ मिळतं, तो इतिहास ती प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. त्यामुळे नक्की वेळ काढुन इथे भेट द्या. मुलांनाही घेऊन जा. 

पूर्ण होईल तेव्हा बघु असा विचार करू नका. आताच ४ तास सहज जातील एवढ्या गोष्टी आहेत. याचे पुढचे टप्पे सुरु होईल तेव्हा वेळही जास्त लागेल, तिकीट दरही वाढेल, तेव्हा नवीन गोष्टी पाहण्यासाठी परत या. आपल्या इतिहासासाठी आपल्या वारशासाठी आपणच सढळहस्ते हातभार लावला पाहिजे. 

आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या शिवप्रेमींनो, तुम्हीही पुण्यात याल तेव्हा शिवसृष्टीसाठी वेळ राखुन ठेवा. सुट्ट्यांमध्ये त्यासाठी खास पुण्यात या. लालमहाल, शनिवारवाडा, मंदिरे, सिंहगड आणि इतर किल्ले आणि याव्यतिरिक्त वेळ घालवायला पुण्यात बरीच आकर्षणे आहेत. त्यामुळे एक हेरिटेज ट्रिप पुण्यात होऊन जाऊ देत. 

जय भवानी जय शिवराय