Tuesday, February 9, 2016

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा

दोन दिवस वॅलीमध्ये आणि एक दिवस हेमकुंड साहिब, असे आमच्या योजनेनुसार पार पडल्यावर घांगरीयामधला मुक्काम संपला. सकाळी आम्ही आवरून परत गोविंदघाटकडे निघालो. आता फक्त उतरणे असल्यामुळे सगळेच न थांबता आपल्या आपल्या वेगाने फटाफट उतरले. चढताना ६-७ तास लागले होते. तेच आता उतरताना २-४ तासात झालं.

आजचा दिवस गोविंदघाटला पोहोचणे आणि वेळ असल्यास बद्रीनाथ, माना पाहून येणे आणि आसपास फिरणे यासाठी होता. आम्हाला साहजिकच सगळंच करायचं होतं. देवकांत यांना आम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला हि ठिकाणे पहायची म्हणजे पहायचीच आहेत असे बजावले होते. कारण ह्याचा विषय निघाला कि ते "देखते है, आप कब पोहचोगे, रास्ते खुले है कि नही, बहोत सारी चीझोंपे डिपेंड करता है. सब कुछ सही होगा तो मै तो करा हि दुंगा." अशी वाक्ये वापरत होते.



त्यामुळे आम्ही उतरताना बिलकुल टंगळमंगळ न करता झपाट्याने खाली आलो. पण तरी आम्हाला थांबावं लागलं. 

झालं असं कि आम्ही वर जाताना सामानासाठी दोन पोनी केल्या होत्या. तश्याच त्या येताना सुद्धा ठरवल्या. पण त्या पोनीवाल्यांनी एक घोळ घातला. ते सगळे सोबत काम करतात, त्यामुळे एकमेकांना मदत करत सोबत खाली वर जातात. एका माणसाने त्याची बायको आणि छोटी मुलगी यांच्यासाठी एक पोनी केली, आणि त्यांच्या सामानासाठी दुसरी. तो स्वतः पायीपायी खाली आला. त्यांचं सामान कमी होतं. त्यामुळे त्यांच्या पोनीवर भार हलका होता. पोनी अर्धी रिकामीच जात आहे म्हणून या पोनीवाल्यांनी आमच्या सामानापैकी काही सामान त्यावर टाकलं. 

आणि ह्या पोनी पुढेमागे झाल्या. आमचं सामान एकत्र आलं नाही. म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि मग जेव्हा त्या माणसाची पोनी आली आणि त्याने त्याच्या सामानासोबत दुसरं सामान पाहिलं तेव्हा त्याने पूर्ण पैसे द्यायला नकार दिला. त्याने वर एका पूर्ण पोनीचे पैसे द्यायला तयारी दाखवली होती. पण त्याच्या पोनीवर सामान टाकलं म्हणून त्याने आता नाही म्हटलं. 

यावरून बराच वेळ वाद झाला. आमचं सामान जाताना पण दोन पोनीवर गेलं होतं, आणि येताना पण आलं असतं. त्यांना भार हलका करता येईल असं वाटलं म्हणुन त्यांनी कोणाला न विचारता परस्पर करून टाकलं. आमचे गाईड मध्ये पडले आणि आम्ही तिथून निघालो. 

पण रस्त्यात दगडधोंडे रस्त्यात पडले होते. ते हटवायचं काम सुरु झालं होतं. तिथे थांबुन पुन्हा अर्धा एक तास गेला. 

हॉटेलवर पोहचून होईल तितकं लवकर आवरून आम्ही जेवलो. आणि बद्रीनाथला निघालो. देवकांत स्वतः आमच्या ग्रुपबरोबर निघाले. तिथे रस्ते परिस्थितीनुसार कधीही बंद करतात म्हणून ते टेन्शनमध्ये होते. 

आधी आम्ही बद्रीनाथला गेलो, पण तिथे आरती का काहीतरी चालू होती. त्यामुळे दर्शन बंद होतं. मग आम्ही तोपर्यंत पुढे मानाला जाऊन आलो.



माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव आहे. त्यानंतर तिबेट/चीनची हद्द सुरु होते. गावाच्या हद्दीवर काही दुकाने आहेत. त्यांनी हिंदुस्तानकि अंतिम दुकान, हिंदुस्तानकि अंतिम चाय, हिंदुस्तानका अंतिम पकोडा, असल्या मजेशीर पाट्या लावल्या होत्या.



पुढे काही अंतरावर प्रसिद्ध वसुधारा धबधबा आहे. लोक इथे पण ट्रेक करतात.



डोंगराच्या खोबणीत एक बाबा धुनी पेटवून बसला होता. पूर्ण चेहऱ्याला भस्म लावलं होतं. बाजूला "बाबा बर्फानी नागा बाबा. बाबा कोणाला काही मागत नाहीत, लोकांना स्वतःला काही द्यावे वाटल्यास देऊ शकतात." अशा आशयाची पाटी लावली होती.



बरेच लोक त्याचा फोटो काढत होते. बाबाला सवय असावी फोटोंची, मला त्याचा लक्ष नसताना फोटो काढायचा होता, पण त्याचं लक्ष गेलं आणि हात उंचावून पोज दिली. 

माना हे भारताच्या हद्दीतलं शेवटचं गाव एवढंच ऐकलं होतं. पण तिथे गेल्यावर महाभारताचं एक पर्वच सुरु झालं. त्या गावात महाभारताच्या भरपूर खुणा दिसतात. 

त्या अंतिम दुकानाजवळ एक मोठ्ठा धबधबा/सरस्वती नदीचा उगम आहे. अत्यंत जोराने मोठ्या आवाजात तिथून पाणी कोसळत असतं. (खालील व्हिडीओ पहा) तिथल्या सांगण्यानुसार हि सरस्वती नदी. ती उगमापासून एवढ्या जोराने वाहते, आणि पुढे काही अंतरावर अलकनंदा नदीमध्ये मिसळून जाते. पण अलकनंदा नदीचा प्रवाह शांतच राहतो, आणि ह्या जोराचा अथवा वेगाचा परिणाम दिसत नाही, म्हणून सरस्वती नदी लुप्त होते असं इथलं स्पष्टीकरण आहे.



सरस्वती नदीच्या असण्या-नसण्याविषयी, लुप्त होण्याविषयी, आणि जागेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यापैकी हा एक.



त्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला जोडणारी एक मोठ्ठी शिळा आहे. तिला "भीम पूल" म्हणतात. त्याची कथा अशी कि, ती मोठी शिळा तिथे भीमानेच उचलून टाकली आणि पुढे जायला रस्ता केला. ह्याच रस्त्याने पांडव पुढे स्वर्गात गेले. 



त्याच गावात व्यास गुंफा आणि गणेश गुंफा आहे. तिथेच राहून त्यांनी महाभारताचे लेखन केले अशी आख्यायिका आहे. जायची प्रचंड इच्छा असूनही देवकांतनी आम्हाला तिथून धावत पळत बद्रीनाथला नेलं. 



बद्रीनाथचं अगदी सहज दर्शन झालं. पण तिथल्या बुवांचा वाईट अनुभव आला. पण त्याबद्दल पुढच्या पोस्ट मध्ये लिहितो. आज फक्त महाभारताविषयी.



मग परतीच्या रस्त्यावर लागलो, आणि धोकादायक भाग पार झाल्यावर शेवटी देवकांतचा जीव भांड्यात पडला.



परतीच्या वाटेत एक जागा आहे हनुमानकि चट्टी. याच जागी भीमाचा रस्ता अडवून हनुमानाने त्याचे गर्वहरण केले अशी पौराणिक कथा आहे.



हॉटेलवर पोहोचलो तेव्हा नुकतीच संध्याकाळ झाली होती. आम्ही पुन्हा आसपास फिरायला गेलो. देवकांत नि एक गाईड सोबत दिला. 

आम्ही पांडव मंदिरांकडे निघालो. रस्त्यात जाताना आधी एक इंद्रधनुष्य दिसले.



नंतर बोनस म्हणून आणखी एक पुसटसे.



पांडू राजाला नपुंसकतेचा शाप होता. त्याची पौराणिक कथा अशी कि एका ऋषीने पांडू राजाला तो आपल्या राणीजवळ कामेच्छेने जाताक्षणी मरण पावेल असा शाप दिला होता. वास्तववादी दृष्टीकोनातून महाभारत लिहिणारे लेखक हा भाग वेगळ्या पद्धतीने लिहितात. अपत्यहीन असलेला निराश राजा आपल्या दोन राण्यांना घेऊन हिमालयात आला. तो याच ठिकाणी राहत होता आणि तप करत होता. 

दोन्ही राण्यांना नियोग पद्धतीने देवांकडून (काहींच्या मते त्या काळी हिमालयात राहत असलेल्या योद्धा जमाती) संतती झाली. ते काही वर्षे तिथेच राहत होते. पण पांडू राजा माद्रीजवळ मोहाने गेला आणि मरून गेला. माद्री सती गेली. आणि एकटी पडलेली कुंती पाचहि मुलांना घेऊन पुन्हा हस्तिनापुरला गेली.



पुढे पांडव जेव्हा वनवासात फिरत असताना या ठिकाणी आले, तेव्हा भीमाने या ठिकाणी पांडू राजाच्या तपाच्या जागेवर मंदिर बांधले. तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारे हि कथा सांगितली.

ह्या मंदिराचे आणखी महत्व म्हणजे बद्रीनाथ जेव्हा बंद केले जाते तेव्हा बद्रीनाथची पूजा याच देवळात केली जाते. 

मी वाचलेल्या महाभारताच्या पुस्तकांमध्ये या घटना आहेतच. पण त्या ह्या जागी घडल्या असे म्हटल्यावर सगळे महाभारत डोळ्यासमोरून सरकते. 

काहीजण रामायण महाभारत फक्त कल्पनाविलास मानतात. काहीजण इतिहास मानतात. तर काहीजण अतिरंजित वृत्तांत मानतात. मला तसेच वाटते. 

ह्या दोन्ही महाकाव्यांचा भारतीय समाजावर प्रचंड पगडा आहे. भारतभर अशा अनेक खुणा आहेत. आणि प्राचीन आहेत. शेकडो वर्षांपासून आहेत. द्वारका आहे, मथुरा आहे. मृत्युंजय आणि युगंधरच्या शेवटी बऱ्याच ठिकाणांचे फोटो आहेत. पाचगणीला पांडवांची पावले दाखवतात. दक्षिणेत कुठेतरी दुर्योधनाचेहि मंदिर आहे.

जर ह्याला फक्त साहित्य मानले, तर देशभरात वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ह्या खुणा स्वतःच बनवल्या असे समजायचे?

इंग्लंडला शेरलॉक होम्सचे असे घर आणि संग्रहालय आहे. लोक त्या पात्राच्या एवढे प्रेमात पडले कि २२१ बेकर स्ट्रीटवर त्याचे घरच बांधले, त्याच्या प्रसिद्ध वस्तू आणुन ठेवल्या. आपल्याकडे हा उद्योग फार आधीपासुन चालू आहे म्हणायचा मग.

आता देऊळ सिनेमात दाखवलं आहे तसं गावाचं महत्व वाढण्यासाठी एक देऊळ त्याची महती कृत्रिम पद्धतीने वाढवून गावातली आवक जावक वाढवता येते. पण तसं इथे झालंय असं वाटत नाही. पण ह्या गोष्टी भारतात पर्यटन हा उद्योग नसल्यापासून केवळ श्रद्धेवर आधारलेल्या आहेत.

त्यामुळेच मला अतिशयोक्तीचा भाग किती हे सांगता येत नाही, पण ती पुटे बाजूला केली तर काही तरी सत्यांश ह्या कथांमध्ये दडला असावा असं वाटतं.



आजसुद्धा हे भाग एवढे दुर्गम आहेत. बरेच दिवस रस्तेच बंद असतात. आणि चालू असले तरी कधी खराब होतील, बंद होतील सांगता येत नाही. अशा ठिकाणी येउन हि मंदिरे कोणी बांधली असतील? त्याची माहिती कशी पसरली असेल? कुठल्या ओढीने ह्या ठिकाणी वर्षानुवर्षे भक्त येत असतील?

हिमालयाचं सौंदर्य फारच गूढ आहे. आसक्ती आणि विरक्ती असे दोन्ही परिणाम साधणारे हे अनोखे सौंदर्य. ह्याच्या प्रेमात पडून लोक वारंवारसुद्धा येतात. काही लोक विरक्तीमुळे इथेच येउन राहतात. उगाच नाही तप म्हटले कि हिमालय डोळ्यासमोर उभा राहत.

त्या बर्फानी बाबा सारखे जगाची फिकीर नसणारे आत्म मग्न लोक असेच हिमालयाच्या कडेकपारीत बसत असतील. ऋषी तपासाठी येत असतील. महाभारतातच पांडव विशेषतः अर्जुन तर कितीतरी वेळा हिमालयात येउन गेले. काहीतरी खास जादू आहे ह्या हिमालयात.

महाभारत, हिमालय, आसक्ती, विरक्ती असे अनेक विचार त्या वेळी मनात तरळून गेले, आणि त्या खुणा मनावरही कोरून गेले. 

No comments:

Post a Comment