Thursday, April 22, 2021

जीवनसाथी

काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलिप यांचा वयाच्या ९९व्या वर्षी मृत्यु झाला. राणीचे पती असूनही त्यांना राजा नव्हे तर प्रिन्सच म्हटले गेले, तो एक वेगळाच विषय. त्यांच्या शाही इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्तांकन झाले. त्यात इंग्लंडच्या राणीचा कोव्हीडच्या मर्यादेमुळे इतरांपेक्षा वेगळे आणि एकटेच बसलेला फोटो पाहुन मन हेलावले. त्या राणीचे स्वतःचे वय ९५ आहे. 

राणीच्या आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाला ७३ वर्षे होऊन गेली. ७३. माझ्या वयाच्या दुपटीपेक्षाही काही वर्षे अधिक. इतकी वर्षे सोबत काढुन शेवटी त्या साथीदाराला समोर कायमचा निरोप देताना कमालीच्या शांतपणे, धीरोदात्तपणे बसलेल्या त्या राणीला पाहुन कौतुकही वाटले आणि दुःखसुद्धा झाले. इतकी वर्षे साथ दिलेला माणुस आपण विसरत नाही, कायम मनात असतो, आठवणीत असतो, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या. पण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टीत ज्याची सवय असते त्या गोष्टी करायला सोबत तो माणुस नसतो हे ही तितकेच खरे. 

राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप (फोटो : विकिपेडियावरून साभार)

त्या दोघांच्या संसाराबद्दल काही गोष्टी वाचण्यात आल्या. दोघांनी मनापासुन एकमेकांना साथ दिली. त्यांचे तरुण असल्यापासुन ते वृद्ध होईपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगातले आणि अनेक हसरे फोटो पाहिले. असे म्हणतात कि राणी एलिझाबेथ या एरवी एकदम गंभीर, कडक शिस्तीच्या आहेत. पण प्रिन्स फिलिप सोबत असताना मात्र त्या त्यांच्या गप्पांमुळे, त्यांनी केलेल्या एखाद्या गमतीशीर टिपणीवर नेहमी हसायच्या. प्रिन्स फिलिप त्यांना हमखास हसवायचे. हे आणि अशा अनेक गोष्टी त्या राणी मिस करणार हे नक्की. 

माझ्या मनात मग जीवनसाथी या विषयावर विचारचक्र सुरु झाले. आता मी जे काही लिहितोय त्यात मला काही विशेष मांडायचंय असं नाही. फक्त या निमित्ताने आलेले विचार लिहावेसे वाटले. त्यात फार काही नवीन, मुद्देसुद असं काही नाही. फक्त मनात आलेलं व्यक्त करतोय बस. हा ब्लॉग आहेच त्यासाठी. 

काही वर्षांपूर्वी माझे आजोबा गेले. नंतर २-३ वर्षांनी माझी आजी गेली. त्यांचाही ५०-५५ वर्षे संसार झाला. आजोबा गेल्यावर आजीचा विचार करायचो तेव्हाही असे विचार येऊन गेले होते. पण ती गोष्ट तशी वैयक्तिक असल्यामुळे असं लिहिलं नाही तेव्हा. आज या प्रिन्स फिलिपच्या उदाहरणाने कदाचित हे बाकी लोकांना पण नीट समजुन घेता येईल. 

इंग्लंडची राणी-प्रिन्स फिलिप, आणि माझे आजी-आजोबा यांच्या जोडीत एक साम्य होते. प्रिन्स फिलिप सारखेच आजोबा आजीला हसवायचे. त्यांचा स्वभाव मिश्किल होता. ते आजीला नेहमी चिडवत राहायचे. आजी काही राणी इतकी गंभीर नव्हती. पण आजोबांच्या मनाने तेवढी मनमोकळी नव्हती. 

तिचा थोडा टेन्शन घ्यायचा स्वभाव होता. घरातल्या सगळ्यांचं वेळापत्रक विचारायचं. म्हणजे कोणाची ऑफिसची कॉलेजची वेळ काय, मी नोकरीसाठी बाहेर राहायला लागल्यावर माझ्या बस/ट्रेनची वेळ काय, अशा गोष्टी माहित करून घ्यायच्या. आणि मग त्याचं थोडं टेन्शन घ्यायचं. मग वेळेच्या २ तास आधीपासूनच अरे तुला उशीर होईल, अरे कधी निघतोस, असं. असंच बऱ्याच बारीक सारीक गोष्टींबद्दल. म्हणजे हे कसं होईल, ते कसं पार पडेल वगैरे. आजोबा तिला शांत करायचे, हो गं, ठीक आहे गं, तू नको काळजी करुस. पोरं करतील सगळं व्यवस्थित. 

मी वीकेंडला, सुटी असताना घरी गेलो कि थोडा वेळ खास त्यांच्या खोलीत गप्पांचा कार्यक्रम ठरलेला असायचा. मुख्य बोलणारे अर्थात आजोबा. मग आम्हाला चिडवत, आजीला चिडवत त्यांच्या काही टिपण्या चालु असायच्या. तिच्यावर काही टिपणी आली कि काही बायका नाक मुरडतात तसे तिचे एक हावभाव ठरलेले होते. आपण छान म्हणायला जसं अंगठा आणि पहिल्या बोटाचा गोल करतो, आणि तीन बोटं सरळ ठेवतो तसे करून फिरवायची आजोबांच्या दिशेने, कि "ह्यांच्याबद्दल कायच बोलावं?" 

आजी आजोबांचा जुना फोटो. आजोबांचा ७५वा वाढदिवस होता त्यावर्षी त्यांच्या लग्नाला ४९ वर्षे झाली होती. 

आजीला कौतुक होतं आजोबांचं. अशा गप्पा तिला पण आवडायच्या. ती काही काही जुन्या आठवणी रंगवुन सांगायची. तिचे काही काही किस्से आम्हाला पाठ झाले होते. तेच ती आजोबा गेल्यावर पण सांगायची, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. 

निवृत्त झाल्यावर काही वर्ष माणसं सक्रिय असतात. कुठल्यातरी संघटना, नातेवाईकांचे कार्यक्रम, मुलं नातवांची, भाच्या-पुतण्याची लग्ने ह्यात व्यस्त असतात. पण हळूहळु आरोग्य नाजुक झालं कि हे कमी होतं. मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात घटना कमी होतात, ते आपल्या पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यात जे चाललंय त्याचे प्रेक्षक बनतात. त्यांचा त्यातही सहभाग असतो, पण मुख्य भूमिका नसते. 

आजोबा असेपर्यंत त्यांना सगळ्यात फार रस असायचा, पण ते गेल्यावर आजीचा रस मला जरा कमी झाल्यासारखा वाटायचा. कदाचित माझ्या मनाचे खेळ असतील, मी त्या चष्म्यातून पाहत असल्यामुळे. मला ती नंतर जे काही दिवस होती त्यात थोडी अलिप्त वाटायची. अर्थात तिचा सगळ्यांमध्ये जीव होता, पण शेवटी सगळे आपापल्या कामांमध्ये स्वाभाविकपणे व्यस्त असणारच. आजोबांची अर्धशतकाहून जास्त जी साथ तिला लाभली, ती शेवटी काही वर्ष नव्हती. 

आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात, आई बाबा, बहीण भाऊ, जवळचे मित्र मैत्रिणी इ. पण जीवनसाथी का वेगळा असतो? कारण त्या व्यक्तीसोबत आपण आपलं जास्तीत जास्त आयुष्य घालवतो. 

अनेक गोष्टी ह्या व्यक्तीशिवाय बाकी कोणाशी शेअर होत नाहीत. आपल्या ऑफिसात काम न करता सुद्धा घरी गेल्यावर कधी ऑफिसात ताण आहे, कधी चांगलं चाललंय हे त्या व्यक्तीला माहित असतं. पण तेच कोणी तिसऱ्याने विचारलं कि आपण काय म्हणतो? "बस, चाललंय रुटीन." 

"मला हा अमका असं म्हणाला, तमक्याला मी असं म्हणालो, आता पुढचे २ आठवडे खुप जास्त काम असणार आहे" इतक्या बारीक सारीक गोष्टी प्रत्येक जवळच्या व्यक्तीला सांगायला आपल्याला, आणि ऐकायला त्यांना वेळ नसतो, आणि गरजही नसते तशी. पण जीवनसाथी जो असतो, त्याला हे सगळं समजतं. 

आज कोणी तरी माझं कौतुक केलं, आज मस्त वाटतंय, हे खावं वाटतंय, थोडं फिरावं वाटतंय, इतक्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण ह्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. 

त्या व्यक्तीला आपल्या बारीकसारीक सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी, कुठल्या प्रसंगात आपण कसं वागणार, कशाला कशी प्रतिक्रिया देणार हे चांगलं माहित असतं. तेही अंदाज चुकतात कधी कधी, किंवा अंदाज बरोबर असुनही मतं वेगळे असल्यामुळे वाद होतात. 

जीवनसाथीला सगळं समजतं म्हणजे सगळं पटतं असं नाही. पण पटलं नाही तरी समोरचा कशा पद्धतीने विचार करतोय, त्याचं कारण काय हे तरी समजतं. 

मी सारखा जीवनसाथी हा शब्द वापरतोय, नवरा बायको नाही. कारण सगळेच नवरा बायको जीवनसाथी असतात असं नाही. आपल्या संस्कृतीमध्ये, समाजामध्ये लग्न हि जी संस्था आहे, त्या संस्थेने नवरा बायको हे एक नातं निर्माण केलंय, आणि त्यातल्या दोघांना फार टिपिकल भूमिका दिल्यात. ठरवुन नाही, पण तशी पद्धत पडली आहे. 

सात फेरे घेताना आजकाल गुरुजी प्रत्येक फेऱ्याचा अर्थ सांगतात. त्यातल्या बहुतांश शपथा, वचने हे खरं तर जीवनसाथी बनण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी आणि साथ देण्यासाठी असतात. 

आधीच्या काळी किती गुरुजी सांगत होते माहित नाही, आणि आज जरी ते सांगत असले तरी गदारोळ इतका असतो, कि पाहुणे, मुहूर्त, फोटो ह्या नादात ज्या विधींसाठी आपण इतका खर्च करतो त्याच्या गाभ्याकडे कितपत लक्ष असतं कोणास ठाऊक. 

त्यामुळेच अनेकजण नवरा बायको होऊनही जीवनसाथी होत नाहीत. तरीही परंपरा म्हणुन किंवा नाईलाज म्हणून किंवा आणखी कोणत्या कारणाने आपली गाडी ओढत राहतात. 

मी भाडीपाचे सारंग साठ्ये आणि पॉला यांची एक मुलाखत पाहिली होती. त्यांना त्यांच्या नात्याबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलं कि आम्हाला लग्न नवरा बायको यात रस नाही, पण आम्ही एकमेकांना जीवनसाथी म्हणतो. 

नवरा बायको म्हणा, लिव्ह इन रिलेशनशिप असेल, किंवा आजकाल ज्याबद्दल जागरूकता वाढतेय, जगभरात स्वीकारार्हता वाढतेय असे समलैंगिक जोडपे असतील. नात्याला लेबल कुठलं का असेना, जीवनसाथी असं म्हणूनही तसं वागलं नाही तर काही अर्थ नाही. ते जीवनसाथी नाही तर जीवनभराचं लोढणं होतं. 

ह्या व्यक्तीला मला आयुष्यभराची साथ द्यायची आहे आणि ती व्यक्तीसुद्धा मला तशीच साथ देणार आहे, हि इच्छा असणं, हा विश्वास असणं आणि त्यानुसार वागणं म्हणजे जीवनसाथी असणं. हे एकदा लग्न करून, एकदा कुठली शपथ घेऊन करता येत नाही. सतत साथ देणं, एकमेकांना आधार देणं हे आयुष्यभर करावं लागतं. मी म्हणताना हे करावं लागतं असं म्हणतोय, पण जीवनसाथी मानलं कि करावं लागतं असं मनात येत नाही, करावं वाटतं. 

बहुधा ७ हॅबिट्स या पुस्तकात मी एक छान संकल्पना वाचली होती. त्या लेखकाकडे अनेक जोडपी यायची आणि सांगायची There is no love between us anymore. मग तो लेखक त्यांना सांगायचा कि, Do you realize that love is not just a noun but also a verb in English?

म्हणजे प्रेम ही काही बाटलीबंद वस्तु नाही कि ती एक दिवस संपेल. प्रेम हि करायची गोष्ट आहे. आपण ते करायचं थांबवतो तेव्हा ते संपतं. आणि प्रेम करायचं म्हणजे काय हि काही एका व्याख्येत बसणारी गोष्ट नाही. प्रत्येक नात्यात त्याचा अर्थ वेगळा असतो. आई बाबांसाठी प्रेम वेगळं, ते व्यक्त करण्याची त्यांच्यासाठी काही करण्याची पद्धत वेगळी, मित्रांशी वेगळी, बहीण भावांशी वेगळी, आणि जीवनसाथीशी सुद्धा वेगळी. 

जीवनसाथी असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जण असलाच पाहिजे असं नाही. व्यवसायामध्ये भागीदारी असली तरी आपलं कौशल्य, रस ह्यानुसार जबाबदाऱ्या ठरतात, काही गोष्टी सोबत कराव्या लागतात, काही गोष्टी एखादा भागीदार एकटाच करतो. पण ते आपापलं काम नीट करत असतील, आणि दुसऱ्याला पाठिंबा देत असतील तर व्यवसाय चांगला चालतो तेच ह्या नात्यात आहे. 

माझे दोन्हीकडचे आजी आजोबा, आई बाबा, काका काकु अशा संसारात मुरलेल्या जोड्या पाहिल्या कि नवरा बायको असण्यासोबतच जीवनसाथी असणं म्हणजे काय हे समजतं. ते नवरा बायको या रूढ भूमिकेत असलेल्या गोष्टीही करतात, पण जीवनसाथी म्हणुन एकमेकांना जपतात, प्रत्येक गोष्ट स्वतःला आवडत नसली तरी दुसऱ्याला आवडते, किंवा तशीच लागते हे समजुन घेऊन सोबत करतात. 

आपल्याकडे अरेंज्ड मॅरेजेस बऱ्याच प्रमाणावर होतात, आणि लव्ह मॅरेज झालं तरीही ह्या नात्याबद्दल काही स्पष्ट विचार नसतो. माझं लग्न झालं तेव्हा माझ्याही डोक्यात इतके विचार नव्हते. नवरा बायको पासुन ते जीवनसाथी होईपर्यंत वेळ लागु शकतो. 

पारंपरिक पद्धतीत स्त्रियांचं बायकांचं स्थान नेहमीच दुय्यम असतं. अनेक माणसांना बायकोच हवी असते, जीवनसाथी नाही. काही कुटुंबांमध्ये बाकी लोकांचा बायकांना त्याच त्या गोष्टीत बांधुन ठेवण्याचा फार मोठा हात असतो. अशा वातावरणात त्या लोकांना बायकांना जीवनसाथी न बनवुन, त्यांना समान दर्जा (त्यांचा हक्क) न देऊन आपण काय गमावतो हे समजणं शक्यच नाही. 

अशा नात्यांची सुरुवात करणाऱ्या आणि त्यात आधीच असणाऱ्या प्रत्येकाने विचार करावा कि आपण एकमेकांसाठी फक्त लग्न लावुन दिलेले नवरा बायको बनुन राहतोय का आपण त्यापेक्षा अधिक काही होऊ शकतो? 

ह्या लेखात माझा भर अर्थात नवरा बायको वरच आहे. कारण जीवनसाथी मिळण्याची आणि बनण्याची सर्वात जास्त शक्यता तिथे असते. लग्न करण्याचा उद्देशच तो असला पाहिजे. पण ते वयात आलं कि केलंच पाहिजे म्हणुन केलं जातं आणि हा विचार केला जात नाही. काही जणांची लॉटरी लागते आणि ते जीवनसाथी बनतात. काही जणांची नाही लागत. किंवा लागुनही अनेक वर्षांनी साथ सुटते. दोघांपैकी कोणी तरी आधी जाणारच आणि ती वेळ सांगुन येत नाही. 

जीवनसाथी फक्त नवरा बायकोच होऊ शकतात का? ज्या ज्या नात्यात आपण झोकून देतो, प्रेम करत राहतो, आयुष्यभर साथ देत राहतो, ते सगळेच जीवनसाथी. नवरा बायको असणं वेगळं आणि जीवनसाथी असणं वेगळं हेच मला म्हणायचं आहे. त्याच नात्यात जीवनसाथी मिळाला तर भाग्यच. पण त्याव्यतिरिक्त सुद्धा जीवनसाथी असु शकतात. त्यामुळे जिथे प्रेम आहे ते प्रत्येक नातं जपलं पाहिजे, त्या माणसांना मनापासुन साथ दिली पाहिजे. 

आयुष्यात येणारा प्रत्येकजण जीवनसाथी असु शकत नाही. आपण भरपुर जणांसोबत आयुष्यातले प्रसंग शेअर करतो, अनेकजण आपली मदत करतात, आपण अनेकांची मदत करतो. पण आयुष्य शेअर करावं अशी माणसं कमी असतात. अशा लोकांना ओळखता आलं तर छान. 

मी आधीच सांगितलं तसं मला काही फार नवीन आणि मोठे मुद्दे मांडायचे नव्हते. फक्त आजूबाजूच्या निरीक्षणातुन, विशेषतः माझे आजी आजोबा गेल्यानंतर मनात आलेले विचार, जे आत्ता प्रिन्स फिलिप गेल्यानंतर पुन्हा यायला लागले ते व्यक्त करायचे होते. तुम्हाला त्यातलं काही पटलं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जीवनसाथी मिळावेत आणि तुम्हीही इतरांसाठी बनावे यासाठी शुभेच्छा!