Friday, January 30, 2015

चष्मे

आपल्यापैकी बऱ्याचजणांना चष्मा असतो. लांबचा. जवळचा. तात्पुरता. कायमचा. स्वस्त. महाग. पण हा चष्मा फक्त शरीराला असतो. त्या दृष्टीशिवाय आपल्याला एक दृष्टी असते. आपल्या मनाची. किंवा विचारांची. याला मनःचक्षुना असणारी दृष्टी म्हणतात. शब्दशः म्हटलं तर मनाच्या डोळ्यांची दृष्टी.

या चक्षुंना मात्र सर्वांनीच कोणता न कोणता चष्मा लावलेला असतो. खऱ्या डोळ्यांचा चष्मा काचेचा असतो. आपल्या डोळ्यातले दोष दूर करून आपल्याला नीट दिसावं म्हणून. पण हा दुसरा चष्मा अदृश्य असतो. त्याची काच असते आपल्या अनुभवांची, माहितीची, पूर्वग्रहांची. हा चष्मा कधीकधी आपली दिशाभुल करतो.

Image : clker.com
हि वेळ असते आपल्या चष्म्याचा नंबर तपासुन बघण्याची.

लहानपणापासुन आपल्यावर केले जाणारे संस्कार, आपण शिकलेल्या गोष्टी, आपण अनुभवलेल्या गोष्टी या सगळ्यातून आपली मतं बनतात. काही गोष्टींबद्दल आपली मतं पुर्वग्रहदुषित असतात. आपल्याला प्रत्यक्ष काही अनुभव नसला तरी आपले काही समज असतात.

कोणी आपल्याला सांगितलं कि अमका माणुस खूप खडुस आहे, तर ते आपल्या डोक्यात राहतं. आपण आपल्या चष्म्यातून त्या माणसाला खडूस म्हणूनच पाहतो. त्या माणसाशी वागताना आपण जपुन राहतो. तो थोडा जरी विचित्र वागला कि आपला समज पक्का होऊन जातो. असे सांगणारे सगळेच काही वाईट हेतूने सांगत नसतात. काही आपल्या भल्यासाठीच आपल्याला वेळोवेळी सावध करतात.

पण काही चष्मे आपले आपण लावून घेतलेले असतात, आणि ते आपल्या डोळ्यांना घट्ट चिटकून बसतात. अशा चष्म्यांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

आपल्याला निसर्गाने बहुमोल अशी ज्ञानेंद्रिये दिली आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून कायम शिकत राहिलं पाहिजे. शारीरिक इंद्रीयांपलीकडे अतिशय शक्तिशाली अशी विचारशक्ती आपल्याला मिळाली आहे.

आपल्याला चष्मा असेल तर आपण दर वर्षी किंवा अशा काही अंतराने डोळे तपासत राहतो, आणि गरज पडल्यास चष्मा बदलून घेतो. कधीकधी फक्त हौस म्हणून, आपल्या दिसण्यात नाविन्य आणण्यासाठी म्हणून चष्मा बदलतो.

तसंच आपण आपल्या मनातले चष्मेसुद्धा बदलत राहिलं पाहिजे. साधा विचार करा आपण ५ वर्षांपूर्वीचा चष्मा आजसुद्धा वापरत असू आणि मधल्या काळात आपला नंबर वाढला असेल तर आपल्याला नीट दिसेल का?

जग रोज झपाट्याने बदलतंय. लोकसुद्धा बदलतात. आणि आपणसुद्धा बदललं पाहिजे. कारण बदल हाच जगाचा स्थायीभाव आहे.

नौकरी.कॉम सारख्या संकेतस्थळांवर जर तुमची अद्ययावत माहिती नसेल तर भरती करणारे लोक तुमच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीत. तुमचा डीपी तुम्ही खूप दिवसात बदलला नसेल तर तुमचे मित्र तुम्हाला भंडावुन सोडतात, अरे किती दिवस तोच फोटो ठेवशील? बदल आता!

असंच आपण आपल्या मनातली जुनी माहिती झटकून नव्यासाठी जागा केली पाहिजे. आपण आपल्या न कळत्या वयात काही गोष्टी मनाशी ठरवल्या असतील आणि त्यालाच चिटकून आपण कायम राहिलो, तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा आनंदच घेता येणार नाही. काही उदाहरण देतो.

मला लहानपणी दही बिलकुल आवडत नव्हतं. पण कधीतरी आईने मला बळजबरी थोडं तरी खाउन पहा म्हणून खायला भाग पाडलं आणि ते मला आवडायला लागलं. पण वांग्याची भाजी मला तेव्हा पण आवडत नव्हती आणि आजहि आवडत नाही. पण मी ती अगदी खातच नाही असंही नाही.

कॉलेजात असताना नोकरी, आयुष्य याबद्दल आम्हा सगळ्यांच्याच खुप वेगळ्याच कल्पना आणि स्वप्नं होती. आता प्रत्यक्ष अनुभवातुन त्यात थोडी वास्तविकता आली. याचा अर्थ स्वप्न बदलली असा नाही. पण कोणत्या गोष्टी आपल्याला साध्य आहेत, कोणत्या आवश्यक आहेत, आणि कोणत्या गोष्टींच्या मागे धावण्याची आपल्याला गरज नाही याचं भान आलंय.

आपण लहानपणी किती काय काय बनायचं ठरवलं असेल. एकाच वेळी आपल्याला वैमानिक, सैनिक, शास्त्रज्ञ, अभिनेता असं सगळंच व्हायचं असतं. पण पुढे आपल्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार आपण एखादंच क्षेत्र निवडतो.

आपण नोकरी सुरु करतो तेव्हा आपल्या आणि कंपनीच्या एकमेकांकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतात. काळानुसार त्या बदलत जातात. तशाच राहत नाहीत. त्याच पगारावर आणि तेच काम तुम्ही आयुष्यभर कराल का?

तसंच नात्यांचं स्वरूपसुद्धा कायम बदलत असतं. एखादी व्यक्ती आयुष्यात येते. कोणी मित्र बनते, कोणी नाही. कोणी अगदी जवळची बनते. सगळ्यांकडून आपण हि अपेक्षा ठेवत नसतो. पण त्या जवळच्या लोकांबरोबरसुद्धा आपलं नातं आपल्या संपर्कानुसार बदलत असतं.

एखादी व्यक्ती आज तुमच्यासाठी ज्या स्थानावर आहे, तिने तिथेच थांबावं अशी अपेक्षा का करावी? ती व्यक्ती आणखी जवळ येऊ शकते, लांब जाऊ शकते, कोणी दुसरं तिची जागा घेऊ शकतं. आपणच एका ठिकाणी साचून राहू नये. आपला चष्मा साफ करून आज आत्ता जे आहे ते बघितलं पाहिजे.

तरुणपणी पूर्ण विचार करून ब्रह्मचर्य स्वीकारणारा, आणि ते आयुष्यभर पाळणारा एखादाच भीष्म असतो. आकाशातल्या फक्त एका ताऱ्यालाच ध्रुवपद असतं. बाकी सगळे अस्थिर असतात. हे आपण लक्षात घ्यायला हवं.

कुठलाही चष्मा हा आपल्या बघण्यात स्पष्टता यावी म्हणूनच असतो. काचेच्या चष्म्यांनी आपल्याला समोरची गोष्ट स्पष्ट दाखवली पाहिजे, आणि विचारांच्या चष्म्यांनी आपल्या आयुष्यातली दिशा स्पष्ट दिसली पाहिजे. चष्मा लावणं वाईट नसतंच. पण तो वेळोवेळी बदलायला हवा. दुरुस्त करायला हवा.