सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या.
कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे.
त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.
कॉलेजात असताना मी आणि माझा मित्र कोणालातरी भेटायला गेलो होतो, त्यांच्या घरातच छोटं मंदिर होतं. ते आजोबा स्वतः तिथे पद्धतशीर पूजा करायचे.
आम्ही दर्शन घेतलं. घरातलं खाजगी मंदिर असल्यामुळे तिथे काही मोठी दानपेटी नव्हती पण तरीही आमच्या आधी येऊन गेलेल्या लोकांनी काही पैसे, पेढे असं काही तरी वाहिलेले दिसत होतं.
एरवी मी मंदिरात दान टाकत नाही, आणि त्यादिवशी सोबत काही पैसेही नेलेले नव्हते. पण आम्ही त्यांच्या घरात त्यांच्यासमोरच असल्यामुळे जरा अवघडल्यासारखं झालं.
मी म्हणालो आजोबा आम्ही काही आणलेलं नाही वाहायला.
त्यांनी त्यांचं फुलपात्र पुढे केलं, म्हणाले हे पाणी वाहा जरा देवाला, हे फुल पण घे.
देव काही म्हणतो का मला पैसेच दे किंवा अमुकच वहा? अरे हे सगळं ज्याने बनवलं त्याला त्यानेच बनवलेल्या गोष्टी आपण वाहतो ते कशा साठी?
ती आपली भावना असते. आपल्याला या जगात आणलं, इथल्या सगळ्या गोष्टी उपभोगायला मिळाल्या, तेव्हा त्याची कृतज्ञता म्हणून आपण ते देवासाठी वाहतो, एक प्रतीक म्हणुन.
पण सगळं त्याने बनवलं म्हणुन काही कचरा वाहणार का? तर आपणच देताना आपल्याला चांगलं वाटेल अशा गोष्टी ठरवल्या.
पत्र पुष्प फलं तोयं असा काहीसा श्लोक म्हटला त्यांनी आणि म्हणे फुल, पान, फळ, पाणी असं सगळं चालतं. आणि ते पण ऋतूकालोद्भव. हिवाळ्यात पण मला आंबाच हवा असा काही हट्ट करत नसतो देव.
त्यावेळी जे उपलब्ध असेल ते द्यायचं.
त्या आजोबांचा मुड छान होता, त्यामुळे इतकं छान समजावून सांगितलं होतं त्यांनी, ते मला अजुनही लक्षात आहे.
हा जो कोणी ट्रेकर होता, त्याने सहज भावनेनं तेच केलं. इथे ठेवलेली मूर्ती पाहुन त्याला काही तरी वाहण्याची इच्छा झाली आणि जवळच्या दोन गोळ्या काढून ठेवून दिल्या.
या छोट्याश्या कृतीत जेवढं सौंदर्य आहे ते देवासाठी १०० किलो पेढे, १००० किलो बर्फी, अमुक किलो चांदी, तमुक किलो सोन्याचं सिंहासन असा दिखावा करण्यात आहे का... विचार करण्यासारखी गोष्ट आहे.