Friday, April 25, 2014

ती आणि तो : भाग ४

(भाग १) (भाग २) (भाग ३)
त्याने तिला नंतर बऱ्याचदा फोन केले, मेसेज केले, पण तिने एकदाही उत्तर दिलं नाही. आणि तिने फोन उचलला असता तरीही बोलायचं काय, हे त्यालाही माहित नव्हतं. त्याला फक्त बोलावं वाटत होतं तिच्याशी. त्याने काही निर्णय घेतलाच नव्हता. त्याचा संभ्रम पाहून तिनेच चिडून त्याला मोकळं करून टाकलं होतं. 
त्याला मोकळं व्हायचं होतं कि नव्हतं हेहि त्याला माहित नव्हतं. 

तिच्या उत्तर न देण्यामुळे त्याचे फोन मेसेज कमी होत होत बंदच झाले. तो पूर्ण सैरभैर झाला होता. जशी आधीची बातमी सगळीकडे पसरली होती, तसंच त्यांचं लग्न मोडल्याची बातमी पण सगळीकडे पसरली होती. त्याच्या ऑफिसमध्ये आता त्याला देवदास समजायला लागले होते. आणि काही मुलींचा त्याच्यावरचा राग सुद्धा लपून राहत नव्हता. 

कोण पसरवतात असल्या गोष्टी? तो विचार करत होता. कोणाच्या घरी लग्नाचे मुलगे मुली आहेत, लोकांची लफडी, लग्न जमणं, मोडणं असल्या गोष्टी आपोआप सगळीकडे पसरतात. लोकांना उद्योग नाहीत का दुसरे? त्याच्या लक्षात आलं कि तोसुद्धा बऱ्याचदा अशा गप्पांमध्ये असायचाच. पण आता त्या गॉसिपचा विषय तो झाला होता. म्हणून त्रास होत होता. 

त्या बलात्कार करणाऱ्या लोकांनी ती तो, असं सगळ्यांचंच आयुष्य बिघडवलं होतं. त्याने मनातल्या मनात त्यांना खूप शिव्या दिल्या. त्यांचा पत्ता लागला असता, तर त्याने त्यांचा जीव घेतला असता, इतका राग त्याच्या मनात हॉस्पिटलमध्ये हे सगळं समजल्यापासून होता. 

इकडे ती पण हल्ली फार चिडचिडी झाली होती. तिला लोकांच्या नजरांचा, सहानुभूतीचा आधीच वीट आला होता. पण आईबाबा, तो सोबत होते म्हणून ती शांत राहायचा प्रयत्न करत होती. पण लग्न मोडल्यानंतर या सगळ्यात भरच पडली. आई बाबा हताश झाले होते. त्यांना आता कुठेही येणंजाणं नको वाटत होतं. आणि तिचा राग सगळीकडेच बाहेर पडत होता. 

करणारा गुन्हा करून मोकळा झाला होता. पण ती मात्र त्या दिवसापासून शिक्षा भोगत होती. तिची सहनशक्ती आता संपत चालली होती. पुन्हा एकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागले होते. 

त्याचं कामात लक्षतर लागत नव्हतं. पण तरी त्याने जास्तीत जास्त वेळ कशात तरी गुंतून राहायचा प्रयत्न चालवला होता. कारण रिकामा बसला कि तिचा विचार काही मनातून जात नव्हता. आपण केलं ते बरोबर आहे का, हि अपराधी भावना त्याचं मन पोखरत होती. या प्रश्नावर उत्तर काही केल्या मिळत नव्हतं. 

त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांच्या अवघड प्रसंगी दोघांनी चांगली सोबत केली होती. मग आताच का? 

त्याचे आई बाबा म्हणत होते ते खरंच होतं. तिच्याकडे पहायचा सगळ्यांचाच दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित होता. ती घरात आली असती तर सध्या जसं तिच्या घरी सगळ्यांनी येणं जाण कमी केलं होतं तसंच त्याच्या नातेवाईकांनी संबंधितांनी त्यांच्या घरावर अघोषित अस्पृश्यता लादली असती. 

पण तिची काय चूक होती या सगळ्यात? काहीच नाही. पण तरिहि... जे होतं ते असं होतं. मग त्याच्यात हिम्मत नव्हती का सगळ्यांच्या विरोधात उभं रहायची?

त्याने एक दोनदा त्याच्या मित्रांशी बोलायचा प्रयत्न केला. पण तेही काही समाधानकारक सांगू शकले नाहीत. 

"बघ यार, तुझ्यावर आहे. तुझे आई बाबा नाराज होतील. नातेवाईक चिडतील. मग तू काय करशील?"

थेट तसं न बोलता ते जे चाललंय ते चालू दे हेच सांगत होते. पण त्याची घालमेल थांबत नव्हती. 

दिवस नुसतेच चालले होते. तिच्या आई बाबांनी आता तिच्या लग्नाचं मनावर घेतलं. निदान त्यानेतरी सध्याची परिस्थिती बदलेल अशी त्यांना आशा होती. पण काही चांगलं स्थळ सांगून येईच ना! त्यांनी सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं. पण त्यांची प्रतिक्रिया पाहूनच त्यांची किती मदत होणार आहे हे लक्षात यायचं. 

त्यांचा हा खटाटोप पाहून ती आणखी चिडत होती. मला लग्नच नको, असं म्हणून ती वाद घालायची. 

आणि जे काही एकदोन ठिकाणाहून स्थळ येत होते, त्यात वयस्कर, लग्न न जमलेले असे कोणालाही पसंत पडत नव्हते. त्यामुळे आईबाबांना आता यातून मार्ग कसा निघणार हेच दिसत नव्हतं. 

काही दिवसांनी त्याचं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं. एरवी तो आनंदाने नाचला असता. पण तो त्या मूडमधेच नव्हता. त्याला आधी अशी प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा  कधी एकदा  तिला सांगतो असं व्हायचं. 

आणि मग ती कौतुकाने "वाह रे मेरे शेर" असं काही म्हणायची, तेव्हा कुठे त्याला त्या गोष्टीचं सार्थक वाटायचं. 

आतापण त्याच्या मनात आलं कि तिला फोन करून सांगावं. पण फोनकडे बघून त्याने नुसताच उसासा सोडला. एक मित्र म्हणून सांगायला तरी काय हरकत होती? पण तिचं बरोबर होतं. असा हात सोडून देणाऱ्याला मित्र म्हणून तरी कसं स्वीकारणार?

आपलं इतकं छान नातं तुटलं म्हणून तो आणखी दुःखी झाला. त्या बलात्कारी लोकांचा त्याला अजून राग आला. पण हे नातं तर त्यांनी तोडलं नव्हतं. ते त्याच्याचमुळे तुटलं होतं. त्या बलात्काराचा त्यांच्या नात्यावर परिणाम त्यानेच होऊ दिला होता. 

त्याचे ऑफिसातले मित्र त्याच्या अवतीभवती अभिनंदन करायला जमले. आणि त्याची विचारांची लिंक तुटली. ते त्याला ऑफिसनंतर जबरदस्ती पार्टी करायला घेऊन गेले. तो अजिबात मूडमध्ये नव्हता. पण त्याने उसनं अवसान आणून वेळ मारून नेली. 

घरी तो रात्री पुन्हा विचार करत बसला. त्याने नेमकं का नातं तोडलं होतं? तिच्यावर बलात्कार झाला. पण त्याला का प्रोब्लेम होता नेमका? तिची काही चूक नव्हती हे त्याला माहीतच होतं. मग काय?

बलात्कार. जबरदस्तीने केलेला सेक्स. हा प्रोब्लेम होता? सेक्स तर आधी त्याने पण केला होता. मग त्याला या मुद्द्यावर नाही म्हणायचा काय अधिकार होता? 

पण तिच्यावर बलात्कार झाला होता. तिची काही चुकही नव्हती. त्याच्या डोक्याचा भुगा होत होता विचार करून. 

त्या रात्री तिचा अपघात झाला असता... तिने हात पाय गमावले असते, चेहऱ्यावर व्रण राहिले असते तरी त्याने क्षणभरहि  विचार न करता तिची सोबत केली असती. कदाचित तिनेच विरोध केला असता. त्याच्यावर तिचं ओझं होऊ नये म्हणुन. ती खूप स्वाभिमानी होती. पण मग आता तिने असं नेमकं काय गमावलं होतं, कि त्यामुळे तो तिला स्वीकारू शकत नव्हता? 

अब्रू? पण समाजात लफडी करणाऱ्याला अब्रू आहे. पैसे खाणाऱ्याला अब्रू आहे. वेश्येकडे जाणाऱ्याला अब्रू आहे. बेताल वागणाऱ्या स्त्रीपुरुषांना अब्रू आहे. मग तिलाच का नाही? अब्रू तर त्या बलात्कार करणाऱ्याची जायला हवी होती. पण त्याचा काही पत्ताच नाही. विचार करता करता त्याला झोप लागली.

भाग ५