Friday, December 30, 2016

पेन्स

आज खूप वर्षांनी रेनॉल्ड्सचा पेन लिहायला मिळाला. हा पेन माझ्या लहानपणी फार चालायचा. माझे बाबा तेव्हा हाच पेन वापरायचे आणि सुरुवातीला हा सोडून दुसरा कुठला पेन आम्हाला माहितसुद्धा नव्हता.

प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही. जेव्हा पेन वापरायला परवानगी मिळाली तेव्हा पुन्हा बजावण्यात आलं कि आता तुम्ही मोठे झालात (तिसरी का चौथीमधेच), तुम्ही खाडाखोड करू नये अशी अपेक्षा आहे.

तेव्हा रेनॉल्ड्सपासूनच पेनने लिहिण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. तेव्हापासून शाळेत असेपर्यंत आम्हा मुलांमध्ये कपड्यांसारखी पेनचीसुद्धा फॅशन यायची जायची.

बॉल पेनपेक्षा शाई पेनने अक्षर चांगले येते असा एक समज होता. म्हणून तो प्रयोग करून झाला. मग शाई पेन असेल तर शाईची बाटली बाळगणे, सांडणे, शाईचे डाग गणवेशावर पाडणे, शाई दुसऱ्यांवर उडवणे, शाई संपली म्हणून एकमेकांकडे पेन पेन्सिल मागणे असे सगळे प्रकार करून झाले.

मग चायना पेनची लाट आली. ह्या पेनला शाई ओतून भरण्याची गरज नव्हती. यांच्यात ड्रॉप/पंप लावलेला असायचा, तो दाबून शाई भरावी लागायची. त्यामुळे शाई सांडायची नाही, पण पेन बाटलीत बुडवावा लागायचा, आणि मग तो पुसायला एक कापड सोबत ठेवावा लागायचा. तो पेन तेव्हा ४० रुपयाला मिळायचा, आणि तो सगळ्यांना घ्यावा वाटायचा.

टोपण असलेल्या पेन सोबतच जेटरसारखे खटका दाबून उघडायचे पेनसुद्धा होते. टोपण पडायचे किंवा हरवायचे म्हणून हे पेन सोयीचे वाटायचे. पण ते चुकून उघडे राहिले तर खिशाला डाग लागायचे.

खटका असलेल्या पेनमधेच दोन तीन रंगाच्या रिफील असलेले पेनपण हटके म्हणून भाव खाऊन जायचे. असा पेन घेऊन मग उत्तर लिहिताना महत्वाचे मुद्दे वेगवेगळ्या रंगाच्या शाईने अंडर लाईन करता यायचे.

शिक्षक गृहपाठ आणि परीक्षेचे पेपर तपासताना लाल शाई वापरत असत, म्हणून हे रंगीत पेन त्यांच्यात विशेष लोकप्रिय होते.

चित्र स्रोत : http://www.promogallery.com.au/Vogue-Pens

काही दिवस अशा खटकावाल्या पेनमधेच बटन दाबून उघडण्याऐवजी खटका फिरवून उघडण्याचे पेन आले होते. या पेनाची शाई सुगंधित होती. अशा पेनांचा वेगळा रुबाब होता. एकाने जरी हा पेन आणला तरी हा थोडावेळ म्हणून सगळे मागून घ्यायचे. एखाद्या तासाला तो पेन वापरून परत करायचा, आणि आपल्या वहीत तो सुगंध घेत बसायचा.

हायस्कुलमध्ये पोचेस्तोवर ऍडजेलमुळे आम्हाला जेलपेनची ओळख झाली. जेल पेन मग काही दिवस भरपूर लोकप्रिय झाले. त्याने लिहिलेल्या कागदाला बॉल पेनने लिहिलेल्या कागदापेक्षा एक वेगळीच चकाकी यायची. आणि काही दिवस अक्षर सुधारल्यासारखे वाटायचे. असेच काही पायलटपेनसुद्धा उपलब्ध होते.

त्या काळात अमिताभ बच्चनने पार्कर पेनची जाहिरात करायला सुरुवात केली होती. "व्हाय अ पेन? नॉट अ पार्कर?" अशी त्याची कॅच लाईन होती. त्यामुळे आपल्या १०-२० रुपयांच्या पेन पलीकडे पेनमध्येसुद्धा प्रीमियम अशी रेंज उपलब्ध आहे हे आकलन झाले.

बाबांना कोणाकडून तरी हा पेन भेट म्हणून आला होता. तो मीच वापरला. आणि तिथून पुढे काही दिवस वाढदिवसासारख्या प्रसंगी पार्करचे पेन भेट म्हणून देण्याघेण्यात दिसु लागले.

एकीकडे हे उच्च श्रेणीतले पेन येत असताना बाजारात २ रुपयाचे वापरून फेकून देण्याचे पेन यायला लागले. १० रुपयाचा पेन घेणं जमत असतानासुद्धा मुलं सगळे वापरतायत म्हणून हे २ रुपयाचे पेन वापरायला लागले. तेव्हापासून हे पेन, ऑफिसमध्ये वाटप करताना, सेमिनारमध्ये, ट्रेनिंगमध्ये असा सर्व ठिकाणी वापरात दिसत आहेत.

एक रायटोमीटर नावाचा पेन आला होता. ह्याची जाड रिफील खूप दिवस चालायची. एका रिफील मध्ये तुम्ही १०००० मीटर, म्हणजेच १० किमी म्हणजेच माउंट एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा जास्त तुम्ही लिहू शकता असा त्यांचा दावा होता. त्या रिफील वर एक स्केलसुद्धा होती, १०००० मीटर दाखवणारी. म्हणूनच नाव रायटोमीटर. तोसुद्धा मी वापरून पाहिला. आणि खरंच एकच रिफील काही महिने चालली. त्या पेनचा रंग उडाला, टोपण तुटलं, पेन लूज झाला, तरी ती रिफील संपेना. शेवटी कंटाळून मी तो फेकून दिला. कदाचित नोट्स वगैरे काढून लिहून अभ्यास करण्याची ज्यांना सवय आहे, त्यांच्याकडून लवकर संपला असता.

नऊवी दहावीच्या वर्षात दहाविची महत्वाची परीक्षा जवळ येत होती. आमच्या आवडीनिवडी पक्क्या होत होत्या. आणि त्याचबरोबर शिक्षकसुद्धा सांगायचे कि आता एकाच पेनाने लिहिण्याचा सराव करा. त्या पेनची सवय झाली पाहिजे, हात बसला पाहिजे, म्हणजे अक्षरात सातत्य येईल.

माझ्या वर्गातल्या बऱ्याच जणांचा सेलो ग्रीपर हा पेन आवडता होता. मला स्वतःला सेलोचाच सेलो पिनपॉईंट हा पेन आवडता होता. आणि त्याच प्रकारचा सेलो टेक्नोटीप हा पेन मला जास्त आवडला, आणि तोच मी आजतागायत वापरतोय.

पण शिक्षण संपलं कि लिहिण्याची सवय सुटली. आता ब्लॉगसुद्धा संगणकावर लिहितात लोक. त्यामुळे आजकाल मला लेखनाची आवड आहे म्हणण्यापेक्षा टंकनाची आवड आहे म्हटलेले जास्त बरोबर ठरेल. :D

असो. तर माझा आवडता टेक्नोटीप घरी विसरल्यामुळे मला सहकाऱ्याकडून रेनॉल्ड्स पेन मागून घ्यावा लागला. तो पेन पाहून पेन या विषयावर गप्पा झाल्या, आणि हे स्मरण रंजन झाले.

टीप : मला स्वतःला सर्व प्रकारच्या गोष्टी करून बघण्याची, वापरून बघण्याची आवड असल्यामुळे मी एवढे पेन वापरले. त्यासोबतच काही केल्या अक्षर चांगले येत नव्हते हे हि एक कारण होते. सर्वांनी एवढे पेन वापरले असतील असे नाही.
काही जणांचे एका पेनने अक्षर चांगले यायला लागले, किंवा अक्षर चांगलेच होते, ते कुठल्या पेनमुळे छान दिसायला लागले कि त्यांचा शोध संपला. अस्मादिकांचे अक्षर ह्या जन्मात कधी कुठल्याही पेन अथवा पेन्सिलीमुळे चांगले आले नाही. त्यामुळे हा फक्त लहानपणात वापरलेल्या पेन्सबद्दल स्मरणरंजनाचा लेख असून कुठल्या अमुक पेनमुळे अक्षर चांगले येते असा लेखकाचा दावा मुळीच नाही.

Sunday, October 2, 2016

ब्लॅक अँड व्हाईट

चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल. 

किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे. 

यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं. इतक्या वर्षांनी पहिलंच. ते मला चुकवायचं नव्हतं, आणि ते नेमकं त्याला टाळायचं होतं. झालं मग. त्याने भारतात यायचंच टाळलं. त्याच्या बाजूच्या लग्नात मीच आईबाबांसोबत लावली हजेरी प्रतिनिधी म्हणुन. आणि रियुनियनलासुद्धा गेले एकटीच. 

किती मजा आली. सगळे आपापल्या नवराबायकोला घेऊन आले होते. म्हणजे ज्यांची लग्न झालीयेत ते. काहीजण अजूनही एकटे जीव सदाशिव. मी लग्न झालेली असून एकटीच गेली होते. सगळे मला विचारत होते काय गं राधा एकटीच का आलीस. दीपेशला का नाही आणलं. दिपेशचाच कामाचा बहाणा सांगुन दिली उत्तरं त्यांना. तरी बरं खोलात नाही शिरले कोणी. 

या वेळेस जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड तनु. केवढी बदलली आहे ती. तिचा पोशाख, वावर, आत्मविश्वास सगळंच नवीन. लग्न मानवलेलं दिसतंय तिला. तिचा नवरा गौरवपण आला होता रियुनियनला. सगळ्यांत मिसळला. ओळखी करून घेतल्या. जोडी आवडली सगळ्यांनाच. 

तनु जशी सगळ्यांशी बोलत होती, उत्साहाने गेम्स गाणीवगैरेमध्ये भाग घेत होती ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. हे कॉलेजमध्ये असताना मुळीच नव्हतं तनुचं. शांत असायची. आपल्यात गुंग. माझ्यासोबत यायची सगळी कडे. पण सोबतीपुरतीच. तिचा स्वतःचा सहभाग कमी असायचा खुप. आता फारच फरक पडलाय. मस्त दिसतेय काय, हसतेय काय. 

तो सुजय तर बोललासूध्दा. लग्नानंतर कसा सगळ्यांमध्ये वेगवेगळा फरक पडतो पहा. राधा काकूबाई झाली, आणि तनु तर आधीपेक्षा यंग दिसतेय. विक्षिप्तच आहे तो आधीपासून. कुठे काय बोलावं याची जरासुद्धा अक्कल नाही. 

एक दिवस तनु घरी राहायला येऊन गेली. दिवस कमी पडला आम्हाला बोलायला. अमेरिका आणि भारतात दिवस रात्रीचा फरक. वेळेची गणितं सांभाळून दोन्हीकडचे आई बाबा, महत्वाचे नातेवाईक यांच्याशी फोनवर बोलणं झालं तरी पुरे. तनुशी मेसेज आणि फोनवर कितीही बोललं तरी समोर आल्यावर अजून विषय निघतात. 
तिच्यात लग्नामुळे म्हणजे खरं तर गौरव मुळे फरक पडला हे निश्चित.

मी कॉलेजात असताना पॉप्युलर होते. बऱ्याचजणांनी प्रपोज केलं मला. तनु दिसायला पण साधी होती आणि राहायची पण अगदी साधी. तिच्या वाट्याला कोणी फारसं जायचं नाही. पण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आम्ही नेहमी सोबत असायचो. त्यामुळे माझी मैत्रीण म्हणून ती पण सगळ्यांना माहित होती. 

तिला याचा कधीकधी राग यायचा. म्हणायची मी पिक्चरमधल्या सारखी सुंदर हिरोईनची साधी मैत्रीण वाटते सगळ्यांना. काही मुलं माझ्याकडे येऊन तुझ्याबद्दल बोलतात. मी काय नोकर आहे का तुझी. पण यात माझी काय चूक होती? हे तिलासुद्धा माहित होतं. म्हणून यायची पुन्हा नॉर्मलवर. 

आपण बरं आपलं काम बरं असा तिचा स्वभाव होता. कॉलेजच्या फेस्टिवल्समध्ये तिचा क्रिएटिव्ह गोष्टीत सहभाग असायचा खरा. पण होस्ट करायला, बाकी कॉलेजमध्ये जाऊन प्रमोशन करायला मलाच सांगायचे. मला आणि अजून अशा कॉलेजमधल्या गुड लुकिंग मुलामुलींना. हे मार्केटिंगचे फंडे, कॉलेजात पण वापरतात. चांगले चेहरे जिकडे तिकडे दिसायला हवेत. 

मला सहानुभूती वाटायची कधी कधी. आज तिला माझी स्थिती सांगितली तर तिला सहानुभूती वाटेल माझ्याबद्दल. असो. 

मी फक्त सुंदर होते असं नाही. हुशार पण होते. मार्क्स नेहमी चांगले असायचे, अभ्यास चांगला करायचे. पण हे कोणाला दिसत नसावच. माझी ओळख कॉलेजातली मस्त पोरगी म्हणुनच होती. तनु माझी बेस्ट फ्रेंड तर होतीच. पण बाकीपण ग्रुप होता आमचा मोठा. मुलं आणि मुली दोन्ही होते त्यात. 

पण काही छपरी पोरांना राग यायचा याचा. माझ्या जोड्या लावायचे कोणा कोणासोबत, कमेंट्स पास करायचे. बाकी मुलांशी बोलते आणि त्यांच्याशी बोलत नाही याचा राग असावा बहुतेक. ते चांगले वागले असते तर का नसते बोलले त्यांच्याशी? तनुला तसा त्रास कमी होता तुलनेने. तसा सगळ्याच मुली बायकांना इकडे तिकडे रस्त्यावर वगैरे काही न काही त्रास होतच असतो. पण जितकं रूप चांगलं तितका त्रास जास्त असं मला वाटतं. 

बऱ्याच जणांना मी शिष्ट वाटते. माझे हावभाव शिष्ट वाटतात. दिसत असेल काही चेहऱ्यावर. मला अगदी नाही नाही म्हणायचं. पण सगळीकडे सगळ्यांचा वळलेल्या माना, रोखलेल्या नजरा, एक्सरेसारखी फिलिंग याचा काही परिणाम होत नसेल का चेहऱ्यावरच्या हावभावांवर?

मुलींमध्ये लोक रूपापेक्षा दुसरं काही बघतात का असा मला प्रश्न पडतो. म्हणजे मुलींकडे अक्कल पण असते, त्या आपलं डोकं वापरू शकतील अशी अपेक्षाच नसावी लोकांना. आणि सुंदर मुलींना अक्कल कमी असते हा तर सगळ्यांचा आवडता डायलॉग आहे. 

लग्नाआधी माझं रिलेशनशिप होतं पंकजशी एक दोन वर्ष. त्यानेसुद्धा रूप सोडून दुसरं काही पाहिलं नाही असंच वाटतं. ऑफिसमध्येच भेटला. लगेच अट्रॅक्ट झाला. "लव्ह अँट फर्स्ट साईट" म्हणायचा तो. माझा आता या गोष्टींवरचा विश्वास उठलाय. फर्स्ट साईट म्हणजे तुम्ही काय बघता? फक्त रूप. तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो? आवडी कळतात? बॅकग्राउंड कळतं?

सुरुवातीला छान वागायचा तो. पण नंतर मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते, मला पण तेवढाच ताण असतो, सुटीला दुसरे काही प्लॅन असू शकतात, मी माझ्या आधीच्या मित्र मैत्रिणी (खास करून मित्र) यांच्यासोबत कुठे जाऊ शकते. हे सगळं विसरून वागायचा. म्हणजे या "लव्ह अँट फर्स्ट साईट"मध्ये फक्त फिजिकल अट्रॅक्शन आलं तर. बाकी आपलं व्यक्तिमत्व आणि आयुष्य राहिलं बाजुला. भांडणं होऊन होऊन शेवटी संपलं एकदाचं रिलेशन. 

ऑफिसमध्ये बाकी लोकांचं पण तेच. मी न मागता मला जास्त अटेन्शन मिळायचं. माझ्या सोबत जॉईन झालेल्या लोकांमध्ये, मुलींना, त्यातल्या त्यात आम्हा एक दोघींना जास्त तत्परतेने मदत मिळायची. मग साहजिकच बाकीजण हे कडवट नजरेने बघायचे. 

मी हुशार होतेच. मेहनत पण करायचे बरीच. कशात काही कौतुक झालं, किंवा अवॉर्ड, प्रमोशन वगैरे मिळायचं. तेव्हा लोकांना माझी मेहनत दिसायची नाही. मी सुंदर आहे म्हणून मला एवढा भाव मिळतो, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. फक्त मुलांच्याच नाही तर मुलींच्यासुद्धा. 

कंटाळा आला होता मला या सगळ्याचा. आणि पंकजबद्दल घरी सांगितलेलं होतंच. त्याच्याशी ब्रेकप झालं तेव्हा काही दिवस थांबून आईबाबांनी माझ्या लग्नाचं मनावर घेतलं. 

नातेवाईक पण हेच बोलायचे. एवढी सुंदर आहे आपली मुलगी, हजार चांगली स्थळं येतील. म्हणजे मी शिकलेली होते, चांगल्या नोकरीला होते, याचं काही महत्व नव्हतं. 



दीपेशचं स्थळ आलं. दिसायला खूप भारी नसला तरी स्मार्ट आहे दीपेश. स्वभावाने पण छान आहे. त्याच्या घरचे पण आवडले सगळ्यांना. त्याच्या अमेरिकेतल्या नोकरीचं कौतुक तर होतंच. 

मला इथल्या ह्या वातावरणाचा कंटाळा आला होता. दीपेशला तो सुटीवर भारतात आला असताना दोन तीनदा भेटले. तो आवडला, त्याला मी आवडले. अमेरिकेत गेल्यावर, स्थिर स्थावर झाल्यावर नोकरी बघायची असा माझा बेत होता. त्यानेही माझ्या काम करण्याला कसली हरकत घेतली नव्हती. मी त्याला होकार दिला, आणि लग्न करून भारतातली नोकरी सोडून अमेरिकेत आले. 

झालं. पैसे पाहून अमेरिकेतला नवरा पकडला, असा सगळ्यांचा समज झाला. तो माझ्या तुलनेत दिसायला ठीक ठाक असल्यामुळे पैसे पाहूनच लग्न केला अशी खात्रीच पटली सगळ्यांची. आमची जोडी पाहून लग्नात काही जणांनी "लंगूर के हाथ अंगूर" असल्या छापाच्या थेट किंवा छुप्या कमेंट्स पण केल्या. मला वाटतं प्रॉब्लेम तिथूनच सुरु झाला. 

दीपेश सुरुवातीला खूप छान राहिला. स्वभाव चांगलाच आहे त्याचा. आम्ही हनिमूनला गेलो, तेव्हा मी सर्व प्रकारचे ड्रेस नेले होते, ते सगळे त्याला आवडले. कुठल्याच ड्रेसला त्याने कसली आडकाठी केली नाही. भरपूर फिरलो आम्ही, एन्जॉय केलं. फोटो काढले, 

पहिल्या वर्षी आम्ही प्रत्येक सण, प्रत्येक ऑकेजन खूप उत्साहाने साजरे केले. भारताबाहेर भारतीय लोक जरा जास्त जवळ येतात. आम्ही अशा कार्यक्रमांना जायचो, गेट टुगेदर्स ना जायचो. आमच्या घरीसुद्धा आम्ही बऱ्याचदा पार्टी केली. आम्ही बरेच फोटो काढून आमच्या ग्रुप्स मध्ये, फेसबुक वर टाकायचो. 

त्याच्या काही बावळट मित्रांनी भाई थोडा फेअर अँड हँडसम लगा ले, भाभी के सामने अच्छा लगेगा, असल्या कमेंट टाकल्या. इथून जरा दीपेशचा मुड बदलायला लागला. 

मला जे अटेन्शन आधीपासून मिळतं ते त्याला खुपायला लागलं. आमच्या रूपात जो फरक आहे त्यामुळे त्याच्या मनात एक अढी, एक कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्याने माझ्या ड्रेसमध्ये लक्ष देणं सुरु केलं. मी बाहेर जाताना जास्त तयार झालेलं त्याला खटकायला लागलं. मी अगदी साधं राहावं अशी त्याची अपेक्षा होती. आमची भांडणं सुरु झाली. 

आमचं बाहेर जाणंच हळू हळू कमी झालं. हे फोटो शेअरिंग वगैरे त्या फालतू कमेंट्सनंतर तसंही जवळपास बंदच झालं होतं. मला आता घरात बसून कंटाळा आला होता. आणि पुरेसा ब्रेक झाला होता. मी नोकरीचा विषय काढला. त्याने आता आढेवेढे घेणं सुरु केलं. पण मी हट्टाला पेटून नोकरी मिळवलीच. 

अगदी साधे कपडे घालून, काहीच विशेष तयार न होता मी ऑफिस ला जाते. रोज सकाळी दीपेशचं माझ्या कडे लक्ष असतं. मी कशी तयार होऊन जाते हे तो बारीक नजरेने पाहत असतो. बोलत नाही. पण वाद नको म्हणून मीच काही करत नाही. 

पण मला नाही आवडत हे असं मन मारून जगणं. तयार होणं, छान दिसणं, बाहेर जाणं, लोकांत मिसळणं हे आपण फक्त दुसऱ्यांसाठी करतो का? हे सगळं करून आपल्याला सुद्धा छान वाटतं ना? आपण आपल्यासाठीसुद्धा काही नको का करायला? जाऊ दे. 

तनुचं माझ्या उलट. दिसायला, राहायला साधी सावळी. कॉलेजात, ऑफिसात कुणाच्या अध्यात न मध्यात अशी राहायची. तिचं लग्न जुळायला तसा वेळ लागला जरा. बऱ्याचदा पत्रिकेचं कारण सांगुन नकार यायचा. 

मी आणि दीपेशसारखे गौरव आणि तीसुद्धा लग्ना आधी काही वेळा भेटले. त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडला. त्याचं लग्न झालं तेव्हा मी गडबडीत भारतात येऊन गेले. गौरवशी भेटणं बोलणं तर जमलं नाही. पण आत्ता तनु भेटली तेव्हा गप्पा मारताना त्याच्याबद्दल भरभरून बोलली. 

गौरव तिच्यापेक्षा दिसायला उजवा आहे. हे तिच्या आणि त्याच्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनी टिप्पणी करून आपलं मत नोंदवलंच. असे कुचकट लोक आपले नातेवाईक का असतात, आणि का आपण त्यांना भाव देतो? दीपेशसुद्धा कोण कुठल्या लोकांच्या मनात आमची जोडी कशी दिसते हे एवढं मनावर का घेऊन बसलाय?

गौरवला तनुचं खूप कौतुक आहे. त्याचं पण तिच्या ड्रेसेसकडे, मेकअप कडे लक्ष असतं. पण वेगळ्या अर्थाने. तो तिच्या सगळ्याच गोष्टींत खूप इंटरेस्ट दाखवतो. तिचं कौतुक करतो. त्यामुळे हळू हळू तिने पण स्वतःकडे जास्त लक्ष देणं सुरु केलं. फटाफट शॉपिंग उरकणारी ती बाकी मुलींसारखी चुझी होत गेली. कुणी कौतुक करणारं असलं कि आपोआप आपल्यामध्ये रिफ्रेशिंग फिलिंग येते. उत्साह येतो. 

मला तिचा हेवाच वाटायला लागला. ती इतकी सुंदर नाही, त्यामुळे गौरवला कसली चिंता नसेल, त्याला सेफ वाटत असेल म्हणुन तो इतका छान राहत असेल असा निरर्थक विचारसुद्धा माझ्या मनात येऊन गेला. 

पण नाही. मी भेटले ना गौरव ला. रियुनियनला, तनुच्या घरी जेवायला गेले तेव्हा. तो ज्या नजरेने, ज्या प्रेमाने तनु कडे बघतो, त्या नजरेने दिपेशने मला पाहिलं, तर मला मी कोणते कपडे घालतेय, मेकअप करतेय कि नाही याचं काहीच वाटणार नाही. बाकी कोणी मला काकूबाई म्हटलं तरी काही वाटणार नाही. 

तुमच्या आयुष्यातली माणसं, वातावरण, सुख दुःख, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. देहबोलीत दिसतं. जो माणूस आनंदी असतो, खुलून हसतो, तो सुंदरच दिसतो. रूढार्थाने सुंदर अशी मी, पण मी माझ्या बॅचमेटला काकूबाई वाटले, आणि रूढार्थाने साधी अशी तनु, ती छान चमकत होती. 

प्रत्येक लहान बाळ आपल्या सगळ्यांना क्युट वाटतं. मग तेच मोठं झाल्यावर काय होतं?

आज मला पटलं. सौंदर्य हे माणसाच्या मनात असतं. विचारांत असतं. पाहणाऱ्याच्या नजरेत असतं.

Monday, August 8, 2016

मैत्री

काल फ्रेंडशिप डे साजरा झाला. सगळीकडून शुभेच्छा आणि मैत्रीविषयी मेसेजेसचा पाऊस पडला. माझ्याही मनात काही विचार घोळत होते. म्हटलं वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा आणि लिहावं थोडं.

मैत्रीची बऱ्याच जणांनी व्याख्या केली आहे. ती प्रसंगानुरूप बदलत जाते. मला वाटतं बऱ्याचदा आपण मैत्रीचा अर्थ फार संकुचित असा लावतो. कुटुंबाबाहेर, नातेवाईकांच्या व्यतिरिक्त जे आपले चांगले संबंधित लोक असतात त्यांनाच आपण मित्रांमध्ये पकडतो.

पण तसं नसतं. मैत्री हि प्रत्येक नात्यात असू शकते, पण प्रत्येक नातं हे मैत्रीचं नसतं. विचित्र वाटतं ना?

मैत्री म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांशी केलेली शेअरिंग. ह्याला सुयोग्य मराठी शब्द सुचत नाहीये. एकमेकांच्या आयुष्यात सहभागी करून घेऊन साथ देणं म्हणजे मैत्री. आणि अशी मैत्री कोणासोबतही होऊ शकते.

नात्याला नाव आई बाबांचं असू शकतं. पण शेअरिंग असेल, एकमेकांशी चर्चा करून समोरच्याच्या मताला किंमत देण्याची पद्धत असेल, तर ती त्या नात्यातली मैत्रीच आहे. हे नसलं तरी त्यात नातं तर असेलच पण मैत्री नसेल. बऱ्याच मुलांना बाबांचा फक्त धाक, भीतीयुक्त आदर असतो, त्यामुळे त्यांच्यात काहीच शेअरिंग नसतं. आणि हे असलं तर ते आईबाबा मित्रसुद्धा असतात.



आपले नातेवाईक खूप असतात, त्यात नातं सगळ्यांशीच असतं. तरीसुद्धा काही जवळची नाती लांबची वाटतात, काही दूरची जवळ वाटतात. कारण असतं त्यातली शेअरिंग आणि मैत्री.

आपल्या शाळेत कॉलेजात किमान साठ-सत्तरजण एका वर्गात असतात, पण मित्रांमध्ये गणना होते ती त्यातल्या काही मोजक्यांचीच. सगळ्यांशी सुरुवातीला संबंध सारख्याच पद्धतीने येतो, पण वाढत जाणाऱ्या शेअरिंगमुळे क्लासमेट ते मित्र हा प्रवास होतो.

हेच कॉलनी, ऑफिस, बस, लोकल अशा कुठल्याही ठिकाणी होतं. प्रत्येक ठिकाणी सहज मित्र जोडणारे मी काही लोक पाहिलेत. त्यांचा हेवा वाटतो आणि त्यांच्याकडून शिकावं वाटतं.

हे खूप महत्वाचं आहे. कारण माणूस अनाथ म्हणून वाढू शकतो, कुटुंबाला पारखा होऊ शकतो. पण तरी मित्र जोडून “आपली माणसं” मिळवू शकतो. म्हणूनच मित्रांना मित्र परिवार असंही म्हणतात.

नागरिकशास्त्रात शिकलोय आपण, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला माणसांची गरज असते. आपण काहीही यश मिळवू, पण त्याचा आनंद साजरा करायला, किंवा दुःखात आधारासाठी माणसंच लागतात.

आपली गरज एवढाच हा स्वार्थी विचार नाही. तुमची किती आपली माणसं आहेत यासोबतच तुम्ही किती जणांचा आपला माणूस आहात हेही महत्वाचं आहे.

कुटुंब आणि नातेवाईक जन्मतानाच ठरतात. ती नाती त्यात मैत्री असो व नसो आयुष्यभर राहणार असतात आणि त्याला पर्याय नसतो. पण मैत्री (कुठल्याही नात्यात) हि मर्जीने, दोन व्यक्तींच्या सहभागाने केली जाते, म्हणून खास असते. करा विचार तुमच्या आयुष्यात किती नाती आहेत, आणि किती नात्यात मैत्री आहे? सुदैवाने मला माझ्या कुटुंबातसुद्धा खूप मित्र आहेत, आणि कुटुंबाबाहेरसुद्धा. संबंध कसाही येवो, नातं कुठल्याही नावाचं असो, संपर्क आणि शेअरिंग यानेच मैत्री होते आणि टिकते. 

प्रत्येक नात्यातली मैत्री जपा, आणि मैत्रीचं प्रत्येक नातं जपा.

Friday, February 26, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ९ : माहिती आणि समाप्त

वॅली ऑफ फ्लॉवर्सची आमची ट्रिप खूपच छान आणि संस्मरणीय झाली. त्याबद्दल तुम्ही या मालिकेत वाचलंच आहे. आता त्या संदर्भात तिकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना उपयोगी पडेल अशी माहिती देत आहे.



मार्ग/टप्पे :

-१. दिल्ली पर्यंत : आम्ही पुणे आणि मुंबईचे लोक मिळून गेलो होतो. तिथून दिल्लीला विमानाने पोचलो आणि एकत्र आलो.
०. दिल्ली ते हरिद्वार हा प्रवास ट्रेनने केला. दिल्ली ते देहरादून मार्गावर हरिद्वार येते आणि यासाठी कमी अधिक वेगाच्या अनेक ट्रेन आहेत. आम्ही देहरादून जनशताब्दी एक्स्प्रेसने गेलो. ४-५ तासात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारपासून आमचे वॅली ऑफ फ्लॉवर्सचे टूर कंपनीचे पॅकेज सुरु झाले.
मुक्काम : हरिद्वार
१. ट्रीपमधला पहिला दिवस हरिद्वार ते गोविंदघाट या प्रवासासाठी होता. साधारण ३०० किमीच्या या डोंगराळ प्रवासाला १०-१२ तास लागतात. आणि दरड कोसळली तर कितीही वेळ खोळंबा होऊ शकतो.
मुक्काम : गोविंदघाट
२. दुसरा दिवस : गोविंदघाट ते घांगरीया पायी जाण्यासाठी. १४ किमीचे अंतर आहे. ८-१० तास लागतात. आपल्या क्षमता आणि वेगानुसार वेळ कमीजास्त होऊ शकतो. इथुन पुढे चार दिवस घांगरीयामधेच राहिलो. वॅली ऑफ फ्लॉवर्स, आणि हेमकुंड या दोन्हीच्या पायथ्याशी हे गाव आहे, आणि दोन्ही ठिकाणी राहण्याची सोय नसल्यामुळे याच गावी राहावे लागते.
मुक्काम : घांगरीया
३. तिसरा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये पहिली वारी. घांगरीयापासून ६ किमीपर्यंत फिरून आलो. जाऊन येउन १२ किमी.
मुक्काम : घांगरीया
४. चौथा दिवस : वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये दुसरी वारी. घांगरीयापासून १० किमीपर्यंत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फिरून आलो. जाऊन येउन २० किमी. हा दिवस राखीव दिवस आहे. हि ट्रीप मुख्यतः वॅली ऑफ फ्लॉवर्ससाठी आहे, तिचा मनमुराद आनंद घेता यावा आणि पहिल्या दिवशी काही समस्या आली, किंवा गोविंदघाटला पोहचायलाच उशीर झाला तर हा दिवस कामी येतो. काही लोक एकदाच फिरून या दिवशी आराम करणेसुद्धा पसंत करतात.
मुक्काम : घांगरीया
५. पाचवा दिवस : हेमकुंड साहिब गुरुद्वाराला जाण्यासाठी. घांगरीयापासून ६ किमी अंतर असले तरी सलग चढण चढत जायला बराच वेळ लागतो. आणि विकीपेडियावरील माहितीनुसार तेथे जाताना बऱ्याच जणांना उंचीचा त्रासहि होतो. मलासुद्धा त्या दिवशी उन लागल्यामुळे खूप त्रास झाला होता. वर लंगरमध्ये प्रसादाचे जेवण मिळते.
मुक्काम : घांगरीया
६. सहावा दिवस : घांगरीया ते गोविंदघाट पायी परत. उतार असल्यामुळे येतानापेक्षा निम्म्या वेळात प्रवास होतो. याच दिवशी वेळ उरल्यास बद्रीनाथ आणि मानाला भेट देता येते.
मुक्काम : गोविंदघाट
७. सातवा दिवस : गोविंदघाट ते हरिद्वार परतीचा प्रवास. पुन्हा तेवढाच वेळ. आम्ही मध्ये थांबून लक्ष्मण झुला पाहून घेतला. हरिद्वारला जाऊन रात्री दिल्लीसाठी मसुरी एक्स्प्रेस पकडली. हि जनशताब्दीपेक्षा संथ जाते. आम्ही मुद्दाम हि निवडली कारण त्यामुळे आमची रात्रभर झोप झाली आणि आम्ही सकाळी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीहून विमानाने मुंबई/पुणे परत.

टूर कंपनी : 

  • आम्ही ब्लू पॉपीज हॉलिडेज या कंपनीकडून गेलो होतो. 
  • त्याचे व्यवस्थापक देवकांत संगवान स्वतः आमच्या सोबत वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये आले होते. 
  • त्यांचे पॅकेज हरिद्वार ते हरिद्वार आहे. त्यातल्या गोष्टी याप्रमाणे
    • हरिद्वारला पहिल्या दिवशीचा मुक्काम 
    • हरिद्वार ते गोविंदघाटला जाण्यासाठी सदस्यांच्या संख्येप्रमाणे गाडी. 
    • हीच गाडी तुम्हाला हरिद्वारला परत सोडते. 
    • गोविंदघाटचा मुक्काम (त्यांनी स्वतः चालवायला घेतलेले चांगले हॉटेल आहे )
    • घांगरीयामध्ये ४ रात्रींचा मुक्काम 
    • घांगरीयामध्ये असेपर्यंत सर्व जेवणे (न्याहारी, दुपारच्या जेवणाचे पार्सल सोबत घेऊन जाण्यासाठी, रात्रीचे जेवण)
    • वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये जाताना सोबत गाईड 
  • शुल्क : १५-१८ हजार. मुद्दाम अंदाज देत आहे. ग्रुपमधली सदस्यांची संख्या, जातानाची वेळ, किती आधी आरक्षण केले आहे, आणि किती घासाघीस केली आहे यानुसार शुल्क कमीजास्त होईल. 
  • त्यात पुन्हा या वर्षी त्यांनी वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस वगळण्याचा, आणि सोबत औली पाहून येणाचा पर्याय उपलब्ध केला आहे. त्यामुळे शुल्क वेगळे असेल. 
  • मला त्यांची सेवा चांगली वाटली. ते ठिकाण दुर्गम आहे. राहण्याखाण्याची चांगली सोय झाल्यामुळे आपल्याला जास्त काही बघावे लागत नाही. 
  • आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वॅली ऑफ फ्लॉवर्समधला ज्यादा दिवस आणि जास्त खोलात जाऊन फिरणे हे फक्त तेच करून आणतात. तुम्ही प्लान करताना याची खात्री करून मग जाऊ शकता. 
  • त्यांची वेब साईट : http://www.valleyofflowers.info/ 
  • यावर खूप सविस्तर आणि चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. 
  • देवकांत संगवान यांनी स्वतः काढलेल्या फुलांच्या आणि पक्ष्यांच्या छायाचित्रांचे संकलन करून एक फोटो बुक दिले आहे. यात सुंदर फोटोज आणि उपयुक्त माहिती आहे. 
  • काही कंपन्या तंबूमध्येसुद्धा व्यवस्था करून देतात, त्याचा खर्च बराच कमी असू शकतो. पण तंबू लावलेल्या जागेपर्यंत जाण्यायेण्यामुळे अंतर वाढू शकते.
इतर खर्च : 
  • वर दिल्याप्रमाणे घांगरीयामध्ये आपला मुख्य मुक्काम असतो, तिथली जेवणे मुख्य शुल्कात असल्यामुळे आपल्याला फक्त घरून तिथे पोहचेपर्यंत, आणि तिथून घरी जाईपर्यंतचा खाण्याचा खर्च करावा लागतो. 
  • हरिद्वारला जाणे आणि येणे हा खर्च आपला असतो. 
  • याखेरीज आपण काही खरेदी केली तर. 
    • खरेदी करण्यासारखे काही विशेष नाही. पण गरम कपडे, टोप्या, ट्रेकिंगचे साहित्य अशा गोष्टी सोबत आणल्या नसतील तर इथे घेऊ शकता. 

कधी जावे : 
यात काही फार पर्याय उपलब्ध नाहीत. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ जमतो, तो उन्हाळ्यात वितळायला सुरुवात होते. इथे फक्त पावसाळ्यात जाता येते. प्रत्येक फुलाचा स्वतःचा हंगाम असतो. हे बर्फ लवकर किंवा उशिरा वितळण्यावर अवलंबून आहे. जुलैच्या दुसऱ्या भागात आणि ऑगस्टच्या पहिल्या भागात हा सर्वाधिक फुले असण्याचा काळ. जुलै हाच जास्त चांगला म्हणतात. पण आम्ही जुलैमध्ये गेलो, तरी यावर्षी बर्फ उशिरा वितळल्यामुळे फुले उशिरा आली. म्हणून मी ऑगस्टचा पहिला भागसुद्धा म्हणतोय.

घांगरीयामधल्या सोयीसुविधा :

  • घांगरीया या गावात फक्त पावसाळ्यात हंगामी वस्ती असते. त्यामुळे येथे मर्यादित हॉटेल्स आहेत. 
  • ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतात. पण किंचित जास्त भावाने. 
  • सर्वाधिक महाग टेलिफोन आहे. एका मिनिटाचे १० रुपये घेतात. 
  • इथे फक्त बीएसएनएल आणि आयडिया चालते असे आम्हाला सांगितले होते. पण आमच्यापैकी ज्यांनी मुद्दाम हे फोन नंबर आणले होते त्यांचेसुद्धा इथे काही चालले नाहीत. 
  • बहुधा फक्त उत्तराखंड सर्कलचे चालत असावेत. 
  • गोविंदघाटला पोचल्यानंतर फोन बंद पडतात. त्या आधी मात्र सर्वांचे चालू होते. 
  • त्यामुळे येथे येताना रोमिंग सुविधेची खात्री करून या. 
  • बाकी आम्ही थांबलेले प्रिया हॉटेल राहण्यासाठी ठीक ठाक होते, येथली सर्व हॉटेल्स तशीच आहेत. 
  • सेवा मात्र तत्पर होती. 
  • जेवण सर्व ठिकाणी उत्तम होते. 
काय बदलू शकता?

  • वेळ असल्यास पुणे/मुंबई ते दिल्लीपर्यंतचा (आणि परतीचा) हाच प्रवास ट्रेनने सुद्धा होऊ शकतो. त्यात एका वेळेस एक दिवस अख्खा जातो. पण भाडे कमी लागते. काही महिने आधीपासून बेत आखल्यास विमानाचे तिकीटसुद्धा स्वस्तात मिळू शकते. 
  • बद्रीनाथ आणि माना आमच्या प्लानमध्ये घांगरीयाहून गोविंदघाटला लवकर पोचता आले तरच शक्य आहे. आणि दुपारी ३-४ नंतर कधीही रस्ते बंद होतात. तिकडे जाण्याची जोरदार इच्छा असेल तर मुक्काम वाढवून त्यासाठी एक दिवस राखीव ठेवू शकता. 
  • हरिद्वार आणि आसपासची तीर्थक्षेत्रे पाहण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. 
तयारी 
  • ट्रीपसाठी वर दिलेल्या साईटवर सविस्तर माहिती आहे. 
  • त्याखेरीज मला जाणवलेल्या गोष्टी 
    • तुमच्याकडे अगोदरच असल्यास ट्रेकिंग स्टिक सोबत बाळगा 
    • किंवा गोविंद घाट हून जाताना ३०-४० रुपयात लाकडी स्टिक मिळेल ती घ्या. 
    • हिचा चढताना फार उपयोग होतो. 
    • चालण्याचा रोजचा सराव नसेल तर काही आठवडे आधी नक्की सराव करा आणि आपली क्षमता वाढवा. 
    • सवय नसेल तर इथे अचानक एवढे किमी चालून त्रास होऊ शकतो, आणि तुम्ही आनंदास मुकु शकता. 
अजुन काही माहिती हवी असल्यास मला विचारा. हिमालय आयुष्यात किमान एकदा तरी पहावाच. आमची ट्रीप एकदम जोरदार झाली. आयुष्यभर लक्षात राहील. तुम्ही गेलात तर तुमचीसुद्धा तशीच होवो अशी आशा करतो. 

Thursday, February 25, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ८ : बद्रीनाथ आणि हरिद्वार

मागच्या पोस्टमध्ये मी बद्रीनाथ आणि जवळचे भारतीय सीमेवरचे अंतिम गाव माना येथे जाऊन आल्याचे वर्णन केले आहे. पण बद्रीनाथला थोडा संतापजनक अनुभव आला, त्याबद्दल सविस्तर सांगायचं होतं. मागची पोस्ट हि प्रामुख्याने महाभारताच्या खुणांवर होती.


बद्रीनाथला आम्ही गेलो आणि अनपेक्षित रित्या अगदी सहज पटकन दर्शन झाले. प्रवेशद्वारावर मोठी घंटा आहे ती वाजवून आम्ही आत गेलो. गर्दी नसल्यासारखीच होती. एक साधूबाबा आम्ही न बोलावताच समोर आले. "इधर से जाओ, यहा से अंदर जाना है" अशा सूचना द्यायला लागले.


आत गेलो, आतमध्ये अगदी बारीक चार पाच मुर्त्या होत्या. त्यांच्याभोवती दागिने, फुले, हार यांची इतकी रेलचेल होती कि त्यातली कोणती मूर्ती कोणाची हेच कळत नव्हते. त्यामुळेच एक गुरुजी माइक घेऊन बसले होते. त्यांची कमेंटरी चालू होती. "आपके दाये बाजू ये है, बीच मे ये है. वगैरे."

मला मंदिरात दान दिलेले आवडत नाही. (त्याबद्दल सविस्तर येथे वाचा.) त्यामुळे बद्रीनाथाला काहीही न चढवता मी बाहेर आलो.

बाहेर ते मघाशीचे बाबा पुन्हा भेटले. मंदिरात चारी बाजूला आणखी लहानसहान मंदिरे आहेत. आम्ही प्रदक्षिणा मारत तिथे फिरतच होतो. हे आमच्या मागेमागे, "अब यहा, अब वहा" करत फिरत होते.

समोर आमचे काही मित्र एक दुसरे बाबा आसनावर बसले होते त्यांच्याभवती उभे होते. ते काहीतरी लक्ष देऊन ऐकत आहेत असं वाटलं. मला वाटलं चेहरा पाहून भविष्य वगैरे सांगत असतील म्हणून मला जरा कुतूहल वाटलं. मी तिथे गेलो. ते फक्त तोंडाला येईल तो आशीर्वाद देत होते, आणि टिळा लावत होते. आणि हि सेवा अर्थातच मोफत नव्हती. आम्ही पामर तो साधूचा आशीर्वाद समजून पुढे निघालो तेव्हा त्यांनी थाळी वाजवून दक्षिणा वसूल केली.

मंदिरात फिरून झाले आणि बाहेर निघालो कि हे मागे फिरणारे बाबा दक्षिणा मागायला लागले. जे कोणीही सांगायची आवश्यकता नाही, असली माहिती स्वतःहून भाविकांच्या मागे फिरून देऊन त्याची दक्षिणा त्यांना अपेक्षित होती. त्या आशीर्वादवाल्या बाबांकडे तरी मी स्वतःहून गेलो होतो, ह्या अनाहूत माणसाला काही देणे शक्यच नव्हते. मी त्यांना नकार दिला.

तेव्हा त्यांनी हात उंचावून शिव्याशाप द्यायला सुरु केले. "वाह रे भक्त. वापस मत आना यहा." मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर गेलो.


देवकांत यांनी मानाहून येताना नीलकंठ शिखर दाखवले होते. आणि ते म्हणाले कि हे दिसायला पुण्य लागते. ते शिखर खूप कमी वेळा दिसते. बऱ्याचदा ढगांमध्ये गुडूप होते. ते आता पुन्हा दिसत होते. आम्ही त्याचे फोटो काढत होतो.


तोच अजून एक बाबा माझ्याजवळ आले. म्हणाले, "बेटा यात्रापर निकला हु, एक छाता या ऐसी कोई काम कि चीज दिलवा दो." येउन त्यांनी सरळ ऑर्डरच दिली. ५-१० रुपयात खुश होणारे भिक्षुक नव्हते ते.

मी त्यांना नकार दिला आणि किंचित दूर गेलो. बाकी जणांना पुन्हा मलाच असा बाबा येउन भेटला म्हणून जरा हसु आलं. तोपर्यंत या बाबांनीसुद्धा रागारागात बडबडायला सुरु केलं.

"कलयुग है बेटा, कलयुग!!! नारायण कि सेवा नाही करोगे, तो यहा आनेका क्या फायदा? दरिद्र नारायण जानते हो? यु हि तो बाड आती है. तुम जैसे लोग ले डूबोगे दुनिया को."

त्यांच्याकडेसुद्धा दुर्लक्ष करून आम्ही गावात, बाजारात थोडा फेरफटका मारला. फिरत फिरत गाडी लावली होती तिकडे गेलो.



तिथे एक सगळी चाके काढलेला टेम्पो उभा होता. देवकांत यांनी आम्हाला त्याबद्दल एक गमतीशीर गोष्ट सांगितली. खरी कि खोटी माहित नाही. त्या गाडीच्या मालकाने खोटा विमा अर्ज दाखल केला होता. गाडी व्यवस्थित असूनसुद्धा ती पुरात वाहून गेली असा अर्ज केला. विमा कंपनीने तो दावा खोटा असल्याचे सिद्ध केले आणि तो मालक तुरुंगात गेला. तेव्हापासून टेम्पो तिथेच पडून होता. मालक दूर तुरुंगात असल्यामुळे बाकी भामट्यांनी बिनधास्त तिची चाके लंपास करून टाकली.

बद्रीनाथहून आम्ही परत गोविंदघाटला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हरिद्वारला निघालो. आजचा दिवस फक्त या प्रवासासाठी होता. येताना आम्ही या भागात पोचलो तेव्हा अंधार झाला होता. त्यामुळे आम्हाला काहीच दिसले नव्हते. तेच सौंदर्य आता जाताना पाहत होतो. हिमालय सोडून तिथून निघण्याची इच्छा होत नव्हती.

गोविंदघाटवरून थोडं खाली जोशीमठच्या पुढेमागे आमचे मोबाईल पुन्हा सुरु झाले. आणि उत्तराखंड पोलिसकडून मेसेज यायला सुरुवात झाली. जाताना आम्हाला येताना लागली होती त्याहून मोठी दरड कोसळली होती. त्यामुळे भरपूर आधीपासून मार्ग वळवला होता. थोडाथोडा वेळ काही ठिकाणी वाहतूक खोळंबून राहत होती, पण तासंतास एका ठिकाणी थांबावं लागलं नाही.

गाडीत आमचा अंताक्षरीचा गेम रंगला होता. वाटेत थांबून लक्ष्मण झुला पाहिला.




संध्याकाळी हरिद्वारला पोचलो. तेव्हा रात्रीच्या ट्रेनला काही तासांचा वेळ शिल्लक होता. आम्ही फ्रेश होण्यासाठी आणि आराम करण्यासाठी दोन रूम घेतल्या. हॉटेलवाल्यांनी आमची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, होईल तितकी घासाघीस करून आम्ही रूम ताब्यात घेतल्या.

आमच्यापैकी काही जणांना घाटावरची आरती पाहण्याची खूप इच्छा होती. पण बाथरूम दोनच असल्यामुळे आवरायला वेळ लागला. इथे पोचल्यावर सगळे थकले होते. कोण नक्की येणार, थांबणार काही समजत नव्हते. फक्त काही मिनिटे शिल्लक होती. आणि वेळ पुढे सरकत होता. अरूप आणि अमित जास्त थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून मी तोंड धुवेपर्यंत पुढे पळाले.

मी तसाच ओल्या तोंडाने हॉटेलच्या बाहेर पळत आलो. घाटापर्यंत मी पळत तर पोचू शकणार नव्हतो. म्हणून मी तडक समोर आली ती सायकल रिक्षा केली. तोच निखिलसुद्धा मागे पळत आला, आणि माझ्या सोबत बसला. ह्या पळापळी मुळे काहीजण थोडे नाराज झाले. त्यांना पण यायचे होते. :D.

आमची सायकलरिक्षा सवारी मजेदार झाली. हिंदी पिक्चरमध्ये उत्तर भारतातली शहरे, गल्ल्या, बोळी, बाजार, गर्दीतून फिरणारा कॅमेरा असं चित्रण असतं तसंच अगदी वातावरण होतं. दोन्ही बाजूला दुकाने, त्यांच्यासमोर रस्त्यावर आलेले वेगवेगळ्या गोष्टींचे ठेले, अमर्याद गर्दी, ती सगळी मुख्य रस्त्यावर फुटपाथ असल्यासारखी फिरत होती. त्यांच्यामधून वाहने नो एन्ट्रीमध्ये घुसल्या सारखी अंग चोरून वाट काढत दोन्ही बाजूने चालली होती. आमचा सायकल रिक्षावाला फुल ताकद लावून आम्हाला पुढे ओढून घेऊन जात होता. कोणाशीही आपली टक्कर होईल अशी भीती वाटतच होती तोच एका दुचाकीच्या खेटून जाण्यामुळे सायकल रिक्षा कलंडला, आणि मी खाली सांडलो.

"गिरे तो भी सर उप्पर" असे म्हणतात तसे आमचे "गिरे तो भी कॅमेरा उप्पर" असे आहे. मला त्याचीच काळजी होती. बारीक से खरचटले, पण बाकी काही नाही. पुन्हा रिक्षात बसलो आणि पुढे निघालो. घाटावर पोचलो तेव्हा आरती जस्ट म्हणजे अगदी जस्ट संपली होती. हुकलीच शेवटी.

अरूप आणि अमितसोबत अनुजासुद्धा पळत गेली होती हे तिथे गेल्यावरच समजले. ते तिघे खूप पळाले होते आणि घामाघूम झाले होते. त्यांनासुद्धा अगदी शेवटचे काही क्षण बघायला मिळाले होते, पण अगदी परिपूर्ण दृश्य दिसले नव्हते. गंगा नदीच्या घाटावर हजारो लोक आरती करताना खूप छान दृश्य असते, हे फक्त टीव्हीवर पाहिले होते, पण प्रत्यक्षात संधी हुकली होती.


मग थोडावेळ घाटावर फिरलो. हजारो लोक नदीत अंघोळी करत होते. पाण्यापेक्षा सोडलेले दिवे, साबणाचे फेस, निर्माल्य, माणसे यांचाच भरणा नदीत जास्त दिसत होता. काही लोक आरतीचे ताट घेऊन फिरत होते आणि दक्षिणा गोळा करत होते. ते मंदिराचे पुजारी आहेत का, त्यांनी कोणती पूजा केली, आरती खरोखर केली का, कि फक्त कापूर जाळून दक्षिणा गोळा करत होते काय माहित. एक ताट, दिवा, तेल आणि कापूर एवढ्या भांडवलावर आपणसुद्धा हेच करू शकतो.

झाडेझुडपे उगवल्यासारखी गंगा, भगीरथ, शंकर यांची मंदिरेसुद्धा भरपूर होती. एकेक मंदिराच्या चहुबाजूला ओटे करून आणखी मिनी मंदिरे बनवली होती. म्हणजे प्रदक्षिणा घालताना सुद्धा अजून ४ देव दिसणार, आणि त्यात लोकांना दक्षिणा घालावी वाटणार.


आणि जवळपास सर्व मंदिरांवर "असली और प्राचीन" असा बोर्ड लावला होता. प्राचीन ठीक आहे एक वेळ, पण असली मंदिर म्हणजे? देवांची पण पायरसी होते कि काय इथे? कुठल्या दुकानावर शोभतील असले बोर्ड होते ते. बरोबरच आहे म्हणा. इतक्या हजारो लाखो भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेला सेवा पुरवणारी मोठी व्यावसायिक चेनच ती, त्याच्या सगळ्या शाखा. त्यात स्पर्धा, म्हणून आम्हीच असली आणि प्राचीन अशी जाहिरात.

नदीतले पाणी पाहता त्यात जायची इच्छा होत नव्हती. तरी आपली पण सुप्त श्रद्धा, आणि "हरिद्वार आए और गंगा नही नहाए" असं नको व्हायला म्हणुन दूर एका गर्दी नसलेल्या कोपऱ्यात थोडा पाण्याला स्पर्श करून आलो.

थोडी भूक लागली होती, येताना चाटची मोठी दुकाने पाहिली होती. चाट, पूजा साहित्य, कपडे, प्रवाशांना लागणाऱ्या गोष्टी या सगळ्याची बरीच दुकाने होती. आणि त्यातल्या काही दुकानांवरसुद्धा "प्राचीन और प्रसिद्ध" असे बोर्ड होते.

एका दुकानात खूप गर्दी होती म्हणून तिथली कचोरी खाल्ली. नाव मोठं लक्षण खोटं. बस एवढंच वर्णन पुरे. ती गर्दी लौकिकामुळे नसावीच, फक्त आलेले लोकच इतके होते कि प्रत्येक ठिकाणी गर्दीच होती.

अजून काही खाण्याची इच्छा राहिली नाही. तसेच परत गेलो. जेवायला एका हॉटेलवर गेलो. जेवण होता होता जोरदार पाउस सुरु झाला. आमची थोडी फजिती झाली. अगदी समोर पलीकडे असलेल्या स्टेशनवर आम्हाला सामान सुखरूप पोचवायला रिक्षा कराव्या लागल्या.

आम्ही स्टेशनवर पोचल्यावर अगदी थोडाच वेळ तो पाउस टिकला. फक्त आमची फजिती उडवायलाच आला होता.

रात्री उशिराची संथ गतीने जाणारी ट्रेन होती. माझी जागा जरा दुसरीकडे होती. जागेवर पोचून थोड्यावेळात मी झोपून गेलो. सकाळी दिल्लीला पोचलो.


स्टेशनबाहेर आम्ही एक सोबत ट्रीपमधला शेवटचा सेल्फी/ग्रूपी काढला आणि आम्ही पांगलो. प्रत्येकाचे वेगळ्या वेळी वेगळ्या ठिकाणी विमान होते.

मध्ये वेळ असल्यामुळे आम्ही ४ जण ममताच्या घरी जाऊन आलो. काकूंनी अगदी चविष्ट पुरी भाजी करून आम्हाला तृप्त केलं. विमानतळावर जाऊन परतीचं विमान पकडलं आणि एक जबरदस्त सहल संपली. 

Tuesday, February 9, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा

दोन दिवस वॅलीमध्ये आणि एक दिवस हेमकुंड साहिब, असे आमच्या योजनेनुसार पार पडल्यावर घांगरीयामधला मुक्काम संपला. सकाळी आम्ही आवरून परत गोविंदघाटकडे निघालो. आता फक्त उतरणे असल्यामुळे सगळेच न थांबता आपल्या आपल्या वेगाने फटाफट उतरले. चढताना ६-७ तास लागले होते. तेच आता उतरताना २-४ तासात झालं.

आजचा दिवस गोविंदघाटला पोहोचणे आणि वेळ असल्यास बद्रीनाथ, माना पाहून येणे आणि आसपास फिरणे यासाठी होता. आम्हाला साहजिकच सगळंच करायचं होतं. देवकांत यांना आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला हि ठिकाणे पहायची म्हणजे पहायचीच आहेत असे बजावले होते. कारण ह्याचा विषय निघाला कि ते "देखते है, आप कब पोहचोगे, रास्ते खुले है कि नही, बहोत सारी चीझोंपे डिपेंड करता है. सब कुछ सही होगा तो मै तो करा हि दुंगा." अशी वाक्ये वापरत होते.



त्यामुळे आम्ही उतरताना बिलकुल टंगळमंगळ न करता झपाट्याने खाली आलो. पण तरी आम्हाला थांबावं लागलं. 

झालं असं कि आम्ही वर जाताना सामानासाठी दोन पोनी केल्या होत्या. तश्याच त्या येताना सुद्धा ठरवल्या. पण त्या पोनीवाल्यांनी एक घोळ घातला. ते सगळे सोबत काम करतात, त्यामुळे एकमेकांना मदत करत सोबत खाली वर जातात. एका माणसाने त्याची बायको आणि छोटी मुलगी यांच्यासाठी एक पोनी केली, आणि त्यांच्या सामानासाठी दुसरी. तो स्वतः पायीपायी खाली आला. त्यांचं सामान कमी होतं. त्यामुळे त्यांच्या पोनीवर भार हलका होता. पोनी अर्धी रिकामीच जात आहे म्हणून या पोनीवाल्यांनी आमच्या सामानापैकी काही सामान त्यावर टाकलं. 

आणि ह्या पोनी पुढेमागे झाल्या. आमचं सामान एकत्र आलं नाही. म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि मग जेव्हा त्या माणसाची पोनी आली आणि त्याने त्याच्या सामानासोबत दुसरं सामान पाहिलं तेव्हा त्याने पूर्ण पैसे द्यायला नकार दिला. त्याने वर एका पूर्ण पोनीचे पैसे द्यायला तयारी दाखवली होती. पण त्याच्या पोनीवर सामान टाकलं म्हणून त्याने आता नाही म्हटलं. 

यावरून बराच वेळ वाद झाला. आमचं सामान जाताना पण दोन पोनीवर गेलं होतं, आणि येताना पण आलं असतं. त्यांना भार हलका करता येईल असं वाटलं म्हणुन त्यांनी कोणाला न विचारता परस्पर करून टाकलं. आमचे गाईड मध्ये पडले आणि आम्ही तिथून निघालो. 

पण रस्त्यात दगडधोंडे रस्त्यात पडले होते. ते हटवायचं काम सुरु झालं होतं. तिथे थांबुन पुन्हा अर्धा एक तास गेला. 

हॉटेलवर पोहचून होईल तितकं लवकर आवरून आम्ही जेवलो. आणि बद्रीनाथला निघालो. देवकांत स्वतः आमच्या ग्रुपबरोबर निघाले. तिथे रस्ते परिस्थितीनुसार कधीही बंद करतात म्हणून ते टेन्शनमध्ये होते. 

आधी आम्ही बद्रीनाथला गेलो, पण तिथे आरती का काहीतरी चालू होती. त्यामुळे दर्शन बंद होतं. मग आम्ही तोपर्यंत पुढे मानाला जाऊन आलो.



माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव आहे. त्यानंतर तिबेट/चीनची हद्द सुरु होते. गावाच्या हद्दीवर काही दुकाने आहेत. त्यांनी हिंदुस्तानकि अंतिम दुकान, हिंदुस्तानकि अंतिम चाय, हिंदुस्तानका अंतिम पकोडा, असल्या मजेशीर पाट्या लावल्या होत्या.



पुढे काही अंतरावर प्रसिद्ध वसुधारा धबधबा आहे. लोक इथे पण ट्रेक करतात.



डोंगराच्या खोबणीत एक बाबा धुनी पेटवून बसला होता. पूर्ण चेहऱ्याला भस्म लावलं होतं. बाजूला "बाबा बर्फानी नागा बाबा. बाबा कोणाला काही मागत नाहीत, लोकांना स्वतःला काही द्यावे वाटल्यास देऊ शकतात." अशा आशयाची पाटी लावली होती.



बरेच लोक त्याचा फोटो काढत होते. बाबाला सवय असावी फोटोंची, मला त्याचा लक्ष नसताना फोटो काढायचा होता, पण त्याचं लक्ष गेलं आणि हात उंचावून पोज दिली. 

माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव एवढंच ऐकलं होतं. पण तिथे गेल्यावर महाभारताचं एक पर्वच सुरु झालं. त्या गावात महाभारताच्या भरपूर खुणा दिसतात. 

त्या अंतिम दुकानाजवळ एक मोठ्ठा धबधबा/सरस्वती नदीचा उगम आहे. अत्यंत जोराने मोठ्या आवाजात तिथून पाणी कोसळत असतं. (खालील व्हिडीओ पहा) तिथल्या सांगण्यानुसार हि सरस्वती नदी. ती उगमापासून एवढ्या जोराने वाहते, आणि पुढे काही अंतरावर अलकनंदा नदीमध्ये मिसळून जाते. पण अलकनंदा नदीचा प्रवाह शांतच राहतो, आणि ह्या जोराचा अथवा वेगाचा परिणाम दिसत नाही, म्हणून सरस्वती नदी लुप्त होते असं इथलं स्पष्टीकरण आहे.



सरस्वती नदीच्या असण्या-नसण्याविषयी, लुप्त होण्याविषयी, आणि जागेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यापैकी हा एक.



त्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला जोडणारी एक मोठ्ठी शिळा आहे. तिला "भीम पूल" म्हणतात. त्याची कथा अशी कि, ती मोठी शिळा तिथे भीमानेच उचलून टाकली आणि पुढे जायला रस्ता केला. ह्याच रस्त्याने पांडव पुढे स्वर्गात गेले. 



त्याच गावात व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. तिथेच राहून त्यांनी महाभारताचे लेखन केले अशी आख्यायिका आहे. जायची प्रचंड इच्छा असूनही देवकांतनी आम्हाला तिथून धावत पळत बद्रीनाथला नेलं. 



बद्रीनाथचं अगदी सहज दर्शन झालं. पण तिथल्या बुवांचा वाईट अनुभव आला. पण त्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये लिहितो. आज फक्त महाभारताविषयी.



मग परतीच्या रस्त्यावर लागलो, आणि धोकादायक भाग पार झाल्यावर शेवटी देवकांतचा जीव भांड्यात पडला.



परतीच्या वाटेत एक जागा आहे हनुमानकि चट्टी. याच जागी भीमाचा रस्ता अडवून हनुमानाने त्याचे गर्वहरण केले अशी पौराणिक कथा आहे.



हॉटेलवर पोहोचलो तेव्हा नुकतीच संध्याकाळ झाली होती. आम्ही पुन्हा आसपास फिरायला गेलो. देवकांत नि एक गाईड सोबत दिला. 

आम्ही पांडव मंदिरांकडे निघालो. रस्त्यात जाताना आधी एक इंद्रधनुष्य दिसले.



नंतर बोनस म्हणून आणखी एक पुसटसे.



पांडू राजाला नपुंसकतेचा शाप होता. त्याची पौराणिक कथा अशी कि एका ऋषीने पांडू राजाला तो आपल्या राणीजवळ कामेच्छेने जाताक्षणी मरण पावेल असा शाप दिला होता. वास्तववादी दृष्टीकोनातून महाभारत लिहिणारे लेखक हा भाग वेगळ्या पद्धतीने लिहितात. अपत्यहीन असलेला निराश राजा आपल्या दोन राण्यांना घेऊन हिमालयात आला. तो याच ठिकाणी राहत होता आणि तप करत होता. 

दोन्ही राण्यांना नियोग पद्धतीने देवांकडून (काहींच्या मते त्या काळी हिमालयात राहत असलेल्या योद्धा जमाती) संतती झाली. ते काही वर्षे तिथेच राहत होते. पण पांडू राजा माद्रीजवळ मोहाने गेला आणि मरून गेला. माद्री सती गेली. आणि एकटी पडलेली कुंती पाचहि मुलांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरला गेली.



पुढे पांडव जेव्हा वनवासात फिरत असताना या ठिकाणी आले, तेव्हा भीमाने या ठिकाणी पांडू राजाच्या तपाच्या जागेवर मंदिर बांधले. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारे हि कथा सांगितली.

ह्या मंदिराचे आणखी महत्व म्हणजे बद्रीनाथ जेव्हा बंद केले जाते तेव्हा बद्रीनाथची पूजा याच देवळात केली जाते. 

मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकांमध्ये या घटना आहेतच. पण त्या ह्या जागी घडल्या असे म्हटल्यावर सगळे महाभारत डोळ्यासमोरून सरकते. 

काहीजण रामायण महाभारत फक्त कल्पनाविलास मानतात. काहीजण इतिहास मानतात. तर काहीजण अतिरंजित वृत्तांत मानतात. मला तसेच वाटते. 

ह्या दोन्ही महाकाव्यांचा भारतीय समाजावर प्रचंड पगडा आहे. भारतभर अशा अनेक खुणा आहेत. आणि प्राचीन आहेत. शेकडो वर्षांपासून आहेत. द्वारका आहे, मथुरा आहे. मृत्युंजय आणि युगंधरच्या शेवटी बऱ्याच ठिकाणांचे फोटो आहेत. पाचगणीला पांडवांची पावले दाखवतात. दक्षिणेत कुठेतरी दुर्योधनाचेहि मंदिर आहे.

जर ह्याला फक्त साहित्य मानले, तर देशभरात वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ह्या खुणा स्वतःच बनवल्या असे समजायचे?

इंग्लंडला शेरलॉक होम्सचे असे घर आणि संग्रहालय आहे. लोक त्या पात्राच्या एवढे प्रेमात पडले कि २२१ बेकर स्ट्रीटवर त्याचे घरच बांधले, त्याच्या प्रसिद्ध वस्तू आणुन ठेवल्या. आपल्याकडे हा उद्योग फार आधीपासुन चालू आहे म्हणायचा मग.

आता देऊळ सिनेमात दाखवलं आहे तसं गावाचं महत्व वाढण्यासाठी एक देऊळ त्याची महती कृत्रिम पद्धतीने वाढवून गावातली आवक जावक वाढवता येते. पण तसं इथे झालंय असं वाटत नाही. पण ह्या गोष्टी भारतात पर्यटन हा उद्योग नसल्यापासून केवळ श्रद्धेवर आधारलेल्या आहेत.

त्यामुळेच मला अतिशयोक्तीचा भाग किती हे सांगता येत नाही, पण ती पुटे बाजूला केली तर काही तरी सत्यांश ह्या कथांमध्ये दडला असावा असं वाटतं.



आजसुद्धा हे भाग एवढे दुर्गम आहेत. बरेच दिवस रस्तेच बंद असतात. आणि चालू असले तरी कधी खराब होतील, बंद होतील सांगता येत नाही. अशा ठिकाणी येउन हि मंदिरे कोणी बांधली असतील? त्याची माहिती कशी पसरली असेल? कुठल्या ओढीने ह्या ठिकाणी वर्षानुवर्षे भक्त येत असतील?

हिमालयाचं सौंदर्य फारच गूढ आहे. आसक्ती आणि विरक्ती असे दोन्ही परिणाम साधणारे हे अनोखे सौंदर्य. ह्याच्या प्रेमात पडून लोक वारंवारसुद्धा येतात. काही लोक विरक्तीमुळे इथेच येउन राहतात. उगाच नाही तप म्हटले कि हिमालय डोळ्यासमोर उभा राहत.

त्या बर्फानी बाबा सारखे जगाची फिकीर नसणारे आत्म मग्न लोक असेच हिमालयाच्या कडेकपारीत बसत असतील. ऋषी तपासाठी येत असतील. महाभारतातच पांडव विशेषतः अर्जुन तर कितीतरी वेळा हिमालयात येउन गेले. काहीतरी खास जादू आहे ह्या हिमालयात.

महाभारत, हिमालय, आसक्ती, विरक्ती असे अनेक विचार त्या वेळी मनात तरळून गेले, आणि त्या खुणा मनावरही कोरून गेले. 

Wednesday, February 3, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे.

वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता. पण त्यादिवशी सुद्धा सकाळी पाउस पडल्यामुळे आम्ही सावधगिरी म्हणून हेमकुंडला गेलो आणि नंतर कडक उन पडून आमची फजिती झाली.

आता आज खरोखरीच शेवटचा दिवस होता. आज पाऊस पडो कि न पडो, धुकं असो वा नसो आम्हाला वॅलीमधेच जाणे भाग होते. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला घांगरीयामधून पुन्हा गोविंदघाटकडे निघायचे होते.

आमचे मॅनेजर देवकांत यांनी सांगितलेच होते, कि एकदा वॅलीमध्ये जाऊन आल्यावर सहसा लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्यात आळशीपणा करतात, आणि हेमकुंडला जाऊन येउन आराम करतात, किंवा हेमकुंडला जाण्याआधी एक दिवस घांगरीयामधेच जवळपास वेळ घालवतात.

सकाळी आमच्या ग्रुपमधूनसुद्धा थोडी गळती होईल अशी चिन्हे दिसत होती. आदल्या दिवशी हेमकुंडला जाऊन आल्यामुळे सगळ्यांना थोडा थकवा तर आलाच होता. पण शेवटी एकमेकांच्या उत्साहाचा सगळ्यांवर परिणाम झाला आणि सगळेच जण निघाले.

असे म्हणतात कि जे होते ते चांगल्यासाठीच ते खरे वाटावे असा त्या दिवशीचा अनुभव होता. सकाळपासुन थोडं ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे वॅलीमध्ये पोहचेपर्यंत तिथे फिरून येईपर्यंत धाकधुक चालू होती. पण पाऊस पडला नाही.

मध्ये चढताना काही वेळ उन पडून गेले, थोडासा त्रासही झाला. पण पुन्हा गेले आणि वातावरण जरा सुखद झाले. माझी आणि निखिलची पुन्हा वेगळी गम्मत झाली. आम्ही चढताना थोडे मागेच होतो. काही वेळ मी सगळ्यात मागे होतो. आणि माझ्या थोडं पुढे निखिल. उन्हामुळे त्राण कमी होऊन माझा वेग खूपच मंदावला होता. पण मी आज ठरवलं होतं कि कितीही वेग कमी असला तरी चालत राहायचं. उभ्या उभ्या थांबून लगेच निघायचं. निखिल काल सारखाच पुन्हा पुन्हा थांबत होता. पण मी त्याच्या जवळ पोचलो कि तडक पुढे जात होता. रस्ता चिंचोळा होता म्हणून ओव्हरटेक करता येत नव्हतं. आणि मलाही खूप वेगात पुढे जायचं नव्हतं म्हणुन मी त्याच्या मागेच चालत होतो. पण मला मजा वाटत होती.

थोड्यावेळाने आम्ही एका झऱ्यापाशी पाणी प्यायला थांबलो. बाकी काहीजण पण होते. तिथुन रस्तापण जरा मोठा होता. आणि वॅलीपण जवळ आली होती. मी पाणी पिउन ताजातवाना झालो आणि मग जवळपास न थांबताच पुढे गेलो.

आज ग्रुपमधल्या लोकांमध्ये तसं खूप जास्त अंतर नव्हतं. निखिल जेव्हा पोचला तेव्हा त्याने सांगितलं कि काल जसे आम्ही दोघंच मागे राहिलो होतो, तसं होईल असं त्याला वाटत होतं. पण माझी परिस्थिती कालपेक्षा बरी होती म्हणून मी पुढे गेलो तर तो एकटाच राहिला असता आणि त्याला मग पुढे यायचा उत्साह कमी झाला असता, म्हणून तो मला येऊ देत नव्हता. :D. पण आज उन तुलनेने कमी असल्यामुळे, आणि बाकीचे खूप पुढे नसल्यामुळे काल इतकी वाईट परिस्थिती नाही झाली.

घांगरीया हे छोटेसे गाव आहे. तिकडे फक्त पावसाळ्यात लोक जाऊन दुकाने हॉटेल्स चालवतात. त्यामुळे तिथली क्षमता मर्यादित आहे. म्हणून टूर कंपन्या गट करून साधारण एकाच वेळापत्रकानुसार लोकांना तेथे आणत असाव्यात.

स्वतःच्या योजनेनुसार, किंवा तंबूमध्ये सामानसुमान घेऊन येणाऱ्या गटांबद्दल मी बोलत नाही. किंवा हेमकुंडच्या दिशेने जाणाऱ्या शीख यात्रेकरू यांच्याबद्दलसुद्धा नाही. त्यांना गोविंदघाट, आणि घांगरीया या दोन्ही ठिकाणी अजून गुरुद्वारा आहेत, तिथे आसरा, मदत मिळते.

पण जसा आमचा मुळात आदला दिवस वॅलीसाठी होता तसाच बाकी अनेक जणांचा सुद्धा होता. आम्हाला वॅली पावसाशिवाय पाहण्याची अति हौस असल्यामुळे फक्त आम्ही तो दिवस टाळून हेमकुंडला गेलो. पण बाकी सगळे जण थांबले किंवा वॅलीमध्येच गेले.



त्यामुळे आज फक्त आम्ही वॅलीमध्ये गेलो. बाकी एखाद दुसरे एकटे फिरणारे परदेशी लोक सोडता वॅलीमध्ये कोणीही नव्हते. वॅली आमच्यासाठी राखून ठेवल्यासारखी वाटत होती.

भरपूर भटकलो आम्ही. खूप दूरपर्यंत जाऊन आलो. पहिल्या दिवशी आम्ही घांगरीयापासून साधारण ६ किमीपर्यंत आलो होतो. आज १० किमी आलो. म्हणजे आजची पूर्ण पदयात्रा २० किमीची होती.


पाउस नसल्यामुळे दूरपर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं. आधी एवढा स्पष्ट व्ह्यू मिळालाच नव्हता.



भरपूर प्रकारची फुलं असली तरी वॅली नेटवर पाहिलेल्या फोटो सारखी फुलांनी गच्च भरलेली नव्हती. हिमालय मूलतःच इतका सुंदर आहे, त्यामुळे आमच्या समोरची दृश्ये छानच होती.

पण फुलांमुळे थोडा अपेक्षाभंग झाला. गाईडकडून याचं कारण समजलं ते असं. ह्या भागात दर वर्षी पूर्ण बर्फ जमतो आणि तो उन्हाळ्यात वितळल्यावर फुले यायला सुरुवात होते. आणि मग तापमान, पाउस, यावर प्रत्येक फुलाच्या जातीचा एक हंगाम असतो. साधारणपणे जुलै महिन्यात सर्वात जास्त फुलं असतात. त्यामुळे आमची वेळ निश्चितच बरोबर होती. पण या वर्षी बर्फच जरा उशिरा वितळला होता. म्हणुन अजून म्हणावी तितकी फुले नव्हती.

    

आम्ही थोड्या मनातल्या मनात अन थोड्या उघडपणे शिव्या दिल्या. कि हे आधी सांगता येत नव्हतं का? १-२ आठवडे सुट्टी काढुन, दूरचा प्रवास करून आपण इतक्या वर येउन पोहोचल्यावर, जेव्हा थोडा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्याचं शास्त्रीय कारण ऐकून काही समाधान होत नाही. त्याच वर्षी १० जणांच्या सुट्या पुढे मागे ढकलणं अवघड आहे. पण आम्ही पुढच्या वर्षी आलो असतो.

मुद्दा असा कि, पुन्हा येणं अशक्य जरी नसलं तरी असे मोठे बेत सहजासहजी होत नाहीत. एवढ्या दूरची जागा एकदा पाहिली असेल तर आपण बेत आखताना दुसऱ्या जागांना साहजिकच जास्त प्राधान्य देतो.

पण ते शेवटी व्यावसायिक लोक. म्हणावी तितकी फुलं आली नाहीत म्हणून घेतलेली आगाऊ रक्कम परत करून आरक्षण त्यांनी स्वतःहून रद्द करणे तर अशक्यच. त्यापेक्षा आम्ही ठरवलेल्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवतो, गाईड देतो, फिरवून आणतो, फुलं कमी कि जास्त ते आमच्या हातात नाही म्हणून हात वर करणे हेच सोपं आहे.

पण मी म्हटल्याप्रमाणे "थोडा"च अपेक्षाभंग. कारण आम्हाला अनुभवायला मिळालं ते सौंदर्यसुद्धा अप्रतिम. आणि ह्या ट्रीपमध्ये बेत आखताना, जाताना, येताना, फिरताना, सगळ्याच गोष्टीत आम्ही भरपूर आनंद लुटला होता.

   

काही ठिकाणी आनंद तिथल्या वैशिष्ट्यांमुळे येतो, काही ठिकाणी आपल्या सोबत असलेल्या लोकांमुळे. आणि कधी त्या दोन्हींमुळे.



  

प्रेमकथांमध्ये त्या जोडप्याला कुठे तरी दूर दूर जाण्याची इच्छा असते असं दाखवतात. आणि संन्यासी लोकसुद्धा जगापासून वेगळे होण्यासाठी शांत जागी जातात. हि जागा तशीच होती. बाकी जगाचा काहीच संबंध नाही. एकदम शांत. सोबतचे लोक पुढे मागे झाले, किंवा फोटो काढण्यासाठी कुठे रेंगाळलो तर पूर्ण शांतता. आणि आजूबाजूला फक्त सुंदर दृश्य. वेड लावेल इतका सुंदर आहे हिमालय.

जर चाललं असतं तर तिथेच पडून राहून एक रात्र काढायची इच्छा होती. तिथे मावळणारा आणि उगवणारा सूर्य पहायची इच्छा होती. पण काय करणार?


फिरत फिरत, फोटोज काढत, भरपूर पाण्याचे ओढे पार करून आम्ही गाईडच्या मते शेवटच्या टोकाला पोचलो.


गाईडच्या मते यासाठी म्हटलं कि, त्या पुढेसुद्धा वॅली पसरलेलीच आहे. पण तिकडे कोणी जात नाही. तिकडून परत यायला इतका वेळ लागतो कि, आणि तिथे मुक्काम किंवा संध्याकाळपर्यंत फिरलेलं चालत नाही. आणि पुढे जास्त नवीन फुलेही नाहीत, आतापर्यंत पाहिलेलीच फुले इस्ततः विखुरलेली आणि कमी संख्येने दिसतात.



मग आम्ही जर निवांत एका नदीकिनारी बसलो. सोबत आणलेले डबे काढुन जेवलो. चिक्कार सोलो आणि ग्रुप फोटो काढले.



गाईड इथून लवकर परत जायला घाई करत होता. उन कमी होऊन आता पुन्हा ढग यायला लागले होते. जाताना पाऊस पडला तर रस्त्यात लागलेल्या कुठल्याही ओढ्यांचा प्रवाह वाढू शकतो असं त्याला वाटत होतं. आमच्यापैकी काही जण अजून किती पुढे जाता येईल ते बघत होते. त्याला आग्रह करून आम्ही काही जण अजून पुढे एका हिमखंडापर्यंत जाऊन आलो.

थोडासा पाउस पडला तरीही सुदैवाने गाईडला भीती होती तसं काही झालं नाही. आम्ही सावकाश, टाइमपास करत, ती इंद्राची बाग (वॅली) शेवटची डोळ्यात भरून घेत तिथून बाहेर पडलो.

---

ता. क. आज शेवटचा दिवस म्हणून प्राणी पक्षी यापैकी कसले तरी फोटो काढायचेच म्हणून परतीच्या वाटेवर जवळपास अर्धा तास खर्च करून काढलेले फोटो. खूप इकडे तिकडे पळुन हाती लागले फक्त लाल चिमणी



आणि बिन शेपटीचा पहाडी चुहा. (म्हणतात ना, खोदा पहाड, निकला चुहा. :D)



Friday, January 22, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ५ : हेमकुंड साहिब

आदल्या दिवशी वॅलीमध्ये पोहचायला आम्हाला उशीर झाला. मग उशिरामुळे आणि पावसामुळे आम्हाला खूप कमी वेळ वॅलीचा आनंद लुटता आला. आज वॅलीसाठी ठेवलेला दुसरा (जादा) आणि शेवटचा दिवस होता. त्यामुळे आम्ही आज काहीही करून लवकर पोहचुन जास्तीत जास्त वेळ वॅलीमध्ये काढण्याचं ठरवलं होतं. पण निसर्गाच्या मनात तसं काही नव्हतं.

मी आणि अरूप आधी तयार झालो. बाकीच्यांना अजून वेळ लागेल आणि पुन्हा उशीर होईल असं वाटत होतं. आम्ही खाऊन झालं कि पुढे निघतोय असं सांगुन निघालो. बाकीच्यांना अजून वेळ होता. त्यांच्यावर लवकर आवरायला दबावसुद्धा टाकायचा होता, आणि कोणी उशीर केलाच तर आज थांबुन वेळसुद्धा घालवायचा नव्हता.

आम्ही नाश्त्याला जाऊन बसलो. एक एक जण येऊ लागले. भरपूर धुकं आणि ढग होते. थेंब थेंब पाऊस सुरु झाला होता. आमचं खाणं चालू असताना जोरात पाऊस सुरु झाला. आम्ही डोक्यावर हात मारून बसलो. घ्या आता लवकर निघुन काय फायदा? सगळे येउन बसले, खाऊन झालं तरी पाउस थांबला नाही.

आम्ही बराच वेळ थांबलो. मग आमचे मॅनेजर देवकांत यांनी एक पर्याय सुचवला. कि तुम्ही आज हेमकुंडला जाऊन या. तिकडे जायला पावसामुळे काही बिघडत नाही, आणि उलट उन्हाऐवजी ढग आणि पाउस असेल तर चांगलंच. आम्हाला ते पटलं.

काही जणांनी दुपारच्या जेवण्यासाठी अंडी असलेले कॉम्बो बांधून घेतले होते. ते बदलून पूर्ण शाकाहारी गोष्टी घेतल्या. तसे हेमकुंडला जाताना लंच सोबत न्यायची गरज नसते, तिकडे गुरुद्वारेच्या लंगरमधेच जेवणे होतात. पण आज हेमकुंडचा दिवस नसल्यामुळे लंच तयार होता. आमची इच्छा होती कि अनावश्यक ओझं वाढू नये. पण देवकांत नि त्यांची टिपिकल लाइन मारलीच. "ले लो यार, मेरे पैसे तो लग गये है इसमे. गिन के बनाते है ये लोग. आप नही लोगे तो ये होटलवाला तो फेक देगा इसको. इससे अच्छा आप ले जाओ. रस्ते मे काही खा लेना."

आम्ही पुन्हा रूमवर गेलो. लवकर आवरायचं म्हणून आम्ही अंघोळीवर पाणी सोडलं होतं. आता हेमकुंड गुरुद्वाऱ्यात जायचं म्हणजे तसं कसं चालेल? पुन्हा आवरून निघण्यात वेळ गेला. मी आज कॅमेरा घेतलाच नाही. हेमकुंडला जाताना खूप उंची आणि विरळ ऑक्सिजनमुळे खूप जणांना त्रास होतो असं विकीपेडिया, आणि नेटवर वाचलं होतं आणि ऐकलंही होतं. त्यामुळे फोटोपायी त्रास वाढवुन घेण्याऐवजी मी त्या दिवसापुरतं फोन आणि बाकी लोकांच्या फोटोग्राफीवर विसंबून राहायचं ठरवलं.

आवरून निघेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला आणि थेंब थेंब सुरु होता. घांगरीयातून वॅली आणि हेमकुंडकडे जाण्याचा रस्ता एकच आहे, पुढे एका धबधब्यापाशी ते रस्ते वेगळे होतात. तिथे पोहचेपर्यंत पाउस पूर्ण थांबला. आता इकडे जावे कि तिकडे जावे असा प्रश्न होता. पण आम्ही हेमकुंडला जाणार म्हणून सगळे गाईड पुढे गेले होते. उशीर तर झालेलाच होता. कालपेक्षा कमी वेळ मिळाला असता. आणि वॅलीमध्ये दुसऱ्या दिवशी तर आम्हाला अजून लांब जायचं होत. आम्ही आता हेमकुंडलाच जाण्याचं ठरवलं.

वर जाईपर्यंत पूर्ण आभाळ मोकळं झालं आणि कडक उन पडलं. वॅलीचे डोंगर दिसत होते, तिकडे काही वेळ ढग दिसत होते. आम्ही आमची समजूत काढत होतो, कि ठीके तिकडे ढग आहेत अजून. नसतं दिसलं काही. पण तिकडे पण आभाळ साफ झालं आणि आमची फजिती झाली यावर शिक्कामोर्तब झालं.

घांगरीया ते हेमकुंड हे अंतर ६ किमी आहे. हेमकुंडची पायवाट जवळपास पूर्ण रस्त्यावर मोठी आणि प्रशस्त आहे. चालत जायचं बस. चिंचोळ्या रस्त्यावरची चढाई नाही. पण जी चढण आहे ती खूप तीव्र नसली तरी सतावत राहते. रस्ता मोठा आहे. सपाटीवरचं अंतर आणि चढाईवरचं यात हाच फरक आहे. चढताना तेच अंतर दुप्पट वाटतं.

दोन अगदी तरुण पंजाबी पोरं आमच्या पुढेमागे वर निघाली होती. त्यातल्या एकाकडे सामान होतं आणि एकाकडे गॉगल. गॉगलवाला भरपूर स्टाईल मारत होता. सामान घेऊन मागे येणाऱ्यावर लवकर चल म्हणुन दमदाटी करत होता. थोड्याच वेळात त्यांचा दम निघाला, आणि त्यांनी वाटेत भेटलेली पोनी ठरवली आणि त्यावर बसून गेले.

जसं जसं आम्ही वर गेलो तसं तसं उन भरपुर वाढलं. आणि त्यामुळे खुप त्रास होऊ लागला. भरपुर घाम येउन डीहायड्रेशन झालं. आणि शरीरातलं त्राण कमी होऊ लागलं. थांबत थांबत जाऊ लागलो. सुरुवातीला सगळे एकमेकांसाठी थांबत थांबत जात होते. पण असं खुपदा केलं कि सगळ्यांनाच थकवा येतो. आमचा बाकीचा ग्रुप आणि मी आणि निखिल यातलं अंतर वाढत गेलं. आणि नंतर तर ते दिसेनासेच झाले. त्यालासुद्धा तसाच त्रास होत होता.

आम्ही दोघं एकमेकांपासून काही पावलांच्या अंतरावर सावकाश चाललो होतो. निखिल ला खूपच त्रास होत होता. काही पावलं चालुन काठीच्या आधाराने उभ्याउभ्याच किंवा जागा मिळाली तर कुठेतरी बसुन विश्रांती घेत होता. मी आता मुद्दाम ठरवून बिलकुल बसत नव्हतो. तसं केलं कि जास्त थकवा येतो असं वाटत होतं.

आता दुपार झाली होती आणि तिकडून लोक परत येत होते आणि आम्ही पोहोचलोसुद्धा नव्हतो. आमच्या चेहऱ्यावरूनसुद्धा आमची हालत दिसत असावी. वरून परत जाणारे शीख भक्त लोक आम्हाला धीर देत होते. "कोई नई जी, पोहोच गये बस. वो उधर रहा उपर. १० मिनट मे पोहोच जाओगे." ते १०  मिनिट काही संपता संपत नव्हते.

चल थोडंच राहिलं आता असं एकमेकांना म्हणत आम्ही वर पोहोचलो शेवटी. पूर्ण शरीराची वाट लागली होती. बाकी जणांचं दर्शन झालं होतं. गुरुद्वारेचा दरवाजा पण बंद झाला होता. आम्हाला वाटलं इतकं रखडत वर येउन काही फायदा नाही, पण हरप्रीत आला. त्याने तिथल्या लोकांना पंजाबीमध्ये काहीतरी  बोलून विनंती केली.  त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.



आम्ही आत गेलो आणि एकदम शांत वाटलं. वेगळंच समाधान.

गुरु गोविंदसिंग पूर्वीच्या जन्मात इथे तप करत होते असा शिखांच्या धर्मग्रंथात उल्लेख आहे. तसंच लक्ष्मणानेसुद्धा इथे तप केले असल्याचे वाचले. त्यामुळे त्यांचा पूर्व जन्मीचा किंवा काही तरी संबंध आहे अशी मान्यता आहे. नेमका मला कळाला नाही. तिकडे काही चित्रांमध्ये गुरु गोविंद सिंग आणि लक्ष्मण असे दोन्ही दाखवले आहेत.



त्यामुळे हि जागा हिंदू आणि शीख दोन्हींसाठी पवित्र आहे. इथे लक्ष्मणाचे मंदिरसुद्धा आहे. काही वर्षांपूर्वी इथे गुरुद्वारा बांधला गेला. त्याची रचना पाहून मला सिडनी ओपेरा हाउसची आठवण आली.

खुप वर्षांपूर्वी नांदेडच्या गुरुद्वाऱ्यामध्ये गेलो होतो त्यानंतर आजच. माझ्या शहरात, औरंगाबादलासुद्धा एक छान गुरुद्वारा आहे. सगळीकडेच जी स्वच्छता असते, तिथल्या सेवकांचा नम्रपणा, शांतपणे होणारं प्रसाद वाटप, लंगर मधली शिस्त, ते पाहुन आल्याचं समाधान वाटतं. नांदेड, औरंगाबाद, हेमकुंड तिन्ही ठिकाणी माझा अनुभव असाच होता.

स्वच्छ आणि शांत धार्मिक स्थळे पहिली कि मला थोडं छान वाटतं, थोडा हेवा वाटतो, आणि थोडा आपल्या मंदिरांचा, विशेषतः महाराष्ट्रातल्या, राग येतो. अंगावर येणारे दुकानदार, उद्धट पुजारी, ढकलाढकली करणारे रक्षक, रांगेत मधूनच घुसणारे लोक इ. इ. गर्दीची जागृत देवस्थाने टाळून, जवळपासची शांत, कमी लोकप्रिय मंदिरात जाण्याचा हल्ली माझा कल असतो. असो. मंदिरांचा विषय निघाला कि नेहमीच असं भरकटायला होतं.




बाहेर आलो आणि तिथल्या कुंडाकडे गेलो. ह्या कुंडामुळेच ह्या जागेचं नाव हेमकुंड आहे. हेम (संस्कृत) म्हणजे बर्फ. ७ बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे कुंड. हिवाळ्यात पूर्ण गोठलेलं. आम्ही गेलो तेव्हा वितळुन पाणी तर होतं पण अतिथंड. त्या कुंडात डुबक्या मारायचं आम्ही ठरवलं होतं.

आमचे मॅनेजर देवकांत यांना आम्ही जेव्हा सांगितलं कि आम्ही डुबकी मारणार आहोत. तेव्हा ते म्हणाले "बेस्ट लक. मै इतनी बार गया हु वहा लेकिन बस २००८ मे एक हि बार मैने डुबकी लगायी. एक बंदे को केमरा पकडा दि फोटो निकालने. अंदर गया और तुरंत वापस. फोटो तो आयी हि नही. मैने कहा भाडमे जाये फोटो, एक बार का पुण्य बस हो गया."



आम्ही हिम्मत करून डुबकी मारली. भयानक थंड होतं पाणी. सगळे मोठमोठ्याने ओरडत होते. त्या थंड वातावरणातसुद्धा पाण्याबाहेर आलो कि लगेच गरम वाटलं इतकं ते पाणी थंड होतं. मग फोटोसाठी पुन्हा. मग मी विषम आकडा करावा म्हणुन अजून एकदा उतरलो. असं प्रत्येकाने १, २, ३ अशा वेगवेगळ्या वेळा डुबक्या मारल्या. मस्त हुडहुडी भरली मग.

अंग घासून कोरडं केलं, कपडे बदलले. आणि लक्ष्मणाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो. मग थोडे फोटो काढले.





इथलं पाणी खूप पवित्र समजतात म्हणून सगळ्यांसाठी कॅन आणल्या. त्यात पाणी भरून घेतलं. आता उन पूर्ण गेला आणि धुकं गडद होऊ लागलं. थंड वारे वाहू लागले. पाहता पाहता समोर स्पष्ट दिसत असलेलं कुंड धुक्यात हरवू लागलं.





लंगरमध्ये पटकन जेवून खाली निघणं भाग होतं. येण्यात खूप उशीर झाला होता त्यामुळे आता फक्त आमचा ग्रुप वर उरला होता. बाकी सगळे खाली निघाले होते.

जेवण झालं कि पुन्हा मी आणि निखिल मागे राहायला नको म्हणून आम्ही तडक पुढे निघालो. त्या घाईत आमचा हलवा खाण्याचा राहिला. त्या थंडीमध्ये गरम गरम हलवा खाउन मजा आली असती, पण ते राहूनच गेलं.



येताना उन पूर्ण जाऊन त्याजागी गडद धुकं आलं होतं. उन नसल्यामुळे खाली जाताना काही त्रास झाला नाही. आरामात थांबत थांबत आलो. हळू हळू बाकी लोक पण पुढे आले.

आणि जगातलं सर्वात उंच ठिकाणी असलेलं गुरुद्वारा पाहून, हेमकुंडात स्नान करण्याच (काही असलंच तर ते) पुण्य पदरात घालुन आम्ही घांगरीयाला रूममध्ये परतलो. आणि दाबून जेवण करून बिछान्यावर कलंडलो.