Sunday, May 10, 2020

अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायणमी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही.

शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले. 

(आज लिहुन झाल्यावर पाहतोय तर फारच मोठी पोस्ट झाली आहे, त्याबद्दल क्षमस्व.)

रामानंद सागर यांनी ३३ वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ, अभिनय, चित्रणकला यातली त्याकाळची प्रगल्भता ह्या सगळ्यांच्या आधाराने आणि स्वतःच्या (आणि अर्थात त्यांच्या संघाच्या) अभ्यास आणि भक्तिभावाने जी अद्भुत कलाकृती निर्माण केली आहे त्याचं पुष्कळ कौतुक मी मागच्या भागात आधीच केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा टाळतो. 

शेवटच्या भागातलं लव कुश "हम कथा सुनाते है" हे म्हणतानाचा प्रसंग, त्यानंतर सीतेला पुन्हा अयोध्येच्या प्रजेसमोर स्वतःच्या शुद्धीचं प्रमाण देण्यासाठी शपथ देण्याचा प्रसंग, आणि तिने धरतीमातेला पोटात घे म्हणुन विनंती करण्याचा प्रसंग अंगावर काटा, डोळ्यात अश्रु, मनात किती तरी भावना, प्रश्न उभे करणारे होते. 

आज त्याबद्दलच सविस्तर बोलणार आहे. 

(सूचना: इथे मी तुम्हाला रामाची कथा अगदी तपशिलात नाही तरी संक्षिप्त स्वरूपात तरी माहिती असेल असं गृहीत धरतोय. त्याशिवाय हे मुद्दे तुम्हाला पूर्ण कळण्याची शक्यता कमी आहे. पोस्ट खूप मोठी होईल त्यामुळे ती कथा इथे सांगत नाही.)

१. लंकेतली अग्निपरीक्षा

मला खटकणारा पहिला प्रसंग म्हणजे सीतेची लंकेत झालेली अग्निपरीक्षा. 

सीता रावणाच्या लंकेत जवळपास एक वर्ष राहिली त्यामुळे ती अजूनही पवित्र आहे कि नाही याबद्दलची शंका दूर करण्यासाठी घेण्यात आलेली अग्निपरीक्षा. 

म्हणजे ज्या बाईला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेण्यात आलं आहे, त्या माणसाने तिच्यावर बळजबरी केली तर ती अपवित्र होते? तो माणुस अपवित्र, त्याची करणी अपवित्र, पण त्याचा परिणाम म्हणून ती स्त्री अपवित्र?

म्हणजेच आपला समाज हा आधीपासूनच असल्या सडक्या विचारांचा आहे. इतके ऋषी मुनी, विचारवंत होऊनही हि कीड मात्र तेव्हापासुन आजवर निघालेली नाही. 

त्यामानाने सुग्रीवाने आपल्या पत्नीला फार मानाने वागवले. वालीने आपल्या भावाला राज्याबाहेर हाकलून त्याच्या पत्नीला बळजबरीने स्वतःची पत्नी बनवले होते. पण वालीवधानंतर सुग्रीवाने कुठली अग्नी परीक्षा घेतली नाही. तिलाही स्वीकारले आणि वालीच्या पत्नीशी लग्न करून तिचा महाराणीचा दर्जा तसाच ठेवला. तिच्यावर बळजबरी केली नाही. वालीच्या मुलालाही (अंगद) युवराज बनवले. वानर समाज मनुष्य समाजापेक्षा पुढारलेला होता असाच याचा अर्थ होतो. 

रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांसाठी असे केले असे म्हणु. 

रामायण मालिकेत तर असे दाखवले आहे, कि रावणाने सीतेला पळवण्याआधीच रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त केले होते, आणि तिचे प्रतिबिंब छाया सीता त्यानंतर एक वर्ष सीता म्हणुन वावरत होती. लंकेमध्ये रामाने फक्त अग्निदेवाकडून परत मुळ सीतेला आणले. आणि हि लीला लक्ष्मणालाही त्या क्षणापर्यंत माहित नव्हती. 
आणि या घटनेचा लोकांनी अग्निपरीक्षा असा चुकीचा अर्थ लावला. 

पण हि गोष्ट उगाच नंतर (रामानंद सागर यांनी नव्हे, पण त्यांनी संदर्भ घेतलेल्या कुठल्या तरी रामायणात) जोडली असेल असे मला वाटते. माझा तर्क असा आहे, कि जर रामाने सीतेला अग्निदेवाकडे सुपूर्त करणे लक्ष्मणालाही न सांगता फक्त अग्निदेवाला पाचारण करून केले होते, तर मग तिला परत आणताना सगळ्यांसमोर का? तेही तसेच एकांतात करता आले असते, म्हणजे कोणाचा गैरसमज झाला नसता.

आणि मग रामाने सीतेसाठी व्याकुळ होणे, दुःखी होणे हे प्रसंग दाखवले होते ते सर्व खोटे? 

दुसरा तर्क असा कि ह्या लीलेचा खुलासा रामाने अयोध्येच्या प्रजेसमोर केला असता, तर पुढची गैरसमजाची साखळी टळली असती. 

मागे दुसरं एक पर्यायी स्पष्टीकरण मी असं वाचलं होतं कि अग्नीपरीक्षा म्हणजे आगीवर चालणे नव्हे. रामाने सर्वांची खात्री पटावी म्हणून सर्वांसमोर सीतेला तू शुद्ध आहेस का असे विचारले. एका स्त्रीसाठी सर्वांसमोर अशा प्रश्नाला उत्तर देणे सुद्धा अत्यंत कठीण आहे म्हणून त्याला अग्निपरीक्षा म्हटले आहे. 

असो. मला पीडित स्त्रीला अपवित्र मानणे या मानसिकतेचा प्रचंड त्रास होतो. बलात्कार हा तात्पुरता शारीरिक अत्याचार असतो, पण त्या बलात्काऱ्याहून अधिक मानसिक अत्याचार आपला समाज दीर्घ काळ करत असतो. म्हणून अनेक जणी याबद्दल बोलत नाहीत, लपवून ठेवतात, आत्महत्या करतात. 

(काही वर्षांपूर्वी मी ह्याच विषयावर असाच अस्वस्थ असताना एक कथा लिहिली होती, वाचावी वाटल्यास जरूर वाचा. लिंक ती आणि तो : भाग १)

असो. रामाचा सीतेवर विश्वास होता, पण लोकांची मानसिकता लक्षात घेऊन सीतेला हे दिव्य पार पाडावे लागले असे समजून पुढे चलू. कारण यानंतर दोघांनी अयोध्येत जाऊन पुन्हा सोबत संसार आणि राज्यकारभार सुरु केला होता. 

२. अयोध्येत सीतेला सोडणे, दुसरी अग्निपरीक्षा

रामाने राज्यकारभार सुरु केल्यानंतर त्याला समजते कि प्रजेमध्ये सीतेबद्दल कुजबुज सुरु आहे, आणि तिला राणी म्हणुन बसवलेलं त्यांना आवडलेलं नाही. 

रामाला आदर्श पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्याची धारणा अशी होती कि राजधर्म असे सांगतो कि राजा हा प्रजेचा सेवक आहे, आणि प्रजामतापुढे राजाने आपले वैयक्तिक आयुष्य दुय्यम ठेवायला हवे. त्यामुळे जनमतामुळे रामाने सीतेला सोडले. 

मिथिलेची राजकन्या असूनही तिने मिथिलेला परत न जाता पुन्हा वनवास पत्करला, आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली. 

मालिकेत असे दाखवले आहे कि सीतेने स्वतः हा निर्णय घेतला. तिला आशा होती कि काही काळानंतर प्रजेला आपली चूक कळेल आणि तिला तिचा मान परत मिळेल. 

पुढे लव कुश आपल्या गाण्यांमधून लोकांना जाब विचारतात, त्यांच्या चुका दाखवतात. त्यानंतर तेच रामाचे पुत्र आहेत हे कळल्यावर रामाने पुन्हा सीतेला सन्मानाने आणून सर्वांना पुन्हा राजवाड्यात आणावे असे काही लोक म्हणतात, पण काही लोक तरीही सीतेची अग्निपरीक्षा आमच्यासमोर झालेली नव्हती, त्यामुळे सीतेने पुन्हा सर्वांसमोर आपल्या पवित्रतेची शपथ घ्यावी. 

दुसऱ्या दिवशी सीतेआधी वाल्मिकी ऋषी स्वतः आपली प्रतिष्ठा, तपोबल सर्व पणाला लावुन सीता पवित्र आहे असे सांगतात, तरीही सीतेला शपथ घेण्यास सांगता येते. (दुसरी अग्निपरीक्षा) 

या क्षणी सीतेचे हावभाव अत्यंत परिणामकारक होते. बाकी मालिकेत सीतेचा अभिनय अगदी अपेक्षित आणि ठरलेल्या मार्गावरून जाणारा होता. ह्या क्षणी मात्र त्या अभिनेत्रीने (दीपिका) तिच्या डोळ्यात जो अंगार आणला होता, तो लाजवाब होता. 

सीतेला कळुन चुकते कि ह्याला काही अंत नाही. आधी लोकांसाठी म्हणून अग्निपरीक्षा, मग अयोध्येच्या लोकांनी स्वतः बघितली नाही म्हणून पुन्हा अग्निपरीक्षा, शपथ ग्रहण. उद्या अजुन कोणी येईल त्याची खात्री पटावी म्हणून पुन्हा तो प्रसंग उभा राहील. 

त्यामुळे ती तिची मूळ माता, भूमिमातेला पाचारण करून पृथ्वीच्या पोटात परत जाते. 



मालिकेच्या ह्या भागांमध्ये राम हा अवतारी पुरुष होता, त्याला वेगवेगळे आदर्श प्रस्थापित करायचे होते, असं खूपदा म्हटलं आहे. 

रामाने आदर्श राजा कसा असावा, त्याने प्रजेसमोर वैयक्तिक सुख दुःख दुय्यम मानावे, प्रजेचा सेवक बनुन राहावे हे दाखवले. 

राम शक्तिशाली राजा होता. अशी कुजबुज करणाऱ्यांना दंड देणे सहज शक्य होते. पण काही लोकांना दंड देऊन कुजबुज थांबण्या ऐवजी वाढलीच असती हे मात्र खरे. आणि वैयक्तिक कारणासाठी कोणाला दंड देणे हे रामाच्या तत्वातही बसले नसते. 

पण त्याने काय झाले? 

हा राजाचा आदर्श किती लोकांना कळला? रामाच्या नावाने इतकं राजकारण होतं. पण रामाचा हा आदर्श राजकारण्यांनी ठेवला, तर त्यांच्यावर आरोप झाले, विरोधी जनमत तयार झालं तर त्यांना राजकारण सोडून घरी बसावं लागेल. 

पण आजकालचे राजकारणी लोकांना रामापेक्षा जास्त ओळखून आहेत असं दिसतं. कुछ तो लोग कहेंगे, असं म्हणत ते अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून जे करायचं ते करत राहतात. 

कारण लोक सर्व प्रकारचे असतात. काही लोक आपल्या बाजूने, आणि काही लोक आपल्या विरुद्ध बाजूने सतत बोलत राहतात. शंभर टक्के सर्व लोकांना आपल्या बाजूने करणे राम आणि कृष्णासारख्या अवतारी माणसांना सुद्धा जमले नव्हते. 

अशातच संसदेत ट्रिपल तलाक चा वाद चालू असताना कोणत्या तरी महाभागाने रामाने सुद्धा सीतेला सोडले होते असा उल्लेख केला होता. किती हे विचारांचे दारिद्र्य. रामाने सीतेपासून दूर राहून सुद्धा तिचा मनातून त्याग केला नव्हता. अश्वमेध यज्ञात सुद्धा तो तिचीच सुवर्ण प्रतिमा बाजूला घेऊन बसला होता. 

राम एक पत्नीव्रता होता. रामाने सीतेला सोडले, पण तिच्याशी, ह्या व्रताशी प्रामाणिक राहिला. रामाच्या स्वतःच्या वडिलांना ३ राण्या होत्या. रामाच्या काळात आणि नंतर हजारो वर्षे माणसांना अनेक बायका असणं सामान्य होतं. त्यामुळे त्याचं हे व्रत वेगळं होतं. हा आदर्श नंतर किती जणांनी घेतला? आता ती पद्धत आपोआप बाद झाली ती गोष्ट वेगळी. 

पण रामाने सीतेला सोडलं हे, आणि ज्या कारणामुळे सोडलं ते मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलं. आणि स्त्री दुसऱ्या पुरुषासमवेत राहिली कि त्यागावी अशा समजाला मात्र बळ मिळालं. 

रामाने किंवा सीतेने वेगळे झाल्यानंतर प्रजेच्या विचारांची पातळी वाढावी म्हणून मात्र काही केले नाही. स्वस्थ बसून राहिले. पुढे लव कुश यांच्या गीतांनी काय तो थोडा विचार लोकांनी केला. 

आपल्या पुराणांमध्ये स्त्रीच्या पतिव्रताचं अति स्तोम माचवलेलं आहे. स्त्री हि जगतजननी पण, आदिशक्ती पण, सरस्वती आणि लक्ष्मी पण. पण तिच्या जन्माचं सार्थक म्हणजे पतिव्रता असणं. 

पतीला परमेश्वर मानायला, पतीच्या नावाचं व्रत करायला पती त्या लायकीचा असावा हे कुठल्या कथेत सांगितलेलं नाही. उलट पत्नीच्या पतिव्रताच्या शक्तीमुळे असुरसुद्धा अवध्य झाले, आणि देवांना सुद्धा पतिव्रत भंग करण्याचे मार्ग पत्करावे लागले अशा विचित्र कथा आहेत. 

आणि ते व्रत मानलं तरी स्त्रीने स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर ते व्रत भंग होईल ना. पण अशा कथांमध्ये मात्र दुसऱ्या पुरुषाने कपटाने, बळजबरीने जरी तसे केले तरी ते व्रत भंग होते अशी आजच्या काळात तर अगदी न पटणारी कल्पना दाखवली आहे. 

शाळेमध्ये असताना "महापुरुषांचा पराभव" नावाचा एक सुंदर धडा होता. त्याचा सारांश असा कि कुठलेही महापुरुष असो, त्यांचं स्वतःचं आयुष्य कितीही यशस्वी आणि कीर्तिमान असलं तरीही त्यांचे अनुयायी मात्र त्यांच्या जवळपासही नसतात. त्यांना त्या महापुरुषांच्या विचारांची आदर्शांची उंची झेपत नाही आणि त्यांच्याच विचाराचा पुढे विपर्यास होत राहतो, आणि अशा तर्हेने सर्व महापुरुषांचा या बाबतीत पराभव होतो. 

रामाचा हा आदर्श राजाचा विचार वायाच गेलेला दिसतो. त्याने परपुरुषाच्या घरी राहून आलेल्या पत्नीला त्यागले हे सर्वांच्या लक्षात राहते. पण हे त्याने एक राजा झाल्यावर लोकापवादामुळे केले हे नाही लक्षात राहत. एक वनवासी असताना त्याने आपल्या पत्नीला सोबत घेऊन घरी घेऊन गेला होता, हे नाही लक्षात राहत. 

कृष्ण म्हटलं कि काही लोकांना तर किशन कन्हैया, रास लीला, एवढंच आठवतं. कॉलेजात भरपूर फ्लर्टींग करणाऱ्या मुलांना कन्हैया म्हणतात. त्याच्या १६००० बायका होत्या हे लोकांच्या लक्षात राहतं. पण त्या त्याच्या खऱ्या बायका नसुन, नरकासुराने बंदिवासात ठेवलेल्या स्त्रिया होत्या हे लोकांना माहित नसतं. 

कृष्णाने नरकासुराला मारले तेव्हा सुद्धा असाच प्रश्न निर्माण झाला होता. ह्या पीडित स्त्रियांना मुक्त तर केले, पण त्यांनी जावे कुठे, कोण त्यांना स्वीकारेल असा प्रश्न होता. त्यांना मान मिळावा म्हणुन कृष्णाने त्या सर्वांशी प्रतीकात्मक लग्न केले. 

पण हा आदर्श तरी कोणी समजून घेतला? कृष्णाने मात्र स्वतः बदनामी पत्करली. १६००० लग्न करणारा असं अजूनही बरेच लोक समजतात. 

मी मागच्याही लेखात म्हणालो होतो कि आपण आज जसे विचार करतो, त्यावर आपण आपल्या एक दोन आधीच्या पिढ्यांना सुद्धा पारखणं चुकीचं आहे. मग रामासारख्या हजारो वर्ष आधीच्या माणसाला कसं काही बरोबर चुक ठरवणार? 

त्याचं असं आहे कि हि पात्रं, ह्या कथा हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य हिस्सा आहेत. ह्याचा आपल्या सर्वांवर खूप प्रभाव आहे. मग अशा महत्वाच्या गोष्टींना जरा विचारपूर्वक बघायला नको का? आंधळ्या श्रद्धेनं जे आजवर लोक मानत आले तेच आपण पुढे मानत राहिलो तर आपली प्रगती कधी होणार? आणि फक्त रामायण, महाभारत, गीता, भागवत यांचे सप्ताह आणि पारायण करत राहिलो तर त्यातले विचार आपल्याला कधी कळणार? 

दिल्ली ६ नावाचा एक सुंदर चित्रपट येऊन गेला. तो काही चालला नाही, बऱ्याच जणांना कळलाही नाही. त्यात अतुल कुलकर्णीचं पात्र अस्पृश्यता पाळत असतं. (आजच्या काळातही). 

एका प्रसंगात ते सर्व जण राम लीलेला जातात. रामाने शबरीचे उष्टे बोरं खाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा अभिषेक बच्चन अतुल कुलकर्णीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. अतुल कुलकर्णी उत्तर देतो कि "वो तो भगवान है. वो कुछ भी कर सकते है." 

हे असंच चालू आहे आपल्याकडे शतकानुशतकं. लोक ग्रंथांचे पारायण करतात, मुखोद्गत करतात, पण त्यातले विचार, आदर्श कधी आचरणात सोडा स्वतःच्या विचारातही आणत नाहीत. 

शुद्ध तत्वज्ञान लोकांना आवडणं अवघड असतं म्हणुनच अशा बोधकथा आणि पुराणांची निर्मिती होते. पण त्यातला गर्भित अर्थ समजून घेतला तरच उपयोग आहे. 

अशा खटकणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या समृद्ध वारशाकडे पाठ फिरवणे, किंवा आहे त्याला विचार न करता डोक्यावर उचलून घेणे ह्या दोन्ही गोष्टी टोकाच्या आणि निरुपयोगी आहेत. 

रामायणातून किती काय शिकण्या सारखं आहे हे मी मागच्या लेखातही बोललो आहे. समाजात बदल एका रात्रीत एका क्रांतीत होत नसतात. म्हणून असे महापुरुष त्या त्या काळानुसार संदेश घेऊन येतात. आपण या महापुरुषांकडून जे आजही शिकण्यासारखं आहे ते शिकत राहावं, जे आता कालबाह्य झालं ते सोडून द्यावं. 

शेवट स्वदेस मधल्या ह्या माझ्या आवडत्या ओळींनी करतो. 

राम हि तो करुणामे है, शांती मे राम है
राम हि है एकतामे, प्रगतीमे राम है

राम बस भक्तो नही शत्रुकिभी चिंतन मे है 
देख तज के पाप रावण, राम तेरे मन मे है

राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है
राम तेरे मन मे है, राम मेरे मन मे है

राम तो घर घर मे है 
राम हर आंगन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है 

मन से रावण जो निकाले 
राम उसके मन मे है........ 

।। जय श्रीराम ।।

Saturday, April 18, 2020

पुन्हा एकदा रामायण

रामायणाचं पुनर्प्रक्षेपण आज संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन.

२०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत.

नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा. पण त्याच टीव्हीवर बाकी इतक्या मालिका असताना, आणि आज तर इतक्या वाहिन्या, नेटफ्लिक्स, प्राईमवरच्या सिरीज सारखे हजारो पर्याय असताना, डेटा इतका स्वस्त असताना हे बाकीच्या मालिकांना का जमलं नाही?

आणि रामायण दाखवण्यातसुद्धा धार्मिक अजेंडा शोधणाऱ्यांना तर शत शत प्रणाम. एक एक करत रामायण, महाभारत सोबतच चाणक्य, व्योमकेश बक्षी, सर्कस, शक्तिमान हे सर्वच सुरु झालं. तरीही रामायणाने पुन्हा जी लोकप्रियता गाठली ती दुसऱ्या कोणाला जमली नाही. महाभारतला दुसरी वाहिनी (डीडी भारती) आणि थोडी विचित्र वेळ याचा फटका बसला असावा, नाही तर त्या मालिकेतही तेवढी शक्ती आहे.



या कथांचा आपल्या संस्कृतीवर, आपल्या समाजमनावर जो पगडा आहे तोच यातुन ठळक दिसुन येतो. आणि हे लोक सामान्य लोकांपासुन पार तुटलेले आहेत हेही दिसुन येतं. ह्यांच्या रडगाण्याकडे साफ दुर्लक्ष करत लोकांनी पुन्हा रामायणाचा आस्वाद घेतला. तुम्ही सामान्य लोकांपासुन दूर ज्या कुठल्या पातळीवर पोचला आहात, तिथेच खुश असा.

कोरोना संकटाच्या ह्या काळात रामायण दाखवल्याबद्दल दूरदर्शनचे खुप आभार.

एका अलौकिक युगपुरुषाची हि कथा किती प्रेरणा देते, शिकवण देते. कुटुंबातल्या प्रत्येक नात्याची महती, प्रत्येक नातं निभावण्याची आदर्श सांगुन जाते.

मला रामायण, महाभारत या कथांचं लहानपणापासुन खुप आकर्षण आहे. त्या कथा मी वेगवेगळ्या रूपात वाचल्या. रामायण फार आदर्शवादी आहे, त्यात साधी साधी माणसं देवासारखी वाटतात. महाभारत जास्त सामान्य माणसाच्या जवळ आहे. त्यामुळे साहजिक अलीकडच्या काळातले लेखक आणि कादंबरीकार यांचं त्यावर जास्त प्रेम आहे. म्हणुन ते जास्त वाचनात आलं.

रामायण लहान मुलांची पुस्तकं, आणि काही थोडी विस्तीर्ण पुस्तक यापलीकडे वाचनात नाही आलं. रामायण मालिका मी लहान असताना संपलेली होती. पण जय हनुमान, जय वीर हनुमान अशा मालिकांमधून ती कथा पाहण्यात आलं होतीच.

आपल्या पुराणकथा वाचताना एक लक्षात येतं कि त्यात खुप वेगवेगळी रूपं आहेत. विष्णु पुराणात विष्णूची महती जास्त, शिव पुराणात शंकराची महती जास्त असा प्रकार आहे. आणि प्रत्येक लेखकाने आपल्या भक्तिभावाने, आपल्या समजुतीनुसार, कल्पनेनुसार त्यात भर घातली आहे. बदल केले आहेत.

एक साधा खेळ असतो, कि एकाच्या कानात काही तरी सांगायचं, त्याने दुसऱ्याच्या कानात काही तरी सांगायचं आणि मग असं दहा बारा लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्यात मूळ गोष्टीतलं किती उरेल आणि बाकी मीठ मसाला किती असेल सांगता येत नाही.

या कथा हजारो वर्षांनी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्यात किती चमत्कृती, अतिशयोक्ती यांची भर पडली असेल सांगता येत नाही. पण मला वाटतं हे सगळे थर बाजूला करून हजारो वर्षांपूर्वी खरंच हे महान लोक जन्माला येऊन गेलेच असावेत. त्याशिवाय त्यांच्या चरित्राचा इतका पगडा आशियातल्या इतक्या देशांमध्ये उमटला कसा.

त्यांच्या वास्तव्याच्या भारतात ज्या काही खुणा सांगितल्या जातात त्या सगळ्या खऱ्या असतील असं नाही. पण त्यांच्या नंतरही पराक्रमी राजे महाराजे सम्राट, संत महात्मे होऊन गेलेच कि. त्यांच्यापैकी कोणीही इतका प्रचंड प्रभाव टाकून गेले नाहीत.

या कथेमधल्या चमत्कृती, अति नाट्यमय प्रसंग यापैकी काही गोष्टी नक्कीच नंतर आल्या असतील. पण आगीशिवाय धूर उमटत नाही तसा मुळात त्या व्यक्तींचं आयुष्य श्रेष्ठ असल्याशिवाय हे वरचे दागदागिने त्यांना शोभूनही दिसले नसते.

रामानंद सागर यांनी मालिकेच्या शेवटी अत्यंत विनम्रपणे इतक्या संतांच्या विविध रामायणातून आमच्या छोट्याशा झोळीत जे मावेल तेवढं आम्ही प्रामाणिक पणे सादर केलं, चुकलो असु तर माफ करा असं सुंदर निवेदन केलं.

अगदी त्या कथेतल्या पात्रांना शोभेल अशाच भाषेत आणि भावातलं ते निवेदन ऐकून मला काही तरी सापडल्या सारखं वाटलं.

३३ वर्षांपूर्वी तंत्रज्ञान, त्याहूनही भारतीय चित्र सृष्टीतलं तंत्रज्ञान आज इतकं प्रगत नसताना त्यांनी ज्या ताकदीने रामायण सादर केलं, त्याला खरंच तोड नाही. त्या मालिकेतून भक्तिभाव ओसंडून वाहतो.

नंतर कित्येक रामायण, हनुमान, विष्णु यांवर मालिका बनल्या, पण कशालाही त्याची सर आली नाही.

आणि तरीही त्यांचा तो विनम्रपणा पाहुन मला रामायणातलं एक गुज सापडलं. विनम्रपणा, भक्तिभाव, समर्पण वृत्ती.

रामायणातील प्रत्येक पात्र बाकीच्यांना प्रचंड आदर, प्रेम आणि समर्पण वृत्तीने वागवतं. राम पित्यासाठी, त्याच्या वचनासाठी राज्य सोडतो. सीता नवऱ्यासाठी, लक्ष्मण मोठ्या भावासाठी राजमहाल सोडतो. भरत मोठ्या भावासाठी, आणि न्याय्य वारसदारासाठी राज्य परत करतो. शत्रुघ्न एकटा महालात राहुन कुटुंबाला सांभाळतो. हनुमान सुग्रीवामागे किष्किंधे बाहेर राहतो, आणि मग रामासाठी पराक्रम गाजवतो. सुग्रीव मित्रासाठी आपली सेना आणि राज्य पणाला लावतो. इंद्रजित आणि कुंभकर्ण आपल्या पित्यासाठी, भावासाठी राम लक्ष्मणाच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊन सुद्धा प्राण पणाला लावतात.

अतिशय पराक्रम गाजवुन, यश मिळवुन पुन्हा पुन्हा सर्व जण याचं श्रेय एकमेकांना, एकमेकांच्या मदतीला, प्रेमाला, आशीर्वादाला देत राहतात. कोणीही आपल्या त्यागाचं भांडवल करू पाहत नाही. उलट दुसऱ्याची महती गात राहतात.

कोणीही मला कुटुंबाकडून, देवाकडून, देशाकडून काय मिळालं याचा कधीच विचार करत नाहीत. उलट आपलं कर्तव्य काय, आपला धर्म काय याचाच विचार करत राहतात.

माणसाला मोठं व्हायचं असेल तर कर्तव्य ओळखणं, ते निभावणं हाच मार्ग आहे. आपल्या कुटुंबाचा, पूर्वजांचा मान राखणं, आणि आपल्या पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असं आयुष्य जगणं हि आपली जबाबदारी आहे. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या घरच्यांच्या शब्दाची किंमत आपण राखु तेवढीच.

आणि कितीही मोठे झालो तरी आपल्या कुटुंबासमोर, मित्रांसमोर, गुरूंसमोर, उपकर्त्यांसमोर, आपल्या सेवक आणि कनिष्ठांसमोर सदैव विनम्र राहिलं पाहिजे. हाच त्यांचा संदेश आहे.

अर्थात रामकथेत ज्या काही त्रासदायक गोष्टी (वालीचा वध, सीतेची अग्नी परीक्षा, सीतेला सोडणं) आहेत, त्याबद्दल नेहमी मन साशंक असतं. उत्तर रामायण तर मूळ रामायण नाही नंतर जोडण्यात आलेला भाग आहे असंही वाचनात येतं.

पण त्याबद्दल विचार करताना एक जाणवतं कि तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या लोकांना आजचे मापदंड लावुन चालणार नाही.

प्रत्येक पिढीत इतका बदल होत जातो, कि ५०-६० वर्षांपूर्वीच्या लोकांना आपल्या सारखं धरून तोलू शकत नाहीत. हजारो वर्ष आधीच्या नायकांना कसं जोखणार?

आजकाल जे इंग्रजीमध्ये अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन या कथा आपल्या संकुचित विचारांनी मोडतोड करत सादर करण्याचं पेव फुटलेलं आहे, तेवढंच वाचुन आणि खरं मानुन लोक वादविवाद करतात तेव्हा त्यांची कीव करावी वाटते.

आजचं तंत्रज्ञान, चित्रपट मालिकांमध्ये झालेल्या सुधारणा, उत्कृष्ट नटांची वाढलेली संख्या या सगळ्यांचा पूर्वग्रह मनात ठेवुन हे रामायण पाहिलं तर अवघड आहे.

पण ३३ वर्षांपूर्वीचा आजच्या तुलनेतला भाबडेपणा, जुनं तंत्रज्ञान, आणि रामानंद सागर यांचा प्रामाणिक प्रयत्न याकडे पाहिलं तर त्याचं महत्व कळतं.

त्यामुळे या कठीण काळात रामानंद सागर कृत रामायण पाहण्याचा योग आला हि देवाचीच कृपा. नाहीतर याची सीडी, डीव्हीडी उपलब्ध असूनही पाहण्याचा कधी योग येणं अवघड होतं. आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात आजच्या पिढीतल्या लोकांनी पाहणं तर फार अवघड.

त्यानिमित्ताने आता पुन्हा यावर चर्चा सुरु झाली, नेट फोरम्स वर याबद्दलचे प्रश्न दिसु लागले. मी सध्या बऱ्याचदा तशाच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय.

माझ्या सारख्या अनेकांना तर पुन्हा रामायण वाचुन काढण्याची इच्छा हि झाली असेल.

हि मालिका बघुन खुप सकारात्मकता मिळाली, अनेक भावुक क्षण मिळाले, लोकांचं आणि नात्यांचं महत्व पुन्हा कळलं.

सतत वाईट आणि चिंताजनक बातम्यांचा भडीमार होत असताना मनाला उभारी देणारं असं काही तरी समोर यावं हि रामाचीच इच्छा असावी.

।। जय श्रीराम ।।