डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. आमटे कुटुंबियांचे महान कार्य या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. अनेक लोक या चित्रपटामुळे प्रेरित झाले असतील.
अशावेळी मी एका तुलनेने छोट्या चित्रपटाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येउन गेला. नाव "बोक्या सातबंडे".
हा दिलीप प्रभावळकरांच्या "बोक्या सातबंडे" या पुस्तकांवर आधारित होता. आपल्याकडे बालसाहित्य हा तसा दुर्लक्षित प्रकार आहे. किंवा फारसा गांभीर्याने न घेतला जाणारा प्रकार आहे. जे साहित्य मराठीत उपलब्ध आहे, त्यात "बोक्या सातबंडे" हि मालिका खूप चांगल्या साहित्यापैकी एक आहे.
चिन्मयानंद उर्फ "बोक्या सातबंडे" हे दिलीप प्रभावळकर यांनी निर्माण केलेले काल्पनिक पात्र. मुंबईमधला एक खोडकर, प्रेमळ आणि संवेदनशील असा मुलगा. तो आणि त्याची मित्रांची टोळी, त्यांचे प्रताप… त्याचे खोड्यांना काहीसे वैतागलेले पण चांगल्या कामात पाठीशी उभे राहणारे आई बाबा, आजी, दादा. या सगळ्यांच्या गोष्टी या मालिकेत त्यांनी लिहिल्या होत्या.
जितकी हि पुस्तकांची मालिका गाजली, तशीच बऱ्याच वर्षापूर्वी यावर एक टीव्ही मालिकासुद्धा बनली होती.
यातला बहुतेक कथाभाग हा मुळ पुस्तकातलाच आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा हा एक सुंदर चित्रपट आहे.
आपल्याकडे लहान मुलांना अतिशय आचरट किंवा अतिगोड अशा भूमिका देण्याचा प्रघात आहे. त्याविरुद्ध इथे बहुतेक मुलं वास्तविक, आणि निरागस दाखवली आहेत. बाल्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे.
क्रिकेट खेळताना बोक्या आणि त्याच्या मित्रांचा बॉल एका आजीआजोबांच्या घरी जाऊन पडतो. ते आजोबा अतिशय खडूस म्हणून प्रसिद्ध असतात. सगळ्याच मुलांनी त्यांच्याकडून बोलणी खाल्लेली असतात. त्यांच्याकडून बॉल परत आणण्याची जबाबदारी बोक्यावर येउन पडते. बोक्या त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याबद्दल त्याचं कुतूहल जागृत होतं. आणि बोक्याचा प्रामाणिकपणा त्या आजी आजोबांना भावतो.
त्यांचा मुलगा कित्येक वर्षांपासुन अमेरिकेत जाऊन राहतोय. इथे हे दोघेच त्याची वाट बघत बसलेत असं त्याला समजतं आणि त्याला त्यांच्याबद्दल ममत्व वाटायला लागतं. तो त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांना जाऊन भेटायला लागतो. घरी काही खास केलं कि त्यांना नेउन देतो. बोक्यामुळे त्यांना खुप समाधान मिळतं.
असंच एकदा त्याला आपल्या घरातली कामवाली बाई, तिच्या घरची परिस्थिती त्याला समजते. तिच्या मुलांना वाढदिवस साजरा करणे, बाहेर फिरायला जाणे, या गोष्टी आपल्याला जितक्या सहज मिळतात तितक्या त्यांना मिळत नाहीत ह्याची त्याला जाणीव होते. आणि मग त्याच्या सुट्ट्यात तो त्याच्या मित्रांना घेऊन अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो.
त्यांना समजावून सांगताना "मोठ्यांना स्वतःहून काही सुचत नाही. आणि आपल्याला सुचलेलं काही आवडत नाही" हे बोक्याचं वाक्य पुरेसं बोलकं आहे.
यात काही खूप महान असं दाखवलेलं नाही. अगदी छोट्याछोट्याच पण आपल्याला सहज जमतील अशा गोष्टी आहेत. आपण संवेदनशील बनून राहिलो तर आपल्याला आणि लोकांना आनंद मिळेल अशा गोष्टी आपण किती सहजपणे करू शकतो हे यात छान दाखवलेलं आहे.
या चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत खूप सुंदर आणि मनाचा ठाव घेणारं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं "मन आकाशाचे व्हावे" हे गीत अगदी सहजरित्या या चित्रपटाचा संदेश देतं.
हल्ली बरीचशी मुलं कम्प्युटर, स्मार्टफोन यामध्येच गुंग असतात. घरातल्या लोकांशी संवाद, आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी चांगल्या गप्पा, त्यांच्यामध्ये रस घेणे या गोष्टी अभावानेच दिसतात. मुलांमध्ये संवेदनशीलता, आणि अशा जाणीवा निर्माण व्हाव्यात म्हणून थोडे प्रयत्न सुद्धा करायला हवेत.
हा चित्रपट आपल्या कुटुंबातल्या मुलांना नक्की दाखवा. आणि तुम्ही सुद्धा पहा.