Thursday, March 30, 2023

रामाचा प्रभाव

यावर्षीच्या गुढीपाडव्याला पहाटे तुळशीबागेतल्या राम मंदिरात सायकलवर गेलो होतो. तिथे गणपतीबाप्पा, राम लक्ष्मण जानकी, महादेव आणि इतर देवतांच्या दर्शनाने नववर्षाची सुंदर सुरुवात झाली. 

बाहेर नववर्ष शोभा यात्रेसाठी तयारी चालु होती. रामाचा मोठा कोदंडधारी पुतळा एका ट्रकवर होता आणि असेच इतर ट्रकसुद्धा यात्रेसाठी सजवले जात होते. 


घरी येताना रामाचा आपल्या संस्कृतीवर केवढा प्रचंड प्रभाव आहे त्याचा विचार करत येत होतो. 

आपल्या वर्षातल्या प्रमुख सणांवर रामाचा प्रभाव आहे. तसं आपल्या बऱ्याच सणांशी एकापेक्षा अधिक पौराणिक कथा निगडित असतात, कि अमुक दिवशी ह्या देवाने असं केलं, ह्या देवीने तसं केलं, तमुक ऋषींनी काही केलं असे २-४ निमित्त एकत्र असतात. देव लोक पण मोठ्या कार्याला हात घालताना पंचांग मुहूर्त पाहायचे कि काय देव जाणे.  

वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचे एक कारण म्हणजे श्रीरामाचा राज्याभिषेक. 

रामनवमी तर अर्थात रामाचाच सण आहे. 

हनुमान जयंती, रामभक्ताचा सण. 

देवीच्या नवरात्रीनंतर येणारा दसरा, या दिवशी रामाने रावणाचा वध केला, त्याबद्दल साजरा होतो. 

काही दिवसांनी येणाऱ्या दिवाळीचं एक कारण रामाचा वनवास संपुन अयोध्येत परतल्याबद्दलचा आनंद. 

आपल्या भाषेवर सुद्धा किती प्रभाव आहे पहा: 

रामराज्य: आदर्शवत राज्य. रामाने अयोध्येवर केलेल्या राज्याचा उल्लेख रामराज्य म्हणून होतोच, पण प्रजेवर प्रेम करत त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या शिवरायांसारख्या राजाच्या राज्यकारभाराची तुलना केली जाते ती रामराज्याशीच. 

रामबाण उपाय: एखाद्या समस्येवर किंवा आजारावर सर्वोत्तम उपाय कोणता तर तो रामबाण उपाय. कारण रामाचा बाण त्याचं काम तमाम केल्याशिवाय राहणार नाही. 

एकमेकांना भेटल्यावर "हॅलो" सारखं "राम राम" म्हणायची आधी पद्धत होती, ती आता जवळपास कालबाह्य झाली आहे. 

कोणी वारल्यावर अंतिम संस्कार करायला नेतानासुद्धा रामाचंच नाव घेतलं जातं. 

ह्याचं कारण म्हणजे नामस्मरणाला आपल्याकडे असलेलं महत्व. त्यामुळे प्रत्येक निमित्ताला देवाचं नाव घेतलं जावं यासाठी अशा पद्धती पडल्या. रामायणाच्या गोष्टींमध्येच एक दोन गोष्टी श्रीरामाच्या नावाच्या चमत्काराबद्दल आहेत. 

अशाच श्रद्धेमुळे लोक नाव ठेवतानासुद्धा कुठल्याही गोष्टीनंतर किंवा संकल्पनेनंतर शेवटी राम लावून नाव ठेवायचे. कृष्णाच्या भावाचं नावसुद्धा बलराम होतं. बलशाली राम. तुकाराम, सखाराम, जयराम, जलाराम, धनीराम इत्यादी इत्यादी. 

शिर्डीच्या साईबाबांचं काही भक्त ओम साईराम म्हणून स्मरण करतात. 

अगदी आताच्या काळात सारखं इकडून तिकडे पक्ष बदलत फिरणाऱ्या राजकारण्यांना आयाराम गयाराम म्हणण्याची पद्धत पडली आहे. रामाच्या नावाने राजकारण तर चालू आहेच. 

आपल्या आयुष्यात या न त्या स्वरूपात राम असावा म्हणजेच देवाची कृपा असावी हि सुप्त इच्छा इतकी असते कि आता आयुष्यात काही अर्थ राहिला नाही याच अर्थाचा "जगण्यात राम राहिला नाही" असा एक वाक्प्रचारसुद्धा आहे. तोही आता कालबाह्य होतोय बहुतेक. 

आपल्या भाषेत, श्रद्धांमध्ये, सणांमध्ये हा प्रभाव तर आहेच पण त्या कथेच्या खुणासुद्धा भारतभर किंवा भारतीय उपखंडात पसरल्या आहेत. रामायणाची कथा अयोध्या, शरयू, गंगा, यमुना, दंडकारण्य, गोदावरी करत करत उत्तर ते दक्षिण भारत आणि लंका असा प्रवास करून येते. त्यामुळे अनेक ठिकाणी राम सीता लक्ष्मण त्यांच्या वनवासात असताना राहून गेले अशा मान्यता आहेत. तिथे तशी मंदिरे आहेत. 

जिथे जिथे प्राचीन काळी भारतीयांचा इतर प्रदेशांशी व्यापारी किंवा राजकीय संबंध आला तिथे तिथे या कथेचं गारुड पसरलं. आग्नेय आशियामधल्या देशांमध्येसुद्धा या कथा सर्वांना परिचित आहेत. रामायणाची भारतातच जशी इतकी रूपं आहेत, ती रंगवून सांगताना त्यात बदल होत गेले तसे रामायणाचे काही रूप त्या देशांमध्ये सुद्धा आहेत. रामलीला सारखे कलाप्रकारसुद्धा आहेत. 

थायलंडच्या राजघराण्यात आज पण राज्याभिषेक झाल्यावर राजाला राम म्हणून म्हणण्याची पद्धत आहे. त्यांचा आताचा राजा हा दहावा राम आहे. गेल्या दहा पिढ्यांपासून हि पद्धत ते पाळतात.

असो. रामाचा महिमा काही एका लेखात लिहून संपणारा नाही. परवा रामाच्या दर्शनानंतर रामाबद्दलच्या आठवलेल्या ह्या सर्व गोष्टी कागदावर उतरवायचा प्रयत्न केला एवढंच. 

सर्वांच्या आयुष्यात राम रहावा हि रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा. जय श्रीराम!!!