Tuesday, March 26, 2024

अधिकार

गेल्या आठवड्यात माझ्या बायकोच्या आजी देवाघरी गेल्या. बातमी कळताच आम्ही सर्व तातडीने पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला निघालो. गाडीमध्ये मी माझी बायको आणि माझे सासु सासरे होते. 

पूर्ण प्रवासात सतत आम्ही संभाजीनगरला आजींच्या राहत्या घरी गोळा झालेल्या नातेवाईकांशी संपर्कात होतो. एरवी पुण्याहून निघालो, नगरला पोहोचलो, नगर क्रॉस झालं, जवळ पोहोचलो एवढे अपडेट पुरेसे असतात. अशा प्रसंगी मात्र कोणालाच स्वस्थ बसवत नसतं, सतत बोलत संपर्कात रहावं वाटतं. जवळची एक व्यक्ती गेलेली असताना इतर जवळच्या व्यक्तींच्या सहवासात रहावं वाटतं. 

आणि यावेळेस सतत चर्चा करण्यासाठी आणखी एक विषय होता. दिवंगत आजींना मुलगा नव्हता. त्यांना आणि दादांना (आजोबांना सगळे दादा म्हणतात) सहा मुली. त्यातल्या एक मावशी आजाराने अशातच देवाघरी गेलेल्या. सख्खा भाऊ नाही. 

मग अंतिम संस्कार कोणी करायचे असा प्रश्न होता. यावर आजी आणि दादांनीच काही वर्षांपूर्वी आमच्या मुलींनीच आमचे सर्व सोपस्कार पार पाडले तर बरं अशी इच्छा व्यक्त केली होती असं समजलं. आणि या बहिणींची सुद्धा तशीच इच्छा होती. 

सहसा घरातून एकदा पार्थिवाला निरोप दिला की पुरुष मंडळी वैकुंठात जाऊन अग्निसंस्कार करून येतात आणि स्त्रिया घरीच राहतात. माझ्यासमोर आजवर आलेल्या प्रसंगात हेच पाहिलं होतं. आणि वैकुंठात जे वातावरण असतं ते पाहता मला त्यात आजवर फार काही वावगं वाटलं नाही. 

आत्ता अगदी काही तासांपूर्वीपर्यंत आपल्यात वावरणाऱ्या जवळच्या व्यक्तीच्या पार्थिवाला अग्नी देताना पुरुषसुद्धा भावूक होतात. आपण हे काय करतोय असा प्रश्न पडतो. त्यात स्त्रिया तुलनेने जास्त भावनाप्रधान असतात, त्यांना घरी असतानाच दुःख आवरायला बऱ्यापैकी जड जातं. 

पण आजवर मी पाहिलेल्या बहुतेक प्रसंगात सगळे विधी करायला मुलगा होताच. 

प्रश्न होता ही मुलींनीच सर्व संस्कार करण्याची थोडी रूढ मोडणारी इच्छा पूर्ण करायला कोणी गुरुजी सहाय्य करतील का? घरातलंच कोणी विरोध करेल का? सुदैवाने घरातल्या कोणी मोडता घातला नाही परंतु अशी तयारी दाखवणारे गुरुजी शोधायला मात्र अवघड गेलं. 

अनेक ठिकाणी फोन झाले. मुलींना अधिकारच नाही हे शेरे ऐकवून नकार मिळाले. प्रयत्न करून त्यातलेच एक तयार झाले पण तरीही त्यांनी विधी सांगताना तुसडेपणा, खरं तर हा ह्यांचा अधिकार नाही पण आता काय करणार, करा.. असली शेरेबाजी केलीच. 


या बहिणींनी मात्र या सर्वातून खंबीर राहून एकमेकींना धीर देत तो प्रसंग निभावून नेला. फार कौतुक वाटलं त्यांचं. आणि थोडं इतर नातेवाईकांचे सुद्धा ज्यांनी हे पार पडायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली. 

या अधिकारावर चर्चा होत असताना मला गाडीत जाताना आईंचं एक वाक्य सतत आठवत होतं.. मुलींचं असच का होतं? जबाबदाऱ्या सगळ्या घ्यायच्या, सेवा सगळी मुलींनी करायची, कामं करायची आणि अधिकार मानसन्मान मात्र पुरुषांना. सुख असो दुःख असो कुठलाही प्रसंग आला तरी तेच. आपल्याच आई वडिलांचं करायला अधिकार का नाही? 

आज त्याच आजींचे दशक्रिया विधी पैठणला पार पडले. तेही याच बहिणींनी केले. इथे भेटलेल्या गुरुजींचा मात्र सुखद अनुभव आला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कसलीही शंका मनात न ठेवता सगळं करा. मुलींना मुलांना आहे तसाच पूर्ण अधिकार आहे. उलट मुली दोन कुळांचा उद्धार करतात त्यांना जास्त अधिकार आहे. 

असेच गुरुजी सगळीकडे का नसतात? असा चांगला विचार सगळ्यांनीच दाखवला तर का मुली नकोशा होतील? 

वंशाला दिवा म्हणुन, वय झालं की आधार द्यायला म्हणुन, शेवटी खांदा द्यायला आणि अग्नि द्यायला म्हणुन अशा नाना कारणांनी लोक मुलगा मुलगा करत बसतात. मुली हे सर्व करू शकतात. 

आजी दादांना मुलीच असल्यामुळे अनेकदा अपमान झेलावे लागले असं मी ऐकलं. त्याउपर त्यांनी अशी इच्छा दाखवली आणि मुलींनी ती पूर्ण केली. आणि आज त्यांना तो पाठिंबा मिळाला. 

आधीच्या काळी अनेक मुलगा नसलेल्या कुटुंबात मुलींना असं बोलताही आलं नसेल. त्यांच्या आई वडिलांचे विधी करायला कोणी चुलत भाऊ, पुतण्या, नातू, जावई असे कोणी पुढे झाले असतील. बरं संबंध जवळचे आणि आपुलकीचे असले तरी ठीक पण चांगले संबंध नसतानासुद्धा केवळ अधिकाराच्या मुद्द्यावर कोणीही सोम्या गोम्या त्यांच्या आई वडिलांचं करायला पुढे केला जात असेल तर त्यांना किती वाईट वाटत असेल? 

आणि कोणी दिला हा अधिकार? मी गेल्यावर माझ्या देहाचं काय व्हावं हे ठरवायचा पहिला अधिकार माझा, मी तो व्यक्त न करता गेलो तर माझ्या कुटुंबाचा अधिकार हवा. कोणी तिसऱ्याने का अधिकार सांगावा? 

आधीच्या काळी धर्मपरंपरा म्हणून, पुरुषप्रधान व्यवस्था म्हणून जे होत असेल ते असेल. पण आपण सती प्रथा सोडली, विधवा केशवपन सोडलं, जुना पेहराव सोडला, असे अनेक बदल केले. तसे आता असेही बदल स्वीकारायला हवेतच. 

मी वाचलेल्या एका सुभाषितात असं म्हटलं होतं की आपल्या मतिला पटेल तोच धर्म. एखादी गोष्ट ब्रह्मदेव सांगतोय पण बुद्धीला पटत नसेल तरी ती करू नका, आणि जी गोष्ट आपल्या सद्बुद्धीला पटेल ती ब्रह्मदेवसुद्धा चुकीची ठरवू शकत नाही. 

आपल्या लोकांनी बदल बंद केले तेव्हाच आपल्या सनातन धर्माचं साचलेलं डबकं होऊन त्यात घाण माचली होती. आपण पुन्हा बदल स्वीकारायला लागलो तेव्हापासूनच आपण समाज म्हणुन पुन्हा प्रगतीपथावर आहोत. 

कधी काळी याच पैठणमध्ये कर्मठांनी, परंपरा मोडली म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना देहत्याग हेच प्रायश्चित असं सांगितलं होतं. आणि त्यांनी ते करूनही त्यांच्या मुलांना छळलं होतं. आज त्याच ठिकाणी गुरुजींनी मुलींना पूर्ण अधिकार आहे हे सांगताना ऐकलं तेव्हा फार बरं वाटलं. 

एका इंग्रजी सिरीजमध्ये एक छान वाक्य ऐकलं होतं, Power resides where men believe it resides. 

आपण पूजेला एक सुपारी उचलतो आणि मग तिला गणपती मानून पुढचे विधी करतो, दगडाला शेंदूर फासतो मग त्याला देव मानतो, अंतिम संस्कारात एक दगड उचलून तोच सांभाळून त्याला अश्मा म्हणून पूजेत घेतो. 

हा मान देणारे आपणच, अधिकार देणारे आपणच, अधिकार गाजवणारे आपणच आणि सदुपयोग करू शकणारे सुद्धा आपणच. 

चांगले विचार आणि काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे आणि तो सर्वांनी सतत बजावावा. 

ता. क. देवाघरी गेलेल्या व्यक्तीचं समाधान असमाधान व्यक्त करण्याचा अधिकार आपण कावळ्यांना दिलेला आहे. आमच्या आजीच्या पिंडाला तत्काळ कावळे शिवून त्यांनी आपलं पूर्ण समाधान व्यक्त करण्याचा अधिकार बजावला.

No comments:

Post a Comment