Tuesday, April 14, 2026

K2S: कात्रज ते सिंहगड ट्रेक

मला ट्रेकिंगची आवड आहे. पुण्याजवळ असलेले पुरंदर वेल्हेच्या जवळ आणि लोणावळा परिसराच्या जवळ असलेल्या बऱ्यापैकी किल्ल्यांवर मी जाऊन आलेलो आहे. परंतु K2S अशा संक्षिप्त नावाने ओळखला जाणारा "कात्रज ते सिंहगड" ट्रेक माझा झालेला नव्हता. पुण्यात राहायला आल्यानंतर एका मैत्रिणीकडून याबद्दल ऐकलं होतं, पण गेल्या बऱ्याच वर्षांपासून ही ईच्छा अपूर्ण होती, ती शेवटी गेल्या रविवारी पूर्ण झाली. 


कात्रज घाटातल्या हत्ती डोंगराजवळ ३-४ ठिकाणांपैकी एका ठिकाणाहून याची सुरुवात करतात आणि १५-१६ टेकड्यांवर चढत उतरत जवळपास १४ किलोमीटर अंतर कापुन सिंहगडावर पोहोचतात. 


या ट्रेकला किमान ५-६ तास लागतातच, आणि मोठा ग्रुप असेल, बऱ्याचदा थांबत थांबत गेलो तर जास्त वेळही लागु शकतो. त्यामुळे हा ट्रेक आयोजित करणारे सहसा रात्रीच करतात. उन्हाळ्यात तर रात्रीच केलेला बरा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात दिवसा करण्याची कल्पना करू शकतो. रात्रीचा ट्रेक असल्यामुळे याची तारीख सहसा पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या एक दोन दिवस अलीकडे पलीकडे ठरवतात. आम्ही गेलो त्या आठवड्यात पौर्णिमा आठवड्याच्या मध्ये आलेली होती त्यामुळे अलीकडच्या आणि पलीकडच्या अशा दोन्ही वीकेंडला काही ग्रुप्सने हा ट्रेक आयोजित केला होता. 


मी सिंहगडला पुणे दरवाज्याच्या बाजूने चढायला नियमित जातो. पुण्यातले बरेच लोक जातात. हा ट्रेक मात्र तुलनेने मोठा आणि लांबुन करायचा असल्यामुळे एकदा करून बघावा असं माझ्या डोक्यात होतं. ट्रेक करताना समजले की हा ट्रेकसुद्धा नियमित दर महिन्याला करणारे, एकट्याने करणारे असेही धुरंधर लोक असतात. आमच्याच सोबत काही १५-२० वेळा K२S केलेले लोक होते. आम्ही सुरुवात करत असताना एक जोडपं सिंहगड ते कात्रज असा उलटा ट्रेक करून खाली उतरत होते. त्यांनी संध्याकाळी ५ च्या सुमारास सुरुवात केली असावी. अनेक टेकड्यांवरून वाट असल्यामुळे पहिल्यांदा करताना कुठल्यातरी अनुभवी लोकांच्या ग्रुप सोबतच हा ट्रेक करावा असं मला वाटतं.


मी आणि माझा मित्र सागर अशा दोघांनी "संडे हायकर्स" ग्रुप सोबत नोंदणी केली होती. त्यांच्यासोबत आम्ही एकुण अठ्ठावन्न लोकांनी हा ट्रेक त्या रात्री पूर्ण केला. ग्रुपचे संस्थापक आनंद अंकम आणि इतर अनेक अनुभवी ट्रेकर्स लोकांना मार्गदर्शन करायला सोबत होते. त्यांचं नियोजन छान होतं. 


नोंदणी केलेल्या सर्वांना ४ विभागानुसार गट पाडून टेम्पो ट्रॅव्हलर बस केल्या होत्या. आपापल्या भागातुन सर्व बस रात्री जुन्या कात्रज घाटात ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी मोठ्या समुहाला सांभाळणे सोपे व्हावे म्हणुन हिरवा, निळा, लाल अशा ६ छोट्या गटात विभागले. त्याच रंगाचे रिस्ट बँड त्यांनी लोकांना वाटले आणि प्रत्येक गटाला त्यांच्या सोबत आधीच्या ट्रेकचा अनुभव असलेले दोन गटनेते नेमले. एकाने पुढे, एकाने मागे राहायचे आणि कोणीही त्यांना ओलांडायचे नाही अशा सूचना दिल्या. असंच सर्व अठ्ठावन्न जणांत मिळुन सर्वात पुढे कोण असणार आणि मागे कोण असणार हे हि सांगितले आणि त्यांच्या पुढे जायचे नाही अशा कडक सूचना दिल्या. प्रत्येकाला आपल्या ग्रुप मध्ये नेमके किती आणि कोणते लोक आहेत याबद्दल काही संभ्रम राहु नये म्हणुन मार्गदर्शकांपैकी संजय सरांनी स्वतः समोर प्रत्येक ग्रुपला मोजदाद करून एक एक करत पुढे पुढे सोडले. 



मी आणि सागर लाल रंगाच्या ग्रुपमध्ये होतो. वाघजाई मंदिरासमोर हा सगळा कार्यक्रम पार पडला आणि आमची मोहीम सुरु झाली. रमेशअण्णा हे सर्वात पुढे निघाले आणि त्यांच्या मागे पहिला ग्रुप म्हणुन आमच्या रेड टिमचीच वर्णी लागली. कात्रजचा जुना बोगदा आणि नवीन बोगदा याच्या मधल्या डोंगर टेकड्यांवरून हा ट्रेकचा रस्ता आहे. त्यामुळे कधी इकडचा कधी तिकडचा आणि कधी दोन्ही रस्ते दिसत राहतात, रस्त्यांवरच्या गाड्यांचे लाईट्स दुरून सुंदर दिसतात आणि कात्रज, आंबेगाव, नऱ्हे, कोंढणपूर आणि इतर अनेक शहरी निमशहरी भाग रात्रीच्या दिव्यांनी उजळलेले दिसत राहतात. वरती पौर्णिमेचा (किंवा जवळचा) चंद्र असतोच. त्यामुळे एरवीच्या ट्रेक्सपेक्षा फार वेगळं विलक्षण दृश्य सतत समोर असल्यामुळे हा ट्रेक म्हणजे डोळ्यांना एक अनोखी मेजवानीच होती. ती दृश्य बघत, फोटो घेण्याचे प्रयत्न करत ट्रेक आपोआप पार पडत होता. 



आमच्या नशिबाने त्या दिवशी फार ढगाळ वातावरण नव्हतं, त्यामुळे उकाडा नव्हता. रात्रीची थंडगार हवेची झुळूक किंवा थोडा वेळ जरा जोरात वारा आम्हाला पूर्ण ट्रेक मध्ये लाभला. उन्हाळ्यात रात्रीचा ट्रेक करणं पूर्ण वसुल झालं. त्यामुळे ट्रेक करताना फारसा थकवा आला नाही. 


एकदा ट्रेक सुरु झाला कि या पूर्ण रस्त्यात कुठेही कसलेही दुकान नाही, पाण्याची सोय नाही. त्यामुळे लोक सिंहगडला ट्रेक + पिकनिक आणि कधी नुसती पिकनिक म्हणुन जातात कारण तिथे सरबत, फळं, दही, ताक, पाण्याच्या बाटल्या अशी सगळी सोय रस्त्यातही असते आणि वर तर असतेच. तशा अपेक्षेने इथे येऊन भागत नाही. इथे आम्हाला या गोष्टीची आधीच कल्पना दिली होती आणि प्रत्येक ट्रेकरने स्वतःसाठी किमान ३ बाटल्या साधे पाणी आणि १ बाटली इलेक्ट्रोलाईट असलेले पाणी आणा अशी सूचना दिली होती. 



कुठलीही प्रदीर्घ ऍक्टिव्हिटी, मग ती सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग असु देत, त्यात पाण्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे असते. आणि इलेक्ट्रोलाइट्स हा थोडा दुर्लक्षित विषय आहे. आपल्याला घाम येतो तेव्हा फक्त शरीरातील पाणीच कमी होत नाही, त्यासोबत क्षार म्हणजेच मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा कमी होत असतात. बऱ्याच वेळेला लोक फक्त पाणीच पीत राहतात, त्याने पाणी तर शरीरात जाते पण क्षार जात नाहीत. क्रॅम्प येणे, चक्कर येणे, प्रचंड थकवा येणे असे अनेक त्रास जे लोकांना अशा वेळेस होतात ते याची काळजी घेतली तर होत नाहीत. त्यामुळे इलेक्ट्रल, एनर्झल, फास्ट अँड अप या उत्पादनांपैकी जे आवडेल ते किंवा किमान लिंबु मीठ पाणी तरी सोबत ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला मी सुद्धा या बाबतीत अनभिज्ञ होतो, पण आता मात्र शक्यतो याची काळजी घेतो आणि त्याचा फायदाही जाणवतो. 


१५-१६ टेकड्या असल्यामुळे आम्ही जसजसे पुढे चाललो होतो तसतशी लोकांची मोजणी सुरु होती, आता चौथी गेली, आता सातवी गेली.. आणि त्यावरून वादविवादसुद्धा होत होते. एक तर रात्रीच्या वेळी टेकड्यांमध्ये नेमका फरक करणे अवघड होते, आणि दुसरे म्हणजे काही टेकड्या पूर्ण खाली उतरून चढाव्या लागत होत्या तर काही थोडं खाली वर करून मागे सरत होत्या. त्यामुळे कुठली टेकडी कितवी हे अनुभवी लोकच आत्मविश्वासाने सांगु शकत होते, बाकी लोकांचे फक्त अंदाजपंचे मोजत मोजत चालले होते. 


कुठलाही ट्रेक सुरु होऊन काही वेळ झाला कि आलेल्या लोकांपैकी काही जणांचा सराव कमी असतो आणि त्यांना थकवा लवकर येतो, मग आता किती, अजून पुढे किती वेळ असे प्रश्न सुरु होतात. त्यांच्यासाठी किती टेकड्या झाल्या हा प्रश्न फार महत्वाचा असतो. इतर ठिकाणी एकाच किल्ल्यांचे ट्रेक असतात तेव्हा सोबत असलेले अनुभवी लोक किंवा आपण चढत असताना वरून उतरत येणारे लोक सहसा लोकांना प्रोत्साहन द्यायला "बस आलाच तुम्ही वर, आणखी १० मिनिट किंवा १५ मिनिट" असं उत्तर देतात. असं २-४ वेळा ऐकलं कि नवख्या लोकांना त्यातली मेख कळते किंवा काही जणांची सहनशक्ती सुद्धा संपते. त्यांचा त्रागा होतो... "अरे यार सगळे मघापासून फक्त १० मिनिट १० मिनिट करतायत". 


हा ट्रेक बराच मोठा असल्यामुळे हे १० मिनिटांचं उत्तर इथे खपणार नव्हतंच. त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये एक सौरभ नावाचा ट्रेकर दर महिन्यात एकदा तरी हा ट्रेक करतो असं लोकांना कळलं होतं. सगळे त्याला विचारत होते आणि त्याचं ठरलेलं उत्तर होतं "पाऊण तासाच्या" प्रमाणात. आधी हे समोरची टेकडी करायला आपल्याला पाऊण तास लागेल मग आणखी पाऊण तास, बस झालं. नंतर आता आलोच, पाऊण तास फक्त.. शेवटी शेवटी २० मिनिटांवर हे उत्तर आलं होतं. 



इथल्या ट्रेक मध्ये एक गमतीशीर गोष्ट मला अशी वाटली कि आम्हाला बहुतांश चढ हे उभे चढावे लागले. म्हणजे ते आता शब्दात सांगणं अवघड आहे तसं.. पण एखादा डोंगर डोळ्यासमोर आणा, त्याच्यावर जायला आपण सहसा वळणावळणाचा रस्ता घेतो. म्हणजे डोंगर किंवा कळस समोर दिसत असला तरी सरळ त्याच दिशेने जात नाही, इकडून तिकडून वळसे घेत जातो. इथे मात्र बरेच कळस आम्हाला दिसत होते आणि आम्ही अगदी सरळ चढाई करून त्या दिशेने जात होतो. त्यामुळे कोणी आमचा बाजूने लांबून फोटो काढला असता तर डोंगराच्या 2D चित्रावर मानवी आकृत्या चालत आहेत असं दिसलं असतं. 






या रस्त्यावर वाळु भरपूर आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जमीन, माती पूर्ण कोरडी ठाक असते. त्यामुळे उतरताना घसरण्याची शक्यता वाढते. काही काही उतार अवघड होते. एका ठिकाणी तर आधार घेण्यासाठी मजबूत दोरी बांधून ठेवली आहे. इथे आणि इतरही अवघड ठिकाणी सर्वांचं उतरून व्हायला बराच वेळ लागायचा. सगळ्यांकडे हेड टॉर्च होते. एरवी हातातले टॉर्च चालून जातात, पण अवघड चढाईच्या वेळेस किंवा विशेषतः तर तोल सांभाळत उतरताना हात मोकळे ठेवुन हेड टॉर्च वापरणेच आवश्यक होते.  आमची रेड टीम पुढे असल्यामुळे आमचं उतरून झालं आणि थोडं पुढे जाऊन मागे वळून पाहिलं कि अंधारात मागच्या टेकडीवर वरपासून खालपर्यंत सगळ्या ग्रुपमधल्या सगळ्या लोकांचे हेड टॉर्च फक्त दिसायचे आणि तेही दृश्य बघायला मजा यायची. 



५८ जण असल्यामुळे पुढे मागे होणं, मध्ये थोडा गॅप पडणं असे साहजिक प्रकार होतच होते. संडे हायकर्स टीमकडे अशा प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वॉकी टॉकी होते. ट्रेकमध्ये असताना मोबाईल रेंज सारखी येत जात असते, त्यामुळे अशा यंत्राचा चांगलाच फायदा होतो. त्या टीमचं आपसात अमुक रंगाची टीम इथे पोहोचली, अमुक लोक मागे राहिले आहेत, थोडावेळ सर्वांना थांबायला सांगा अशा प्रकारचा संवाद सतत सुरु होता. त्यानुसार सगळा ग्रुप अधेमध्ये ब्रेक घेत होता. २-३ तासांनी थोडा मोठा ब्रेक घेऊन सर्वांनी थोडं सोबत जे काही आणलेलं असेल ते खाऊन घेतलं. 



त्यानंतर त्यांनी सांगितलं कि आपला ट्रेक कोंढणपूर फाट्यापर्यंत संपतो. सिंहगड किल्ला त्यापलीकडे आणखी २-३ किलोमीटर घाट चढल्यावर येतो. तिथे जायची ज्यांची इच्छा असेल तर जे आधी पोहोचतील आणि ज्यांना आणखी चालण्याची ऊर्जा शिल्लक असेल त्यांनाच जाता येईल. उरलेल्या लोकांना आपल्या बस तिथे थांबलेल्या आहेत त्यात बसुन जिथे आपलं जेवण सांगितलं आहे त्या हॉटेलात नेण्यात येईल. 


इथुन पुढे "कलर टीम" मोडल्या आणि ज्यांना कोंढणपूर ते सिंहगड हा भाग सुद्धा करण्याची इच्छा होती ते रमेश अण्णांच्या जवळ राहुन पुढे पुढे राहायचा प्रयत्न करायला लागले. रमेश अण्णाच्या पुढे कोणी जायचं नाही एवढा नियम मात्र सर्वांनी बहुतांश वेळ पाळला. सागर आणि मलासुद्धा सिंहगड पर्यंत जाण्याची इच्छा होतीच. तसं केलं तर तो खरा K2S (कात्रज ते सिंहगड) झाला असता, नाहीतर तो K2K (कात्रज ते कोंढणपूर फाटा) झाला असता असं एक स्वतःला मोटिव्हेट करण्यासाठी माझ्या मनात एक कारण होतं. 


आता मी जेव्हा नियमित सिंहगडला जातो तेव्हा काही आत जाऊन निवांत फिरत नाही, पुणे दरवाज्यापाशी येऊन परत उतरतो. सिंहगड आतमधुन काही वेळा निवांत फिरून झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस आत जाण्याची गरज वाटत नाही. तसंच हा ट्रेक पुन्हा केला तर कोंढणपूरपर्यंत हरकत नाही, पण आज पहिलीच वेळ आहे तर आज तर सिंहगडला जाऊच असं मी मनाशी ठरवलं होतं आणि सागरलाही तेच म्हणालो. सुदैवाने आम्हा दोघांना शेवटपर्यंत पुढच्या १०-१५ लोकांमध्ये राहता आलं आणि सिंहगड शेवटपर्यंत करता आला. 


सिंहगड अगदी सुरुवाती पासून आम्हाला दिसत होता, त्यावरच्या टॉवर मुळे ओळखु येत होता. तिथले लाल दिवे टिमटिमत होते. दिवसा ट्रेक करतो तेव्हा किल्ल्याचा बालेकिल्ला किंवा कळस, किंवा कुठे तरी उंचावर रोवलेला भगवा झेंडा दुरून दिसत असतो, त्यामुळे मनाला एक उभारी मिळत असते. लक्ष्य समोर दिसत असतं आणि तिथे पोहोचेपर्यंत चालत राहायचं बळ मिळतं. आज गडावरच्या टॉवरने तेच काम केलं. जवळ येताना खडकवासला धरण आणि पाणी दिसायला लागलं, पहाटे उजाडायच्या आधी आकाश चंद्राभोवती केशरी झालं होतं, त्यालासुद्धा सूर्योदयाची शोभा आली होती. 



या ट्रेकबद्दल आम्हाला आधीच एक दोन जणांनी सांगितलं होतं कि शेवटच्या ३-४ टेकड्या अवघड जातात. त्याने सुरुवात झाली तर एवढ्या अवघड नाहीत, पण आपण तिथे पोहोचेपर्यंत भरपुर चालुन येऊन दमलेलो असतो, त्यामुळे शेवटी त्या थोड्या मोठ्या टेकड्या पार करताना फार जीवावर येतं असं काही. ट्रेकमध्ये सुद्धा काही आधी करून आलेले लोक तेच सांगत होते आणि त्यांच्या बोलण्यात W फार येत होतं. म्हणजे त्या इंग्रजी अक्षरासारखं सारखं खाली वर खाली वर करत जाणं. 


ट्रेकला सुरुवात झाल्यापासुन "वो आखरी W बहोत मुश्किल है..." "actually वो W भी नाही V और W है..." "वो W कब आयेगा?..." "अरे अब तक तो सब आसान था, वो W आयेगा तब वाट लगेगी..." अशी चर्चा फार कानावर पडत होती. मला व्यक्तिशः ते फार अवघड वाटले नाहीत. कदाचित त्या दिवशी वातावरण छान असल्यामुळे अति घाम किंवा थकवा आला नाही, तसं काही झालं तर कदाचित त्रासदायक वाटलं असतं. पण मला आता बऱ्यापैकी ट्रेक्स आणि लॉंग सायकल राइड्स केल्यामुळे एक कळुन चुकलं आहे. कुठलाही टप्पा, मग तो शेवटचा असो, जेवणाचा असो किंवा अधला मधला काही लँडमार्क असो, तो कधी येईल कधी येईल असं सारखं मनातल्या मनात किंवा मोठ्याने विचारून काहीही फायदा होत नाही. उलट आपलं अवसान जातं. त्यापेक्षा पुढे जे काही आहे ते येईल तेव्हा येईल.. आपण आपल्या गतीने रमत गमत, आनंद घेत गेलो तरच ते चांगलं होतं, नाही तर सारखं हे कधी संपेल असा विचार करत करत आपण कंटाळतो. 


कोंढणपूर फाट्याजवळ पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी उजाडलं होतं. जवळपास २८ लोक सिंहगडावर येण्यासाठी तयार झाले, आणि उरलेले २ बस मध्ये बसुन खाली हॉटेल मध्ये गेले. थोडा रस्ता घाट मार्गे चढल्यावर एका व्ह्यू पॉइंटला आम्ही थांबलो, फोटो काढले आणि मग पुढे पुन्हा डोंगर मार्गे जायचं ठरवलं. 



इथे मात्र गंमतच झाली. या रस्त्याने जाताना एका ठिकाणी पायवाट सोडुन लोक आणखी उंच डोंगरावर चढुन गेले. तिथे पुढे उतरायला रस्ता थोडा अवघड होता. एका दगडाच्या खोबणीत भार दगडांवर आणि पायावर जोर देऊन तोल सांभाळत उतरावं लागणार होतं. 


तिथे सराईत लोक उतरले होते पण बाकी लोकांना वेळ लागत होता. तिथे थोडा ट्राफिक जॅम झाला. आम्ही पुढे लोकांना वेळ लागतोय म्हणुन परत मागे जाऊन दुसरा रस्ता मिळतोय का बघायला गेलो. जिथे पायवाट सोडुन आम्ही वर चढलो होतो, त्या बाजूने रस्ता फार निसरडा होता, चिखलामुळे नव्हे तर कोरड्या वाळूमुळे. तिथून बसून उतरावं लागलं आणि काही लोकांची घसरण्याच्या भीतीने फार घाबरगुंडी उडाली होती. त्या डोंगरावरून दोन्ही बाजूने उतरताना लोकांची फजिती झाली होती. पण तरी त्या भागात मजासुद्धा फार आली. या रस्त्याने जाताना आम्हाला सिंहगडाच्या मागची बाजु बघता आली. नेहमी पुण्याकडची बाजु दिसते. 



सिंहगडच्या पार्किंग मध्ये पोहोचल्यावर आमचं एक स्ट्रेचिंग सेशन झालं. साचीने सर्वांना सूचना देत छान व्यायाम करून घेतला. त्यानंतर आम्ही कोंढणपूर फाट्यापर्यंत जीपने गेलो, आणि पुढे आमच्या बसमध्ये खाली एका हॉटेल मध्ये पोहोचलो. इथे सर्वांसाठी जेवण सांगितलं होतं. ताजेतवाने होऊन आम्ही जेवण केलं. सिंहगडावर असतं तसंच मडक्यातलं दही, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, डाळ भात असा साधाच पण रुचकर बेत होता. 


जेवण होता होता संडे हायकर्सकडून सर्व सहभाग्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं, ट्रेकसाठी मेहनत घेणाऱ्या, यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्व स्वयंसेवक आणि मार्गदर्शकांचं सर्वांनी टाळ्या वाजवुन कौतुक केलं. त्यानंतर येताना आलो त्याच बसमध्ये बसुन सर्व हायकर्स आपापल्या घराच्या दिशेने निघाले. 



अनेक वर्षांपासुन मनात असलेला हा ट्रेक देवाच्या कृपेने अतिशय छान हवामान, प्रसन्न वातावरण, उत्साही सहप्रवासी आणि अनेक सुंदर दृश्ये यांच्या साथीने मस्त पार पडला. 




No comments:

Post a Comment