Thursday, July 25, 2013

माझा अभिप्राय : चित्रपट : दुनियादारी

मराठीतला नवा मल्टीस्टार चित्रपट "दुनियादारी" याने निर्माण केलेल्या अपेक्षा बऱ्याच अंशी पूर्ण केल्या आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा स्टायलिश चित्रपट सत्तरच्या दशकातील वातावरण उभे करून चांगलेच मनोरंजन करतो.

आता मराठी चित्रपटांची निर्मितीमुल्ये चांगलीच सुधरलेली असल्यामुळे आजकाल मराठी चित्रपट पाहणे हा देखील एक सुखद अनुभव होत आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव स्वतः एक नामांकित चलतचित्रकार असल्यामुळे या आघाडीवर हा चित्रपट छानच आहे.

पात्रांची निवड अभिनयदृष्ट्या जरी चपखल असली तरी, कॉलेजचे विद्यार्थी म्हणून स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, आणि त्यांच्या टोळीतील काही जण ३ इडियट्स मधील आमिर खान, माधवन  ई. इतके हे सहजासहजी लवकर पचनी पडत नाहीत.


पण कथा जशी पुढे सरकते तशी याची सवय होते. हि कथा आहे पुण्याच्या एस पी कॉलेज मधील काही मित्रांची… त्यांच्या कट्टा गैंगची. या टोळक्यातल्या सगळ्याच मित्रांची आपली एक तऱ्हा असते. आणि एकत्र येउन ते धमाल करतात. ह्या मित्रांच्या सगळ्याच पात्रांची निवड आणि त्यातल्या अभिनेत्यांचा अभिनय सुरेख आहे.

पुण्यात नवा आलेला श्रेयस (स्वप्नील जोशी) एका गैरसमजातून या टोळीच्या संबंधात येतो, आणि नंतर त्यांचाच 'श्रेया' बनून जातो. त्यांचा म्होरक्या असतो 'दिग्या' उर्फ 'दिगंबर शंकर पाटील' उर्फ 'डी. एस. पी.' (अंकुश चौधरी) अंकुश चौधरीने हा दिग्या खूपच छान रंगवला आहे. बंडखोर पण  मित्रांवर जिव लावणारा अश्या स्वभावाचा दिग्या सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकतो. या टोळीचा कट्टर वैरी म्हणजे साई. (जितेंद्र जोशी) जितेंद्र जोशीने हि साईची भूमिका करून पडद्यावर धमाल उडवली आहे. श्रेयसला 'रिशी पकुर' म्हणून हाक मारत, आणि अशा लकबी वापरून त्याने हशे वसूल केले आहेत.

अशा या मित्रांच्या कहाणीत भांडणे, प्रेम, यारी-दोस्ती, कौटुंबिक समस्या असा सगळा मसाला आहे. मिनू (उर्मिला कानेटकर), श्रेयस, शिरीन (सई ताम्हणकर) आणि असा प्रेम त्रिकोण देखील आहे. स्वप्नाळू, साधी भोळी, गोड अशा मिनुचा अभिनय उर्मिलाने छान केलाय. ती आणि अंकुश चौधरी अशी दोनच पात्रे अगदी अस्सल म्हणावी अशी वाटतात. बाकीची सगळी कमी अधिक प्रमाणात फिल्मी आहेत.

मध्यान्तरापुर्वीचा पहिला भाग तर उत्तम जमलाय. तेरी मेरी यारी… बाकी **त गेली दुनियादारी अशा पंच लाईन्स पण मस्त वापरल्यात. पण नंतर अगदी नेहमीच्या वळणाच्या साचेबद्ध कलाटण्या दिल्यामुळे पुढे काय होणार आहे याचा अगदी सहज अंदाज येतो. पण तरीदेखील फार कंटाळवाणा होत नाही.

एकूणच काही उणीदुणी सोडता एकदा थेटरात जाऊन आनंद घ्यावा असा हा चित्रपट आहे.