Saturday, September 27, 2025

ये दिल मांगे मोर!

प्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डो याचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. सध्याच्या घडीला सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी (सर्व खेळ धरून) हा एक. इन्स्टाग्रामवर याचे सर्वाधिक अनुयायी आहेत. अर्थातच सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी सुद्धा आहेच. 

त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातली एक गोष्ट सांगितली. काही वर्षांपासून त्याला एक छान जेट विमान घ्यायची ईच्छा होती. आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत वाटेल तिथे खाजगी प्रवास करता येण्यासाठी. प्रसिद्ध व्यक्तींना लोक कुठेही एकटे सोडत नाहीत. ते दिसले की त्यांचे फोटो व्हिडिओ काढतात, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणाचा व्यत्यय न येता आपल्याला सोयीस्कर होईल असा त्याचा विचार असावा. 

पण ते विमान घेण्याची तयारी करत असताना, त्याला त्याच्या आईने सांगितलेल्या तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवल्या. त्याची आई पोर्तुगालच्या ग्रामीण भागात लहानाची मोठी झाली. तिथे शाळेत जाण्यासाठी तिला रोज अनेक मैल पायी ये जा करावी लागत असे. 

ऐकून थोडं आश्चर्य वाटतं की नाही? ही तर आपल्या इथलीच गोष्ट वाटते. पोर्तुगाल सारख्या युरोपातल्या, एके काळी जगात विविध ठिकाणी वसाहती करून राज्य करणाऱ्या देशामध्ये अशीच परिस्थिती कशी असेल? पण असंच आहे खरं. पळसाला पाने तीनच. गरिबांची परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. 

रोनाल्डोला वाटले आपण एक विमान घेऊन फारतर आपली थोडी अधिक सोय करून घेऊ शकतो, पण आपण आपल्या आईसारख्या आजही पायपीट कराव्या लागणाऱ्या मुलांसाठी काही करू शकलो तर? हा विचार येताच त्याने विमान खरेदी रद्द करून त्याऐवजी तब्बल १०० स्कूल बसेस विकत घेतल्या. 

पोर्तुगालच्या ग्रामीण भागात शाळेपासून दूर राहत असणाऱ्या मुलांसाठी या बसेसची सेवा सुरू केली. पहिल्या दिवशी त्याला बसमध्ये चढून बसलेल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, आता रोज बसमध्ये प्रवास करण्याचा आनंद, त्याच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून रोनाल्डोला फार समाधान वाटलं. 

त्याने त्याच्या आईला जेव्हा हे सांगितलं, आणि विशेषतः तिने लहानपणी सोसलेल्या कष्टाची जाणीव ठेवून ही कल्पना सुचल्याचं जेव्हा सांगितलं तेव्हा साहजिकच त्या फार भावुक झाल्या. रोनाल्डो म्हणतो या प्रसंगातून मला आयुष्यात काय खरं महत्वाचं आहे हे समजलं. 

हा व्हिडिओ पाहून मला नाना पाटेकरची आठवण झाली. त्यानेही महागडी परदेशी कार घेण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवले होते. पण दुष्काळाच्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या पाहून त्याची इच्छा गेली. 



त्याने मराठवाड्यातून आलेल्या अभिनेता आणि मित्र मकरंद अनासपुरे ला सांगितलं की हे पैसे घे आणि दुष्काळी भागात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना हे पैसे वाट. त्यांना थोडा हातभार लागेल. मकरंदने हे पैसे द्यायला नानाने स्वतः यावे असा आग्रह केला. शेतकऱ्यांची माहिती काढून त्यांना एकत्र आणून ते पैसे दिले. 

त्यांना भेटल्यावर ही मदत फार तुटपुंजी आहे आणि यातून प्रश्न सुटणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरांना आवाहन केले, अल्पावधीत कोट्यवधी रुपये जमले. त्यातून नाम फाऊंडेशन आकारास आली. तिचा नुकताच दशकपूर्ती सोहळा झाला. गेल्या दहा वर्षात या संस्थेने अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांना मदत केली, जलसंवर्धन, आपत्कालीन मदतकार्य, वीरगतीस प्राप्त झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाची मदत, असहाय्य महिलांची मदत असे भरीव कार्य केले. 

दोन्ही गोष्टींमध्ये साम्य हेच की आपण नेहमी आपले आयुष्य अजून आरामदायक करायच्या मागे असतो. आणखी मोठे घर, आणखी मोठा टीव्ही, महागडा स्पीकर, अत्याधुनिक मोबाईल.. अशा अनेक गोष्टी आपल्याला खुणावत असतात आणि आपण त्या गाजरांमागे गाढवासारखे फिरत राहतो. 

त्याच वेळी आपल्याच आजूबाजूला मूलभूत गोष्टींसाठी झगडा करावे लागणारे लोक असतात. अर्थात त्यात आपला काही दोष नसतो. पण भांडवलशाही, चंगळवाद या सगळ्या गोष्टींचे हेही पैलू आहेत. 

आपण आपला उत्कर्ष साधायला हवा पण आपल्याला दुसऱ्याचं दुःख सुद्धा समजायला हवं. ते नजरेआड करण्याइतके आपण निर्ढावलो तर आपण कितीही उत्कर्ष साधला तरी माणुस म्हणुन आपण छोटेच राहु. 

आधी पोटोबा मग विठोबा असं आपल्याकडे म्हणतात. आपल्या ताटातला घास कमी करून दुसऱ्याला देणारे विरळाच. पण तो विठोबा किमान भरल्या पोटी तरी लक्षात यावा. 

कोणाची गरज किती हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. प्रत्येकाची सुरुवात वेगळ्या बिंदूवरून होते. कोणासाठी स्वतःच घर एवढंच स्वप्न असेल, कोणासाठी थोडा मोठा फ्लॅट हे स्वप्न असेल. कोणी लहानपणापासून मर्सिडीज गाडी घ्यायची इच्छा बाळगून असेल. 

अशी स्वप्न असायलाच हवीत. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, दिशा मिळते.. स्वप्नपूर्तीचा आनंद घेता येतो. पण कुठली स्वप्नं, कुठलं लक्ष्य आपल्यासाठी महत्वाचं आहे हे ही लक्षात यायला हवं. नाही तर थांबायचं कुठे हे आपल्या कधीच लक्षात येणार नाही. आपण समोर ठेवतोय ती लक्ष्य आपल्यासाठी आहेत, आपल्या भल्यासाठी आहेत की निव्वळ आकर्षण म्हणून, समाजात मित्रमैत्रिणींच्या बघितलेल्या गोष्टींमुळे, प्रभावामुळे आहेत, का लोकांना काहीतरी दाखवायला म्हणून आहेत हे समजलं की आपण त्यातून स्वतंत्र होऊ शकतो. नाही तर आपण या अनावश्यक लक्ष्यांचे गुलाम होऊन बसु. 

पैशाने किती सुख विकत घेता येतं त्याला मर्यादा आहेत. अजून चांगलं, अजून भारी याला काही अंत नाही. रोनाल्डोला जेट विमानापेक्षा १०० स्कूल बसमध्ये आणि नाना पाटेकरला इंपोर्टेड कारपेक्षा नाम फाऊंडेशनमध्ये कितीतरी पटीने अधिक समाधान मिळालं असेल. 

त्यामुळेच जगातल्या अति‌‌‍‌श्रीमंत व्यक्तींपैकी असलेल्या बिल गेट्स, वॉरन बफे, अझीम प्रेमजी सारख्या व्यक्तींनी आपली अर्धी संपत्ती टप्प्या टप्प्याने समाजोपयोगी कामांसाठी दान करण्याचा संकल्प केलेला आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट इतकीच त्यांच्या गेट्स फाउंडेशन मधली कारकिर्द आणि त्याचा आवाका तेवढाच मोठा आहे. 

ह्यासाठी ह्या मोठ्यां लोकांच्या गोष्टी झाल्या.. दहा वर्षांनी अमुक एवढे कमावल्यावर मगच बघु असा दृष्टिकोन ठेवण्याची गरज नाही. आपण जशा म्युच्युअल फंडाच्या SIP लावतो, RD करतो.. तसं सुद्धा करू शकतो. महिन्यातली शंभरात अर्धा पैसा, एक रुपया जे आपल्याला पटेल ते अशा कामात देऊ शकतो. 

प्रत्येक गोष्ट पैशाने होत नसते. पैसा देण्याइतकंच वेळ देणं, श्रमदान करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. रकमेला किंवा प्रमाणाला महत्व नाही. रामाच्या सत्कार्यात आपण उभे राहिलो तर तो हनुमानाची दखल घेतो, सुग्रीवाची घेतो, अंगद, नल, नील यांची घेतो, तितकीच दखल तो सेतुसाठी चिमूटभर वाळू आणणाऱ्या खारीची सुद्धा घेतो. प्रश्न दान काय आणि किती हा नाही, दानत आहे की नाही हा आहे. 

तोच राम जेव्हा समुद्राने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, लंकेत जाण्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही तेव्हा खवळला होता. त्याने उग्र रूप धारण करत समुद्रच कोरडा करण्याची तयारी केली होती तेव्हा कुठे समुद्राला उपरती होऊन त्याने सेतु बांधण्याचा मार्ग सुचवला होता. ही गोष्टही लक्षात घेण्यासारखी आहे. असा समृद्ध तरीही स्वमग्न समुद्र होण्यापेक्षा छोटासा वाटा उचलणारी खार झालेले केव्हाही चांगले.. नाही का?

⁠जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणजे जो आपुले, 

⁠तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा

No comments:

Post a Comment