Monday, November 10, 2014

स्वच्छ भारत अभियान : गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासुन त्यांनी कैक चांगल्या गोष्टी सुरु केल्या. विदेश दौऱ्यावरचा खर्च कमी करण्यासाठी लवाजमा कमी करणे. सरकारी बाबूंना वेळेवर येण्यास भाग पडणे. उच्च अधिकाऱ्यांसोबत जातीने बैठकी घेऊन त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरून सरकारी कामकाज सुलभ सुकर करण्यास प्रोत्साहन देणे. पंतप्रधान जन धन योजना. सांसद ग्राम विकास योजना. आणि एक देशातल्या प्रत्येक नागरिकाने हातात घेण्याजोगे आणि घ्यावेच असे स्वच्छ भारत अभियान.

मोदी सरकारने एक चैतन्याची लहर या देशात आणल्याचे त्यांचे विरोधक असलेले केजरीवाल सुद्धा मान्य करतात.

स्वातंत्र्य दिनी याची घोषणा मोदींनी केली, आणि २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने हे अभियान स्वतः दिल्लीत झाडू हाती घेऊन सुरु केले. आपल्या सहकाऱ्यांना, देशातल्या नागरिकांना आणि त्यांनी ९ इतर सेलिब्रिटीजना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येकाला स्वतः सहभागी होत आणखी ९ जणांना आवाहन करण्याची विनंती करून साखळी पद्धतीने याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.

याला त्या सर्व सेलिब्रिटीजकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी आणखी लोकांना आमंत्रित केले. अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, शशी थरूर, सचिन तेंडूलकर, सलमान खान अशा अनेक प्रथितयश मोठ्या लोकांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.

मोदींचे विरोधक याला देखावा म्हणून टीका करतात. काँग्रेसवाले मोदी सरकारने बाकी सर्व गोष्टीप्रमाणेच हि गोष्ट आमच्याकडूनच उचलली आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप करतात. त्यांनी यात सक्रिय सहभाग तर नोंदवला नाहीच. पण मोदींनी नामांकित केलेले शशी थरूर यांनी या अभियानात सहभागी झाले म्हणून आणि मोदींचे कौतुक केले म्हणून त्यांना पक्ष प्रवक्ते या पदावरून बडतर्फ केले.

आणखी काही लोक मोदी सांगताहेत त्यात नवे काय? गाडगे बाबा, गांधीजी यांनी हा संदेश आधीच देऊन ठेवला आहे. मग मोदींनी सांगण्या आधी का केली नाही स्वच्छता? असा सवाल करत आहेत.

हि सगळी निष्क्रिय बडबड आहे. संदेश कोणी आधी दिला, कोणी नंतर दिला, कोणाच्या सांगण्यावरून कोणी स्वच्छता केली या सगळ्यापेक्षा स्वच्छतेबद्दल वाढणारी जागरूकता महत्वाची आहे. होणारी स्वच्छता महत्वाची आहे.

भारतात अनेक आरोग्याचे प्रश्न हे स्वच्छतेशी निगडीत आहेत. मग ती घरातली स्वच्छता असो वा रस्त्यावरची. स्वच्छता राखल्याने मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे अनेक साथीचे रोग आपोआप नियंत्रणात येतील.

भारतीयांची नागरी मानसिकता खूप अविकसित आहे. आपण आपल्या घरात जशी स्वच्छतेशी काळजी घेऊ तशी बाहेर घेत नाही. घराबाहेर आपण कुठलीच जबाबदारी घेत नाही. आपल्या घरून कचरा बाहेर गेला कि प्रश्न संपला.

ह्या उदासीनतेमुळेच, आपण ज्या प्रशासकीय यंत्रणेकडे हि जबाबदारी सोपवली आहे, ते लोक फायदा उठवतात. प्रश्न विचारणारे लोक नसल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. वेळोवेळी स्वच्छता होत नाही. राजकारणी मंत्री जिथून जातील तिथेच या यंत्रणा जाग्या होताना दिसतात.

जास्तीत जास्त नागरिक स्वच्छतेबद्दल सजग होताना दिसले, त्यासाठी रस्त्यावर येताना दिसले तर आपोपाप या यंत्रणांवरचा दबाव आणि वचक वाढेल. त्यांना आपले काम चांगले करण्यास सहकार्यसुद्धा मिळेल आणि प्रेरणासुद्धा.

स्वच्छता हि कोणी सांगण्याची गरज नसलेली प्राथमिक गोष्ट आहे. आपणास जो नेता/संत आवडतो त्याच्या नावाने आपण स्वच्छता करावी. मोदी फक्त निमित्त आहेत, सुरुवात आहेत. उद्या मोदी सरकार गेले तरी हे अभियान सुरु राहावे.

या अभियानातल्या आमच्या सहभागाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.