Monday, January 7, 2013

दोन कंडक्टर्स

मुंबईच्या आयुष्यात लोकल्स, बेस्टच्या बसेस, रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका चांगला असल्यामुळेच मुंबईला दिवस रात्र काम करता येतं. कधी न झोपणारे शहर अशी बिरुदावली मिरवता येते. या सोयींच्या भरोशावरच मुंबई, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यांना व्यापणाऱ्या पट्ट्यात लोक घर आणि व्यवसाय निवडतात, रोज ये जा करतात.

या सगळ्या सेवा पुरवणार्यांमध्ये सर्वात कठीण परिस्थिती असते ती बेस्टच्या कर्मचाऱ्यांची. कारण ट्राफिक जामचा सामना त्यांनाच रोज करावा लागतो. रिक्षावाल्यांना जसं हवं तेव्हा, हवं तेवढंच काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, तसं त्यांना मिळत नाही. रोजच्या ठरलेल्या फेऱ्या, ठरलेल्या शिफ्ट्समध्ये मध्ये कराव्याच लागतात. आणि कंडक्टरसाठी एसटीसारखं आरक्षित सीटसुद्धा मिळत नाही. खचाखच भरलेल्या बसमध्ये जवळपास पूर्ण दिवसभर उभे राहून तिकिटे वाटावी लागतात. त्यात लोकांची धक्काबुक्की, त्यावरून भांडणे, पाकीटमाऱ्या, सुट्ट्या पैशांवरून वाद हे दिवसभर चालूच. त्यामुळे बहुतेक कंडक्टर्स स्वाभाविकपणे  बऱ्याचदा घुस्शात असतात.


मी मुंबईला असतांना रोज ऑफिसपर्यंत प्रवास बेस्टने करायचो, जाताना नियमित आणि येताना अनियमितपणे. त्यामुळे कंडक्टर्सचे अनेक नमुने पाहिलेत. सकाळी रोज ज्या बसेसने जातो, त्यांच्या कंडक्टर्सशी चांगली ओळख झाली होती. तिकिटे वाटून झाल्यावर वेळ उरला तर त्यांच्याशी थोड्या गप्पा सुद्धा होत. इतक्या सगळ्या कंडक्टर्सपैकी २ जण अगदी खास नमुने..

पहिला जो आहे, तो एकदम खडूस. कायम चिडलेला. त्याला हसताना पाहिल्याचं त्याच्या रोजच्या हजारो प्रवाश्यांपैकी एकालाही आठवत नसेल. मला तर मुळीच आठवत नाही. त्याच्या बस मध्ये बसलं तर एक ते सव्वा तासाच्या प्रवासात हमखास एक तरी भांडण पाहायला मिळतं म्हणजे मिळतंच.

सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्यामुळे बरेच लोक असे आहेत जे अगदी नियमित त्याच बसने प्रवास करतात. इतक्या दिवसात हा कंडक्टर त्यातल्या कोणाशीही हसून, ओळख दाखवून बोलल्या वागल्याचे मला आठवत नाही. सलगीपेक्षा भांडणातच त्याचं मन जास्त रमत असावं. याचं नाव काय तेही रोजच्या प्रवाशांना माहित नाही.

सामान्य माणसाच्या हातात बऱ्याच बाबतीत काहीच नसतं... त्याचा राग आणि त्यातून आलेली बंडखोरी, मस्ती ज्या गोष्टीत त्याला अधिकार असतो त्यात दिसते. हा माणूस त्याचं उत्तम उदाहरण आहे.

मुळातच घुस्शात असल्यामुळे भांडणासाठी, भांडण्यासाठी त्याला अगदी क्षुल्लक कारण पुरतं. सुट्टे असूनदेखील तो प्रत्येक माणसाशी सुट्ट्यांसाठी कुरकुर करतो. "सगळ्यांनी नोटा काढल्या तर आम्हाला सुट्टे कोण देणार? आम्ही काही चिल्लरची खदान घेऊन फिरत नाही." हि त्याची नेहमीची तक्रार. काही प्रवासी खरोखर सुट्टे करून घेण्यासाठी मुद्दाम शंभर पाचशेच्या नोटा काढतात. आठ दहा रुपयाच्या तिकिटासाठी शंभरचे सुट्टे देणं अवघड आहे खरंच, पण हा माणूस, १७ रुपयाच्या तिकिटाला २० रुपये दिले तरी चिडतो.


लोक चुकीच्या बस मध्ये चढले तर हा माणूस त्यांच्यावर प्राणपणाने खेकसतो, भर रस्त्यात बस उभी करून त्यांना उतरवतो. आणि ते नाही जमलं तर एकदम तोऱ्यात त्यांच्याकडून पुढच्या थांब्यापर्यंतचे तिकीट वसूल करतो. आणि ते उतरेपर्यंत त्यांना काही न काही सुनावत राहतो.

बरेच लोक, बसची नेमकी माहित नसेल तर खिडकीतून प्रवाशांशी बोलून, कंडक्टरला हाका मारून खात्री करून घ्यायचा प्रयत्न करतात. अशा वेळेस तो त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आणि ते लोक चुकून चढले तर त्यांना बिनदिक्कतपणे सुनावतो, "चढण्या आधी विचारायला काय जातं तुमचं? फुक्कटचा डोक्याला ताप!"

एकदा बसच्या मार्गातल्या दुसऱ्या-तिसऱ्या थांब्यावर मोजकेच लोक होते. त्यातला एक माणूस मोबाईलवर बोलता बोलता हात करून बसला थांबायचा इशारा करत होता. पण ड्रायवरने बस थांबवली नाही, आणि कंडक्टरनेदेखील बेल मारली नाही. तो माणूस बसच्या मागे पळत पळत कसाबसा बसला लटकला.
आणि चढताक्षणी कंडक्टरशी भांडायला लागला. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, कंडक्टरला जाब विचारायला लागला कि बस का नाही थांबवली.

कंडक्टर चूक मानायला तयारच नव्हता. तो उलट त्यालाच बोलायला लागला, कि बस येतेय का जातेय लक्ष नको का तुमचंच, मोबाईलवर बोलत निवांत उभे होतात, आम्हाला काय कळणार, थांबवलं तरी बसमध्ये चढणार कि नाही ते.., चढताना पडला असतात म्हणजे?" त्याच्या ह्या उलट बोलण्याने तो आणखी अडकला.

प्रवासी आणखी चिडला, आणखी शिव्या देत त्याला म्हणाला, "तुम्हाला माझं मोबाईल वर बोलणं दिसत होतं, तर मी हात करून थांबवतोय ते दिसत नाही? बस थांबवली असती तर माझं मी पाहिलं असतं ना, कसं चढायचं ते.." ते दोघे असे भांडतच राहिले. बाकीच्या प्रवाशांना असह्य झालं तेव्हा त्यांनी मध्ये पडून ते थांबवलं.

त्याच्या बसमधून जर भांडण न पाहता प्रवास झाला तर आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. बसमधून उतरल्यावर आम्ही गमतीत म्हणतो "मूड अच्छा होगा मास्तरका! आज शांतीसे सफर खतम हो गया"


दुसरा कंडक्टर याच्या अगदी उलट आहे. एकदम बोलका.. हसरा. प्रसन्न आणि कामसू. सुट्ट्यांचे प्रॉब्लेम यालासुद्धा येतातच. पण हा चिडत नाही, सुट्टे द्यायला अगदी चांगल्या सुरात सांगतो, त्याच्याकडे आणि प्रवाशांकडेही सुट्टे नसतील तर मग बाकीच्यांना मागून पाहतो, किंवा मग होईपर्यंत थांबतो, थांबायला सांगतो. आणि हे करताना तोल बिलकुल ढळू देत नाही.


जे लोक सुरुवातीच्या बस थांब्यापासून बसत असतात, त्यांचा पुष्कळ वेळ प्रवास होत असल्यामुळे बऱ्याचजणांशी त्याची मैत्री आहे. सगळे त्याला नावाने ओळखतात. जाधवसाहेब म्हणून हाक मारतात. त्यांच्याशी बस भरेपर्यंत आणि पुढे तिकिटे वाटून संपल्यावर गप्पा मारतो.


पण गप्पा मारल्यामुळे कामाकडे दुर्लक्ष बिलकुल होऊ देत नाही. उलट काम झाल्याशिवाय गप्पा मारत नाही. हिशोबात एकदम पक्का असल्यामुळे पटपट काम संपवतो. शेवटचा थांबा जवळ आला कि, कोणी विनंती केली तर ५०० रु, १०० रु अशा नोटांचे सुट्टेहि देतो त्याच्याकडे पुरेसे असतील तर.


ओळखीच्या लोकांकडे महत्वाच्या बाबींची चर्चा करतो. त्यांचे सल्ले घेतो. कोणी बँकेत कामाला असतं, त्यांच्या कडून परीक्षांची, कर्जाची माहिती करून घेतो, त्याच्या ओळखीच्या लोकांसाठी त्याला हि माहिती हवी असते. कोणी विमा कंपनीमध्ये असतं, त्यांच्याकडे पॉलीसीबद्दल चौकशी करतो. गावातल्या गप्पा सांगतो, गावी जाऊन आला तर काय काय केलं ते सांगतो. मुलीला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता, तेव्हा सगळ्यांशी चर्चा केली, चांगल्यात चांगलं कॉलेज कुठलं याची खात्री करायला.

हि ठाणे ते अंधेरी अशी लांब पल्ल्याची गाडी आहे. अर्ध्या पाऊण तासाने अशी त्याची फ्रिक्वेन्सी आहे. एक गाडी चुकली कि अनेकांच्या ऑफिसच्या वेळा चुकतात. सकाळच्या मुख्य ४-५ गाड्यांमध्ये बाकीच्या गाड्या आल्या न आल्या जाधव साहेब त्यांची गाडी बरोबर वेळेत आणतील आणि नेतील असा त्यांचा लौकिक आहे.
एवढंच नाही तर काही लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा असतो. आणि त्यांच्या स्वतःच्या गाडीचं, पुढच्या आणि मागच्या गाडीचं स्टेटस सुद्धा ते लोकांना सांगतात.


याचा त्या माणसाला काहीच फायदा नाही. कंडक्टरचं अप्रेजल होत असेल असं मला वाटत नाही, आणि असेल तरी तो प्रवाशांशी कसा वागतो ह्यावर तर काहीच अवलंबून नसतं. कारण बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टर यामध्ये किंवा त्यावर कोणीही उपस्थित नसतं. त्यामुळे ते पूर्णपणे त्यांच्याच हातात आहे.


यातल्या कोणाचंहि वर्तन जाणूनबुजून तसं आहे कि मूळ स्वभावाच तसा आहे हे मला ठाऊक नाही. पण त्यांच्या परिस्थितीमध्ये तर साम्य आहे. कंडक्टर बनण्याचं लहानपणी कोणाचं गमतीशीर स्वप्नं असू शकतं. पण जाणतेपणी कोणी कंडक्टर बनण्याचं ध्येय ठेवत नाही. किंबहुना तसे अनेक व्यवसाय आहेत. पण नाईलाजाने, परिस्थितीला सामोरे जात बरीच माणसे अशा व्यवसायात पडतात. काही पहिल्यासारखी नाखूष राहतात, जगावर चिडचिड करतात. आणि काहीजण कळत नकळत त्यातला फोलपणा जाणवून समाधानी प्रसन्न राहायचा प्रयत्न करतात.


एकाच व्यवसायात अगदी सारख्या कामात मी पाहिलेली हि दोन टोकाची माणसे.