Wednesday, November 4, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग

माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली.  

या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात. :D म्हणजेच चिडवणे, जोक किंवा टोमणे मारणे, अतिशय पांचट जोक करत राहणे, मनाला वाटेल तसे वागणे. 

यातल्या सगळ्यांनाच फिरायची, चित्रपटांची, संगीताची, मस्ती करायची, पार्टी करायची आवड आहे. आम्ही सगळे सोबत बरेच चित्रपट पाहतो. संगीताच्या कार्यक्रमांना जातो. खरेदी करायला जातो. किल्ल्यांवर ट्रेक करायला जातो. रात्र जागवायला जातो. आसपास फिरायला जातो. 

यात आमचे इतर मित्रसुद्धा कधी सोबत येतात, आणि सगळेच या ग्रुपमध्ये पटकन मिसळून जातात. 

आमची एक पारंपारिक वार्षिक सहलसुद्धा असते. अलिबागला. वर्षातला एक मोठा विकेंड ठरलेला. तेव्हा सगळेजण अलिबागला जाऊन मासे खाणे, समुद्रात खेळणे, रात्री खातपीत खिदळत टाईम पास करणे, एवढाच उद्योग दर वर्षी करतो. जागेत काही बदल नाही. खाण्यात (कोकणात असल्यामुळे) विशेष बदल नाही. तरी इथे जाऊन निवांत वेळ घालवणे सगळ्यांना आवडते. सगळ्यांची बॅटरी रिचार्ज होते. (याबद्दल सविस्तर इथे वाचा.

नंतर बऱ्याच जणांनी कंपनी/शहर बदलले तरी आमच्या ह्या गोष्टी चालूच राहिल्या. गेल्या काही वर्षात आम्ही जवळपास आणि छोट्या मोठ्या बऱ्याच ट्रीप केल्या असल्या, आणि काही ट्रेक केले असले तरी सुट्टी, वेळ अशा कारणांमुळे २-३ दिवसांपेक्षा जास्त, आणि सिल्वासापेक्षा दूरची ट्रीप झाली नव्हती. 

अरूपचे रुममेट (अमेय आणि काही मित्र) वॅली ऑफ फ्लॉवर्सला जाण्याचा बेत आखत होते. उत्तराखंडमध्ये गोविंदघाटजवळ वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. तिथे दर वर्षी नैसर्गिकरित्या मोठ्या परिसरात कित्येक जातीची रंगबिरंगी फुले येतात. हे अक्खे खोरे फुलांनी आणि रंगांनी बहरून उठते. नैसर्गिकरित्या हे विशेष. हि जागा जागतिक वारसा म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे येथे वाहने नेता येत नाहीत. पायीच जावे लागते.

तर या वॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये कैक किलोमीटर्सचा ट्रेक, सोबत जवळच असलेले आणि सर्वात उंच ठिकाणी असलेले हेमकुंड साहिब गुरुद्वारा, जाता येता हरिद्वार, बद्रीनाथ वगैरे असा हा बेत होता. यात ट्रेक म्हणजेच चालणे आणि चढणे पुष्कळ होते. हा जगातला एक प्रसिद्ध ट्रेक आहे. 

त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली. एका कंपनीकडून (ब्लु पॉपीज) त्यांनी सविस्तर प्लानसुद्धा मिळवला. अरूपने तो आम्हाला पाठवला. 



आमच्या ह्या वर्षीच्या अलिबागच्या ट्रीपमध्ये रात्री एक वाजता ह्यावर अगदी जोरदार आणि जोशिली चर्चा झाली. आणि सगळ्यांनी जाण्याची तयारी दाखवली. इतका प्रतिसाद जरा अनपेक्षित होता. अवघड ट्रेक, आणि आठवडाभर सुट्या, ह्यामुळे कमी लोक तयार होतील असं वाटत होतं. 

या प्लानसाठी जितके जास्त लोक असतील तितके सवलत मिळवायला म्हणुन, आणि सोबत मजा करायला म्हणून चांगले. त्यामुळे अरूपने तो आम्हाला, बाकी मित्रांना, आणि आम्ही आमच्या मित्रांना असा सगळीकडे पसरवला.

पण बाकी ठिकाणाहुन म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सुरुवातीला सगळ्यांनी हो हो केलं. आम्ही एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. त्यावर सगळी प्लानिंग सुरु केली. हळूहळू काही लोक मागे हटले. नंतर ज्यांनी हा प्लान सुरु केला, तेच टंगळमंगळ करायला लागले. शेवटी फक्त आम्ही म्हणजे डस्सुझ तेवढे उरलो. 

आम्ही बाकी कंपनी आणि ट्रेक कंपन्या यांच्याशी बोलून पण तुलना करत होतो. अजून स्वस्त आणि चांगली डील मिळते का बघत होतो. पण काही जणांना खूप आधीपासून सुट्या घ्याव्या लागतात त्यामुळे, आणि वॅली ऑफ फ्लॉवर्स मध्ये जास्तीत जास्त फुले पाहण्यासाठी जुलैचाच महिना चांगला असे कळले असल्यामुळे आम्ही तारखा आधीपासुन जुलैच्याच ठेवल्या होत्या.

आम्ही केलेल्या तुलनेत आम्हाला आमच्यासाठी ब्लु पॉपीज हाच पर्याय योग्य वाटला, आणि आम्ही तो ठरवून टाकला. आता राहिली प्रवासाची तिकिटे. 

ह्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर अनुजा (सर्वात जास्त) आणि मी लवकर तिकिटे बुक करा म्हणून आग्रही होतो. हवेत सगळेच गप्पा मारतात पण तिकिटे बुक करणे म्हणजे एक कमीटमेंट आहे. ते केलं कि त्यात एक खात्री येते. म्हणून आमचा हा आग्रह होता. पण काही न काही कारणामुळे ते पुढे पुढे ढकलल्या जात होतं. 

विमानाच्या काही स्वस्तातल्या ऑफर्स डोळ्यासमोर येउन चालल्या होत्या. बुकिंग होत नव्हती म्हणून आमची थोडी चिडचिड चालू होती. आम्ही मग काही दिवस नाद सोडून दिला.

मग आहेत ते लोक बुकिंग करून घेऊ असे म्हणत म्हणतसुद्धा काही दिवस गेले.

असे करता करता मला काही अडचणी आल्या. त्याच महिन्यात माझा अमेरिकेसाठी विसा इंटरव्ह्यू, आणि कंपनीच्या कामासाठी अमेरिकेला जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे माझे जाणे डळमळीत झाले. अनुजाने निर्वाणीची धमकी दिली, कि आता बुकिंग केले नाही तर मी येणार नाही.

मग आधी मुंबईहून जाणाऱ्यांनी बुकिंग केली. काही दिवसातच मग अनुजा आणि अरूप यांनी पुण्याहुन जाण्याची तिकिटे बुक केली.

सगळ्यांची तिकिटे काढून झाली आणि माझे काही ठरेना. पण शेवटी माझा विसा इंटरव्ह्यू ट्रीपच्या आधीच ठरला, आणि अमेरिकेला जाणे काही दिवस पुढे ढकलले गेले. माझा ट्रीपला जाण्याचा मार्ग आपोआप मोकळा झाला. मी हा दैवी आदेश मानुन माझी तिकिटे बुक केली.

पण मला उशीर झाला होता, विमानाची तिकिटे प्रचंड महाग झाली होती. मी नाईलाजाने पुणे-दिल्ली-हरिद्वार-दिल्ली- पुणे अशी ट्रेनचीच तिकिटे बुक केली. जाताना पुणे-दिल्लीला जाताना एसी मिळण्याची शक्यताही दिसत नव्हती. पण परत येताना मात्र स्लीपर कन्फर्म, आणि एसी तोपर्यंत पुढे सरकेल अशा वेटिंगमध्ये होते, म्हणून दोन्ही काढून ठेवली.

पण दुर्दैव म्हणजे एक आठवडा आधीच मला दिल्लीला जाणारी ट्रेन रद्द झाल्याचा मेसेज आला. का रद्द झाली, कशामुळे काही कळले नाही. त्या दिवशी काही तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रद्द होणे वेगळे, पण हे आधीच रद्द म्हणून सांगणे काय प्रकार होता काही कळला नाही.

आता अगदीच ट्रेन रद्द झाली म्हणुन रडावे कि, अगदी शेवटच्या क्षणाला फजिती होण्यापेक्षा एक आठवडा वेळ मिळाला म्हणून हसावे काही कळेना. आता दुसरी कुठली ट्रेन मिळणे शक्य नव्हते, आणि विमानाने जाणे भाग होते. विमान मी ट्रेन तिकीट बुक केले तेव्हापेक्षाही महाग वाटत होते. पुणे दिल्लीचे विमान तर वारंवारता कमी असल्यामुळे मुंबई दिल्लीपेक्षा एरवीदेखील महाग असते, ते आता एकच आठवडा शिल्लक असताना विचारायलाच नको. मुंबई दिल्ली त्यामानाने बरेच स्वस्त वाटले म्हणुन तेच बुक केले.

ट्रीपसाठीचा तयारीतला सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे तिकिटे काढणे, हॉटेल बुकिंग करणे अशा प्रकारे कसाबसा पार पडला. 

No comments:

Post a Comment