Friday, April 22, 2022

आनंद कुठे आहे?

 सोशल मीडियावरील सर्व ट्रेंडिंग गोष्टींपैकी, मला एक विशिष्ट ट्रेंड आवडतो. आनंदाची व्याख्या करणे. लोक फोटो पोस्ट करताना, व्हॉट्सॲप वर स्टेटस, किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्टोरीज टाकताना कॅप्शन लिहितात. त्यात ते त्यावेळेसचा आनंद म्हणजे काय याची शब्दात व्याख्या करण्याचा प्रयत्न करतात. 

"खूप वर्षांनंतर तुमच्या जुन्या मित्रांना भेटणे म्हणजे आनंद." 

"आनंद म्हणजे आपल्या गावी जाणे"

"आनंद म्हणजे आईच्या हातचे जेवण" 

"आनंद म्हणजे आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवणे आणि तासांची गणती विसरणे"

छोट्या छोट्या गोष्टीमधला आनंद लोक व्यक्त करतात, आनंद मिळवण्याचे त्यांचे सोपे सोपे मार्ग दाखवतात म्हणुन मला हा ट्रेंड आवडतो. 


राग, दुःख, वैताग, संताप, कंटाळा यांच्यासाठी हजार कारणे सांगणे फार सोपे असते, आणि आपण त्यातच अनेकदा गुंतलेले असतो. अशावेळेस या गोष्टी लोकांना आनंदाची कारणे, ज्या गोष्टी त्यांना आनंद देतात त्या गोष्टींचा विचार करायला लावतात.


अचानक, आपल्याला आनंदी होण्याची अनेक कारणे सापडतात. जरी कधी तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल दु:खी असाल, आणि कोणाची अशी पोस्ट पाहिली तर…


एखाद्याला तो घरी जेवत असल्यामुळे किंवा तो त्याच्या जुन्या मित्राला भेटल्यामुळे किंवा त्याने त्याच्या आवडत्या फिल्म स्टारचा चित्रपट पाहिल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला असेल. मग ते वाचुन तुम्हाला कदाचित जाणवेल की तुमच्याकडेही तशी एखाद दुसरी गोष्ट होती ज्याबद्दल तुम्हाला काही विशेष वाटत नव्हतं पण इतरांना त्यातच आनंद वाटतोय. मग असं काही करून तुम्हालाही काही काळ आनंदी वाटू शकेल. 


मी कॉलेजमध्ये असताना आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक बेसिक कोर्स (YES+) केला होता. मी तिथे शिकलेल्या एका गोष्टीचा (अनेक चांगल्या गोष्टींपैकी) माझ्यावर खूप प्रभाव पडला. 


त्या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक दिनेश भैय्या यांनी सर्वांना विचारले, "तुम्ही कधी आनंदी व्हाल?" 


सहभागी झालेल्यांनी आपापला विचार करून त्याप्रमाणे उत्तर दिले. कुणी म्हटलं की शिक्षण पूर्ण केल्यावर आनंद होईल, तर कुणी म्हटलं नोकरी मिळाल्यावर, कुणाला मनासारखी बाईक मिळाल्यावर, वगैरे वगैरे. 


मग प्रशिक्षकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले की कोणीही असे उत्तर दिले नाही की "मी आत्ता या क्षणीसुद्धा आनंदी आहे."



प्रत्येकजण आनंदी होण्यासाठी काहीतरी घडण्याची वाट पाहत होता. याचा अर्थ तुम्ही आता उदास आहात का? त्या गोष्टी होण्यापूर्वी तुम्ही आनंदी होऊ शकत नाही का? तुमचा आनंद फक्त त्या गोष्टीवर अवलंबून आहे का? डोळे उघडणारा करणारा प्रश्न होता.


जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा ही अमुक एखादी गोष्ट घडेल तेव्हा मला आनंद होईल, तेव्हा ती गोष्ट होईपर्यंत आपण आपला आनंद पुढे ढकलतो. काही गोष्टींना कमी वेळ लागतो, काही गोष्टी जसे की शिक्षण, किंवा तुमच्या मुलांचे शिक्षण व्हायला वर्षेसुद्धा लागतील. आपल्याला ते सर्व करतानासुद्धा, आयुष्यात इतर गोष्टी घडत असतानासुद्धा आनंद वाटायला नको का?


मग ते अजुन समजावून सांगायला लागले.


आनंद ही एक भावना आहे. आता या क्षणी तुम्हाला आनंद वाटू शकतो. आपण काहीतरी घडण्याची प्रतीक्षा थांबविली पाहिजे. 


तुम्ही तुमच्या आनंदाला कोणत्याही अटीपासून, कोणत्याही लक्ष्यापासून मुक्त केले पाहिजे. जरी तुम्ही कशात अयशस्वी झालात, तुमचे मन दुखावले गेले, लोक दुरावले तरीही तुमच्याकडे आनंदी राहण्याचे काही ना काही कारण असेल. 


याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्दिष्टे ठरवणे किंवा एखादा लक्ष्य ठेवणे थांबवा. तुमच्याकडे काही तरी लक्ष्य असलेच पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायलाच हवेत. पण तुमचा आनंद यावर अवलंबून ठेवू नका. 


आत्ता आहात तसेसुद्धा आनंदी रहा. जेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते साध्य करता तेव्हा तुम्हाला अधिक आनंद वाटेल. पण तुमच्या यशाची पर्वा न करता, आनंदी व्हा, आनंद पसरवा. 


जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल की तुम्ही कसे आहात, तेव्हा साधे औपचारिक "ठीकठाक" असले निस्तेज उत्तर देऊ नका. "एकदम मजेत", "झकास" असे काहीतरी जोरदार उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला आनंद वाटतो तेव्हा तुम्ही इतरांना तुमच्यासोबत हसवायला हवे.


तो कोर्स केल्यावर काही दिवस मी पण "सुपर फॅन्टास्टिक" असे काहीतरी उत्तर द्यायचो, पण नंतर लवकरच, मी आपोआप नेहमीच्या उत्तरांकडे परतलो. 


पण ही आनंदाची गोष्ट मात्र तेव्हापासून माझ्या मनात रेंगाळत राहते. माझ्या विचार करण्यामध्ये, गोष्टी हाताळण्याचा पद्धतीमध्ये यामुळे खूप मोठा बदल झाला आहे. 


यात म्हटलं तर नवं काय आहे? कोणालाही असं कोणी लेक्चर दिलं नाही तरी काही चांगलं घडलं की आनंद होणारच आणि काही वाईट घडलं की दुःख होणार, अपमान झाला की राग येणार. आणि लेक्चर दिल्यानंतरही ते होणारच. मग फरक काय.


फरक आहे. हे सगळं तर आयुष्यभर चालुच राहणार. पण एरवी आपल्या भावना ह्या नेहमी कशावर तरी प्रतिक्रिया म्हणुन येतात. आनंद नेहमी कशावर तरी प्रतिक्रिया म्हणुन होत असेल तर एक निमित्त झालं की आपण वाट बघत बसतो. 


हा विचार तुम्हाला आनंदाकडे फक्त प्रतिक्रिया नव्हे तर क्रिया म्हणुन बघायला शिकवतो. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला शिकवतो. इतर भावना घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया म्हणून येत राहतील जात राहतील, ते चालु द्या. आपली सतत चालणारी क्रिया मात्र आनंदी राहण्याची हवी. 


हा विचार राबवलात तर आनंद आत्ता या क्षणी इथेच आहे. 😊