Saturday, November 14, 2015

कट्यार खरोखर काळजात घुसली

आज "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहिला… त्यापेक्षा जास्त ऐकला. आणि अक्षरशः कान तृप्त झाले.

संगीत नाटक नाट्यगृहात जाऊन बघण्याची इच्छा या न त्या कारणांमुळे अजून अर्धवट होती.

नाही म्हणायला नांदी या कोलाज सदृश नाटकात त्याची चुणूक पाहायला मिळाली. आणि कट्यार हेच नाटक थोडा वेळ टीव्हीवर पाहिले. त्यामुळे ती तहान शमण्याऐवजी अजून वाढली.

आज हा चित्रपट पाहिल्यामुळे तो अनुभव वेगळ्या तऱ्हेने घेता आला. हा चित्रपट घोषित झाला तेव्हा तो कसा बनेल याविषयी शंका होती.

पण सुबोध भावे (यातील नट आणि दिग्दर्शक) यांनी हि जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलून एक नितांत सुंदर चित्रपट आपल्यासमोर सादर केला आहे.

कलावंत, त्यांची कला साधना, कलेवरील प्रेम, त्यांना होणारी ‘ग’ ची बाधा, तुल्यबळ कलाकारांविषयी वाटणारी स्पर्धा आणि मत्सराची भावना यावर अनेक बरेवाईट चित्रपट (सूर, अभिमान, लंडन ड्रीम्स, ई.) आहेत. कट्यार त्या यादीत अग्रस्थानी नक्कीच असेल.एका राजदरबारी असलेला प्रतिभासंपन्न राजगायक. पंडित भानुशंकर. (शंकर महादेवन) सच्चा कलावंत. त्यांचे विचार आणि संस्कार हे त्यांच्या गायकीइतकेच उच्च असतात.

इतर गायकांना संधी मिळावी आणि मान मिळावा यासाठी आग्रही असणारा हा कलावंत स्वतःचे राजगायकाचे पद पणाला लावून स्पर्धा ठेवतो. या स्पर्धेचं पारितोषिक असते राजगायकाचे पद मान मरातब एक मानाची कट्यार आणि त्या कट्यारीने आत्मसंरक्षणासाठी एका खुनाची माफी.

त्यानेच प्रोत्साहन देऊन त्या गावी आणलेले आपल्या संगीताच्या घराण्याबद्दल अत्यंत अभिमान बाळगणारे खानसाहेब (सचिन) त्या स्पर्धेत उतरतात आणि वारंवार हरतात.

हा आपल्या घराण्याचा अपमान समजून शरमिंदे आणि क्रोधित होतात आणि इथे मत्सरामुळे कलावंताची जागा एक अहंकाराने पछाडलेला माणूस घेतो.

सतत 14 वर्षे हरल्यानंतर खानसाहेब नाट्यमय पद्धतीने जिंकतात आणि यश त्यांच्या डोक्यात जाते.

पंडितजींचा शिष्य सदाशिव (सुबोध भावे) आपल्या गुरूच्या पराभवाचा संगीतानेच बदला घ्यायचे ठरवतो.

त्या सदाशिवाची साधना, त्याने गुरूच्या नकली पुरते मर्यादित न राहता अजून शिकावे खुद्द खानसाहेबांचे शागीर्द व्हावे अशी पंडितजींची ईच्छा, आपल्या घराण्याचा वारसा परक्या माणसाला आणि तेही पंडितजींच्या शिष्याला देण्याला खानसाहेबांचा नकार, त्यानंतर सदाशिवाची धडपड आणि प्रसंगी आततायीपणा आणि त्याची आणि खानसाहेबांची स्पर्धा अशी कथा पुढे जाते.

त्या अनुषंगाने दोन वेगळ्या शैलीतली गाणी, एकाच गाण्याची अनेक रूपे, आणि त्या शैलींचा मिलाफ आपल्याला ऐकायला मिळतो. ती आपल्या कानांना मेजवानीच आहे.

त्यासोबत कलाकारापेक्षा कला मोठी. कलाकार फक्त त्याच्या कलेमुळे नाही तर त्यापलीकडे आपल्या स्वभाव आणि चरित्रामुळे मोठा होतो. कलेला कुठल्याही सीमा नसतात असू नयेत असे अनेक विचार छान प्रकारे समोर येतात.

नाटकाचे किंवा साहित्याचे रूपांतर चित्रपटात करताना ते आणखी मोठ्या स्वरूपात करण्याची संधी आणि स्वातंत्र्य असते. माध्यम आणि तंत्र वेगळे असल्यामुळे आणखी काही बदल आवश्यक असतात. असे दोन्ही प्रकारचे बदल कसे हाताळले जातात यावर त्या चित्रपटाचा दर्जा अवलंबून असतो. अथवा नाटकाची व्हीसीडी आणि चित्रपट यात सेटचाच काय तो फरक राहील.

हा बदल या चित्रपटात सुबोध भावेंच्या चमूने मस्त हाताळला आहे. अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारे सेट्स आणि पोशाख, मोहक निसर्गस्थळांचा पार्श्वभूमीवर वापर करून आपल्या कानांसोबत डोळ्यांनाही सुखावेल अशी निर्मिती केली आहे.

मात्र नाटकात मी पाहिलेला एक प्रसंग आहे. ज्यात कविराज गाणे ऐकल्यानंतर एकाच वेळी तृप्त आणि भावूक होतात. आपल्याला संगीतातले कळत असले तरी गाता येत नाही अशी भावना त्यांना काहीशी दुःखी करते. हा सिन चित्रपटात वगळला आहे.

तो सिन मनाला एकदम भिडला होता कारण माझी अवस्थासुद्धा तशीच आहे. उलट त्यापेक्षा बिचारी. संगीतात गळा तर सोडा कानसुद्धा तयार नाही.

पण सर्व प्रकारचे संगीत ऐकून आस्वाद घेण्याची इच्छा आहे. पुलंच्या रावसाहेबांसारखं आहे तपशील कळले नाहीत तरी चांगले वाईट एवढे तर कळते.

हल्ली बालगंधर्व आणि आताचा कट्यार या चित्रपटाच्या माध्यमातून आधी शास्त्रीय न ऐकणारी मंडळी थोडी त्या दिशेला वळत आहेत हि चांगली चिन्हे आहेत.

सर्वांचे अभिनय उत्तम. शंकर महादेवन हे या चित्रपटातले अभिनयातले सरप्राईज पॅकेज.

कथा पटकथा संगीत सर्वच उत्कृष्ट.

या मूळ नाटक समोर आणणाऱ्या महान लोकांविषयी काही बोलण्याची तर गरज नाहीच.

त्यांना नमन करूनच, नव्या उत्साहात शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, त्यावर चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोचवणाऱ्या राहुल देशपांडे, आनंद भाटे, महेश काळे, अजय पुरकर, सुबोध भावे या सर्वांनाही सलाम.

आज काळजात घुसलेली संगीताची कट्यार आणि ओठांवर बसलेली गाणी आपापली जागा सोडणे अशक्य.