जुन्या काळी लोकांकडे फोटोंचे अल्बम असायचे
स्टुडिओत कधीतरीच पैसे मोजून फोटो काढून घ्यायचे
सण सहल वाढदिवस असे मोजकेच निमित्त असायचे
असलाच कॅमेरा तर रिळांच्या हिशोबात फोटो निघायचे
फोटोग्राफर लावून करून घेतलेला लग्नाचा एखादाच अल्बम मोठा
बाकी अल्बममधे कधी इथल्या कधी तिथल्या आठवणींचा साठा
बघायला बसलो कधी तर कोण्या काळचं आपलं कोणीही दिसून जातात
आपल्याच लोकांची जुनी जुनी रूपं बघत किती तरी क्षण निघून जातात
हल्ली लोक प्रत्येक ठिकाणी खचाखच बेहिशोब फोटो काढतात
आपण कशात छान दिसतो तेवढं पाहून बाकीचे डिलिट मारतात
आपल्याच फोटोंनी मग लोक आपली प्रोफाईल भरत जातात
तीच व्यक्ती तेच स्माईल, इतर लोक फक्त बॅकग्राऊंड बनत जातात
आत्मकेंद्रित प्रोफाईलपेक्षा अल्बम किती बरा वाटतो
मुद्दाम हसून घेतलेल्यापेक्षा कँडिड फोटोच खरा वाटतो
सहज वाटलं आपलं आयुष्य अल्बमसारखं असावं
अनेक जागा, अनेक लोक, विषयांना त्यात स्थान असावं
असा अल्बम घेऊन कधी निवांत आठवणीत रेंगाळत बसावं
आपल्या लोकांनी अल्बम बघताना आपणही त्यात दिसावं
आकाश खोत
No comments:
Post a Comment