Sunday, December 25, 2011

इंडियाना खोत्स : शोध खजिन्याचा


हि गोष्ट आहे माझ्या दुसरी - तिसरीतली. मी, माझ्याच वयाचा माझा चुलत भाऊ सुशांत, आम्ही दोघं शाळा आणि १२विपर्यंतचे  कॉलेज, सोबतच होतो. एकाच वर्गात, एकाच  बाकड्यावर, रोल नंबरसुद्धा मागेपुढेच. येणं-जाण सोबत एकाच रिक्षातून. आमची जोडगोळी शाळेत प्रसिद्ध होती. 'खोत बंधू'  असंच सगळे आम्हाला म्हणायचे. आता फार फरक पडला, पण लहानपणी आम्ही बरेचसे सारखे दिसत असू, कारण काही लोक आम्हाला जुळे समजायचे. लहानपणापासून आम्ही अनेक कुटाणे केले, त्यामुळे आता सांगत आहे तसे आमचे बरेच किस्से आहेत.

या शाळेत (मोंटेसोरी बालक मंदिर) आम्ही पहिलीमध्ये आलो, आणि आतापर्यंत चांगले स्थिरावलो होतो. मित्रांचा ग्रुप जमला होता छान. मधल्या सुटीत डबा खाणं लवकर उरकून, छोटेखानी क्रिकेट, लंगडी, किंवा अजून काही टाइमपास गप्पाटप्पा चाललेलं असायचं. या वयात मुलांना कोणीही काहीही सांगतं आणि त्यांना ते खरंही वाटतं. आणि आपल्या ग्रुपमध्ये मग अशा सगळ्या गोष्टी सांगायची मुलांना हौस असते. बाकीच्यांनापण त्या खऱ्या वाटतात, आणि काहीहि गैरसमज पक्के होतात.

मला बरेच दिवस इंदिरा गांधींची भीती वाटत होती, कारण आठवत नाही, पण त्यांची केसांची अर्धी पांढरी बट, आणि आमच्या शाळेतला त्यांचा भयानक फोटो यामुळे असेल. माझा एक मित्र सुमित, बरेच दिवस हे ऐकायलाच तयार नव्हता कि चाचा नेहरू, आणि पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे एकच आहेत. इतिहास माहित होईपर्यंत सुभाषबाबूंचा घोड्यावरचा फोटो पाहून मला ते गोष्टीतल्यासारखे राजे वगैरे वाटायचे. असे अनेक समज मनात पक्के घेऊन मुलं राहत असतात.


आतापर्यंत अलिबाबा सारख्या गोष्टी वाचून मला खजिना वगैरे काय प्रकार असतो हे माहिती झालं होतं. खूप सारा पैसा, खूप सोनं-नाणं, हिरे अशी चित्र खजिन्याबद्दल मनात होती. आणि आमचा मित्र अमित बरडे, याला कुठून हि कल्पना सुचली माहित नाही, पण त्याने आम्हाला अगदी विश्वासात घेऊन, हळू आवाजात, गुपित सांगितल्याच्या अविर्भावात, सांगितलं कि आमच्या शाळेबाहेर सरस्वती कॉलनीचे जे गेट आहे, त्यापलीकडे, एक खजिना पुरला आहे, आणि त्या खजिन्याचं टोक वरती दिसत.

त्याचं हे सांगणं, मी जे ऐकून होतो कि, खजिना पुरलेला असतो, लपवलेला असतो याच्याशी मिळतंजुळतं होतं. आमचा त्याच्यावर विश्वास बसला. आम्ही ते ठिकाण पाहायला जाऊन आलो, तिथे एका पाईपचं तोंड वर आलेलं खरंच दिसत होतं. आणि ते सोनेरी रंगाचच होतं. बस खात्री झाली आमची. आता आमची चर्चा झाली कि, खजिना मिळवायचा कसा?


वर्दळीचा रस्ता, तिथे काही कसं करता येईल? आम्ही ठरवलं, कि मधली सुटी संपल्यावर, आजूबाजूच्या सगळ्या शाळेतली मुलं-मुली वर्गात परत जातात, तेव्हा गर्दी अगदी कमी होते, तेव्हा तिथे जाऊन खणायचं. आता आम्हाला एकदम भारी वाटत होतं. तेव्हा शब्द माहित नसतील हे, पण रोमांच, थ्रील वगैरे सर्व आम्ही अनुभवत होतो.
त्यानंतर बहुतेक दुसऱ्याच दिवशी, आम्ही ठरल्याप्रमाणे, मधल्या सुटीनंतर, शाळेतून बाहेर सटकलो, दगड वगैरे घेऊन तिथे खणायला गेलो. आमच्यासोबत गोविंद नावाचा आणखी एक मित्र असावा, असं मला पुसटसं आठवतंय. आम्ही खणणे सुरु करताना खूप उत्तेजित झालो होतो. खणता खणता मी, 'खुल जा सीम सीम', आणि 'तिळा तिळा दर उघड' असे दोन्ही भाषेतले अलीबाबाचे पासवर्ड वापरून पाहिले होते. पण दुर्दैव. :D

त्या मोठ्ठ्या गेटच्या पलीकडे एक चिडका म्हातारा चॉकलेट, गोळ्या, मुरकुलची गाडी घेऊन उभा राहायचा. तो कायम मुलांवर खेकसायचा. त्याचं आमच्या उद्योगाकडे लक्ष गेलं, आणि काठी घेऊन तो आमच्या मागे धावला. आम्ही घाबरून शाळेत पळालो. त्याच्या आमच्या मागे लागण्यामुळे आमचा समज उलट पक्का झाला. तो त्या खजिन्याचा रखवालदार असावा, असा आमचा समज झाला.

आम्ही नंतर अनेक योजना आखल्या, शाळेतून भुयार खणाव, रात्री उशिरा जावं, दिवाळीचा बॉम्ब फोडून पाहावा, अशा अनेक कल्पनांवर विचार झाला. काही दिवस सतत आमची चर्चा चाले. कधी तरी रात्री, आमची चर्चा घरी मोठ्यांच्या कानी पडली, आणि आमची चांगलीच खरडपट्टी काढली त्यांनी. असेच काही दिवस गेले आणि त्या योजना मागे पडल्या. त्याचा पासवर्ड वेगळा असावा, आणि तो काही करून मिळवता यायला हवा, असं मला बरेच दिवस वाटत राहिलं. पण तेही नंतर मी विसरलो.

आम्हाला खजिना काही मिळाला नाही, पण आमच्या आठवणींच्या खजिन्यात एक मस्त भर पडली. पुढे काही वर्षांनी बोक्या सातबंडेच्या साहसात असलीच एक गोष्ट वाचली तेव्हा छान वाटलं होतं. आजही त्या जागेवर तो पाईप दिसला कि एक स्मितहास्य चेहऱ्यावर नक्कीच खुलतं. :)

No comments:

Post a Comment