Thursday, July 11, 2013

हिरोइनशी लग्न ठरलेला

आपल्या हिंदी "मसाला" चित्रपटांमध्ये नीट पाहिलं तर "मसाला" हे नाव सार्थ करणारे अनेक मसाले दिसतात. म्हणजे एखाद्या पाककृती मध्ये अमका मसाला, तमकी पावडर टाका जसं असतं तसंच हिंदी पटकथाकार करत असावेत. एक आयटम सॉंग, एक विरह, एक भांडण हिरो किंवा हिरोइन पैकी एक अगदी गंभीर आणि दुसरा अगदी बिनधास्त, मग हा बिनधास्त, गंभीर असलेल्याला शिकवतो "कैसे जीना चाहिये"… आधी भांडण, मग जवळीक… वगैरे वगैरे. त्यातलाच एक मसाला : हिरोईनचं लग्न ठरलेलं आहे… किंवा दुसराच कोणता तरी बॉयफ्रेंड आहे. आणि तो एकदम झाम्या असतो.

या पात्राला नेहमीच बावळट, गोंधळलेला दाखवून कॉमेडीसाठीच वापरतात. दिल चाहता है मधला सोनाली कुलकर्णीचा बॉयफ्रेंड सुबोध. एकदम गंभीर. न हसणारा. प्रत्येक गोष्टीचं कडक वेळापत्रक असलेला. सैफ अली खान तर त्याची टाइमटेबल म्हणून खिल्ली उडवतो. स्वतः मुळीच न हसणाऱ्या या पात्राने चांगलीच कॉमेडी केली होती.


आय हेट लव स्टोरीज मध्ये सोनम कपूरचा बॉयफ्रेंड सुद्धा असाच कमालीचा बोरिंग मनुष्य दाखवलाय. 

जब वि मेट मधला अंशुमनसुद्धा अगदीच बावळट दाखवला नसला तरी चिडका, काय चाललंय आजूबाजूला याचा गंध नसलेला असा दाखवून काही सीन कॉमेडी केले आहेत.



मला या पात्रांबद्दल उगाचच सहानुभूती वाटते. बऱ्याच कथांमध्ये यांची काही चूकदेखील नसते. स्थळ वगैरे बघून यांनी पद्धतशीर हिरोइनशी लग्न ठरवलेलं/केलेलं असतं. केवळ चित्रपटाच्या मुख्य नायिकेच्या आयुष्यात आल्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते.

हिरो यांचा आपोआप शत्रूच बनतो. आणि मग त्याच्या हातून यांची पिटाई होते. ( हंगामा : राजपाल यादव ) नाहीतर फजिती होते. (दोस्ताना : बॉबी देओल )

पडोसन मधला मेहमूद हे यासाठी अगदी समर्पक उदाहरण. नायिका यांच्याशी अगदी लहरीपणे वागते. कधी नायकाला जळवण्यासाठी यांचा वापर करून घेते.

हिरो उठून दिसावा म्हणूनच या पात्राला नेहमी बावळट दाखवतात. हिरो रांगडा असतो हा नेभळट असतो. हिरो बिनधास्त असला तर हा भित्रा असतो. हिरो स्मार्ट असला तर हा निरस असतो. हिरो प्रामाणिक असेल तर हा हरामखोर असतो.

मग याचा बावळटपणा पाहून हिरोइनला कळतं कि हिरो किती हुशार आहे. गुंडांच्या तावडीत हा घाबरला आणि हिरो लढला कि मग कळतं कि हा काही करू शकत नाही. तो मतलबी वागला कि मग कळतं कि हिरो किती सद्गुणी आहे.

थोडक्यात हिरोचा चांगुलपणा सिद्ध करायला दुसऱ्या माणसाचा वाईटपणा सिद्ध करावा लागतो.

हे पाहून मला तरी असं वाटतं कि यातून हेच दिसतं कि हिरोइन हिरोवरच्या प्रेमापेक्षा त्याच्या एवढा चांगला पर्याय नाही म्हणून त्याच्या जवळ येते. जर तो दुसरा पर्याय चांगला निघाला असता तर? असं फार कमी चित्रपटात दिसतं.

RHTDM मध्ये सैफ चं पात्र माधवनच्या पात्र एवढंच चांगलं असतं. किंबहुना जास्तच. पण फक्त प्रेमामुळे हिरोइन माधवन कडे येते आणि तो तिला जाऊ देतो.

आता हळूहळू आपल्याकडे प्रेक्षक प्रगल्भ होत आहेत. अगदी चांगला आणि अगदी वाईट असं कोणी नसतं… हे खऱ्या आयुष्याप्रमाणेच पडद्यावर देखील लोक स्वीकारताहेत. त्यामुळे मुख्य भूमिकांमध्येसुद्धा आजकाल ग्रे शेड्स पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी परफेक्ट नसला तरी एखाद्यावर आपलं प्रेम असेल तर तोच आपल्यासाठी योग्य असा विचार सुद्धा काही चित्रपटात दाखवला जातोय.

त्यामुळे कॉमेडीला आपली हरकत नसली तरी अशा साचेबद्ध पात्रापासून आपली सुटका होईल अशी आशा करूया.

No comments:

Post a Comment