Monday, July 28, 2014

जकार्ताच्या आठवणी : ५ : सहस्र द्विप

गेल्या आठवड्यात तमन मिनी येथे एक दिवस मस्त गेल्यावर, पुढच्या वीकेंडकडून माझ्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. पण मला पुन्हा तीच अडचण आली. मला कोणीही सोबत मिळत नव्हते. गेल्या आठवड्यात, सुदैवाने मला हॉटेल लिफ्टमध्ये राहुल भेटला आणि आम्ही तमन मिनीला जाण्याचा प्लान केला. या आठवड्यात ते शक्य झाले नाही. राहुल आणि माझ्या ऑफीसमधले बरेचजण या आठवड्यात भारतात परतले.

शेवटी मी कुठेतरी एकट्यानेच जायचं ठरवलं. अशा वेळी मला टागोरांचे "एकला चलो रे" हे गीत आठवते. कोणीतरी सोबत मिळाले तर चांगलंच, पण कोणी नाही मिळालं तर आपण का म्हणून अडून रहावं? आपण स्वतःच आपल्याला सर्वात उत्तम साथ देऊ शकतो. मला सिनेमे पाहण्याची, नवीन ठिकाणी जाण्याची, फोटो काढण्याची अशा अनेक आवडी आहेत. आणि गरज पडल्यास मी ह्या गोष्टी एकट्यानेच या आधीपण केल्या आहेत. 

आता प्रश्न होता जायचं कुठे? इंटरनेटवरची माहिती, ऑफिसमधल्या लोकांकडून मिळालेली माहिती, या आधारे मी जकार्ताच्या आजूबाजूच्या चांगल्या ठिकाणांची एक यादीच बनवली होती. सहस्र द्वीप म्हणजेच थाउजंड आयलंड्स त्या यादीत होतंच. एका मित्राने मला सांगितले होते कि यातल्या काही बेटांवर स्कुबा डायव्हिंग करता येतं. बस हे ऐकून मी तिथेच जाण्याचं पक्कं करून टाकलं. 



मी खूप आधी माझ्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं कि, स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग या गोष्टी करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा पाहिल्या पासून हि इच्छा प्रबळ झाली आहे. 


जकार्ताजवळच समुद्रात हजारो लहानमोठ्या आकाराची बेटे आहेत. म्हणूनच या भागाला थाउजंड आयलंड्स म्हणतात. काही बेटे इतकी छोटी आहेत कि तिथे चीटपाखरूसुद्धा राहत नाही. काही बेटे जी पुरेशी मोठी आहेत तिथे छोटी खेडी वसलेली आहेत. आणि काही सुंदर बेटांवर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स विकसित करून पर्यटनाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

जी बेटे जकार्ताच्या जास्त जवळ आहेत त्यांच्यावर जकार्ता शहरातील प्रदूषणाचा परिणाम झालेला आहे. पण जी बेटे बऱ्यापैकी लांब आहेत, तिथे मात्र पाणी आणि वातावरण खूप स्वच्छ आहे. आणि ती बेटे अगदी स्वच्छ नितळ पाणी, आणि वैविध्यपूर्ण प्रवाळे यासाठी प्रसिद्ध आहेत. स्कुबा डायव्हिंगची सुविधा असल्यामुळे मी सेपा बेटावर जायचं ठरवलं. 

माझे मित्र तिथे गेले होते तेव्हा एक स्कुबा डायव्हिंग करणारा मोठा ग्रुप आलेला होता. त्या लोकांनी स्कुबा डायव्हिंगचे सगळे किट्स घेऊन टाकले. त्यामुळे माझ्या मित्रांना डायव्हिंग करता आलं नव्हतं. असंच काहीतरी माझ्यावेळीसुद्धा घडण्याची शक्यता होतीच. पण तो म्हणाला कि स्कुबा डायव्हिंग नाही करता आलं तरी स्नोर्केलिंग करता येतं, आणि ते बेट खूपच सुंदर आहे. एकदा जाऊन येण्यासारखं नक्कीच आहे. 

रविवारी सकाळी मी टॅक्सीने अन्चोल डॉकपर्यंत गेलो. तिथूनच या सर्व बेटांवर जाण्यासाठी बोट्स निघतात. तिथे आणखी एक अडचण आली. सेपा आयलंडवर जाण्यासाठी मी एकटाच होतो. आणि त्यामुळे जर सेपा आयलंडला जायचं असेल तर मला दुप्पट भाडे लागणार होते. तिथल्या डेस्कवरच्या मुलीने मला दुसऱ्या कुठल्यातरी बेटावर जा म्हणून सांगितलं. मी सांगितलं कि मला स्कुबा डायव्हिंग करायची इच्छा आहे म्हणून मला सेपाला जायचंय. मग तिने सांगितलं कि पुत्री आयलंडवरसुद्धा स्कुबा डायव्हिंग आहे. आणि सगळी बेटे जवळपास सारखी आणि तितकीच सुंदर आहेत. तुम्ही पुत्री आयलंडला जा, आणखी काही लोकपण तिकडे जात आहेत. तुम्हाला शेअरिंगमध्ये भाडे कमी लागेल. माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हताच. मी पुत्री आयलंडच्या बोटीमध्ये चढलो. 

आम्हाला त्या बेटावर पोहचायला दीड दोन तास लागले. जाताना आम्ही अक्षरशः शेकडो बेटे पाहिली. अगदी निळेशार पाणी आणि आमच्यासोबत समुद्रात आणखी बऱ्याच बोट्स होत्या. 

बेटावर पोहोचल्यावर लगेच जाणवलं कि या बेटांबद्दल आपण जे काही ऐकलं ते सगळं खरं आहे. अगदी नितळ आणि पारदर्शक पाणी. इतकं स्वच्छ कि वर उभं राहूनच खाली पाण्यात असलेले सगळे मासे, प्रवाळ सगळं काही स्पष्टपणे दिसू शकतं. 

त्या बेटावर एक सुंदर रिसॉर्ट बनवला होता. बऱ्याच प्रकारच्या कॉटेज होत्या. एक छोटेखानी स्विमिंग पूल होता. (चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या बेटावर स्विमिंग पूल! :D). रेस्टॉरन्ट, क्लब हाउस अशा सर्व सुविधा होत्या. पिकनिक करायला हि खूपच सुरेख जागा आहे. आणि असे बरेच ग्रुप तिथे मुक्कामाला आलेले होते. गाणी गात, वेगवेगळे गेम्स खेळत मजा करत होते.

मी साधारण २०-२५ मिनिटात पूर्ण बेटावर फोटो काढत भटकून आलो. मग मी स्कुबा डायव्हिंगच्या डेस्कवर गेलो. तिथे परत एकदा निराशा झाली. या बेटावर स्कुबा डायव्हिंगची सुविधा होती खरी पण फक्त परवाना असलेल्या प्रशिक्षित लोकांसाठी. तिथे सेपासारखा ट्रेनर उपलब्ध नसल्याने नवशिक्या लोकांना डायव्हिंग करण्यास मनाई होती. शेवटी मला स्नोर्केलिंगच करावं लागलं. 

ते पण छानच असतं पण मी ते भारतात या आधीपण केलेलं आहे. म्हणून मला स्कुबा डायव्हिंगबद्दल जास्त उत्सुकता होती. ते न करता आल्यामुळे थोडं वाईट वाटलं. ज्यांना यातला फरक माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. स्कुबा डायव्हिंग म्हणजे पाण्यात खोलवर जाउन समुद्रातल्या गोष्टी बघणे. स्नोर्केलिंगमध्येसुद्धा हेच करायचं असतं पण वर वर, पाण्यावर तरंगत. एक मास्क मिळतो तो घालून पाण्यात सगळं बघता येतं. पण वरवर जेवढं काही दिसेल तेवढंच. स्कुबा डायव्हिंगमध्ये खोलवर जाता येतं त्यामुळे जास्त विविधता पाहायला मिळते. 

एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे स्नोर्केलिंगला वेळेची काही मर्यादा नव्हती. मी एक वेट सुट भाड्याने घेतला. तो सुट घालून मी जसा फिट (!) दिसत होतो ते पाहून मला एकदम छान वाटलं. आणि वेळेचं बंधन नसल्यामुळे अगदी मनसोक्त पाण्यात डुंबून आलो. थोडा वेळ पाण्यात थोडा वेळ बाहेर असा टाइमपास केला. पाण्याखालचं दृश्य अर्थातच खूप सुंदर होतं. चित्रविचित्र आकाराचे आणि अनेक रंगाचे प्रवाळ. तितकीच विविधता माश्यांच्या प्रकारांमध्येसुद्धा होती. माश्यांच्या झुंडी आपल्या अगदी जवळून जाताना एकदम शहारून येत होतं. आपल्याला कधी न दिसणारी आणि जाणवणारी इतकी अद्भुत सृष्टी पाहून जाणवायला होतं कि देवाने इतकं सुंदर आणि गहन असलेलं विश्व बनवलंय. असं वाटतं कि माणसाने कितीही शोध लावले आणि माहिती मिळवली तरी या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला न कळणाऱ्या पुष्कळ गोष्टी शिल्लकच असतील. 

या ट्रीपमध्ये काढलेले फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा. एकट्याने जाण्याचा एक तोटा म्हणजे आपले फोटोज काढायला कोणी नसते. मी असंच एकाला फोटो काढण्याची विनंती केली. त्याने पण अगदी हसून प्रतिसाद दिला, आणि दोन तीन फोटो काढले. पण सगळे बेकार. फोकस न करता. आणि तेव्हा उन असल्यामुळे मला स्क्रीनवर पाहून इतकं काही कळलं नाही. :( माझा या ट्रीपमध्ये एकुलता एक फोटो मी स्वतःच एका काचेमध्ये पाहून काढला. 

मी जेवण केलं आणि त्याच बोटीने परत जकार्ताला निघालो. कोणी सोबत आलं असतं तर चांगलं झालं असतं, पण तरी मी माझ्या परीने एकट्याने आनंद घेतला. :)

No comments:

Post a Comment