Tuesday, February 19, 2013

अति झालं आणि हसू आलं


अति झालं आणि हसू आलं. अशी म्हण आहे मराठीत. त्याचा प्रत्यय सध्या मला वारंवार येतो. आजूबाजूला सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या गोष्टी घडत राहतात वारंवार. राग, संताप, वैताग, कंटाळा, निराशा, हिरमोड, कधी संपणार ते न कळणारी प्रतीक्षा, अशा भावनांच्या हिंदोळ्यांवर मन थकेपर्यंत झुलत राहतं. शेवटी थकल्यावर अलिप्तपणा येतो. दुरून कुठूनतरी स्वतःकडे पाहिल्यासारखं वाटतं. केळीच्या सालावरून घसरून पडलेल्या माणसाला पाहताना आपल्याला एक तर हसू तरी येतं किंवा सहानुभूती वाटते. तसंच काहीसं. स्वतःला त्रस्त आणि वैतागात पाहून कीव येते.

कारण अगदी कशाचंही होतं. ऑफिसमध्ये काम संपता संपत नाही. एक इश्यू सोडवावा कि दुसरा हजर होतो. सोबतचे लोक मूर्खपणाचे नवनवे उच्चांक गाठत राहतात. त्यात कधी तुम्ही स्वतः मूर्खपणा करून बसता. अशावेळी बोलणी बसणार म्हणजे बसणार. पण तुमच्या वरिष्ठाने असंच काही केलं तर त्याला म्हणावं तसं बोलता येत नाही. आणि पाप शेवटी असो कोणाचंही अख्ख्या टीमला बसून धुवावच लागतं.


स्वतःला सतत दुसऱ्यांवर वैतागलेला पाहून मला "ये कहा आ गये हम" म्हणावं वाटतं. कारण मला स्वतःला असा पाहायला आवडत नाही. 

डोक्याला ताण व्हायला ऑफिस आणि कामच हवं असं नाही. कधी कधी कॉलेज, अगदी शाळेत सुद्धा असं व्हायचं. शिक्षणव्यवस्था, शिक्षक, शाळा, कॉलेज यांना शिव्या घालत किती तरी तास दवडलेत आपण सर्वांनी.

कधीकधी सहकारी / मित्र / नातेवाईक किंवा कोणीपण कुठल्यातरी प्रकारे पीडतात. कधी कोणी आपल्याला गृहीत धरतं  नको त्या गोष्टीत, आपली कुचंबणा होते. कधी आपण कोणाकडून काही अपेक्षा करतो, ती पूर्ण होत नाही. एखाद्याची आपल्याला गरज असते, ती व्यक्ती नेमकी तेव्हा मिळत नाही. ज्यांच्याशी आपल्याला बोलायचय त्यांच्याशी बोलणं होत नाही, आणि बाकी बऱ्याचजणांशी बोलून बोलल्यासारख वाटत नाही. अजून असंच अमुक नि ढमुक. थोडक्यात काही किंवा सगळ्याच लोकांचा त्रास वाटायला लागतो.

लोकांच असं, तर आणखी बऱ्याच गोष्टींची आपली तऱ्हा… सगळंच आपल्या मनासारखं नसतं. खूप दिवसांपासून ज्याची वाट पहावी, अशी गोष्ट घडतच नाही, लांबणीवर पडते. भरपूर डोकं लावून बनवलेला प्लान रद्द होऊन जातो.

आपण एका उद्देशाने कुठल्या गोष्टीत पडतो, काही सुरु करतो. शिकतो, काम करतो, नोकरी करतो. ते सगळं बाजूला सुटून काही तरी वेगळंच सुरु झालंय असं वाटतं. काय कशासाठी चाललंय याचा अर्थ लागत नाही.

आपल्यावर अन्याय होत आहे. आपण सोडून बाकीचे असं का वागत आहेत? सर्वकाही आपल्याविरुद्धच का? अशा तऱ्हेच्या भावना तर सार्वत्रिक आहेत.


आणि हे सगळं पार करून गेल्यावर मी म्हणतोय तसं हसू यायला लागतं. कशाचंही काही वाटत नाही. त्यानंतर आजूबाजूला कितीही बॉम्ब फुटले तरी काही वाटत नाही. भूक लागून खूप वेळ झाला कि तीपण आपोपाप कमी होते. नंतर पक्वान्न आणले तरी खूप जोमाने ताव मारला जात नाही.

बेस्ट नाहीतर एसटीचं उदाहरण घ्या. थांब्यावर नव्याने आलेला माणूस बस लवकर नाही आली तर अस्वस्थ होतो, बसमध्ये हादरे बसले कि लाखोली वाहतो, ट्राफिक मध्ये अडकला कि हैराण होतो... रोजचा माणूस त्यावर जोक मारून, चालायचंच अशा भावाने स्माईल देतो. बस वेळेवर येणार नाही, ट्राफिक मध्ये अडकणार असं धरून चालतो. जागा मिळाल्याचं कौतुक नाही आणि सगळ्यांना खेटून उभं राहण्यात दुःख नाही.

मग मला वाटतं कि हि विरक्ती एवढी ठेचकाळूनच का येते? त्याआधीही साधता यायला हवी. अति होऊन हसू येई पर्यंत मधल्या काळात किती त्रास होतो. तोच चुकवला तर?

मी ज्या उदाहरणांची यादी दिलीये.. सगळ्यांचा विचार करा.. ती सर्वसमावेशक नक्कीच नाही. असूही शकत नाही. पण मुख्य गोष्टी अशाच असतात. असं काही आलंच वाट्याला तर त्रास होतो, पण आपण चालवून घेतोच शेवटी. पर्याय शोधतो, कधी नाद सोडतो. पण चालतो आपला गाडा पुढे. अडत नाही. जिथे पोचायचं मनात बाळगतो, ते ठिकाण गवसतंच असं नाही.. पण प्रवास थांबत नाही.

मग आधी का नाही चालत? एखाद्याशी भांडभांड भांडून शेवटी "गेला खड्ड्यात.. मला नाही फरक पडत" असं म्हणायची पाळी येईपर्यंत फरक का पडत असतो?

खूप गोष्टी, खूप लोक, खूप घटना, अशा असतात कि आपल्याला वाटतं त्याने फरक पडतो... पण प्रत्यक्षात नाही.. आपणच त्यांना महत्व देऊन एवढं मोठं करून ठेवलेलं असतं. त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, लोकांशी जमलं नाही, घडायचं ते घडलं नाही तरी आपण जगू शकतो. निवांत. निश्चिंत.

त्या गोष्टींबद्दलचा आपला समज दूर केला कि आपोआप शांत वाटतं. हसायला अटी लागत नाहीत. आणि अति होईपर्यंत थांबावही लागत नाही. हे पूर्णतया मलाच कधी जमलं नाही. पण प्रयत्न करून पाहतो तेव्हा काही दिवस नक्की शांत जातात. आता पुन्हा पाहू प्रयत्न करून हसतमुख राहण्याचा. आल इज वेल..........

1 comment: