Monday, November 10, 2014

स्वच्छ भारत अभियान : आमचा सहभाग

गेल्या रविवारी मी माझ्या मित्रांसोबत देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालो. (या अभियानाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.) हे अभियान सुरु झाल्यापासुन यात सहभागी होण्याचे माझ्या मनात होते.

माझा मित्र अक्षय देशपांडे आणि त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी सामाजिक उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने "उमंग" या नावाने एक ग्रुप बनवला आहे. आणि ते वेळोवेळी रक्तदान, अनाथालय, वृद्धाश्रम, मूक बधीरांची शाळा यांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे कार्य करत राहतात. 

त्याला या अभियानात नक्की रस असणार अशी माझी खात्री होती. त्यामुळे मी सर्वप्रथम त्याच्याशीच याविषयी बोललो आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे या "उमंग" ग्रुपचा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम ठरलेला होता. 

त्यातल्या सर्वांनी आपल्या घराजवळ फिरून कचरा पडलेल्या जागा हेरून ठेवल्या. त्यातल्या काही आम्ही अभियान सुरु करेपर्यंत साफ झाल्या होत्या. :D हि म्हटली तर अडचण, पण नक्कीच सुखद होती. नगरपालिकेचे लोक आपले काम पार पाडत असल्याची खुण होती. 

रविवारी सकाळी आम्ही ठरवलेल्या जागांपैकी पहिल्या जागी पोचलो. उमंगच्या सदस्यांशी हि माझी पहिलीच भेट होती. पिंपळे सौदागर, रहाटणी भागातल्या रस्त्यावर एका कोपऱ्यावरची हि जागा होती. मोकळीच जागा असल्यामुळे ती कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनलेली होती. आम्ही आमचे झाडू, कचऱ्याच्या पिशव्या, हातमोजे बाहेर काढले आणि काम सुरु केले. 

हळूहळू लोकांचे लक्ष आमच्याकडे जायला लागले. काही आपल्या जागेवरून, काही जवळ येउन आम्हाला पाहत होते. काही आमच्याशी येउन बोललेसुद्धा. समोरच्या घरातल्या लोकांकडून आमच्याकडे नसलेली सुपली मिळाली. आमचे काम चालू होते. 

तिथे नगरपालिकेचा एक सफाई कर्मचारी जवळ आला. लोकांनी त्याला हे तुम्हाला सहकार्य करतायत, त्यांची मदत करा म्हणून त्याला दटावून आमच्याकडे पाठवले. त्याने ४ वर्षापासून मला कपडे दिले नाहीत, पगारवाढ दिली नाही म्हणून कुरबुर केली, पण थोडी मदतसुद्धा केली. 

आम्ही साफ करत असल्याचे पाहूनसुद्धा एक माणूस आमच्यासमोर येउन कचरा टाकून गेला. आम्ही त्याला बोलायला लागताच निर्लज्जपणे काहीतरी उत्तरे देत कचरा तसाच सोडून निघून गेला. 

तिथे केसांचे किती तरी झुपके पडलेले होते. ते पाहून आम्ही जवळच्या कटिंग सलूनमध्ये समजवण्यासाठी गेलो. त्यांनी काही कबुल तर केले नाही, आम्ही गाडीतच कचरा टाकतो. त्या समोरच्या सलूनमध्ये जाऊन बघा म्हणून कटवले. दुसऱ्या कटिंग सलूनमध्ये पण तीच गत. 

कबुली तर नाही, पण लोक येउन आपल्याला बोलतायत हि जाणीव तरी त्यांना होईल अशा आशेने आम्ही निघालो. 

एवढा कचरा मोकळा पडलेला पाहून आम्ही नगरसेवकाला भेटून तिथे कचराकुंडीची व्यवस्था करण्याची विनंती करावी असा विचार केला. पण तिथे फिरतीवर असलेल्या नगरपालिकेच्या सुपरवायझरकडून समजले कि तिथे आधी कचरा कुंडी होती, पण ती जागा ज्यांची आहे त्या लोकांनी विरोध करून ती हटवली. अधिकृत कचराकुंडी असताना ती त्या मालकाला चालली नाही. पण आता ती नसतानासुद्धा लोक केवढा कचरा टाकून ती जागा घाण करत होते, हे त्या मालकाला कसे चालते असा प्रश्न आम्हाला पडला. 

आम्ही आजूबाजूच्या घरात तिथे कचरा टाकू नका अशी विनंती करून आलो. त्यांनी आमचे ऐकून घेतले. पण त्यांनी इथे राहणाऱ्या लोकांपेक्षा येणारे जाणारे, गाडीवरून जाणारे लोक जास्त कचरा फेकून जातात अशी तक्रार केली. 

तिथली सफाई करून आम्ही पुढे निघालो. त्याच रस्त्यावर अजून एका ठिकाणी अशीच कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनली होती. ती आम्ही साफ केली. त्या कचऱ्यात चहाचे कप खूप असल्यामुळे आम्ही बाजूच्या चहावाल्याला तिथे कचरा टाकू नका म्हणून विनवले. इथेही तोच अनुभव आला. कोडगेपणे त्याने नुसते ऐकून घेत फक्त हो ला हो केले. 

आम्ही आधीच्या जागेवर पुन्हा चक्कर मारून आलो. लोकांच्या सांगण्याप्रमाणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी थोडा कचरा तिथे फेकलेला होता. आम्ही तो पुन्हा उचलून साफ केला. 

मग आम्ही औंधला गेलो. तिथेच सर्वात जास्त वेळ लागला. तिथे एक मोठी कचराकुंडी होती. ती गच्च भरलेली होती, आणि त्यामुळे लोकांनी तिच्या आजूबाजूला भरपूर कचरा टाकला होता. त्या कुंडीच्या अवतीभवती बऱ्याच दूरपर्यंत कचरा पसरला होता. इथे पोहचेपर्यंत आमची संख्यासुद्धा वाढली होती. 

आम्ही काम सुरु केलं. सगळ्यांनी मिळून कचरा मोठ्या पिशव्यांमध्ये गोळा केला. कचऱ्याला कोणी तरी आग लावलेली होती. ती मधून मधून भडकत होती. बराच वारा सुटला होता. धूर पसरत होता. आम्हाला झाडायचं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने वाहून वारा सगळी धूळ परतवत होता. आम्ही बराच वेळ काम सुरु ठेवलं. 

तिथे पसरलेला जवळपास सगळा कचरा साफ करून भरून ठेवला. आमची सफाई चालू असताना जवळच्या दोन मॉलमधले कर्मचारी कचरा घेऊन आले. रोजप्रमाणे आपली पोती उलटी करून निघण्याचा त्यांचा विचार दिसत होता. पण आम्ही त्यांना रोखले. आणि त्यांनी पण मग जेव्हा गाडी येईल तेव्हा त्यातच कचरा टाकण्याचा निर्णय घेतला. 

तिसरी जागा साफ केल्यानंतर आम्ही हिप हिप हुर्रे करून एकमेकांचे अभिनंदन केले. घरी परत येताना आज काही तरी चांगलं काम केल्याचं समाधान होतं आणि पुन्हा करण्याची ईच्छा होती.