मी थाउजंड आयलंडहून परत जकार्ताजवळच्या अन्चोलमधल्या डॉकवर पोहोचलो तेव्हा नुकतीच दुपार उलटली होती. आजूबाजूला फिरायला अजूनही अक्खी संध्याकाळ माझ्या हातात होती. अन्चोलमध्ये या डॉकजवळच एक एस्सेल वर्ल्डसारखा करमणुकीचा पार्क आहे. मी तिथे जायचं ठरवलं.
तो पार्क मुख्यतः लहान मुलांसाठीच बनवलेला आहे. पण तिथे राईड्सशिवाय आणखी प्राण्यांचे खेळसुद्धा होते. आणि मला त्यात जास्त रस होता. मी तिथे पोहोचलो तेव्हा थोडा उशीर झालेला होता. पार्क बंद होईपर्यंत काही मोजकेच शो शिल्लक होते. त्यातला पहिला शो म्हणजे सी लायन शो.
मी सी लायन हा प्राणी प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होतो. आणि त्याला पाहून मला त्याला सी लायन का म्हणतात हा प्रश्न पडला. तो प्राणी सिंहापेक्षा जास्त कुत्र्यासारखा दिसत होता. माझ्या मते त्याला सी डॉग हे नाव जास्त समर्पक झालं असतं.
भारतात आता सर्कशीमध्ये प्राण्यांचा अशाप्रकारे वापर करण्यावर खूप बंधने आली आहेत. त्यामुळे असे खेळ आता पाहायला मिळत नाहीत. मी शेवटची सर्कस खूप वर्षांपूर्वी लहानपणीच पाहिली असेल.
या शो मध्ये ३ सी लायन होते. आणि प्रत्येकी एक ट्रेनर होता. त्यांनी बॉलशी खेळणे, बॉल नाकावर तोलून धरणे, कॅच कॅच खेळणे अशा अनेक करामती करून दाखवल्या. ट्रेनर त्यांना शोमध्ये खेळवत ठेवायला म्हणून कायम काहीतरी खाऊ घालत होते.
मग एका सी लायनने ट्रेनरसोबत कपल डान्ससुद्धा केला. त्या दोघांनी एकमेकांना कीस सुद्धा केलं. पोटापाण्यासाठी लोकांना काय काय करावं लागतं पहा. :D
त्या सी लायन्सना माणसासारखे बरेच हावभाव शिकवले होते. ते आपल्या परीने टाळ्या वाजवत होते, सलामी देत होते, नाचत होते. त्यांना चक्क थोडं गणितसुद्धा शिकवलं होतं. ट्रेनरने प्रेक्षकांना दोन आकडे सांगायला सांगितलं. प्रेक्षकांनी वेगवेगळे आकडे सांगितले होते. पण त्याने नेमके त्याला हवे असलेलेच सोयीचे आकडे घेतले. :D त्याने एका पाटीवर ४X२ लिहिले आणि सी लायनला दाखवले. उत्तरादाखल सी लायनने त्याच्या समोरची घंटा ८ वेळा वाजवली. अर्थात त्यांना गुणाकार शिकवला नसेल. पण ८ चा आकडा त्यांच्या डोक्यात बसवणे सुद्धा काही कमी नाही.
सी लायन शोमधले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लीक करा.
सी लायन शोनंतर लगेचच मी डॉल्फिन शो पाहायला गेलो. हा शो मला आधीच्या शोपेक्षा जास्त आवडला. या शोसाठी केलेली व्यवस्था मस्त होती. गोलाकार स्टेडीयम होते. आणि समोर एक पुरेसा मोठा स्विमिंग पूल, ट्रेनर्सना उभे राहण्यासाठी जागा, आणि त्यामागे एक मोठी स्क्रीन होती.
शो सुरु होण्यापूर्वी त्यांनी त्या स्क्रीनवर स्टेडीयममधील प्रेक्षकांना दाखविण्यास सुरु केले. कॅमेरा कोणाकडे तरी वळून तो माणूस स्क्रीन वर दिसत असे. अशा स्क्रीनवर आलेल्या माणसांची प्रतिक्रिया फारच मजेदार असे. बाकीचे प्रेक्षक हसून आणि टाळ्या वाजवत दाद देत होते. काही क्षणापुरता मीसुद्धा स्क्रीनवर आलो होतो.
त्यानंतर एका डॉल्फिनबद्दलच्या व्हिडीओने शोला सुरुवात झाली. डॉल्फिन्सना वाचवा अशा आशयाची ती क्लिप होती. त्याच्या शेवटी पडद्यावर आणि प्रत्यक्षात एकाच वेळी डॉल्फिन पाण्याबाहेर उसळून येतात आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसतो.
त्यानंतर मग डॉल्फिन्सनेसुद्धा रिंगमधून उडी मारणे, ट्रेनरसोबत पोहणे, बॉल खेळणे, नाकावर रिंग खेळवणे अशा अनेक करामती करून दाखवल्या. त्या ट्रेनरला डॉल्फिनसोबत इतकं सहज पोहताना पाहून मलासुद्धा डॉल्फिनसोबत पाण्यात उतरून खेळण्याची इच्छा झाली. डॉल्फिन हे खूप हुशार म्हणून समजले जातात. काही दिवसानंतर इंडोनेशियामध्ये काही पार्क्समध्ये डॉल्फिनसोबत आपल्याला पण खेळता पोहता येतं हे कळलं पण ते करण्याची संधी मिळाली नाही.
डॉल्फिन शोमधले फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
डॉल्फिन शोनंतर त्या पार्कमध्ये एकाच शो उरला होता तो म्हणजे एक छोटासा 4D सिनेमा. तो फारच कंटाळवाणा होता. एकतर ती एक घीसीपिटी काऊबॉय स्टोरी होती. त्यातले 4D इफेक्ट्स म्हणजेच खुर्चीला दिलेल्या हालचाली अर्थहीन होत्या. त्यांचा सिनेमामधल्या गोष्टीशी फारसा संबंधच नव्हता. उगाच द्यायच्या म्हणून दिलेल्या वाटत होत्या.
यानंतर पार्क बंद झाला. बाजूलाच एका ठिकाणी लेजर शो होता. मी तोदेखील पाहिला. तो काही विशेष नव्हता. त्यातली एकमात्र नवी गोष्ट म्हणजे लेजर आणि मोठे पाण्याचे कारंजे यांचा एकत्रित वापर करून पाण्याच्या फवाऱ्यावर त्यांनी त्रिमितीय प्रतिमा बनवल्या होत्या. पण ते सोडता तो शो कंटाळवाणा होता.
एका बेटावर सफर, स्नोर्केलिंग, त्यानंतर काही झकास शोज, असं मी एका दिवसात बरंच काही बघितलं होतं. लेजर शोनंतर एका भारतीय हॉटेलमध्ये जेवण केलं. हॉटेलमध्ये परत जाईपर्यंत खूप थकलो होतो. रूममध्ये पोचताक्षणी बेडवर आडवा होऊन मी झोपून गेलो. पुन्हा तो नकोसा सोमवार उगवण्याआधी पुरेसा आराम आवश्यक होता. :)
No comments:
Post a Comment