Friday, April 25, 2014

ती आणि तो : भाग ५

(भाग १) (भाग २) (भाग ३) (भाग ४)
सकाळी सकाळी दार वाजलं. त्याने उघडलं, तर आई बाबा दारात उभे होते. ते आनंदात होते. 

"काय रे प्रमोशन झालं तर पार्ट्या करतोस, पण आम्हाला सांगत सुद्धा नाहीस?" बाबा आत येता येता म्हणाले. 

"तुम्हाला कसं  कळालं?"

"अरे तुझ्या पार्टीचे फोटो तुझ्या मित्रांनी टाकले फेसबुक वर. बाबांनी मला दाखवले. आम्ही किती फोन केले तुला. पण तू उचलले नाहीस."

"अगं, कालच बातमी कळली. लगेच मित्रांनी पार्टी द्यायला लावली. नंतर घरी येउन झोपलो होतो. आज तुम्हाला सांगणार होतो."

"तोपर्यंत आम्हाला थोडी राहवणार होतं. तसाही तू आजकाल आमच्याशी नीट काही बोलत नाहीस."

मागच्या खेपेस त्यांनी लग्न मोडायला सांगितलं तेव्हापासून तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतच नव्हता. 

"ते जाऊ दे. आम्हाला लगेच यायचं होतं. आम्ही पहाटेच निघून आलो. आणि हे काय? प्रमोशनचा, आम्ही आल्याचा काहीतरी आनंद दिसतोय का तुझ्या चेहऱ्यावर?"

"असं काही नाही ग आई. बसा तुम्ही जरा. मी चहा टाकतो."

"मला कळतंय ना सगळं. ते लग्न मोडल्यापासून तू हा असा आहेस. अरे किती दुःख करशील? आपण तरी काय करणार होतो. जनरीतच पाळली फक्त आपण. तिची पण चूक नाही आणि आपली पण नाही."

"आई तो विषय नको बरं."

"बरं तो नको. पण दुसऱ्या मुलीतरी बघशील कि नाही? तुझं लग्न झाल्याशिवाय काही तुझं चित्त थाऱ्यावर येणार नाही. मी येताना फोटो घेऊनच आले आहे. तू बघ सावकाश. पसंत कर. मग आपण पुढचं बघू."

"मी बघणार नाही. मी तिच्याशीच लग्न करणार आहे." याच क्षणी त्याचा निर्णय झाला होता. 

"हा मूर्खपणा आहे. झालंय ना आपलं बोलणं यावर?"

"एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबद्दल अशी कशी वागतेस आई? तिची काय चूक आहे यामध्ये?"

"काही चूक नसेल. पण ती मला सून म्हणून चालणार नाही."

"माझं प्रेम आहे तिच्यावर. मी तिला नाही विसरणार."

"विसरावं लागेल."

"मला एक सांग आई, सॉरी, पण समजा तुझ्यावर आज बलात्कार झाला."

"वाट्टेल ते बडबडू नकोस. मोठा झालास तू, पण असं काही बोलायला लागलास तर थोबाडून काढेन तुला."

"वाट्टेल ते नाही. तुला काय वाटतं बलात्कार फक्त तरुण मुलींवर होतात? चार वर्षांच्या चिमुरडीवर पण होतात, आणि सत्तर वर्षांच्या थेरडीवर सुद्धा. आज तुमच्या लग्नाला सत्ताविसेक वर्ष झाली असतील, तुला मी एवढा मोठा मुलगा आहे. उद्या तुझ्या वर समजा बलात्कार झाला, तर मी आणि बाबांनी काय करावं?"

आईच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा सुद्धा धर्मसंकटात पडले होते. 

"बाबांनी तुझ्याशी नातं तोडावं का? त्याचं आणि तुझं तरी लग्नाचं नातं आहे. तू तर माझी आई आहेस. बलात्कार झाला म्हणून मी तुला आई म्हणून नाकारावं का? आपलं प्रेम संपेल?"

आई बाबा दोघेही या सडेतोड प्रश्नामुळे निरुत्तर झाले होते. 

"मग सांग आई. तिच्यावर बलात्कार झाला, म्हणून मी तिला माझं प्रेम देऊ नये?"

आई आता पश्चातापाचे अश्रू गाळत होती. त्याला तिचं उत्तर मिळालं होतं. त्याने बाबांकडे पाहिलं. 

"मी असं काही झालं तरी तुझ्या आईला सोडणार नाही. तूपण तुझं प्रेम सोडू नकोस."

त्यांचं पाठबळ घेऊन तो तिच्या घरी निघाला. थोड्याचवेळात ती ऑफिसला निघेल, म्हणून घाई करत तो तिच्या घरी पोचला. आणि दारातच थांबला. तिची मावशी घरी आलेली होती. आणि समजावणीच्या सुरात तिला सांगत होती. 

"हे बघ आता आपली बाजू अशी आहे. आपल्याला थोडं जुळवून घ्यावाच लागेल. जे पर्याय समोर आहेत त्यातूनच निवड करावी लागेल ना?"

"पण करूच का मी निवड? नाही केलं लग्न तरी काय बिघडणार आहे? आपली बाजू अशी आहे म्हणे. काय तर माझ्यावर बलात्कार झाला. माझ्या इच्छेविरुद्ध सेक्स झाला. आता हे जे स्थळ तू सांगत आहेस. तो माणूस घटस्फोटीत आहे. त्याने काय सेक्स केलाच नसेल? त्याचं प्रकरण होतं म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेली. आता हा माणूस ह्या लायकीचा. पण त्याच्या घरी तो मला उपकार केल्यासारखं ठेवेल. कारण माझ्यावर बलात्कार झाला ना. का जाऊ मी अशा घरी?" ती संतापून बोलत होती. 

"जाऊ दे. हवं ते कर. मदत करायला गेले तर ह्या असल्या भाषेत मला ऐकवतेय. मी जाते. ज्याचं करायला जावं भलं…" मावशी पुटपुटत  बाहेर निघाली. 

"हेच तर. तुम्हाला असे स्थळ आणून वाटतंय कि तुम्ही माझं भलं करताय. अरे अशा घरी जाऊन कुजण्यापेक्षा मी एकटीच राहीलेलं काय वाईट मला सांग ना?"

तिने बाहेर निघालेल्या मावशीला ऐकवलं. आणि मग त्यांचं दारात उभ्या असलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलं. 
मावशी त्याच्याकडे फणकाऱ्यात पाहून निघून गेली. ती मावशी जाईपर्यंत थांबली. आणि मग त्याच्यावर बरसली. 

"कशाला आला आहेस आता? तू सोडल्यानंतर माझे काय हाल झाले ते पाहायला आलास का?"

"नाही. माफी मागायला आलोय. तुला पुन्हा मागणी घालायला आलोय."

"कशाला? सहानुभूती वाटतेय का. कि तू नाही केलंस लग्न तर कोण करेल माझ्याशी? नको मला तुझी सहानुभूती. आणि उपकार तर बिलकुल नको."

"नाही गं. तुझ्यावर उपकार करावेत म्हणून नाही आलो मी. आणि सहानुभूती पण नाही. काही असेल तर तो माझा गिल्ट, आणि माझं तुझ्यावरच प्रेम."

तिला काय बोलावं ते समजलं नाही. पण तिला त्याला आणखी रागवायचं होतं. 

"शांत हो तू. काका, काकू, तुम्ही पण बसा. मला तुमची पण माफी मागायची आहे." 

"मी जे केलं, त्यानंतर मी कधीच शांतपणे झोपू शकलो नाही. माझ्या चुकीचा सल माझ्या मनात होता. तुला मी तुझ्या कठीण परिस्थितीमध्ये एकटीच सोडून दिलं. आपण नेहमी सोबत राहू, अशी आपण एकमेकांना कमीटमेंट दिली होती. त्याला जागलो नाही."

"तुझ्यावर बलात्कार झाला. तुला असं स्वीकारलं तर आईबाबा नाराज होतील. नातेवाईक नाक मुरडतील हे तर माहित होतंच. पण माझं मला काय वाटतंय हेच मला कळत नव्हतं."

"मी खूप विचार केला. कि तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझी काही चूक नसूनपण तुला का शिक्षा व्हावी? मी तुला का सोडावं? तुझी अब्रू गेली असा सगळ्यांनी आणि मी का विचार करावा? त्या हरामखोराला याचे परिणाम भोगायला हवेत, पण ते तुला भोगायला लागतायत."

ती गुढघ्यात मान घालून रडतरडत सगळं ऐकत होती. तिचे आईबाबा पण ऐकत होते. या विषयावर तेसुद्धा तिच्याशी इतकं थेट बोलत नव्हते. कधी बोललेच तर, फार वाईट झालं, पण आता इलाज नाही, भोगावं लागेल. अशा स्वरूपाचं. तिची काहीच चूक नाही, आणि तिच्या सन्मानाला धक्का पोचलेला नाही हे त्यांनीसुद्धा कधी तिला सांगितलेलं नव्हतं. त्यांना स्वतःची पण लाज वाटत होती. बाकी सगळ्यांनी नाक मुरडली तेव्हा ते ताठ मानेने का नाही वावरले? आमच्या मुलीची काही चूक नाही, आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत ह्याची जाणीव त्यांनी तिला आणि सर्वांनाच करून द्यायला हवी होती. 

तो बोलतच गेला. 

"त्या लोकांनी तुला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं. आणि तुझा वापर करून सोडून दिलं. पण नंतर मी तुला सोडलं, तेव्हा कृती मध्ये नाही पण विचारांमध्ये मी पण त्यांचीच पातळी गाठली होती. मला हे लक्षात आलं तेव्हा माझी मलाच शरम वाटली."

त्याच्या डोळ्यातून पण पाणी यायला लागलं होतं. तो तिच्या जवळ जाउन बोलायला लागला. 

"तू वस्तू नाहीस. माणूस आहेस. माझ्या अगदी जवळची. मी चुकलो. खूप खूप चुकलो. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक माणूस म्हणून. एक मित्र म्हणून. माझ्याशी लग्न करशील?"

ती काही न बोलता रडतरडतच त्याच्या मिठीत शिरली. तिच्या आईबाबांसमोर. आजवर पहिल्यांदाच. पण त्यांनाही काही वाटलं नाही. त्यांनीसुद्धा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता.